आजही नाहीच त्या दारात रांगोळी

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2015 - 06:18

आजही नाहीच त्या दारात रांगोळी
आजही येतील ओठी खिन्नश्या ओळी

रोग अस्ताव्यस्त होण्याचा बरा झाला
बांध आता जीवना तू आपली मोळी

सांजवेळी गाठला मुक्काम पक्ष्यांनी
भिरभिरत आहे तरीही एक पाकोळी

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी

तू इथे येऊन गेल्याचे म्हणाली ती
आजरा घनसाळ गंधाची तुझी चोळी

आरसा पाहून खात्री वाटते थोडी
राहिली आहेत काही माणसे भोळी

वाचवा सूर्योदयापासून ही पृथ्वी
रोज रात्री हिंडतो मी देत आरोळी

भोवतालाचा सुखाशी राबता नसतो
तडफडत पाण्यातही असतेच मासोळी

फेकली फाडून सारी प्रेमपत्रे पण
ठेवली आहे तिने ती एक चारोळी

'बेफिकिर' झालेत मोसम माणसांपेक्षा
यायची यंदा दिवाळीऐवजी होळी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांजवेळी गाठला मुक्काम पक्ष्यांनी
भिरभिरत आहे तरीही एक पाकोळी

भोवतालाचा सुखाशी राबता नसतो
तडफडत पाण्यातही असतेच मासोळी

व्वा. हे शेर फार आवडले. पहिला तर फारच.

फेकली फाडून सारी प्रेमपत्रे पण
ठेवली आहे तिने ती एक चारोळी>>>.सुरेख!

'बेफिकिर' झालेत मोसम माणसांपेक्षा
यायची यंदा दिवाळीऐवजी होळी>>>>>आवडले.

सांजवेळी गाठला मुक्काम पक्ष्यांनी
भिरभिरत आहे तरीही एक पाकोळी

भोवतालाचा सुखाशी राबता नसतो
तडफडत पाण्यातही असतेच मासोळी

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी
अफलातुन सुन्दर शेर.

बेफिकीर,

सुट्ट्या द्विपद्या सुंदर आहेत. पण गझल म्हणून ताळेबंद (टोटल) लागत नाही. हे असं क्वचितच होतं. तुमच्या गझलेत पहिल्या कडव्यापासून शेवटापर्यंत प्रवास अगदी लख्ख दिसतो. हिच्यात दिसत नाही. किंवा, मला कळला नाही असं म्हणूया. जरा समजावून सांगणार का?

आ.न.,
-गा.पै.

रोग अस्ताव्यस्त होण्याचा बरा झाला
बांध आता जीवना तू आपली मोळी

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी

खूप सुंदर ! एक उदास summing up आहे अनेक शेरांमध्ये.

आजरा घनसाळ जी एक तांदुळाची जात आहे. तिचा सुगंध ख्याती पावलेला आहे.

गामा - गझलेतील प्रत्येक द्विपदी सुटीच वाचून रसग्रहण करणे अपेक्षित असते. पुढील / मागील द्विपदींशी संबंध जोडू पाहणे अपेक्षित नसते.

सर्वांचे अनेक आभार!

बेफिकीर,

>> गझलेतील प्रत्येक द्विपदी सुटीच वाचून रसग्रहण करणे अपेक्षित असते. पुढील / मागील द्विपदींशी संबंध जोडू पाहणे
>> अपेक्षित नसते.

असं असलं तरी तुमच्या खूपशा गझलांत एक प्रकारचा आंतरिक प्रवास जाणवतो. या गझलेत जाणवत नाही हा माबुदोस. तुमच्या लेखातलं हे वाक्य प्रकर्षाने आठवलं :

>> गज़ल - किमान पाच ’दोन दोन’ ओळींच्या स्वतंत्र कवितांची मालिका, ज्यात गज़लतंत्र पाळले गेलेले असून आशय
>> हा स्वानुभुती, प्रेम, व्यथा, तत्त्वज्ञान यावर भाष्य करणारा आहे.

प्रस्तुत गझलेत स्वानुभवावर भाष्य केलेलं दिसतंय. की वेगवेगळ्या द्विपदींत वेगवेगळी भाष्ये हाताळलेली चालू शकतात? गझलकाराला काही सांगायचंय का? जरा जास्तच प्रश्न विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

वेगवेगळ्या द्विपदीत वेगवेगळी भाष्ये हाताळलेली चालतात असेच नव्हे तर सर्वसामान्यपणे वेगवेगळी भाष्येच हाताळली जातात. मुसल्सल गझलाही असतात ज्यात एकाच विषयावर शेर असतात, पण तेही प्रत्यक्ष अर्थाने एकमेकांच्या पूर्ण विरोधी अर्थाचे असू शकतात.

म्हणजे असे:

समजा प्रेम हा विषय असला तर मुसल्सल गझलेत पहिल्या शेरात प्रेमातील सर्वाधिक समर्पणाचा विषय, दुसर्‍या शेरात पहिली नजरानजर हा विषय, तिसर्‍या शेरात विरह, चौथ्या शेरात एकमेकांचा अतीव राग, पाचव्या शेरात एकतर्फी प्रेम असतानाचा काळ, असे काहीही व कश्याही क्रमाने असू शकते. प्रत्येक शेर स्वतंत्रपणे आस्वाद घेण्यासाठीच असतो. हे झाले मुसल्सल गझलचे. गैरमुसल्सलमध्ये तर विषयच वेगळे असतात. जसे वरील गझलेत आहेत.

गझलकाराला काही सांगायचंय का? - अर्थातच! त्याशिवाय गझल कशी निर्माण होईल?

ह्या गझलेचा संपूर्ण अर्थ उद्या देईन.

तोवर, आपल्या चिकित्सक परंतु जेन्युईन प्रतिसादांसाठी आपले आभार मानतो. Happy

सुरेख गझल…

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी

व्वा….

भोवतालाचा सुखाशी राबता नसतो
तडफडत पाण्यातही असतेच मासोळी

हा ही आवडला.

शुभेच्छा.

बेफिकीर,

एक उदाहरण देतो. तुमचीच उर्मी विझली पहा कशी जळजळीत कविता आहे. प्रखरपणा प्रकर्षाने जाणवतो. पण पूर्ण आकलन होत नाही. विशेषत: पेनासाठी कडव्याचा काहीच अर्थ लागत नाही. त्यासाठी स्पष्टीकरण वाचावं लागतं. त्यातून निर्मितीप्रक्रियेवर म्हणा किंवा अर्थोत्पत्तीवर म्हणा किंवा काव्य कसं वाचावं यावर म्हणा, एका तऱ्हेचा प्रकाशझोत पडतो. तसाच झोत या गझलेवर टाकावा ही विनंती. Happy

आ.न.,
-गा.पै.

गझलेच्या शेरांचा व्यवस्थित आस्वाद घेण्यासाठी लवचीक मानसिकता आवश्यक असते. कित्येक रसिक मी असे पाहिलेले आहेत जे गझल सादर होत असताना निव्वळ काफिया आणि रदीफ ऐकू आले की समेवर आल्यासारखे वाटून 'वा वा' म्हणतात. त्यांच्यासाठी समोर उच्चारल्या जाणार्‍या गझलेतील यमक व अंत्ययमक उच्चारले जाणे हेच आनंददायी असते. पण शेर तसा आस्वादणे हा एक प्रकारचा अन्याय आहे. गझलेचा शेर आस्वादताना सर्वात पहिले म्हणजे मगाशी ऐकलेला त्याच गझलेतील शेर किंवा ह्यापुढे येणारा त्याच गझलेतील शेर ह्यांचे विचार मनातून काढून टाकायचे. हीच ती लवचीकता! दुसरे म्हणजे काही शेर असे असतात की त्यांच्या शब्दार्थाला काही विशेष अर्थच नसतो, पण त्यातून जाणवणारा अर्थ थोडावेळ गुंगवतो, जसे वरील गझलेतील पाकोळीचा शेर! तिसरे म्हणजे काही शेर निव्वळ शाब्दिक पण त्याचवेळी गहनही असू शकतात. त्यांच्यात शब्दार्थापलीकडला काही अर्थ नसतो पण जो अर्थ असतो तो काहीतरी खास असतो. काही शेर हे अतिशय सध्या, कोणीही कधीही उच्चारेल अश्या, दैनंदिन जीवनात केव्हाही उच्चारल्या जाणार्‍या ओळींचे असतात. त्यांच्यातील सहजपणा आणि त्यत लपेटून आलेली आशयाची गंमत अनुभवायची असते. हे शेर सहसा प्रचंड दाद मिळवतात. ज्येष्ठ उर्दू शायर बशीर बद्र ह्यांचा हा शेर पाहा, अश्याच निव्वळ सहज ओळींचा! ह्या ओळी आपणही दिवसभरात केव्हाही बोलत असतो. पण ह्या ओळीम्चा शेर होतो तेव्हा गंमत येते.

रातका इंतजार कौन करे
आजकल दिनमे क्या नही होता

ह्याशिवाय काही शेर हे एखाद्या शायराच्या खासियतीनुसार असतात. त्यात शायराचे वेगळेपण भरलेले असते.

ह्याशिवायही शेरांचे अनेक प्रकार असतात.

जमीनीमुळे झालेले शेरही अनेक असतात. त्यांना 'तद्दन कृत्रिम' म्हणणे ही एक फॅशन असते. माझे मत उलटे आहे. जमीनीमुळे झालेला शेर आपल्या अस्सल जीवनातील अनुभुतीशी निगडीत होईल असा रचून तो अस्सल बनवणे हे एक आनंददायी आव्हान असते व ते पेलू शकलो की होणारा आनंद खूप असतो.

एकंदरीत, गझलेतील शेर कसा असेल तसेच कोणत्या क्रमाने कोणत्या विषयावरचे शेर येतील असे काहीच नसते. Happy

पुढील प्रतिसादात वरील गझलेतील शेरांबाबत काही लिहायचा प्रयत्न करतो. Happy

आजही नाहीच त्या दारात रांगोळी
आजही येतील ओठी खिन्नश्या ओळी

ती येथे राहायची तेव्हा रोज सकाळी तिच्या दारात रांगोळी काढायची. तिला रांगोळी काढत असताना बघण्याचे वेड लागले होते. हे तिला माहीतच नव्हते. एकतर्फी प्रेम होते ते! जे कधी व्यक्त केलेही नाही, व्यक्त करावेसे वाटलेही नाही आणि तसे साहसही झाले नाही. (खता तो जब हो के हम हाले-दिल किसीसे कहे, किसीको चाहते रहना कोई खता तो नही). पण एक दिवस अचानक ती जागा सोडून गेली. तेव्हापासून ते दार बंद असते. रोज सकाळी उठून पाहतो की काहीतरी चमत्कार होईल आणि अचानक ती रांगोळी काढताना दिसेल. रोज निराशा होते. आजही निराशाच पदरी पडली. ती येथे होती तेव्हा माझ्या भावनांचे स्वरूप सुप्त होते. ती निघून गेल्यानंतर आलेल्या निराशेने कवितेचे स्वरूप स्वीकारले आहे. त्यामुळे ती दिसली नाही की आपोआप खिन्नपणाने भारलेल्या ओळी ओठांवर येतात. आजही त्या दारात रांगोळी नाही हे पाहून आजही तश्याच खिन्न ओळी सुचणार!

रोग अस्ताव्यस्त होण्याचा बरा झाला
बांध आता जीवना तू आपली मोळी

जगत असताना बेभानपणे आपण आपल्या मनाची वाटणी आपल्याला जन्मापासून भेटणार्‍या हजारो माणसांमध्ये हवी तशी, सुचेल तशी करत असतो. कोणाला मनात अधिक स्थान देतो तर कोणाला कमी! मग कोणाला पूर्ण मन देतो तर कोणाला थोडेसे! त्यातही काळानुरूप बदल करत राहतो. शेवटी आपले मन त्या माणसांमध्ये इतके आणि इतक्यावेळा विभागले जाते की सगळा गोंधळ होतो आणि एक वैचारीक अस्ताव्यस्तपणा तेवढा उरतो. ही जणू एक व्याधीच आहे ह्या भूतलावर गुंतून राहण्याची! वास्तविक पाहता आपण इथले नाहीच आहोत ह्याचे भान राहात नाही. पण आपली ती व्याधी आता बरी झाली आहे हे लक्षात येऊ लागले आहे. हळूहळू प्रत्येक माणसामध्ये गुंतलेला आपल्या मनाचा एकेक अंश परत आपल्याकडे येऊ लागला आहे. ही व्याधी बरी झाल्याने (होत असल्याने) आता जीवनाने मनाचे ते विखुरलेले अंश ताब्यात घेऊन त्यांची (स्वतःची) मोळी बांधायला हरकत नाही.

सांजवेळी गाठला मुक्काम पक्ष्यांनी
भिरभिरत आहे तरीही एक पाकोळी

हे दृश्य अनेकजण अनेकदा पाहतात. सगळे पक्षी तिन्हीसांजेला झाडाकडे परत जाऊन सातत्याने किलबिलत राहतात. नंतर गहन शांतताही पसरते. पण त्या अंधारातही एक कुठलातरी इवलासा पक्षी उगाचच इकडे तिकडे उडत असतो. तो का उडत असतो ह्याचे स्पष्टीकरण देणे हा शेराचा उद्देश नाही. त्याचे ते एकाकी उडणे व त्यातील औदासीन्य श्रोत्यापर्यंत पोचवणे इतकेच शेराचे काम आहे. तो पक्षी काय शोधत असतो, त्याला घरटे मिळत नसते का, त्याला दिवसभरात काहीच अन्न मिळालेले नसते का, त्याला त्याच्या घरट्यातील इतर पक्षी हुसकावून लावत असतात का हे ज्यानेत्याने करायचे विचार आहेत. अनेक कंपन्यांमध्ये बहुतांशी कर्मचारी संध्याकाळी घरी गेल्यानंतरही एखादाच कोणीतरी खूप उशीरापर्यंत काम करत राहतो. त्याला नोकरीची नितांत गरज असल्याने तो कामाची प्रचंड काळजी घेत असतो. अश्या प्रकारच्या घटनांनाही शेर लागू पडतो, पण ह्या शेराबद्दल ज्यानेत्याने स्वतःचे मत बनवणे अपेक्षित आहे.

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी

हा निव्वळ शाब्दिक शेर आहे! ह्यात मजा आहे ती सुट्टीत आजोळी जाण्यात जो उत्साह भरलेला असायचा त्याची तुलना थेट कवितेला भेटतानाच्या उत्साहाशी केलेली असणे ही! कविता ही एक तपस्या आहे असे म्हणतात. (अर्थातच, त्यात गझलही आलीच कारण गझल ही आधी एक कविताच असते). कवितेला कवी वेगवेगळ्या प्रकारे बघतो. तसेच एकच कवी वेगवेगळ्या वेळी कवितेला वेगवेगळ्या प्रकारे बघत असतो, कधी मैत्रीण, प्रेयसी, बहिण, मुलगी, आई, आजी, वैरीण, वेदना अश्या अनेक प्रकारे कविता कवीला दिसू शकते. ह्या शेरात आजोळहून मिळणारे निरपेक्ष वात्सल्य ह्या रुपात कवितेकडे कवी पाहात आहे.

तू इथे येऊन गेल्याचे म्हणाली ती
आजरा घनसाळ गंधाची तुझी चोळी

आजरा घनसाळ ही सुवासिक तांदुळाची जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात हा घनसाळ तांदूळ प्रामुख्याने पिकतो. तो विख्यात तांदुळ आहे. त्याचा वास भरून राहतो. हा शेर शाब्दिक आहे पण कल्पकही आहे. मात्र ह्या शेरात इतर कोणताही (शब्दार्थाशिवायचा) अर्थ लपलेला वगैरे नाही. येथे प्रेयसीचा सुगंध तिच्या कपड्यांद्वारे जाणवत राहतो ही एक तरल भावना फक्त कथन केलेली आहे.

आरसा पाहून खात्री वाटते थोडी
राहिली आहेत काही माणसे भोळी

हा मिश्कील शेर आहे. मुशायर्‍यामध्ये असे शेर भाव खातात. हा खास सादरीकरणाने नटवण्याचाही शेर म्हणता येईल. मात्र तरीही ह्या शेरात एक केविलवाणेपणही आहे की कवी म्हणत आहे की मी एकटाच भोळा राहिलो आहे. बाकीचे सगळे जग बनेल झालेले आहे व त्याचे अनुभव मला सातत्याने येत आहेत. ही एक मायूसीची भावना आहे. पण ती पोचवायचे काम सादरीकरणातून अधिक होणार आहे, निव्वळ वाचनातून ते होईलच असे नाही.

वाचवा सूर्योदयापासून ही पृथ्वी
रोज रात्री हिंडतो मी देत आरोळी

हा खरे तर एक चांगला शेर आहे पण विशेष गौरवला गेलेला दिसत नाही. कमनशीबी शेर म्हणावा लागेल. हा गोटीबंदही शेर आहे. ह्या गझलेतील बहुतेक सगळे शेर गोटीबंदच आहेत. म्हणजे त्यातील शब्द रिप्लेस करणे अशक्य आहे. हा चांगल्या गझलेचा एक निकषही असतो. (आत्मस्तुती समजू नये, प्रामाणिकपणे व स्वतःच्याच गझलेकडे त्रयस्थपणे पाहून हे सगळे लिहीत आहे). ह्या शेराचा शब्दार्थ स्पष्ट आहेच. पण अभिप्रेत अर्थ असा आहे. कवीला दिवस उजाडणे नको झालेले आहे. दिवस उजाडला की वास्तवाचे भान येते, मग क्लेष सुरू होतात, दैनंदिन जीवन जगण्याच्या आव्हानांची न झेपणारी मालिका सुरू होते. ह्या सगळ्यापासून कवी फक्त तेव्हाच दूर राहू शकतो जेव्ह सगळे जग रात्र झाली म्हणून निद्रीस्त झालेले असते. म्हणून कवी आर्तपणे प्रार्थना करत आहे की आता पुन्हा सूर्योदय होऊ नये.

भोवतालाचा सुखाशी राबता नसतो
तडफडत पाण्यातही असतेच मासोळी

मासोळी पाण्यात पोहताना पाहिली तर बर्‍याच वेळा तिची हालचाल ही तडफडल्यासारखीच असते. पण हा फक्त 'दृश्य परिणाम' आहे शेराचा! खरा परिणाम तो नाही. खरा अर्थ असा आहे की वरवर सुखी दिसणारे / भासवणारे लोक मनात काय काय दु:खे भोगत असतात ते ज्याचे त्यालाच ठाऊक! हा शेर अश्या प्रकारचा शेर आहे ज्यात शब्दार्थ एक आहे आणि मथितार्थ दुसराच!

फेकली फाडून सारी प्रेमपत्रे पण
ठेवली आहे तिने ती एक चारोळी

हाही एक फक्त सादरीकरणाने नटवण्याचा, मुशायर्‍यात शोभेलसा शेर आहे. पण ह्याही शेरात जुन्या, आज संदर्भहीन बनलेल्या प्रेमाची चुटपुटती आणि बोचरी आठवण आहे व हीच बाब नेमकी ह्या शेराला गझलेचा शेर बनवते.

'बेफिकिर' झालेत मोसम माणसांपेक्षा
यायची यंदा दिवाळीऐवजी होळी

हा शेर शाब्दिक आहे, मक्ताही आहे पण दिवाळीऐवजी होळी ह्यात एक वेगळा अर्थ आहे. दिवाळी हा एक साजरा करण्याचा सण असतो. होळीसुद्धा साजराच करण्याचा सण असतो, पण अनेकदा काही खास चळवळींमधून लावलेल्या आगींनाही होळी म्हणतात. परदेशी कपड्यांची होळी हे एक उदाहरण! तसेच, यंदा एखादवेळेस दिवाळी साजरी करण्याच्या भावनांचीच होळी करावी लागेल असे ह्या शेरात म्हणायचे आहे. ते कदाचित नेमकेपणाने अभिव्यक्त झालेले नसेल. दिवाळी साजरी करण्याच्या भावनांचीच होळी म्हणजे सुखे संपतील व दु:खी कालखंड सुरू होईल. हे पटत असले तरच हेही पटेल की आधीच्या ओळीतील मोसम (ऋतू / सीझन्स) ह्यातून प्रत्यक्ष हिवाळा, उन्हाळा अभिप्रेत नाही तर नशीबाचे ऋतू अभिप्रेत आहे.

तर असे गझलेत अनेकरंगी शेर निव्वळ साचा एकच असल्यामुळे एकमेकांच्या शेजारी न भांडता (जागेसाठी, क्रमासाठी वा कश्याचसाठी न भांडता) गुण्यागोविंदाने बसून राहतात. Happy

इतके वैविध्य एकदम अंगावर आल्यावर त्याचा यथोचित आस्वाद घेण्यासाठी मात्र लवचिकता आवश्यक असते रसिकमनामध्ये! Happy

धन्यवाद व चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफिकीर! जत्रेत वडीलधाऱ्याच्या बोटास पकडून ठेले हिंडल्यासारखं वाटलं! Happy तुमच्या गझला वाचतांना साकल्याची अपेक्षा असते. स्पष्टीकरण वाचून ती पूर्ण झालेली आहे.

सगळ्या द्विपद्या सुट्ट्या सुट्ट्या आवडल्या होत्या. पण एकत्रित वाचतांना अर्थ लक्षात येत नव्हता. आता मात्र हळूहळू लक्षात येतोय. पुनश्च आभार!

आ.न.,
-गा.पै.

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी >>>
........ हाडाचा कवीच असे लिहू शकतो.

आरसा पाहून खात्री वाटते थोडी
राहिली आहेत काही माणसे भोळी >>तुम्ही म्हणताय तसा विशेष मिश्कील शेर.

'बेफिकिर' झालेत मोसम माणसांपेक्षा
यायची यंदा दिवाळीऐवजी होळी >> व्वा.

त्याच आवेगात घेतो भेट कवितेची
धावती पोरे जशी सुट्टीत आजोळी >> सर्वाधिक आवडला.

आजरा घनसाळ बद्दल वाचल्यावर सुरेख अर्थ लागलाय. Happy

धन्स.