घरपोच भाजीपाला व्यवसाय- सल्ला हवा आहे

Submitted by टोच्या on 28 January, 2015 - 06:17

बहुतांश लोक दारावर जो येतो तो भाजीपाला घेतात किंवा तो खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा मंडईत जावे लागते. बहुतांश वेळा हा भाजीपाला दुय्यम दर्जाचा असतो. कारण प्रथम दर्जाचा माल बाजारसमितीतून इतर राज्यांत किंवा परदेशांत जातो. त्यामुळे जो मिळेल, तोच भाजीपाला बहुतेकांना खावा लागतो. यासाठी माझ्या डोक्यात गेल्या सहा-सात वर्षांपासून शेतकऱ्यांकडून घेऊन ताजा भाजीपाला ग्राहकांना घरपोच देण्याची कल्पना आहे आणि यात जम बसल्यास हाच व्यवसाय पुढे वाढविण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे अर्धा दिवस वेळ असतो. पुढे मी पूर्णवेळ त्यात उतरण्याचे ठरविले आहे. कारण भविष्यात भाजीपाल्याची मागणी कधीच कमी होणार नाही. नाशिकमध्ये याआधीही एका कंपनीने असा प्रयोग सुरू केला आहे. पण लोकांची वाढती संख्या आणि मागणी पाहता यात खूपच स्कोप असल्यासारखे वाटते. भाजीपाल्याची ऑनलाइन किंवा व्हॉट्स अॅपवर माहिती नोंदवून तो घरपोच पोहचविण्याची योजना आहे. असा व्यवसाय याआधी कुणी केला असल्यास त्यातले फायदे, तोटे, धोके काय आहेत, याविषयी चर्चा करता येईल. तसेच या ‌व्यवसायाला पुढे खरेच किती स्कोप आहे, यात आणखी काय नवीन करता येईल याबद्दलही जाणकारांकडून माहिती मिळू शकेल. कृपया यासंदर्भात मायबोलीकरांनी आपले अनुभव शेअर करावेत, सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन

नक्क्की चालु करा. भारतातल्या कोणत्याही शहरात चालेल. मुंबईत आहे काही तरुण कॉलेजच्या मुलांनी चालु केली आहे. त्यांची वेबसाईट देखील आहे. घरपोच आणुन देतात. नवरा बायको दोन्ही कामावर असले की भाज्यांचा फार प्रोब्लेम होतो. विशेषतः बायकांना. नवरा येताना बाजारातुन आणुन देतो पण नंतर साफ करणे, निवडणे चिरणे यात बराच वेळ जातो. निवडुन साफ करुन मेथी शेपु बंद प्लास्टीकच्या थैल्यातुन दिले तरी चालतील Happy

टोच्या, खुप चांगली कल्पना आहे. त्यात तुम्ही नाशकात आहात म्हणजे भाजीपाल्याची कमतरताच नाही!
खुद्द नाशिकमध्ये कितपत स्कोप आहे याची कल्पना नाही. माझ्या डोळ्यासमोर १२ ते १५ वर्षापूर्वीचं नाशिक (आणि तेथील लोकांची मानसिकता) आहे. पण आता नक्कीच खुप मागणी असणार. इंडस्ट्रियल एरिया मध्ये काम करणाऱ्या महिलांना असा भाजीपाला कंपनी सुटण्याच्या वेळी देऊ शकलात तर खुप मदत होईल.
याशिवाय तुम्ही मुंबईला असा भाजीपाला पाठवू शकतात.शिवाय परदेशातही पाठवू शकता. इथे भारतीय दुकानांत भारतातल्या सगळ्या भाज्या frozen स्वरुपात मिळतात. असा काही विचार करता येईल का? अर्थात परदेशात फ्रोजन स्वरुपात भाज्या पाठवायाच्या झाल्यास बरेच परवाने, पेपर वर्क आणि खर्च आहे.
तुम्हाला शुभेच्छा!

वत्सला,
आताचं नाशिक बरंच बदललंय. बऱ्यापैकी समृध्दता आलीये. उपनगरांमध्ये लोकसंख्याही भरपूर वाढली आहे. त्यामुळे सुरुवात मी माझ्या परिसरापासून अगदी वीस घरांपासून करणार आहे. भाजीपाला विकणारे उघड्यावर बसतात, शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे आणि मग फिरत्या विक्रेत्यांकडे असा बराच मोठा प्रवास त्या भाजीला पूर्ण करावा लागतो. त्यामुळे ती कितपत खाण्यायोग्य आणि ताजी राहते हा प्रश्न आहे. त्यामुळे मी अगदी नियोजनपूर्वक, स्वच्छतेचा, पॅकिंगचा सर्व विचार करून अगदी आधुनिक पध्दतीने हा व्यवसाय करण्याचे ठरविले आहे. भविष्यात थेट रेडी टू कूक म्हणजे निवडलेल्या भाज्या देण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांकडून माल घेतल्यामुळे अगदी दारावरच्या भाजीच्या भावात किंबहुना त्यापेक्षा एखादा रुपया जास्त भावात मला या भाज्या पुरवता येऊ शकतील.

नविन व्यवसायासाठी शुभेच्छा.

असा एक उपक्रम आमच्या इथे झाला होता. त्यांचे पत्रक आले होते की अमुक ठिकाणच्या शेतकर्‍यांनी मिळून असा व्यवसाय सुरु केला होता. फोन वर / इमेलने ऑर्डर द्यायची व दर दोन दिवसांनी एकदा ते हवी असलेला भाजीपाला व फळे सोसायटीमधे घेऊन येणार. तिथे जाऊन पैसे देऊन पिकअप करायची. इथुन सुरुवातीला दोन चार वेळा भाजी घेतली पण यांचे व्यवसायाचे मॉडले बनवताना खुपच तृटी होत्या. त्यामुळे नंतर काही घेतले नाही.

सुरुवातीला जे पत्रक आणि वेबसाईट दाखवली त्यात भाज्यांचा दर लिहीला होता तरी तो नेहेमीच्या मार्केट रेट प्रमाणे बदलेल असे लिहीले होते. पण प्रॉब्लेम असा की रोजचे बदलणारे दर कुठेच लिहीलेले नसायचे. म्हणजे मी आज एखादी भाजी ऑर्डर केली तर कितीला पडेल हे माहित नसायचे. ते भाजीची पिशवी डिलीवर करायला आणल्यावरच कळणार म्हणे. एकदा या प्रकारात २५ रुपयाची मेथीची जुडी घ्यावी लावली आणि इथुन ऑर्डर करणे बंद केले.

माझ्या मते ( चुकीचे असल्यास दुरुस्त करा प्लिज) शेतातुन मार्केटमधे माल नेल्यावर तिथे लिलावात किंमत ठरते. ती त्यावेळची किंमत असते. ती कधी जास्त, कधी कमी असु शकते. पण जर डायरेक्ट शेतातुन माल रिटेलमधे विक्रीसाठी जात असेल आणि विक्रेता हा शेतकरीच असेल तर मालाची किंमत शेतकर्याने ठरवलेली असायला हवी. ती दर दिवशी अशी आर्बिटरी बदलायची खरंच गरज आहे? अगदी कमी किंमत ठेवू नका हे मान्य, पण मधले होलसेलर , रिटेलर सगळे गायब असतानाही अतिशय महाग ( कधी कधी बाजारभावापेक्षा) भाजी असण्याचे कारण समजले नव्हते.

तेव्हा आलेल्या अनुभवावरुन काही सजेशन्स.
१ - ऑर्डर इमेल, वेबसाईट, फोन वरुन देता यावी.
२- ऑर्डर देतानाच भाजीचा दर,एकुण किती किंमत होईल हे माहित असावा.
३- शक्य तितकी ताजी भाजी डिलीवर व्हावी.
४- भाजी पोहोचवताना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये / कमीत कमी व्हावा. कापडी बॅग्स/ वर्तमानपत्राच्य छोट्या कागदी पिशव्या वापरात आणता येतील.
५- भाजीचे पेमेंट कार्ड/ ऑनलाईन किंवा सिओडी असे ऑप्शन असावेत. रोजच्या रोज दरवाज्यावर भाजी घेऊन आलेल्याला सुट्टे पैसे शोधुन देणे जरा त्रासाचे होते.
६- डिलीवरी चा दिवस आणि टाईम स्लॉट निवडता यावा.
७ - स्वच्छ ( खरोखरच) धुवून निवडलेल्या भाज्यांचा ऑप्शनही असावा. यासाठी एखाद्या बचत गटाला हाताशी धरता येईल.

सावली,
आपण केलेल्या सूचना खरोखरच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
<<माझ्या मते ( चुकीचे असल्यास दुरुस्त करा प्लिज) शेतातुन मार्केटमधे माल नेल्यावर तिथे लिलावात किंमत ठरते. ती त्यावेळची किंमत असते. ती कधी जास्त, कधी कमी असु शकते. पण जर डायरेक्ट शेतातुन माल रिटेलमधे विक्रीसाठी जात असेल आणि विक्रेता हा शेतकरीच असेल तर मालाची किंमत शेतकर्याने ठरवलेली असायला हवी. ती दर दिवशी अशी आर्बिटरी बदलायची खरंच गरज आहे? अगदी कमी किंमत ठेवू नका हे मान्य, पण मधले होलसेलर , रिटेलर सगळे गायब असतानाही अतिशय महाग ( कधी कधी बाजारभावापेक्षा) भाजी असण्याचे कारण समजले नव्हते. >>
शेतकऱ्यांकडून जरी माल घेतला, तरी बाजारात त्या वस्तूचा पुरवठा किती आहे, यावरून किंमत कमी-जास्त होत असते. समजा मार्केटमध्ये मेथीची जुडी जर वीस रुपयांना असेल, तर तो शेतकरी आपल्याला दहा रुपयांना देण्याऐवजी मार्केटमध्ये विकून येईल. त्यामुळे मार्केटमध्ये जे दर आहेत, त़्याच्या आसपासच दर शेतकऱ्यांनाही द्यावा लागेल. पण आपण देणारा दर हा मार्केटपेक्षा कमी असेल, एवढे मात्र नक्की.
ऑर्डर देताना ग्राहकांना दर माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी व्हॉट्स अॅप या पर्यायाचा वापर करता येईल. कारण वेबसाइट, ई-मेल सर्वच लोक बघतील असे नाही. जे नियमित ग्राहक आहेत, त्यांना सर्वांना सकाळी त्या दिवसाचे भाज्यांचे दर व्हॉट्स अॅपवर टाकता येऊ शकतील. शिवाय ऑर्डर नोंदविण्यासाठीही वेबसाईटपेक्षा व्हॉट्स अॅप आणि मिस्ड कॉल या दोन पर्यांयाचा मी विचार करतोय. वेबसाईटही असेलच. ताज्या भाज्यांचे म्हणाल आदल्या संध्याकाळी काढलेल्या भाज्या रात्रीच शेतकरी बाजारात आणतात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्या घेता येऊ शकतात. किंवा शेतकऱ्यांना सांगून ते मार्केटमध्ये नेण्याऐवजी जास्त क्वांटिटी असेल तर आपल्याकडेच आणून देऊ शकतात. त्यामुळे पॅकिंगला आणि डिलीव्हरीला जो वेळ लागेल, तेवढा. साधारणतः सात- ते आठ तासांत ग्राहकाच्या दारात भाजी पोहचू शकते. अशी ती दोन दिवसांनी पोहचते. मी वरती म्हटलेच आहे की भविष्यात रेडी टू कूक म्हणजे निवडलेल्या भाज्या देण्याचा विचार आहे. त्यामुळे अशा वेळी बचतगट किंवा सोसायटीतील रिकाम्या बायकांच्या हातांना काम देता येऊ शकेल.

स्वच्छ आणि नीटनेटके डिलीव्हरी बॉईज मस्ट.

गुटखा खाउन रंगलेले दात दाखवत,/ तोंडात तंबाखूचा बार भरुन शर्टची पहिली बटणे उघडी टाकत भाजी घरी द्यायला आलेले डिलीव्हरी बॉईज नको. डोक्यात जातात.

उत्तम कल्पना.. मला वाटतं डोंबिवलीत असा व्यवसाय होत असतो. निदान पुर्वी तरी होता.
भाजीची ऑर्डर आधी घेणे किंवा आज उपलब्ध असलेल्या भाजीची माहिती देणे या दोन्हीसाठी व्हॉट्स अप चा उपयोग व्हावा. जर शेतकर्‍यांशी थेट संपर्क होत असेल तर त्याच्या शेतात असलेली भाजी कधी काढणीसाठी तयार होणार आहे त्यानुसार आगाऊ मागणी नोंदवता आली तर शेतकर्‍याचाही माल फुकट जाणार नाही.

अतरंगी,
अगदी खरंय. यासाठी काम करून शिक्षण घेणारे गरजू मुला-मुलींना पार्ट टाइम संधी देता येईल. डिलीव्हरी, संवाद, वागणे-बोलणे याबाबत त्यांना काही नियम घालून दिले जातील. तसे ट्रेनिंग द्यावे लागेल.
दिनेशदा,
एकच शेतकरी नव्हे तर अनेक शेतकऱ्यांशी संपर्कात राहून सर्वच भाज्या उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. त्यासाठी विविध भागांतील शेतकरी, बाजार समितीतील होलसेलर्स यांच्याशी संपर्क ठेवावा लागेल. कारण आपल्याकडे न पिकणाऱ्या भाज्या, फळे, बटाटे होलसेलर्सकडून विकत घेण्याचा विचार आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी असल्यामुळे बाराही महिने हिरव्या भाज्या उपलब्ध असतात.फक्त उत्पादनानुसार त्यांचे दर कमी-अधिक होत असतात.

सुनिधी- धन्यवाद.

हे पहा.
http://www.naturesbasket.co.in/

एकच लक्षात ठेवा कि जर तुमच्या सारखी प्रॉडक्ट्स/सर्विसेस इतरही देत असतील तर तुमच्याकडे काही वेगळे, युनिक, जे दुसरे कोणीही ऑफर करत नाहीत असे काहीतरी असायला हवे.

पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा!

उत्तम कल्पना. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

इथे इंग्लंडात आम्ही इथून भाज्या घेतो. दर आठवड्याला जे पिकले असेल, इन-सीझन असेल त्याप्रमाणे भाज्या येतात. उदा. आज आलेला हा बॉक्स. ही कंपनी / हा शेतकरी मनुष्य आणि त्याची टीम फक्त आमच्या भागात काम करतात. कारण त्यांची शेते या भागात आहेत. आपल्याला वेगळ्या भाज्या हव्या असल्यास तीन दिवस आधी मागणी नोंदवावी लागते. आठवड्याच्या ठराविक दिवशी ठराविक भागात त्यांची गाडी जाते. पैसे थेट बँकेतून जातात. बाजारभावापेक्षा थोडे महाग पडते कधी कधी. पण भाज्या चविष्ट असतात. आणि शेतकर्‍याला मदत केल्याचे समाधान मिळते. म्हणून आम्ही घेतो. Happy

धन्यवाद मनस्मी.
ही संकल्पना ना‌शिकला यापूर्वी सुरू करण्यात आली होती, पण योग्य नियोजनाअभावी बंद करण्यात आली. इतरांपेक्षा युनिक पध्दतीने देण्याचा नक्कीच प्रयत्न राहील. लींक दिल्याबद्दल धन्यवाद.

मृदुला,
ही व्हेजबॉक्सची आयडिया चांगली आहे. त्या धर्तीवर काही करता येते का याचा नक्की विचार करीन. धन्यवाद.

शेतकरी -ट्रांसपोर्टवाले - मार्केट यार्डातील आडते - मोठे व्यापारी + छोटे व्यापारी - ट्रांसपोर्टवाले - किरकोळ विक्रेते - ग्राहक
ही सध्याची ऑपरेटींग लि़ंक प्रचलित आहे. यात तुम्हाला " मार्केट यार्डातील आडते - मोठे व्यापारी + छोटे व्यापारी - ट्रांसपोर्टवाले - किरकोळ विक्रेते " या सगळ्यांच काम करायचय. तरच तुम्हाला हव ते यश मिळु शकेल. हे अवघड नाहीये पण वाटत तितक सोप पण नाहीये.
१. खात्रीशिर चांगल्या मालाचा पुरवठा होणे
२. पॅकिंग
३. डिलिव्हरी
यात २ आणि ३ थोड्याफार अनुभवाने जमु शकते. पण १ जमुन येण्यासाठी खुप मेहनत आणि चिकाटी लागते. बर्‍याच जणांनी हे चालु करुन बंद केलेल पाहिल आहे कारण १ वर त्यांना काम करायलाच जमल नाही.
* खात्रीशिर चांगल्या मालाचा पुरवठा होण्यासाठी
१. तुम्ही ज्या शहरात हा व्यवसाय करणार आहात तिथे जवळपास तुमची स्वतःची जमिन आहे का? असल्यास भाजीपाला करण्याची शक्यता किती? हे तपासुन पहा. शेतात भाजीपाला करताना खुप लक्ष घालावे लागते.
२. जर तुमची स्वतःची शेती नसेल तर काँट्रॅक्ट पद्धतीने शेती करु शकता का? यालाच बोली भाषेत ठोक्याने शेती करणे म्हणतात. म्हण्जे शेतकर्‍याला वर्षाला ठराविक रक्कम देउन तुम्हीच ती शेती करणे.
यामुळ तुम्हाला काही प्रमाणात खात्रीशिर पुरवठ्याची सोय होईल.
तरीही तुम्हाला कांदा / बटाटा / मटार यासारख्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबुन रहाव लागेल.
मला वाटत तुम्ही सुरवात ओळखीच्या हॉटेल्सना ना नफा ना तोटा वर पुरवठा सुरु करण्यापासुन करावी. यात तुम्हाला मार्केट काम कस करत हे पण कळेल. शेतकर्‍यांबरोबर काँटॅक्ट तयार होऊ शकतील. मग तुम्ही किरकोळीच्या मार्केटकड जाउ शकाल.
हे माझ वैयक्तिक मत आहे.

सुशांत,
तुमच्या सूचना खूपच अभ्यासपूर्ण आणि अचूक आहेत. या गोष्टींचा विचार करणे आवश्यकच आहे. मी स्वतःही शेतकरी आहे. नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर माझा भाऊ ठेका पध्दतीने शेती करतो. त्यामुळे त्याचाही मला फायदा होईलच. एकदा का शेतकऱ्यांना त्यांचा माल उचलण्याची हमी मिळाली, की ते आपल्यासाठी आपल्याला हवं ते पीक देऊ शकतील. बाजारापेक्षा आपल्याकडून शेतकऱ्यांना किमान भावाची तरी हमी असेल. कारण बहुतेक वेळा बाजारात शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. खात्रीशिर मालाचा पुरवठा करण्यासाठी अनेक शेतकरी मित्रांचीही मदत होऊ शकते. आणि विशेष म्हणजे माझ्या घरापासून अवघ्या दोन- तीन किलोमीटर परिसरात भरपूर शेती आहे. त्यामुळे ऐनवेळी त्याचाही फायदा घेता येईल. धन्यवाद.

टोच्या खुप खुप शुभेच्छा.....
मी पण शेतकरी आहे. माझी शेती पुण्यापासुन बरीच दुर आहे आणि मी फक्त शनिवार रविवार शेतावर असतो त्यामुळ मी भाजीपाल्याचा विचार करत नाही.

व्यवसाय सुरु करायच्या आधी एखादा मेंटर मिळाला तर बघा. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या नेटवर्क व अनुभवाचा फायदा होईल. थोड्या काळात जास्त प्रगती कराल. तसेच सुरुवातीला जर भांडवलासाठी कर्ज किंवा मशीन्स वगैरे घ्यावे लागणार असेल तर त्यात मेंटर मदत करतात. व्यवसायाचा इतर भाग जसे हिशेब ठेवणे, महिना दोन महिने नंतर विस्ताराच्या योजना करणे ह्या सगळ्यात एखादा अनुभवी (आणि निरपेक्ष) मेंटर पाठीशी असणे उपयोगी ठरू शकते.

अनेक शुभेच्छा!

मस्तं कल्पना.
मृदुला, तू दिलेल्या लिंकमधला व्हेज बॉक्स भारी आहे.

टोच्या, नविन व्यवसायाकरिता शुभेच्छा!

सिमंतिनी,
मेंटर मिळाला तर नक्कीच फायदा होईल, हे खरेच. पण, नाशिकमध्ये मेंटर कितपत उपलब्ध होईल, याविषयी शंका आहे. पण नक्कीच प्रयत्न करेन. तसेही सुरुवातीला मी अगदी वीस-पंचवीस घरांपासून सुरू करणार आहे. त्या प्रतिसादानुसार पुढे कसा विस्तार करायचा हे ठरवता येईल. त्यामुळे सुरुवातीलाच खूप भांडवल, मशिनरी वगैरेंची आवश्यकता पडणार नाही, असे वाटते.
साती, धन्यवाद.

व्यवसाय सुरु करायच्या आधी तो कुठल्या भागात किम्वा कुठली शहरं इथे उपलब्ध असणार ते पहा.

आधी पत्रकं वाटून तिथल्या भागातल्या घरांतील लोकांना फीडबॅक द्यायला सांगितला तरी चालेल.

एक प्रश्ण मालिका बनवा.
आणि मगच काय तो पैसा गुंतवा मूळ धंद्यात.
बर्‍याच वर्षापुर्वी, माझ्या मामांनी(१९८० मध्ये का काय ते) नायलॉनच्या मटेरीयलचा धंदा सुरु केला. पण पबलिक त्या काळी कॉटनलाच ज्यास्त विकत घेत. आता अश्या ठिकाणी दुकान उघडले जिथे लोकांची आवड कॉटनच आहे तिथे. दुसरे म्हणजे त्याचवेळी नायलॉन उत्पादनाचा काहितरी घोळ झालेला भारतात. मग पुन्हा त्याची उत्पादनात चढ वाढली, पण मामाचा अंदाज चुकला पण त्याने ते गोदामात ठेवले व बाहेर विकणार्‍या डिलरला पकडले. तेव्हा सर्व बाजूंनी विचार करा.
असो,

तर आधी लोकांची आवड आणि कुठल्या भागात सर्विस देणार त्यावर ठरवा. लोकं मिळणार का डिलीवरी करायला ते ही बघा. मग पैसा गुंतवा. भाजी सबंधित आहे तेव्हा ताजेपणा कसा टिकवायचा ते आधी शिकून घ्या. मशिनी बद्दल जाणून हि घ्या थोडंफार नाहितर तशी लोकं मिळतात का बघा. कित्येक वेळा फ्रीजर बिघडतात. आणि नुकसान होते.

तुम्हाला शुभेच्छा.

Pages