राधा कृष्ण
राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या.
पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य? त्यांच्या नात्याला नेमकं काय म्हणावं? निदान त्याला नातं तरी म्हणता येईल का? जर त्यांच्यात नातं आहे आणि लोक भक्तिभावाने त्यांची पूजा करतात, तर मग त्यांच्यातल्या नात्यातलं पावित्र्य कसं टिकून राहिलं? नात्यातलं पावित्र्य म्हणजे तरी नक्की काय? का नात्यापलीकडले असे काही त्यांच्यात ऋणानुबंध होते? निनावी प्रेम होतं का त्यांचं? प्रियकर, प्रेयसी, प्रेम आणि नातं यांची नेमकी सांगड काय? असे आणि अशासारखे अनेक प्रश्न. या सगळ्या भुतकाळाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं आजच्या काळात म्हणजेच वर्तमानकाळात मिळवता येतील का आणि उत्तरं मिळाली तर ती भविष्यकाळात किती चपखल बसतील? शोध घेणं गरजेचं वाटतं.
नातं. नात्यांची थोडक्यात विभागणी करायची म्हटलं तर नाती दोन प्रकारची असतात. रक्ताची नाती (उपजत) आणि बांधलेली नाती (परिस्थिती आणि गरजेनुसार निर्माण झालेली). आईवडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी इत्यादी नाती ही रक्ताची किंवा उपजत नाती या प्रकारात मोडतात. नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी इत्यादी नाती ही बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती या प्रकारात मोडतात. पण नाती कुठलीही असोत नातं म्हटलं की बंधनं आली, नियम आले, जबाबदारी आली, इच्छा-आकांक्षा आल्या, गरजा आल्या, सवयी आल्या, शिस्त आली, मानसिक आणि शारीरिक आकर्षण आलं मग ते एक व्यक्ती म्हणून असेल किंवा व्यक्तिमत्त्व म्हणून असेल. थोडक्यात गरज, सवय, आकर्षण आणि या सगळ्यांना मिळालेली भावनांची जोड जिथे असते तिथे नातं निर्माण होतं. त्यालाच बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती म्हणतात.
प्रेम = सवय + गरज + आकर्षण
प्रेम = सवय + आकर्षण + गरज
प्रेम = गरज + सवय + आकर्षण
प्रेम = गरज + आकर्षण + सवय
प्रेम = आकर्षण + सवय + गरज
प्रेम = आकर्षण + गरज + सवय
(प्रत्येक व्यक्तिसाठी क्रम वेगळा असू शकतो पण परिणाम एकच.)
प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको या नात्यांमध्येदेखील नियम, बंधनं, इच्छा-आकांक्षा किंवा आशा-अपेक्षा याांसारख्या अनेक बाबी असतातच. पण प्रत्येक व्यक्तिला स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये नावीन्य हवं असतं. आयुष्याकडून आणि आयुष्यातील प्रत्येक नात्याकडून सतत काही नवीन मिळावं ही प्रत्येक व्यक्तिची गरज असते. ही एक प्रकारची भूक आहे. नियम, बंधनं अशा बाबी या नावीन्याला अडथळा आणू शकतात. जर नात्यामधली ही भूक भागत नसेल किंवा नात्यामध्ये नावीन्य नसेल तर त्या नात्यात एक पोकळी निर्माण होते. एक प्रकारचा एकटेपणा व्यक्तिला जाणवतो. व्यक्तिला तात्पुरता का होईना पण आधाराची गरज भासते, असा आधार जो ती पोकळी भरून काढेल. प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात निर्माण झालेली ती पोकळी ही स्वतःची व्याप्ती वाढवून भरून काढणं कधीही योग्य. पण मनःस्थिती कुंठित झाल्यामुळे तसं करणं शक्य होत नाही. अर्थातच अशी व्यक्ती तात्पुरत्या आधाराची मदत घेते. पण कधी कधी त्या आधाराच्या मोहात पडून ती व्यक्ती कायमचा आधार हिरावून बसू शकते आणि पुन्हा एकाकीपणा येऊ शकतो. तात्पुरता आधार हा तात्पुरता आहे याचा विसर पडतो आणि पुन्हा नात्यामध्ये पोकळी निर्माण होते. समाजात प्रतारणा हा शब्द किंवा यासारखे शब्द या सगळ्या बाबतीत वापरले जातात आणि त्याचे परिणाम किती भयंकर आणि वाईट असू शकतात याची अनेक उदाहरणं समाजात सापडतात. मग या सगळ्यातून मार्ग काय? उपाय काय? यांची उत्तरं म्हणजे राधा-कृष्ण.
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात एक तरी नातं असं असावं जे नातं नसावं किंवा ते नात्यापलीकडे असावं. लोकांनी किंवा समाजाने त्याला कितीही नावं ठेवली (प्रियकर-प्रेयसी, भक्त, नियमबाह्य इत्यादी) तरी प्रत्यक्षात ते निनावी असावं, ज्याची स्पष्ट व्याख्या नसावी. कुठलेही नियम नसावेत. कुठलीही बंधनं नसावीत. जबाबदारी असावी पण कुणीही जबाबदार नसावं. इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावं. मोकळेपणा असावा. प्रेम, आपुलकी, काळजी, राग, आनंद, दुःख, समाधान या सारख्या अनेक भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही मी नसावा. राधा आणि कृष्ण यांच्यातील संबंधामध्ये या सगळ्याची पूर्तता होते. स्वतःच्या आयुष्यात किमान अशी एक तरी व्यक्ती असावी जिच्याशी राधा किंवा कृष्णाप्रमाणे निखळ, निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वमान्य असलेल्या नात्यांमधले नियम, बंधनं आणि समाजाचा एक पारंपरिक ढाचा असा विचार, कृती करण्यास अडथळा निर्माण करतो. तशी ही समाजव्यवस्था चुकीची नाही. पण अशा निनावी नात्याबाबतीत प्रत्येक व्यक्ती मर्यादा पाळेलच किंवा पावित्र्य सांभाळेलच याची खात्री नसते आणि त्यामुळे समाजाचा पारंपरिक आणि प्रतिष्ठित ढाचा बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
आता प्रश्न आहे तो मर्यादेचा, पावित्र्याचा. मर्यादा, पावित्र्य सांभाळणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. ज्या व्यक्तिंना स्वातंत्र्य आणि स्वैराचार, मोकळेपणा आणि भरकटलेपणा यांमधला फरक कळतो त्यांना मर्यादा आणि पावित्र्य सांभाळणं अवघड नाही.
ज्या व्यक्तिंना या मर्यादेचं भान असतं त्यांच्या आयुष्यात कधीही दीर्घकाळ पोकळी निर्माण होऊ शकत नाही आणि सगळी नाती (उपजत, बांधलेली आणि निनावी) सांभाळतादेखील येऊ शकतात. ज्यांनी मर्यादा पाळली, त्यांच्याबाबतीत समाजाने आणि एकंदरीत सगळ्यांनी त्याचा आदर राखणं देखील गरजेचं आहे. तसं झालं तर त्यामुळे समाजात त्याला मान्यता मिळू शकते आणि त्याचं महत्त्व, पावित्र्य जपलंही जाऊ शकतं.
तात्पर्य, काय तर प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी राधा असतेच आणि प्रत्येकीच्या आयुष्यात किमान एक तरी कृष्ण असतोच किंवा असं असावं अशी किमान इच्छा तरी प्रत्येकाची/प्रत्येकीची असते. केवळ ते मनात, कुठेतरी मनाच्या एका कोपर्यात दडवून ठेवलेलं असतं (मग ते स्वतःच्या, आप्तेष्टांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी का होईना). असो, कारणं अनेक असोत पण अशा प्रेमाचा आदरपूर्वक सन्मान करता आणि जपता आला पाहिजे हीच काळाची गरज आहे आणि हीच खरी राधा-कृष्णाची भक्तिपूजा.
शिरीष फडके
कलमनामा - १९/०१/२०१५ - लेख १३ - राधा कृष्ण
http://kalamnaama.com/radha-krishna/
राधा कृष्ण
Submitted by शिरीष फडके on 20 January, 2015 - 07:22
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा