'पिफ-२०१५' मधले चित्रपट

Submitted by साजिरा on 19 January, 2015 - 02:31

नुकत्याच पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितलेल्या सिनेम्यांबद्दल माहिती, परीक्षणे, प्रतिसाद, मते इ. बद्दल कृपया इथं लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायलेकाच्या सुंदर लव्हस्टोरीजः Song of my Mother आणि Good bye Lenin
***

song of my mother.jpg
अवघ्या तिशीतल्या दिग्दर्शकाने अत्यंत साध्या आणि अभिनिवेशशून्य पद्धतीने मांडलेल्या Song of my Mother मध्ये कुठच्याही मोठ्या घटना वगैरे नाहीत. गावाकडून अचानक इस्तंबूलसारख्या महानगरात लेकासोबत नाईलाजाने राहायला यायला लागलेल्या म्हातारीची 'एका गाण्याची कॅसेट मला आणून दे'- अशी भुणभूण सुरू होते. ही भुणभूण नुसतीच गाण्यासाठीच नाही, तर म्हातारीला एकंदरच या सिमेंटच्या जंगलाबद्दल आणि उगाचच डोळे दिपवून टाकणार्‍या महानगरी झगमगाटाबद्दल प्रॉब्लेम आहे- हे शाळामास्तर असलेल्या लेकाला हळुहळू कळतं. प्रत्येक ठिकाणी ''मलाही तुझ्यासोबत येऊ दे'' असा बालहट्ट धरणारी आई मग नंतर हळुहळू ''मला गावाकडे घेऊन चल'' असा धोशा चालू करते. कॅसेटमधल्या विशिष्ठ गाण्यापासून ते आईच्या सुखा-आनंदापर्यंत- असा शोध घेण्यातली हतबलता आणि चिडचिड लेकाच्या वाट्याला अपरिहार्यतेने येऊ लागते. शाळेचं रूटीन आणि प्रॉब्लेम्स-रोजचं जगणं-प्रेयसी-तिचे मूड्स-तिची प्रेग्नसी या सार्‍यात पेंडूलम झालेला मुलगा आपल्या म्हातार्‍या आईच्या बालहट्टांचं काय करतो? हलवून टाकण्याची ताकद असलेली ही अतिशय साधीभोळी फिल्म अनेक दिवस लक्षात राहील..
***

Good bye lenin.jpg
आपल्यांत मध्येच कसल्या-कसल्या भिंती उभ्या राहिल्या तर कितीतरी प्रकारचे नवे प्रश्न त्या भिंतींसोबत उभे राहतात. मात्र भिंती 'पडल्यानेही' प्रश्न उभे राहू शकतात, आणि तेही सोडवायला तितकाच झगडा करावा लागू शकतो- हे दाखवणारी आणखी एक मायलेकराच्या जोडीची गोड कथा- Good bye Lenin. साम्यवादावर भक्कम विश्वास असलेली आणि 'पश्चिमी' भांडवलवादाचा मनापासून तिरस्कार आणि आणि निकराने विरोध करणारी आई बर्लिनची भिंत पडण्याच्या काही काळ आधी एका अपघातामुळे कोमात जाते. त्यातून बाहेर ती जेव्हा येते तेव्हा जादूची कांडी फिरल्यागत सारं जग बदललेलं असतं. भिंत पाडल्याने कोंडलेल्या हवेला आणि मानवी भावनांना इकडून तिकडे जायला वाट मिळते खरी, पण त्यासोबत भांडवलवादही जोमाने या नव्या वाटेतून प्रवेश करतो, आणि पुर्वेकडच्या लोकांचं आयुष्यच बदलून जातं. कुठचाही 'धक्का' तिला बसू देऊ नका- या डॉक्टरांच्या बजावणीनंतर तिच्यावर जिवापाड प्रेम असलेल्या तिच्या मुलाची 'जग अजून तसंच आहे, आणि कम्युनिस्ट विचारसरणी हीच अखेर जगाला तारणारी असल्याने आपल्या देशावर खूप मोठी जबाबदारी आहे' असं चित्र तयार करण्याची धडपड सुरू होते. मात्र अंथरूणावर पडल्या पडल्या एकदा खिडकीतून 'कोकाकोला'चं भव्य पोस्टर दिसल्याने 'काहीतरी बदललं आहे' असा संशय आलेल्या आईला आणखी काही 'क्ल्यूज' मिळू लागतात. मग आईला धक्का न बसू देण्याची आणि पर्यायाने जिवंत ठेवण्याची अथक पराकाष्ठा करणार्‍या मुलाची फरफट सुरू होते. आई वाचते की नाही, हा प्रश्न अलाहिदा, मात्र सिनेम्याच्या नर्मविनोदी टेकिंगवर भाळून मनापासून हसलेल्या आपले डोळे 'माझ्या आईच्या कल्पनेतला तिचा देश जसा होता, तसाच राहिला..' असं लेकाच्या तोंडून शेवटी ऐकताना नकळत पाणावतातच..!
***

PIFF Screening categories-

Song of my Mother- World Competition
Good Bye Lenin- 'War Against War' PIFF theme
***

थँक्यू सो मच! आम्हा पामरांसाठी तू हे करच. प्रत्यक्ष वारीला जाता आलं नाही तरी पालखी गावात आल्यावर दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा.. Happy

गुड बाय लेनिन कुठल्या रेट्रोस्पेक्ट मधे होता का?
जुना (किमान ५-६ वर्ष तरी) आहे तो सिनेमा. मिपावर बिकांनी ओळख करून दिली होती या चित्रपटाची.

'गुड बाय लेनिन' २००३ चा सिनेमा आहे. पिफमध्ये तो तो पिफच्या 'वॉर अगेन्स्ट वॉर' या थीम अंतर्गत प्रदर्शित केला गेला.

'साँग ऑफ माय मदर' हा याच वर्षीचा आणि पिफमध्ये 'वर्ल्ड काँपिटिशन' कॅटेगरीमध्ये दाखवला गेलेला.

'पिफ-२०१५' मधले चित्रपट पिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा हाही एक चित्रपट छान होता ......यु-ट्यूब वर जरूर पाहावा असा.

http://www.pahawemanache.com/review/pelo-malo-straight-story-curly-hairs >>>>>>>>>>

मस्तच साजिर्‍या. छानच लिहिलयंस. आशावादी आहे मी. मलाही कधीतरी (याच जन्मी) या सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घ्यायला मिळेल! आमेन!

युद्धखोरीने केलेल्या भळभळत्या, शाश्वत जखमा: 'The Woods are still Green' आणि 'In Between Worlds'
***

The woods are still green.jpg
पहिल्या महायुद्धाच्या काळात दक्षिण हंगेरीतल्या इटलीलगत असलेल्या अतिशय सुंदर पर्वतराजीमध्ये एका मिलिटरी पोस्टवर घडलेल्या २४ तासांचं अंगावर काटा आणणारं चित्रण म्हणजे 'The Woods are still Green'. एक कॅप्टन आणि एक कॉम्रेड आणि जेमतेम ३ महिन्यांचा अनुभव असलेला एक 'ट्रेनी' सोल्जर अशा तिघांची या पोस्टावरची आघाडी सांभाळायची जबाबदारी. अचानक झालेल्या इटलीच्या हवाई हल्ल्यात कॉम्रेड मरतो आणि कॅप्टन जायबंदी होतो. कमांड पोस्टची मदत मिळण्याची आशा पुसट होऊ लागते आणि मग सगळी जबाबदारी या नवख्या शिपायावर. अजून भरपूर शिल्लक असलेल्या माणूसपणाचं बळ वापरून कॅप्टनला आणि स्वतःला वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करणारा हा शिपाईगडी शेवटी आत्मा हरवलेल्या माणसागत होतो. युद्धखोरीचे आत्मेही खरोखर माणसांचेच असतील का- आणि सर्वनाश बघत स्तब्ध झालेल्या तिथल्या नितांतसुंदर आणि स्वर्गीय झाडा-डोंगरांचाही अशा आत्म्यांवर काही परिणाम होत नसेल का- हे प्रश्न त्याच्यासारखेच आपल्यालाही पडतात, तेव्हा फिल्म संपलेली असते. मात्र उठायचं बळ संपल्यागत आपली अवस्था तोवर झालेली असते..
***

In Between worlds.jpg
अफगाणिस्तानातल्या एका खेड्याचं तालिबान्यांपासून संरक्षण करायची जबाबदारी असलेल्या 'नाटो' फौजेतल्या 'जेस्पर' या जर्मन कॅप्टनची कहाणी म्हणजे 'In Between Worlds'. अफगाणिस्तानातल्या खेड्यांचं झालेलं युद्धठाण्यांमध्ये रुपांतर, लोकल अफगाणी सैनिक आणि नाटोचे 'बाहेरचे' सैनिक यांच्यातलं मानसिक द्वंद्व, युद्धखोरीने बदललेल्या दैनंदिन गरजा आणि प्राधान्यक्रम- यांचं अतिशय मनोज्ञ चित्रण असलेला हा सिनेमा. ज्यांचं संरक्षण करायची जबाबदारी अंगावर आलीय, त्यांचाच विश्वास नाही- अशा विचित्र परिस्थितीत जेस्पर 'तारीक' या तरूणाला अरबी-इंग्लिश अशा भाषांतरासाठी मध्यस्थ म्हणून घेतो. जेस्परला 'मदत' करत असल्याच्या भावनेतून बिचारा तारीकही गावकर्‍यांचा विश्वास गमावतो आणि मग त्याला आणि त्याच्या कॉलेजात जाणार्‍या बहिणीला धमक्या यायला सुरू होतात. एव्हाना तारीकशी एक अनाम अशी जवळीक वाटू लागलेला आणि आधीच कात्रीत सापडलेला कॅप्टन, वरिष्ठांच्या 'त्यांच्या अंतर्गत भानगडींकडे अजिबात लक्ष घालू नये' अशा ऑर्डर्समुळे पुरता सैरभैर होतो. अशात तारीकच्या बहिणीवर प्राणांतिक हल्ला होतो आणि स्वतःमध्ये जिवंत असलेलं आणि सीमा, भाषा, जात, देश यांतलं काहीच बघणारं माणूसपण जेस्परला आणखी एक नवी लढाई लढण्याचा निर्णय घ्यायला भाग पडतं. जेस्पर ही लढाई हरतोही आणि जिंकतोही, मात्र 'माणूस' जिंकल्याच्या जाणीवेचं मोठेपण कुठचं महायुद्ध जिंकण्यापेक्षाही मोठं असतं- हे शेवटी नि:शब्द झालेला जेस्पर आपल्याला सहज सांगून जातो..
***

PIFF Screening categories-

The Woods are still Green- 'War Against War' theme
In Between Worlds- Global Cinema
***

वा वा सगळ्यांनी लिहा !!

साजिर्‍या, ह्या चित्रपटांमधली मुळ भाषांमधली नावं पण लिहीशिल का शक्य असेल तर? नेटफ्लिक्स किंवा इतर साईट्सवर शोधायला बरं पडतं.. इंग्लिश नावांनी सापडत नाही कधीकधी..

ओके! पण मग प्रतिसादात लिहिलेल्या चित्रपटांची नावं हेअरमध्ये टाकशील का?
थोडक्यात, अनुक्रमणिका बनवू शकशील का?

यंदाच्या 'पिफ'ला मी पाहिलेले सिनेमे -

बेदम आवडले -

1. Timbuktu
2. I'm not angry! (Asabani Nistam!)
3. Inferno (Inferno)
4. Stations of the cross (Kreuzweg)
5. Test (Ispytanie)
6. Court (Court)

खूप आवडले -

7. Like the wind (Come il vento)
8. Bad Hair (Pelo Malo)
9. The Kindergarten Teacher (Haganenet)
10. Zero Motivation (Efes Beyahasei Enosh)
11. Villa Touma (Villa Touma)
12. Behavior (Conducta)
13. Westen (Lagerfeuer)
14. The Tree (Drevo)
15. One for the road (En el ultimo trago)
16. Dreamland (Traumland)
17. The dark valley (Das finstere Tal)
18. Above us all (Above us all)

आवडले -

19. Monument to Michael Jackson (Spomenik Majklu Dzeksonu)
20. Kidon (Kidon)
21. Now or never (Maintenant ou jamais)
22. Consequences (Silsile)
23. The enemies of pain (Los enemigos del dolor)
24. Come to my voice (Were denge min)
25. Whatever happened to Timi (Megdonteni Hajnal Timeat)

ठीक होते -

26. The last leaf (L'ultima foglia)
27. Ariane's Thread (Au fil d'Ariane)
28. Life of Riley (Aimer, boire et chanter)
29. Not my day (Neicht MeinTag)
30. The Maneater (La Mante religieuse)
31. The man in the orange jacket (M.O.Zh)
32. The owners (The owners)
33. Falling star (Stella candente)

यंदा वेळेअभावी फार चित्रपट बघता आले नाहीत. Car Park, Cat and Fish, Nabat, Difret, Next to her हे चित्रपट बघायचे होते, पण जमलं नाही. Sad

<<<< यंदा वेळेअभावी फार चित्रपट
बघता आले नाहीत >>> एवढे 33 चित्रपट पाहून त री ही हे वि धा न Light 1 Lol

एनिवेज या बाफमुळे पराग म्हणतोय तस नाव तरी कळत आहेत चित्रपटाची . शोधायला बर पडेल . धन्यवाद साजिरा

जाई, दोनशे-अडीचशे सिनेम्यांचं स्क्रीनींग झालंय पिफमध्ये. त्यापैकी ३०-३५ च सिनेमे बघता आले- याचं वाईट वाटणं आहे ते. Happy

थँक्स चिन्मय.

ही माझीही यादी फेसबुकवरून इथं कॉपी करून ठेवतो.

Behaviour (Cuba)
Monument to Michael Jackson (Serbia, Croatia)
Court (India)
The Owners (Kazakhstan)
Kidon (Israel, France)
Consequences (Turkey)
Timbuktu (France)
Measuring the World (Germany)
Elementary Love (Italy, Russia)
Coming Out (Hungary)
The Constant Factor (Poland)
The Woods are still Green (Austria)
The Council of Birds (Germany)
In Between Worlds (Germany)
Villa Touma (Israel, Palestine)
Berlin is in Germany (Germany)
Three Obsessions (India)
Cure: The Life of Another (Switzerland)
Behind Blue Skies (Sweden)
Justice (Philippines)
The Narrow Frame of Midnight (Morocco)
Not My Day (Germany)
Good bye Lenin (Germany)
Munnariyippu (India)
Perfumes of Algiers (Algeria)
Jodi Love Dille na Praane (India)
Song of my Mother (Turkey, France)
Salute- Salaam (India)
Hotel Nueva Isla (Spain, Cuba)
Test (Russia)

आवडलेल्या सिनेम्यांबद्दल जमेल तसं लिहितो आहे.

चिनूक्स नॉट फेअर. अशी यादी टाकून नुसतं घाबरवून जायचं नाही, बेदम, खूप आणि का आवडले ते पण शिस्तीत लिहायचं. Happy

साजिर्‍या ,
<<<<< दोनशे-अडीचशे सिनेम्यांचं स्क्रीनींग झालंय पिफमध्ये. त्यापैकी ३०-३५ च सिनेमे बघता आले- याचं वाईट वाटणं आहे >>> मला एकही बघता आला नाही. मी चिनूक्सपेक्षा जास्त वाईट वाटवून घेतेय Happy

व्यवस्थेकडून न्याय मिळण्याच्या आणि मिळवण्याच्या कहाण्या: 'कोर्ट' आणि 'ख्वाडा'
***

Court-poster.jpg
चैतन्य ताम्हाणे या जेमतेम पंचविशी ओलांडलेल्या बुद्धिमान दिग्दर्शकाने 'कोर्ट' या मराठी चित्रपटात आपल्या जबरदस्त निरीक्षणाने आणि अनुमाने मांडण्याच्या पद्धतीने मला अवाक केलं. किंचित संथ टेकिंग असलेल्या या सिनेम्यात तो पुढे सरकत जातो तसा आपल्या विचारांचा वेग आणि अस्वस्थता वाढवण्याची, विचार करायला लावायची जबरदस्त ताकद आहे. न्यायालयाचं वातावरण भडक, चकचकीत आणि अवास्तव पद्धतीने दाखवणारे सिनेमे आपण आजवर बघितल्याने 'कोर्ट' मधलं अत्यंत अस्सल असं कोर्टाचं वातावरण आपल्यावर अनामिक दबाव आणून आपल्याला खर्‍याखुर्‍या कोर्टात बसायला लावतं, आणि लाजबाब पद्धतीने पडद्यावर मांडलेल्या साध्यासाध्या घटना-प्रसंगांतून गोष्ट पुढे सरकत जाताना आलेल्या अस्वस्थतेत आणखी भर टाकतं. 'कोर्ट'ची कथा सुरू होते ती मुंबईतल्या गटारात सफाई कामगाराचा मृतदेह आढळतो आणि पोलिस एका जेष्ठ शाहिर-लोककलाकाराला 'भावना चेतवल्या जातील अशी गाणी गाऊन त्या कामगाराला आत्महत्येला उद्युक्त केल्याबद्दल' अटक करतात- या घटनेने. कोर्टात हा खटला उभा राहतो, आणि दोन्ही बाजूंचे वकील आपापले युक्तीवाद सादर करतात. या युक्तीवादांना आधार अर्थातच आहे- कायद्याच्या जाड पुस्तकांत कितीतरी वर्षांपुर्वी लिहून ठेवलेल्या किचकट वाक्यरचनांचा, आणि वकील आणि न्यायाधीश वेळोवेळी करत असलेल्या त्यांच्या 'इंटरप्रिटेशन'चा. एखाद्याचा जीवनमरणाचा, आणि त्याहीपेक्षा आयुष्यभर जपलेल्या तत्त्वांचा निवाडा करण्याचं काम करत असलेली कोर्टाची ही जीवघेणी आणि भितीदायक थंडता आपल्याला पार हादरवून टाकते. निवाडे होत राहतात खरे, आणि ते करण्याचं काम करत असलेले या सार्‍या वकील-न्यायाधीशांना आपलं व्यक्तिगत आयुष्यही असतंच असतं, आणि त्यातही केलेले निवाडे आणि वाट्याला आलेला न्याय- हेही ओघाने आलंच. हे सारं बघत फ्रीझ झालेले आपण शेवटच्या प्रसंगातलं झालेलं न्यायदान बघून पुन्हा एकदा अस्वस्थतेच्या वादळात सापडतो..
***

Khwada-खॠवाडा.jpg
आपल्या जबरदस्त लघुचित्रपटांसाठी बक्षिसे मिळवणार्‍या भाऊराव कर्‍हाड्यांचा 'ख्वाडा' हा खास 'आपल्या मातीतला' पहिला मराठी चित्रपट. ख्वाडा' म्हणाजे खोडा, अटकन, अडचण, 'Obstacle'. भटक्या धनगर समाजाचं जीवघेणं वास्तव ज्या पद्धतीने आणि हातोटीने पडद्यावर मांडलं आहे, त्यावरून दिग्दर्शक हे सारं अक्षरशः जगला आहे- असं म्हणायला हवं. अस्सल मातीच्या पोताचा आणि धनगरांच्या मेंढरांसारखाच साधाभोळा गाडग्यामडक्यांचा आणि विंचवाचं बिर्‍हाड असलेला संसार बघताना 'फँड्री'ची आठवण अपरिहार्य! आपल्या जनावरांसाठी जंगला-कुरणांवर अवलंबून राहण्याशिवाय धनगरांना पर्याय नसतो, आणि कुरणं एकाच ठिकाणी सदासर्वकाळ हिरवीगार नसतातच, त्यामुळे जनावरांच्या सोयीसाठी आपली गैरसोय करत पोराबाळासुनांसकट सारा कबिला हलवत राहणारे हे लोक पोटच्या पोरासारखंच आपल्या जनावरांवर प्रेम करतात. अशाच एका कडव्या पण म्हातार्‍या आणि असहाय धनगराची आणि त्याच्या बेडर आणि जिगरबाज जवान पोराची ही कहाणी. मेंढ्या चारत असताना गावातल्या एका पहिलवान आणि वजनदार हस्तीच्या शेतात काही मेंढरं शिरली म्हणून तो म्हातार्‍याच्या सार्‍या मेंढ्याच जप्त करतो. सारा राग आणि अपमान गिळून म्हातारा सार्‍या गावाच्या हातापाया पडतो, पण व्यर्थ. आजवर नाईलाजाने शांत बसवला गेलेला म्हातार्‍याचा तरूण मुलगा मात्र पेटतो आणि आपल्या खास शैलीत आणि 'धनगरी' पद्धतीत न्याय मिळवायला निघतो. महानगरी आयुष्यांना पूर्णपणे अपरिचित असलेल्या वातावरणाची आणि जगण्याच्या पद्धतीची, संस्कृतीची खास मांडणी करणार्‍या या- जबरदस्त सिनेमॅटोग्राफी असलेल्या, अस्सल ग्रामीण बाजाचे चपखल खटकेबाज संवाद आणि धनगरी शिव्या-वाक्प्रचार यांनी सजलेल्या या मस्त कलाकृतीने निखळ समाधान तर दिलंच, पण मेंढरं: धनगराची, आणि एका महानगरातली- अशा तुलनेच्या समेवर संपलेल्या या चित्रपटाने भारून टाकलं, अंतर्मुख केलं...
***

PIFF Screening categories-

'कोर्ट' (Court) - World Competition
'ख्वाडा' (Obstacle) - Marathi Competition.
***

'पिफ'मध्ये भाऊराव कऱ्हाडे यांना अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
***

हे चित्रपट बघायला मिळतील तेव्हा मिळतील, पण हे वाचून " असे चित्रपट निघू शकतात" असे समाधान मात्र मिळतेय.

हे चित्रपट बघायला मिळतील तेव्हा मिळतील, पण हे वाचून " असे चित्रपट निघू शकतात" असे समाधान मात्र मिळतेय.

वरच्या दोन्ही फिल्म्स बघायलाच हव्यात कॅटेगरीतल्या वाटल्या.
विशेष करून दुसरा. वर्णनावरून तरी जबरदस्त मेकिंग दिसतंय.
धनगरांचं, मेंढपाळांचं आयुष्य आपल्या कल्पनेच्याही पलिकडे दूरापास्त असतं हे जेव्हा प्रत्यक्ष काही काळ वस्त्यांवर जाऊन जवळून बघितलं तेव्हा थोडंफार कळू शकलं. त्यामुळे प्रदर्षनाकडे लक्ष ठेवायला पाहिजे आता.