नि:शब्दता

Submitted by भुईकमळ on 29 January, 2015 - 02:59

रात्रंदिन उरी कवटाळुन धरलेले शब्दांचे थवे
डायरीच्या चिटोरयांसारखेच
सांजवा-यावर भिरकावताना
आवंढून येते गळयाशी
जन्मभराची अगतिकता ...

स्वप्नात खोल बुडवणारया रात्रतळाशी
देहातली धुगधूगती तगमग गाडून टाकताना
चुकून सुटलेल्या उच्छवासानेच का
ढळते एखादे चांदणफुल झळ लागून
अनिर्बन्ध पसरलेल्या जलपर्णीच्या पसारयात ...

कुरतडत रहातो मेंदूला रातकिड्यांचा कोरस स्वर
हिवाळाबाधीत झाडांच्या पोकळीतून येणारां
नी बघता बघता
अवेळीच होउन जातात
रक्तातल्या नद्या, संयमीत शुभ्र बर्फवाटा
नि;शब्दतेची धुकाळ दुलई पांघरलेल्या .,
कळत नाही कधी संपून गेला तो मनभावन ऋतू
रात्र रात्रभर मेणबत्तीच्या अन्धुक प्रकाशात
निथळत ..वितळत....कविता लिहीण्याचा .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितांत तरलसुंदर.
>रात्रंदिन उरी कवटाळुन धरलेले शब्दांचे थवे
डायरीच्या चिटोरयांसारखेच
सांजवा-यावर भिरकावताना..>>
हे अगदी असंच अनुभवलं आहे, शब्दांकितही केलं आहे. पुन्हा डसलं.

कळत नाही कधी संपून गेला तो मनभावन ऋतू
रात्र रात्रभर मेणबत्तीच्या अन्धुक प्रकाशात
निथळत ..वितळत....कविता लिहीण्याचा .<< व्वाह.

तगमग आणि निःशब्दता पोचते आहे.
आणि शेवटापर्यंत येता येता अगदीच अस्वस्थ आणि निःशब्द व्हायला होतंय . ही लिखाणाची ताकदच म्हणायची. Happy

भारतीजी आणि सुशांतजी, धन्यवाद कोणत्या शब्दात द्यावेत असा मलाच प्रश्न पडला इतका तुम्ही अनपेक्षित भावस्पर्शी प्रतिसाद दिलात.खरच खुप खुप आभारी आहे आपल्या स्नेहल शब्दान्ची.