हॉस्टेल लाईफ आणि नवरस

Submitted by बावरा मन on 27 January, 2015 - 01:44

हॉस्टेल ला राहाण हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो . हॉस्टेल लाईफ बद्दल एकदम वाईट अनुभव असणारे लोक आणि एकदम भन्नाट अनुभव असणारे लोक असे दोन गट . अधल मधल काहीच नाही . सुदैवाने मी दुसर्या गटात मोडतो . खालचे अनुभव माझे असले तरी थोड्या फार फरकाने हॉस्टेल मध्ये राहिलेल्या प्रत्येकाचेच .

हास्य रस - माझ इंग्रजी तेंव्हा यथातथाच होत . छोट्या शहरामधून आल्यामुळे mannerism चा पत्ता नव्हता . सकाळी शिक्षकांना आल्या आल्या good morning म्हणायचे असते हे नुकतेच कळले होते . एकदा रात्री रस्त्यावर फिरताना रेक्टर सर भेटले . त्याना बघितल्या बघितल्या मी 'Good Night Sir ' म्हणून मोकळा झालो . सरांनी दुसऱ्या दिवशी केबिन मध्ये बोलावून दंड ठोठावला . 'प्रश्न पैशांचा नाही . पण Good Night हे निरोप देताना म्हणायचे असते हे तुझ्या मठ्ठ डोक्यात शिरले पाहिजे . " सरांनी दंड का या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . गरवारे कॉलेज हॉस्टेल नदी काठी आहे . अकोल्याच्या सुमित केडिया ने हि नदी गंगा नदी आहे असे सांगत आमच्याशी तासभर वाद घातला होता . नवीन पोरांचा 'इंट्रो ' घ्यायला रुबाबात आम्ही निघालो आणि त्या मोकार ज्युनियर पोरांनी आमचाच इंट्रो घेतला होता . आज ती पोर मित्र बनली आहेत पण अजूनही तो इंट्रो चा प्रसंग आठवला की हसू येत .

बीभत्स रस - हॉस्टेल लाइफ़ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा रस . आमच्या हॉस्टेल ची मेस लावणे सगळ्यांना सक्तीचे होते . त्यामुळे झक मारून तिथच जाव लागायचं . मेस चा मालक भाऊ च एक लाडक मांजर होत . त्याला हाड हुड कुणी केलेलं पण भाऊ ला खपायच नाही . त्यामुळ ते मांजर कुठेही फिरायचं आणि पडायचं . एकदा त्याला मी आणि माझ्या मित्राने कोबी च्या गड्ड्यावर प्रतीर्विधी उरकताना बघितलं होत . त्याच दिवशी पानात कोबी ची भाजी आली . मी आणि मित्र सटकलो काहीतरी कारण सांगून . आणि बाकीच्यांचं जेवण झाल्यावर आम्ही हे गुपित फोडलं . त्यांची प्रतिक्रिया काय होती हे इथे सांगू शकत नाही . आमच्या रूम च्या अस्वच्छतेच्या तर दंतकथा पसरल्या होत्या . रूम ला महिनो ना महिने झाडू लागत नसे . रूम मध्ये एवढा कचरा होता की त्यात एक छोटी बादली हरवली होती . ती होस्टेल सोडताना सापडली . त्या कचरा आणि दुर्गंधी युक्त रूम मध्ये आम्ही तिघ जण लोळत पडलेलं असू . एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते . आमच्या संवेदना मेल्या होत्या पण त्याच वेळेस मला भेटायला चुलत भाऊ आला होता . तो अजूनही सांगतो की त्यावेळेस जो वास सर्वत्र पसरला होता तो जगताला सगळ्यात किळसवाणा वास होता . आणि तो केमिकल अभियंता आहे .

अदभुत रस - अदभुत म्हणजे आश्चर्य आणि उत्सुकता . घरात अनेक वर्ष एक सुरक्षित आयुष्य काढून हॉस्टेल ला आल्यावर पोहोता न येणाऱ्या माणसाला एखाद्या खोल विहिरीत ढकलून जस वाटत तस वाटत . हॉस्टेल हे जंगला सारख असत . survival spirit उच्च ठेवून राहावं लागत . एकदा आपल्या समानधर्मी मित्रांचा कळप जमला कि हे होतकरू नवोदित विद्यार्थी हे सुंदर जंगल explore करायला लागतो . तोंडात लोणच्याची फोड ठेवायला लागल्यावर तोंडात वेगवेगळ्या चवींचे हवेहवेसे स्फोट होतात तस हॉस्टेल मधला प्रत्येक नवा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो . हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र . पाकिस्तान कसा नष्ट करता येईल , रूम मधल्या ढेकणा चा बंदोबस्त कसा करावा , भारत नेहमी विदेशी भूमी वर सामने का हरतो , पोरी कशा फिर्वाव्यात अशा अनेक विषयावर रात्र रात्र झालेल्या चर्चा , महाराष्ट्र आणि देशातल्या विविध भागातून आलेले मित्र , त्यातून झालेली वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख , आणि जगाचे झालेलं नवीन आकलन . हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो .

क्रौर्य रस - होस्टेल हि एक खूप क्रूर गोष्ट पण आहे . अर्धेंदू नावाचा एक अर्धवट डोक्याचा पोरगा होता . त्याला वागण्या बोलण्याचा फारसा पोच नव्हता . इतर पोर त्याला छळ छळ छळायची . एकदा एका मुली ने तुला कार्ड दिल आहे आणि तुला भेटायला बोलावलं आहे अस सांगून आपणच एक कार्ड त्याच्या हातात कोंबल . त्या येड्याला पण ते खर वाटलं . आणि त्या पोरी समोर जाऊन काही तरी बोलल . पोरीन त्याला थोबडावला . बिचारा अर्धेंदू होस्टेल सोडून गेला . हॉस्टेल ला काही पूर्वोत्तर राज्यातून आलेली काही मुल होती . दिसायला एकदम वेगळी आणि भाषेचा प्रश्न . ग्रामीण भागातून आलेली इरसाल पोर त्याची जाम मजा घ्यायची . पण ते कधी कधी खूप अति करत . आपण किती रेशियल लोक आहोत हे तेंव्हा मला कळल . नंतर ती पुर्वोतर राज्यातली पोर एकजात सगळी लष्करात गेली . पण देशाचा उर्वरित भाग आपल्याला 'आपल ' समजत नाही हे फिलिंग त्यांच्या डोक्यातून गेल असेल का कधी ?

भय रस आणि रौद्र रस - आमच्या हॉस्टेल ला रोज सकाळी ६ ते ६. ३० पीटी सक्तीची होती . आम्ही एखादा बकरा पकडून त्याला रूम ला बाहेरून कडी लावून घे आणि जा असे सांगून स्वतः मध्ये लोळत पडत असू . नंतर नंतर आजूबाजूच्या रूम मधले पोर पण सकाळी तिथे येउन पडायला लागले . रेक्टर सरांना याची कुणकुण लागली . एका दिवशी आम्ही असच बाहेरून कडी एकाला लावायला सांगितली आणि लोळत पडलो होतो आणि सर धाडकन दरवाजा उघडून मध्ये आले . आणि जमेल तसे हात पाय चालवायला सुरु केले . तो प्रसाद ग्रहण करत आम्ही धडपडत बाहेर आलो . नंतर २ आठवडे आम्हाला कॉलेज च्या मोठ्या मैदाना ला १५ चकरा मारण्याची शिक्षा मिळाली .

शृंगार रस - बीभत्स रस हा सर्वाधिक आढळणारा रस असेल तर शृंगार रस हा सर्वाधिक अभाव असणारा रस . अर्थात काही मोजक्या वीरांचा अपवाद वगळून . जो काही शृंगार रस असतो तो एकाच format मध्ये . ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल .

वीर रस - हॉस्टेल तुम्हाला शूर बनवत . घरून आलेला खाऊ इतरांपासून लपवून एकट्याने खाणे , एखाद्या खोडकर अंग्काठीने मोठ्या पोराला अंगावर घेणे , बंदी असताना रात्र भर पत्त्याचा डाव रंगवणे , खिशात शेवटचे ५० रुपये असताना महिन्याचे १५ दिवस काढणे , हॉस्टेल चे गेट ९. ३० ला बंद होत असते तरी पण रात्री पिक्चर बघायला जायचं आणि एका अवघड खांबाचा आधार घेऊन चढून जाण एक ना दोन प्रकार . खूप भितींवर मात करायला हॉस्टेल शिकवत .

शांत रस - हॉस्टेल सोडण्याचा दिवस . सगळीकडे एक विचित्र ओक्वर्ड शांतता . सगळीकडे सामानाची बांधाबांध चालू . बाहेर निरव शांतता पण डोक्यात कल्लोळ . हे हरामखोर मित्र पुन्हा कधी भेटतील ? बाहेरच जग हॉस्टेल सारखच मजेशीर आणि भन्नाट असेल का ? आता कुठ राहायचं ?दुसऱ्या मेस चा मालक आपल्या मेस मालक भाऊ सारख बाहेर जेवायला जाताना पैसे उधार देईल का ? बिपीन आणि प्रभाकर सारख फास्ट फुड दुकान दुसरीकडे असतील का ? हॉस्टेल च्या खिडकीत बसून पडणारा पाऊस आणि नदीच वाढत जाणार पाणी तासंतास बघायला कसली मजा येते आता ती गेलीच का ? आपले ऋणानुबंध फ़क़्त या हरामी मित्रांसोबत च नव्हते तर या भव्य इमारती शी पण होते हे शेवटच्या दिवशी कळत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वीर रस - हॉस्टेल तुम्हाला शूर बनवत >>>> हॉस्टेलच्या मेसमधे जेवणे ही एकच गोष्ट पुरेशी होती आमच्या वेळी.

शृंगार रस - ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल . >>>> अगदी अगदी.

भय रस आणि रौद्र रस - आमच्या हॉस्टेल ला रोज सकाळी ६ ते ६. ३० पीटी सक्तीची होती . >>>> अजुनही आठवले तरी हृदयात कळ उठते हो. Sad

जो काही शृंगार रस असतो तो एकाच format मध्ये . ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल .
>>>>>>>>
येस्स, मी राहिलोय हॉस्टेलवर आणि मला हा फॉर्मेट समजला. Happy

बाकी लेख तर मी नुसता नावालाच वाचत होतो, खरे तर माझे दिवस आठवत होतो. आजही कोणी ऋन्मेष शाळा-कॉलेज-हॉस्टेल-ग्रूपमधील सर्वात वाह्यात मुलगा होता म्हणत आठवण काढतो तेव्हा आयुष्य जगल्याचे समाधान मिळते.

बाकी नवरस फॉर्मेटमध्ये लिहायची कल्पना व लेख आवडला !

सध्या फाईनल-इयरला आहे. २-३ महिने राहिलेत शेवटचे. आधीच कॉलेज संपणार, हॉस्टेल लाईफ संपणार या विचारांमुळे वाईट वाटतय, त्यात तुमचा लेख वाचून ईंजिनिअरींगच्या ४ वर्षांच्या आठवणींची गर्दी झालीये...

चांगले लिहिले आहे, पण माझे मत हॉस्टेलबद्दल प्रतिकूल आहे.
घरचे संस्कार पुसुन टाकून नाही ते आचरट संस्कार करणारे कारखाने वाटतात हॉस्टेल्स म्हणजे.
त्यातुन रॅगिन्ग हे तर अजुनच एक दिव्य प्रकरण आहे. Angry
वि.सू. : सुदैवाने मला कधी हॉस्टेलवर राहण्याची वेळ आली नाही.

नुकतच २५ जानेवारीला आमच्या कॉलेज आणि होस्टेलला भेटुन आलो. काय दिवस होते ते....
होस्टेलवर नविन रहायला आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या सगळ्यांच्या मनात रॅगिंग बद्दल खुप्सारे प्रश्न असायचे.
हा धागा होस्टेलशी संबंधित असल्याने रॅगिंगबद्दल पण मोकळी चर्चा व्हावी.
उदाहरणार्थ पहिल्या वर्षाच्या मुलांना होस्टेलवर वेगळ आयकार्ड ठेवाव लागे. कंडोम. हे पहिल्यांदा ऐकल्यावर खुपच संताप आला. पण त्यामाघचा थॉट सांगितल्यावर लगेच मावळला पण " Always have safe sex "
अति तेथे माती.

मस्त लिहिलंय.. मला प्रत्यक्ष अनुभव नाही पण कल्पना आहे.

रॅगिंग अजून आहे का ? त्याविरोधात कायदा झालाय ना आता ?

"टेबल २१" चित्रपटामधे त्याचे भयानक दर्शन घडले.

वि.सू. : सुदैवाने मला कधी हॉस्टेलवर राहण्याची वेळ आली नाही.
<<
ते न सांगताच समजते आहे. :दिवे:

हा धागा होस्टेलशी संबंधित असल्याने रॅगिंगबद्दल पण मोकळी चर्चा व्हावी.
>>> माझे मत आहे की वसतिगृहातील वास्तव्यादरम्यानच्या कडुगोड अनुभव शेअर करावेत.

वि.सू. : सुदैवाने मला कधी हॉस्टेलवर राहण्याची वेळ आली नाही.
>>>>
हे मला न सांगता समजले नाही, पण हॉस्टेलवर न राहताच थेट प्रतिकूल मत बनवणे म्हणजे फक्त पोस्टर बघून चित्रपटाचे परीक्षण लिहिणे.. Happy

मस्तं लिहीलंय! ट्रीटमेंट जाम आवडली! हॉस्टेल खरंच रिस्की प्रकरण आहे. तरीहि हॉस्टेलला आयुष्यात कधी राहता आलं नाही याचं मलातरी वाईटच वाटतं.

हे बेश्ट आहे! प्रागैतिहासिक काळात भिजवून ठेवलेले कपडे हे तर हॉस्टेलचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
<<<गरवारे कॉलेज हॉस्टेल नदी काठी आहे . अकोल्याच्या सुमित केडिया ने हि नदी गंगा नदी आहे असे सांगत आमच्याशी तासभर वाद घातला होता>>> अकोल्याच्या लोकांना तेवढे पाणी तरी कुठे बघायला मिळणार!!!

>>हे मला न सांगता समजले नाही, पण हॉस्टेलवर न राहताच थेट प्रतिकूल मत बनवणे म्हणजे फक्त पोस्टर बघून चित्रपटाचे परीक्षण लिहिणे.. Happy
धन्यवाद, तसा तर पोस्टरवरून पण अंदाज येतोच पण येथे त्या विषयावर वाद चालू नको करायला.
आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊनच त्यावर मत मांडावे असे शक्य आहे का ? Wink
मी राहिलो नसलो तरी माझ्या ओळखीत कोणीच राहिले नसेल असे नाही ना,
तसेच मी या विषयावर काहीच वाचले नसेल / पाहिले नसेल असेही नाही ना Happy

छान लिहिलंय! हॉस्टेल लाईफचा भरपूर अनुभव घेतला आहे रॅगिंगसकट! प्रत्येकाने एक वर्ष तरी हॉस्टेलमध्ये काढावं..बऱ्याच गोष्टींची किंमत कळते Happy काही गोष्टींची हॉस्टेलवर राहताना आणि काही गोष्टींची हॉस्टेल लाईफ संपल्यावर!

घरचे संस्कार पुसुन टाकून नाही ते आचरट संस्कार करणारे कारखाने वाटतात हॉस्टेल्स म्हणजे.>>
सहमत . होस्टेल च्या मित्र , मैत्रिणींच्या नादाला लागून अनेक चांगली मुले बिघडू शकतात .

Pages