Stillborn

Submitted by निपो on 21 January, 2015 - 14:59

..................... Stillborn ....................

कविता लिहावी म्हटलं तर,
शब्दांचे थवे, हवेत सूर मारून
स्थलांतरीत पक्ष्यांसारखे
परागंदा....

मग आपण बसावे
भाषेच्या काठावर स्तब्ध,
मौनाचे दगड फेकत
निरवतेच्या पाण्यात..

आणि निरखत रहावेत
उठणारे आवेगाचे
अल्पजीवी तरंग ....

आणि मग उठावे हलकेच
जन्माआधीच् मेलेल्या कवितेचे
त्याच काठावर दफ़न करून ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अविदादा मला शब्दात नाही सांगता येणार पण भिडली आतमध्ये. परागंदा झालेल्या शब्दांची ताकद जाणवली. जाऊदे मला जे सांगायचंय ते नाही सांगता येत.

मी फक्त ___/\___ करू शकते.

कविता आणि प्रतिसाद वाचायला येईन परत.

खरे आहे.. एक चांगली कविता नीट जमायला .. ती कागदावर उतरवायला इतके सोपे नसते. म्हणूनच तर काव्य ही सर्वात उच्च प्रतिभा मानली जाते.

कविता छान जमली.. शीर्षक मराठीमधे कसे करता येईल?

इतके जिवंत स्टीलबॉर्न मी प्रथमच अनुभवतेय Happy
फार छान लिहिलय अविनाश. त्यातल्या गूढ वातावरणाने मला औदुंबरची आठवण झाली.

सुंदरच शब्दरचना आहे. तुम्ही लिहिताना कवितेबद्दल लिहिलंय पण साधं बोलतानाही अशी अवस्था ब-याचजणांची होत असेल. ती अवस्था अशा चपखल शब्दात सहज मांडणं मात्र अवघड आहे. Fantastic!

"...मौनाचे दगड फेकत...निरवतेच्या पाण्यात.."

~ फार हळवेपणाने नजरेसमोर चित्र आणले मी...मला दिसला तो कवी...कदाचित कवी नसेलही पण आहे गुंतला मात्र अशाच काव्याच्या जाळ्यात जिथून त्याला आणायलादेखील नको वाटावे...त्याचे एकाकेपण दिसत्ये, पण तो सुन्न झालेला नाही...असे वाटायचे कारण म्हणजे आताही अल्पजीवी असले तरी आवेगाचे क्षण तो स्मरतो आहे आणि मला वाटते त्यातच त्याच्या उरी आशेलाही जागा असावी. "जन्माआधीच् मेलेल्या कवितेचे दफन" करायचे आहे त्याला....पण त्याने नको द्यायला मरायला त्याच्या कवितेला....तीमध्येच त्याच्या जीवनाची आस आहे.

आज एक नवीनच अविनाश भेटला आम्हा मित्रांना....! हवाहवासा वाटणारा.

मामा छान प्रतिसाद.

अवलताई, औदुंबर आठवली, ग्रेट ग.

असे प्रतिसाद वाचले की कविता परत नव्याने उलगडत जाते.

ज्जे ब्बात !
शिर्षकाबद्दल म्हणाल तर स्टीलबॉर्नच चपखल बसलय. या शब्दात जे अभिप्रेत आहे ते मराठीतल्या कुठल्याही शब्दात मांडता आले असते किंवा कसे याबद्दल मला शंकाच आहे.
टोपी उडवली आहे _/\_

छान Happy

क्या बात
शीर्षक तसेच ठेवा, विशालदाशी सहमत

तुमची कवितेची (म्हणजे साहित्याचीच) समज इतकी जबरदस्त आहे की तुम्ही नक्की कविता लिहित असणार हा संशय (:D) होताच!
त्यामुळे कल्पनेचे सत्यापन झाल्याचा आनंद मिळाला.
अनुभव सार्वत्रिक करायला शिकणे हेही कवितेचे एक प्रयोजन आहेच त्या दृष्टीने ही कविता समृद्ध आहेच.
अल्पाक्षरी पण बहुआयामी कविता आणि लख्ख प्रतिमा संयोजन यामुळे आगळे वाचनसुख मिळते आहे.

अविनाशजी , मला नाही वाटत सशक्त आशय असलेली कविता जन्माआधीच मरेल .तुम्हाला कविता म्हणून वाटले
तो फार तर भावनान्चा तीव्र असा लोट असेल .शिवाय येणारया प्रत्येक उत्कट अनुभवाचे आन्तरिकीकरण होवून चांगली कविता होईलच असे नाही अशा .किंबहुना मिळालेल्या एखाद्या अलौकिक अनुभूतीचे रुपांतर कवितेत अर्क रूपाने यायलाच हवे असां आपला हट्ट असतो पण तस होईलच अशी परिस्थिती
दर वेळी असेलच असे नाही .अशा कवितेचे बीज कधी कधी दिवस दिवस तर कधी कशी वर्षानुवर्षे नेणीवेत सुप्तावस्थेत पडून राहते नी योग्य वेळ येताच अंकुरते देखील म्हणजेच अस्सल कविता जन्माला येता येता कधीच मरत नसते . स्पष्ट लिहितेय म्हणून राग मानू नका, सरतेशेवटी काय लिहायचं हा सर्वस्वी कवीचाच निर्णय असतो.
पण तुमच्या कवितेचा शेवट पटला नाही म्हणुन हा सर्व लेखन प्रपन्च त्या कडव्या पर्यन्त कविता एक अलग मूड तयार करते...

मिस केली होती ही सुंदर अभिव्यक्ती.
संवेदना अगदी सूक्ष्म आणि सिद्ध होण्याचा एक तोटा असा की आपल्या शब्दांनी आपलं समाधान होतच नाही ! ही अवस्था एका कवीचीही असू शकते आणि नव्याने व्यक्त होतानाचीही.
ही अवस्था या कवितेत फार तरलतेने उतरली आहे, पण ही अवस्था ओलांडून कवितेची निर्मिती होण्याची स्थितीही याच शब्दात दडली आहे. नाही नाही म्हणता एक अर्थघन कविता जन्माला आलीच आहे की ! पु.ले.शु. अविनाश.

भारती धागा वर काढला ते बर केलत. धन्यवाद.
मस्तच काहीतरी वाचायला मिळाल.

इतक चपखल आणि नेमकेपणाने मांडलय अविनाशजी आपण.. अप्रतिम.
नावापासून सगळच परफेक्ट. प्रत्येक परागंदा शब्दाला अचूक पकडून योग्य जागी बसवलंय तुम्ही.

माझ्या निवडक दहात. Happy

aavadali.