त्यागपूर्वक भोग घ्यावा…….

Submitted by राधोदय on 23 January, 2015 - 08:25

श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराचं कार्य सुरु केलं होतं. आणि पहिल्याचं श्लोकापाशी ते अडले….
ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगतI
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम II
अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहेपणानं दिसतं, भासतं, जाणवतं ते सारं ईश्वरानं व्यापलेलं आहे. त्या सर्वाचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
श्री महाराज,'त्यागपूर्वक भोग घ्यावा' या शब्दांपाशी अडले. त्यागानं भोग तरी कसा शक्य आहे असं त्यांना वाटलं. भल्या भल्या विद्वानांशी चर्चा करूनही अर्थ उकलेना. शेवटी त्यांनी शिर्डी गाठली आणि बाबांनाच प्रार्थना करून त्या श्लोकाचा अर्थ विचारला. त्यावर बाबा हसून म्हणाले, "अरे हा अर्थ तर तुला काका दीक्षितच्या घरची मोलकरीण सांगेल!" श्री दासगणूनाच नव्हे तर हे उत्तर ऐकणाऱ्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्या बिचारीचं शिक्षण ते काय असणार, बुद्धी ती काय असणार,ती उपनिषदाची अर्थ् व्युत्पत्ती कशी काय करणार?
मग दासगणू महाराज काकासाहेबांच्या घरी गेले. रात्री साईबाबां विषयी गप्पा झाल्या. त्या स्मरणरंजणातच दासगणू झोपी गेले. दिवाळीचे दिवस होते ते. पहाटेच दासगणूना जाग आली ती कुणाच्या तरी मधुर गुणगुणण्यानं. आधीच दिवाळीची प्रसन्न पहाट त्यात हा स्वर! दासगणू जाऊन पाहतात तो भांडी घासण्यात दंग असलेली काकांची मोलकरीण गाणं गुणगुणत होती. ती पोरं अंगावर फाटकं लुगडे नेसली होती आणि गात होती ते नारिंगी(रंगाच्या) साडीचं महती सांगणारं गाणं!! त्या साडीची भरजरी नक्षी, तिचे काठ, तीचा पदर यांचं भरभरून वर्णन त्यात होतं. दिवाळीच्या आनंदात माखलेल्या काकांच्या घरातल्या पोरीबाळी नव्या कपड्यात नटल्या होत्या. त्यांना पाहून फाटक्या कपड्यातली ती पोरं उदासपणे नारिंगी साडीचे गोडवे गाणारं ते गाणं गुणगुणत होती. दासगणू महाराजांचं मन या दृष्याने हेलावलं. ते काकांना म्हणाले," अहो काका, या पोरी ला सुद्धा एखादी नवी साडी घेऊन द्या. काका सुद्धा मुळात उदार हृदयाचे!! त्यात दासगणू महाराजांची विनंती! तेव्हा आनंदाने ते घरांत गेले. दिवाळीच्या खरेदी निमित्तं कपाटात आणखीही काही नव्या साड्या होत्या. त्यातली एक सुंदरशी साडी त्यांनी या पोरीला भेट म्हणून दिली. नवी साडी नेसून संध्याकाळी मैत्रिणींसोबत ती पोर फिरली आणि बागडली देखील…. दुसऱ्या दिवशी ती आली मात्रं जुनी साडी नेसूनचं. नवी साडी घरी ठेवून. पण चेहऱ्यावर कालची उदासीनता नावाला ही नव्हती. उलट आनंद विलसत होता. काल अंगावर जुनी साडी आणि चेहरयावर उदासीनता. आजही अंगावर जुनीच साडी पण चेहऱ्यावर आनंद!!! तिचं हे रूप पाहताच दासगणू महाराजांच्या अंतरात श्लोक निनादला…
ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत I
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम II
या मोलकरणीच्या निमित्तानं महाराजांना 'त्यागपूर्वक भोग' चा अर्थ उमगला. आज ती नवी साडी नेसली नव्हती तरी कालचे दैन्य ओसरले होते ते केवळ भावना बदलल्याने! आज मनानं ती खिन्न नव्हती कारण साडीची उणीव नव्हती. प्रथम नवं लुगडं घ्यायला असमर्थ होती म्हणून नाईलाजानं जुनंच लुगडं नेसून उदास होती. मग नवं लुगडं मिळालं. ते नेसण्यास समर्थ होती तरीही जुनंच नेसायचं तिने मनाशी ठरवले त्यामुळे ती मनाने उदास नव्हती. समर्थ असूनही दैन्य मिरवीत होती. केवळ 'आहे' आणि 'नाही ' आणि 'असूनही नाही' या भावनांच्या गुणांनंच माणूस सुख आणि दु:ख भोगतो. प्रत्यक्षात सुख आणि दु:खाच मोजमाप बाह्यावरून करता येत नाही. सर्व जर काही एकाच ईश्वराने व्यापलं आहे तर त्यात सुख आणि दु:ख आलं कुठून?
नवी साडी नसल्याची अपूर्णता दु:खाचं कारण होती. साडी लाभल्याची पूर्णता ही सुखाचं कारण बनली. फरक बाह्यात पडला नाही. आंतरिक होता. थोडक्यात सुख आणि दु:ख हे आंतरिक आहे. प्रत्यक्षात सारं काही पूर्णच आहे. फाटकी साडी नेसलेली ती पोरं ईश्वराचांच अंश. दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दानही ईश्वरी अंशच. सारं काही अशेषच.
ईश्वरावाचून वेगळं काहीच नाही. केवळ मी पणान आंतरिक सुख दु:ख आहे. 'मी'पणामुळे मी देणारा, मी घेणारा, मी अभावग्रस्त असा भाव आहे. प्रत्यक्षात दाता, देय, दान सारं काही ईश्वरी सत्तेतच सामावलं आहे.

माहितीचा स्त्रोत --- लोकसत्ता दैनिक.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरक बाह्यात पडला नाही. आंतरिक होता. थोडक्यात सुख आणि दु:ख हे आंतरिक आहे. प्रत्यक्षात सारं काही पूर्णच आहे.
फार छान.
समजून उमजून आचरणात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. हो, प्रयत्नच. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या वृत्तीचे आचरण करणे आवश्यक आहे. मरताना मन शांत पाहिजे, वेदना होत असल्या तरी!
जेंव्हा मिळेल तेंव्हा त्याचा आनंद घ्यावा,, पण नाही मिळाले तर त्यासाठी जीव टाकू नये.

फारच कठीण आहे समजायला. उपनिषदाची सुरवात इतकी कठीण आणि दाखल्याशिवाय समजणे अवघड आहे तर सर्व उपनिषदे या जन्मी समजणे अशक्यच.

केवळ मी पणान आंतरिक सुख दु:ख आहे. 'मी'पणामुळे मी देणारा, मी घेणारा, मी अभावग्रस्त असा भाव आहे.
>>>>> अतिशय साधं वाटलं तरी एकदम खरं आहे. ह्या गोष्टींचा मुद्दाम विचार करायला हवा कारण त्यामुळेच गोष्टीं कडे बघायचा दृष्टिकोन बदलला की सुख कशामुळे वाटतं किंवा दु:ख कशामुळे होतं ह्याच्या व्याख्या पुर्णपणे बदलू शकतात.

हे खूप छान आहे. समजायला कठीण आहे , आचरायला त्याहूनही कठीण आहे.. दाखल्यामुळे अर्थ तरी समजला. धन्यवाद.

फाटकी साडी नेसलेली ती पोरं ईश्वराचांच अंश. दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दानही ईश्वरी अंशच. सारं काही अशेषच..

...

वा वा वा ! म्हणजे तिजोरीव्दिक्षिताने जपायची आणि सामान्य जनानी तत्वज्ञान जपायचे. सुंदर तत्वज्ञान आहे.

तत्वज्ञान सगळ्यांनीच जपायला हवे. काकांची तिजोरी भरलेली आहे आणि ते ती जपतात ह्यात काकांची चूक नाही. नशीबानी आणि कर्मानी तुमच्या समोर जे येतं त्याकडे तुमचा बघायचा दृष्टिकोन कसा आहे हा प्रश्न आहे.

When the missionaries came to Africa they had the Bible and we had the land. They said 'Let us pray.' We closed our eyes. When we opened them we had the Bible and they had the land.

याची आठवण झाली.

त्यागपुर्वक भोग घ्यावा हे फार चांगल्या रीतीने समजावले आहे. _/\_
याचे एक मोठे उदाहरण म्हणजे जनक राजा, त्याला विदेही जनक असे म्हणत.
स्थितप्रज्ञ वृत्ती असली की हे साधते, अर्थात सोपे नाही.
सुखदु:ख समेकृत्वा, लाभालाभौ जयाजयौ |

महेश
सुंदर प्रतिसाद .
मी वेद आणि काही उपनिषद वाचली आहेत . संस्कृत एवढं समजत नाही पण भाषांतरावरून सगळ्याचं
सार असं सांगता येईल
१. परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप . कारण सगळ्यांच्यात एकाच पर्म्यात्म्याचा अंश आहे
२. फळाची अशा न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहावं.

खूप छान दाखला देऊन उकल केली आहे श्लोकाची. नवं काही तरी कळालं.
पण आचरणात आणणं झेपेल का याबद्दल शंका आहे.