एका लेण्यांच्या मागावर - खडसांबळे लेणी

Submitted by स्वच्छंदी on 9 January, 2015 - 11:44

बरोबर सव्वातीन-साडेतीन वर्षे झाली असतील पण सगळे जसेच्या तसे आठवतेय. तो सतत हुलकावणी देणारा पाउस, त्या घनगडावर चावलेल्या मधमाश्या, ते एकोल्याचे आणी केवणीचे टेबल लँड, ती चुकलेली वाट आणि सगळे काही....
---------------------------------------------------------------------------------------

ह्याची सुरुवात कधी झाली ते नक्की आठवत नाही पण काही वर्षांपुर्वी सांगाती सह्याद्रीचा वाचत असताना बहुदा माझ्या मनात ठिणगी पडली असावी. २००६ साली सवाष्णी घाट केला तेव्हाच तेलबैला, सुधागड परीसराने मोहीनी घातली होती. पुढे घाटवाटा आणि लेण्यांच्या भटकंतीच्या निमित्ताने ती अधिकच गडद झाली आणी आतातर त्या एरियात भटकल्याशीवाय चैन पडेनासे झालेय Happy .

---------------------------------------------------------------------------------------

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ठाणाळे लेण्यात इंग्रजांपासून लपण्याकरीता आश्रय घेतला होता आणी ह्याच लेण्यात मौर्यकालीन नाणी (पंच मार्क्ड नाणी) मिळाल्याचे वाचल्यानंतर एका वर्षीच्या जून महीन्यात ठाणाळेचा ट्रेक करून झालेला, आणी त्याच वेळेस शेजारच्या वाघजाई घाटाची आणी आजूबाजूच्या परीसरातल्या ट्रेकची माहीती मिळालेली, पण घाट हुकलेला. ह्याच लेण्यांच्या अधीक वाचनात नेणवली/खडसांबळे लेण्यांच्या उल्लेख वाचला आणी ह्या लेण्यांच्या भटकंतीच्या मागावर लागलो, म्हणजे मनातल्या मनात प्लॅन बनवायला लागलो Happy . ठाणाळे लेणी बघतानाच जाणवले होते की नि:संशय ह्या आणी ह्याच्या समकालीन नेणवलीच्या लेण्या ह्या अतीप्राचीन आहेत/असाव्यात. काही अभ्यासकांच्या मते तर ह्या लेण्या महाराष्ट्राच्या सर्वात प्रथम मानल्या जाणार्‍या भाजे लेण्यांहूनही प्राचीन आहेत. कालखंड अंदाजे इ.पु. २ रे शतक किंवा त्या आसपास.

जेव्हा खडसांबळे लेण्यांविषयी शोध घेत गेलो तेव्हा त्यावेळेस फार काही हातात लागले नाही. जालावरतर कुठेच काही हातात लागले नाही, कोणी इथे गेल्याचीही माहिती नव्हती, फोटो तर बिलकुलच नव्हते. कुलाबा जिल्ह्याचे पहिले गॅझेटिअर इंग्रजांनी छापले तेव्हा ह्या लेण्यांचा शोध लागला नव्हता त्यामुळे तिथेही ह्या लेण्यांविषयी माहिती नव्हती (भारत स्वतंत्र झाल्यावर छापलेल्या गॅझेटिअरच्या सुधारीत आवृत्तीत ह्या लेण्यांचा उल्लेख आहे मात्र जायचे कसे ह्याचा नाही). आनंद पाळंदे सरांच्या एका पुस्तकात ह्या लेण्यांविषयी माहिती होती पण ते पुस्तक माझ्याकडे त्यावेळी नव्हते. ह्या शोधाशोधीत १-२ वर्षे गेली पण ठोस काही हातात लागत नव्हते.

आणी एका दिवशी असेच जालावरती वाचत असता माहिती मिळाली की ह्या लेण्यांमध्ये पुरातत्व खात्याने नेणवलीतील दोघांना लेणी साफसफाईसाठी ठेवले आहे. झालं, काहीतरी दुवा हाताशी आला असे वाटले. पण शोधाशोध करुनही काही संपर्क हाताशी येईना आणि लेण्यांच्या ठिकाणाविषयी वा मार्गाविषयी कोणी सांगेल असे कोणी भेटेना. पण हा ट्रेक काही डोक्यातून गेला नव्हता आणि माझी शोधाशोध चालूच होती. अश्यातच माझा एक मित्र त्यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला नाणदांड घाट करून आलेला होता आणी त्याच्याकडे त्या भागाची माहीती होती. मग मात्र डोस्के फिरल्यागत झाले आणी ठरवले की काहीही झाले तरी ह्या वर्षी हा ट्रेक करायचाच Happy

---------------------------------------------------------------------------------------

आता त्याभागात ट्रेक करायचा म्हणजे लेण्यांबरोबरच घनगडही करायचा असे ठरले. जेव्हा हा ट्रेक पक्का केला तेव्हापासूनच अनुकूल गोष्टी घडायला लागल्या. मित्राकडून केवणी गावाची माहिती मिळवली. एकोले मधील एका गावकर्‍याचा संपर्क मिळाला आणी तयारीला लागलो. ग्रुप मध्ये घनगड - नाणदांड घाट - खडसांबळे लेणी असा ट्रेक जाहीर केल्या मुळे १२ जण तयार झाले (आम्हाला कोणालाच माहिती नव्हते की पुढे काय वाढून ठेवले आहे ते Happy )

---------------------------------------------------------------------------------------

दिवस पहिला:

सकाळी लोणावळा बस स्टँड वर जमलो तेव्हा पावसाचा मागमुसही नव्हता आणी जबरदस्त उकडत होते Sad . लोणावळा-भांबर्डा गाडी बरोबर ८.३० ला सुटली तेव्हा असे वाटले की सर्व काही जुळून आलेय. १०.१५ ला भांबर्ड्याला पोचलो तेव्हाही पावासाचे काही लक्षण नव्हते, उन होते आणी उकडत नसले तरी हवाही नसल्याने जबरदस्त घाम यायला सुरु झाले होते.

१. भांबर्ड्यातून एकोले, घनगड आणी तेलबैला परीसर

२. भांबर्ड्यातून एकोले, घनगड

३. भांबर्ड्यातून तेलबैला

एकोले मध्ये जांच्याकडे संपर्क झाला होता त्यांच्याकडे सॅक्स टाकल्या आणी घनगडाकडे अक्षरश: पळालो. पळालो कारण गावकर्‍यांनी सांगीतले होते की जर खुप पाउस सुरु झाला तर केवणीवरुन कोकणात उतरणे अशक्य होईल Sad . ते काही आम्हाला परवडणारे नव्हते. घनगडचा ट्रेक तसा सोपा आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा पावसाळ्यात इथं प्रथम आलो होतो तेव्हा गडावर शिड्या लावल्या नव्हत्या आणी आम्हाला दरवाज्यातूनच परत जावे लागले होते. पण आता तशी परीस्थीती नव्हती. शिड्या लावल्या असल्याने आम्ही गडाच्या माथ्यापर्यंत गेलो. वरती पोचलो तेव्हा सगळा किल्ला सोनकीच्या फुलांनी प्रचंड फुलोरला होता. दिसायला ते मोठे नयनरम्य दृश्य दिसत असले तरी किल्ला फिरण्याची पंचाईतच होती. आम्हाला गावकर्‍यांनी सांगितले होते की किल्ल्याच्या उत्तर आणि पश्चिम बुरुजावरून एकोले आणी घनगड पाठचा परीसर दिसतो आणी त्यासाठीतरी आम्हाला किल्ल्यावर भटकणे भागच होते.

४. घनगडाचे काही फोटो

घनगडावरून अप्रतीम दिसणारा तेलबैला परीसर

किल्ला भटकताना जाणवले की फिरताना सोनकीच्या फुलांचा त्रास होतोय. त्यातच फुलांवर फिरण्यार्‍या मधमाश्यांनी संकटाची जाणीव करून दिली आणी तसेच घडले. मी आणि ग्रुप मध्ये अजून दोघांना माश्या चावल्याच. नशीब की त्या आग्यामाश्या नव्हत्या आणी चावलेल्या ठिकाणी थोडेसे सुजण्यापलीकडे फार झाले नाही, नाहीतर आमचा ट्रेक तिथेच संपला असता Happy . पण आम्ही नेटाने तसेच उत्तर आणि पश्चिम बुरुजावर गेलो आणी केवणी आणी परिसर न्याहाळला. फार काही आशादायक वाटले नाही. एकतर सगळीकडे धुक्यासारखे वातावरण होते आणी मुख्य म्हणजे एकोले ते केवणी हे अंतर वाटले त्यापेक्षा बरेच होते.
पटापट जितका जमेल तितका किल्ला बघून आणी केवणी परीसराचे फोटो काढून एकोल्यात उतरलो तेव्हा दुपारचा १.३० झाला होता. पुढची चाल बघता आम्ही इथेच जेउन घ्यायचे ठरवले (हा निर्णय पुढे अगदी योग्यच निर्णय ठरला).

जेवण उरकून मधुकरला (आम्हाला केवणीतून खाली कोकणात घेऊन जाणारा आमचा गाईड) घेउन जेव्हा केवणीच्या दिशेने निघालो तेव्हा २ वाजले होते. मधुकर आम्हाला केवणीपार नाणदांड घाटाने कोकणात उतरण्याची सुरुवात करुन देणार होता. नुकतेच जेवण झालेले असल्याने सगळ्यांचा चालण्याचा वेग मंदावला होता. अश्यातच पाठीमागे मुळशी धरणावर पावसाळी ढगांनी गर्दी केली आणी मधुकर घाई करू लागला. त्याच्या म्हणण्यानुसार जर का पाऊस पडायला सुरु झाला तर नाणदांड उतरून खालची नदी पार करणे कठीण होईल. खरेतर आम्ही ठरवले होते की पटापट नाणदांड घाट उतरून ठाकुरवस्तीत राहायला जायचे. कसेबसे केवणीत पोचलो आणी पाठीमागे घनगडावर पाऊस सुरु झाला नशीबाने अजून केवणीत उन होते.

५. घनगड ते केवणी वाटेवरचे काही फोटो

आमचा ग्रूप केवणीच्या पठारावरून चालताना

---------------------------------------------------------------------------------------
आता केवणी गावाविषयी - मी आत्तापर्यंत बघितलेल्या अतीदुर्गम गावात (खानू, गारजाईवाडी, गुगुळशी, धामणव्हाळ इ.इ.) केवणीचाही नंबर बराच वरचा लागतो. १० घरांच्या या गावात रस्ता, वीज, शाळा, वैद्यकीय अश्या प्राथमिक सुविधाही नाहीत आणी कुठल्याही सामानाची खरेदी म्हणजे १.५ तास चालून भांबर्ड्यात यायचे किंवा १ तास ऊतरून कोकणात ठाकूरवाडीला यायचे (आता एकोले ते केवणी असा रस्ता होतोय. हा रस्ता झाल्यावर तरी परिस्थिती सुधारते का बघूया).

---------------------------------------------------------------------------------------

केवणीत पोचलो तेव्हा मधुकरने वेगळाच सुर लावला. म्हणायला लागला की पाठीमागे एकोल्यात पाऊस पडायला लागलाय आत्ता काहीवेळात आपल्याला तो गाठणार मग नदी ओलांदायची पंचाईत होईल म्हणून नाणदांडघाटाने नको जावूया, त्यापेक्षा मी तुम्हाला नाळेच्या वाटेने नेतो. पाठीमागे एकोल्यात भयानक पाऊस सुरु झाल्यावर आमचापण विचार थोडासा डगमगला. आम्हाला नाणदांडघाट माहीत नव्हता आणी नाळेचीवाट तर कधी ऐकलेलीपण नव्हती. आम्हाला तसेही नाणदांड उतरून खडसांबळ्याला जायचे होते आणी मधुकरच्या मते नाळ उतरणे योग्य झाले असते कारण आम्ही थेट खडसांबळ्याला गेलो असतो आणी दुसरे म्हणजे ह्या वाटेने उतरल्यावर नदी ओलांडायचा प्रश्ण नव्हता. मधुकरवर विसंबून आम्ही नळीच्या वाटेने उतरायला तयार झालो.

केवणीतून निघालो तेव्हा ३-३.१५ झाले असतील पण आता सुर्याचा पत्ता नसल्याने चांगलेच अंधारून आले होते. केवणीवरून कोकणात ३ घाटवाटा उतरतात, पुर्वेकडून, दक्षीणेकडून आणी पश्चिमेकडून. केवणी वरून थोडे दक्षीणेकडे चालत गेलो, थोडे थांबलो आणी आहाहा.. काय जबरी दृश्य होते. पाठीमागून सुरु केले तर तेलबैला, घनगड, त्याच्या शेजारचा पहाड, डावीकडे घुटक्याची वाट, हिरडी गाव, हिरडीची गाढवलोट वाट, खाली कोकणामधे नागशेत, कोंडजाई, समोर नळीची वाट आणी खाली खडसांबळे, उजवीकडे नाणदांड घाट आणी खाली ठाकूरवाडी व त्याच्या बरोब्बर समोर सुधागड.. मस्तच्...पण एक प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे हे सर्व एका मोठ्या काळ्या ढगाखाली होते आणी हा ढग कोसळायच्या आत आम्हाला कोकणात उतरून खडसांबळे गाव गाठायचे होते.

पठारावर थोडा वेळ काढल्यावर पुढच्या ट्रेकमध्ये नाणदांडने उतरायचे ठरवून मधुकरच्या मागून सरळ नळीच्या वाटेला लागलो. १५-२० मिनीटात पठार संपते व आपण पठाराच्या टोकाला येतो. इथे आलो तो समोर गर्द जंगलातून नळी खाली गेली होती आता प्रश्ण असा आला की ह्या नळीतून आम्ही उतरणार कसे? पण सोबतीला मधूकर असल्याने त्याची काळजी नव्हती. त्याने शेजारून जाणारी एक बारीकशी पायवाट दाखवली आणी आम्ही उतरायला सुरुवात केली. नळीची वाट तशी वापरात नाहीये अगदी गाववाल्यांच्यासुद्धा त्यामुळे जर बरोबर कोणी नसता तर ही वाट सापडणे थोडे कठीणच होते.

आम्ही मधुकरच्या मागून सावकाश उतरत होतो. सावकाश अश्यासाठी की एकतर पायवाट बारीकशी आणी वापरातली नव्हती व दुसरे म्हणजे जंगलच एवढे घनदाट होते की पायात येणार्‍या वेली, झाडे बाजूला करत प्रसंगी तोडत जावे लागत होते. साधारण १५-२० मि. उतरलो असू तर आम्हा सगळ्याना श्वास घेताना जाणवले की श्वास घ्यायला नेहेमीपेक्षा त्रास होतोय.. चक्क ऑक्सीजनची कमी जाणवत होती.. आणी साहाजीकच आहे म्हणा, जिथे भर दिवसा वाटेवर अंधार होता तिथे आम्हा दमलेल्यांना हा त्रास होनारच. पण तसेच रेटून खाली उतरत होतो. हवा नावालाही नव्हती आणी सुर्यदर्शन तर लांबच राहीले. सतत बडबडणारा आणी भवतालच्या परीसराची माहीती देणारा मधुकर नसता तर आम्ही उतरणे कठीण होते.

किती उतरत होतो त्याचा अंदाज येत नव्हता पण ज्या पद्धतीचा टेरेन होता त्यावरून असे वाटत होते की भराभर खालच्या लेव्हलला येत होतो. साधारण १ तासानी टेरेन बदलला, नळी संपण्याची चिन्ह दिसायला लागली आणी मधुकरच्या चेहर्‍यावर चिंतेची चिन्ह दिसायला लागली. म्हटले की आता नळीतर संपणार मग खालच्या टप्यातला उतार सुरु होईल, जंगलातुन सुटका होऊन विरळ झाडावळीतून खडसांबळे गाठायला फार वेळ लागणार नाही. पण कसचे काय? जसजसे खाली उतरत होतो तसतसे मधुकरची बडबड कमी झाली आणी नजर बोलू लागली. पहील्यांदा मला ते जाणवले. मी आणी इम्रान पुढे त्याच्या बरोबर चालत होतो. विचारले की कुठे जनावराची चाहूल लागलीय की काय? पण तसे नव्हते. निघताना भीती घातलेल्या पावसाने अजून गाठले नव्हते, त्याबाबतीत अजूनतरी आम्ही त्याच्या पुढेच होतो. मग उरली एकच शंका, ज्याच्या भरवश्यावर इथपर्यंत आलो तोच वाट चुकला की काय? हाय कर्मा... तसेच झाले होते. वाटेतल्या गप्पा व बडबडीमुळे आणी रस्ता न मोडल्यामुळे झालेल्या गफलतीतून आम्ही भलत्याच दिशेला लागलो होतो. जायचे होते खडसांबळ्याला पण मधुकर आणी माझ्या अंदाजाने आम्ही जात होतो ठाकूरवाडीकडे. बहूदा मध्येच कुठेतरी सरळ जायच्या ऐवजी उजवीकडची पायवाट पकडली असावी. वाजले होते ५.००. थोडावेळ तसेच उतरल्यावर एका थोड्याश्या मोकळ्या जागेत आम्ही सर्व जमलो.

आता आमच्या समोर दोन पर्याय होते, एक म्हणजे परत उलटे वरती जाऊन रस्ता शोधणे किंवा तसेच खाली उतरून ठाकूरवाडी गाठणे. सगळ्यांची दमलेली अवस्था बघता (मी पण यात आलो Happy ) पहीला पर्याय निकालात काढून तसेच खाली उतरायचे ठरवले, उतरायला सुरु केले आणी इतकावेळ गुमान पाठी पडण्यार्‍या पावसाने आम्हाला गाठलेच आणी जो कोसळायला लागलाय की ज्याचे नाव ते. आता ठाकुरवाडी गाठायची म्हणजे नदी ओलांदणे आले Sad (तिच ओरीजनल प्लॅनमधली नाणदांड उतरुन पार करावी लागणार होती ती). हे लक्षात आले आणी हातात असलेल्या वेळेचे गणीत सोडवण्यासाठी अक्शरशः पळतच खाली उतरायला लागलो. १५-२० मि. नदी दिसायला लागली. नदीचे पाणी वाढायला लागलेले दिसत होतेच, नदीच्या तिरावर आलो आणी लक्षात आले की नदी ओलांडून पलीकडचा डोंगर चढल्याशिवाय ठाकुरवाडित पोचणार नाही Sad . पण वरच्या डोंगरावर ठाकुरवाडीची घरे दिसायला लागल्यामुळे आम्ही थोडेसे रिलॅक्स झालो होतो. नदी ओलांडण्याअगोदर आम्ही मधुकरला त्याची बिदागी दिली आणी निरोप दिला. हो आवश्यकच होते ते कारण एकतर ५.३० झाले होते आणी त्याला परत घरी परतायचे होते.

---------------------------------------------------------------------------------------
अवांतर: मधुकर जरी म्हणत होता की मी तुम्हाला ठाकुरवाडी दिसायला लागल्यशिवाय सोडणार नाही पण आम्हाला कळत होते की त्याला परत घरी जायचे म्हणजे काय दिव्य आहे. एकतर सगळी नाळेची वाट चढायची, वाटेत अंधार आणि हातात एक छोटी काठी आणि छत्री Sad . नदीकिनारी त्याला निरोप दिल्यावर तो जो काय पळत निघाला त्याला तोड नाही. परत ४ महीन्यानी नाणदांड घाट करण्यासाठी जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा त्याने सांगीतले की त्याने अक्षरशः पळत नळी चढली पण केवणीत पोचेपर्यंत अंधार पडला होता, पण ह्या पठ्ठ्याने तश्या अंधारात केवणी ते एकोले एकट्याने पार केले आणि ८ वाजता घरी पोचला.. धन्य त्या मधूकरची..

---------------------------------------------------------------------------------------

इकडे आम्ही कंबरेएवढ्या पाण्यातून साखळी करून नदी ओलांडली आणी थोडावेळ आराम केला. थोडे रेफ्रेश झालो आणी ठाकुरवाडीचा चढ चढायला सुरुवात केली अंधार पडला होताच. ठाकुरवाडीला पोचेपर्यन्त पायाची वाट लागली होती. गावात पोचून गावातल्या शाळेत मुक्काम टाकला तेव्हा सगळे भयानक दमले होते आणी जरी खडसांबळ्याऐवजी इथे पोचलेलो असलोतरी अंधार पडताना नाळ उतरून गावात पोचलो होते हेच पुश्कळ होते. शाळेत पोचल्यावर १० मिनीटात सीन असा होता की अर्धेजण रात्रीचे जेवण स्किप करून सरळ झोपायच्या तयारीला लागले होते Happy . १-२ जण स्टोव्ह पेटवून खिचडी बनवायला लागले होते. मी आणि इम्रान गावात दुसर्‍या दिवशीची माहीती काढायला निघणार तेव्हढ्यात गावातले काहीजण आमच्या इथे गप्पा मारायला आले. त्यानी सांगीतले की खडसांबळे इथून २.५ तासावर आहे आणी पुढे लेण्या कुठे आणी किती दुर आहेत याची माहीती त्यांना नाही. हे ऐकल्यावर सगळयानी वेगळाच सुर लावला. रात्रीच्या वाडीवर वस्तीच्या येण्यार्‍या गाडीने सकाळी परत मुंबईला जायची भाषा व्हायला लागली Sad . आता आली का पंचाईत? माझीही फार वेगळी अवस्था नव्हती पण ज्याच्या शोधासाठी ही एवढी मेहनत घेतली ते असेच सोडून परत जायचे मन घेईना. सगळ्यांना समजावयचा खूप प्रयत्न केला पण कोणीच तयार होईना. म्हटले जाऊदे, पहाटे बघू. मग फार वेळ न घालवता पटापट जशी शिजली होती तशीच खिचडी खावून झोपून गेलो.

---------------------------------------------------------------------------------------

दिवस दुसरा:

पहाटे गाडी सुटण्याच्या आधी काही शाळेतली मुले गाडीवर आली, त्यांनी सांगीतले की खडसांबळे गाव १ तासावर आहे आहे तिथून पुढे लेण्या १-१.५ तासांवर आहेत. मग परत जायचा माझा तरी विचार रद्द केला पण आमच्यातले ८ जण दमल्यामुळे परत जायला निघाले. गाडी सुटून त्यांना निरोप दिला तेव्हा आम्ही १२ पैकी फक्त ४ जण राहीलो होते. मग भराभर आवरून खडसांबळ्याला निघालो. रात्री झोप झाल्यामुळे आणी पाऊस ही नसल्याने, भराभर निघालो. वातावरण प्रसन्न होते आणि रस्ता ही सरळ असल्याने ४५ मिनीटात गाव गाठले.

गावात पोचून पहीली चौकशी केली की लेण्यात जाता येते का आणी पावसाळ्यात कोणी जाते का? कारण पावसाळ्यात जर कोणी तिकडे फिरकत नसेल तर सगळेच मुसळ केरात Sad पण वाटायला लागले की आज नशीब जोरावर आहे. गावकर्‍यांनी सांगीतले की लेण्यात जाता येते, पावसाळ्यात जाऊ शकतो आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक छोटा डोंगर चढणे सोडले तर लेण्यापर्यंत रस्ता सपाट आहे. व्वा! झकास Happy असे वाटले की कालच्या दिवसाच्या मानाने हे अगदी उलटे घडते आहे. मग गावातील लोकांनी सखाराम नावाचा एक आदीवासी वस्तीवरील माणसाला आमच्या बरोबर पाठवले. त्याच्या बरोबर गप्पा मारत तो डोंगर कधी चढून सपाटीला आलो कळलच नाही. सपाटी आल्यानंतर सभोवताली बघीतले आणी वेडावून गेलो. डोंगररांगांच्या अगदी अंतर्भागी, एका मोठ्या डोंगराच्या पायाशी आणी सभोवतालच्या सगळ्या हिरव्यागार डोंगरांच्या मधे आम्ही होतो. आता सपाटी सुरु झाली होती. थोड्याच वेळात जंगल सुरु झाले आणी लेण्यांच्या डोंगरापाशी आम्ही आलो. ज्या डोंगरात लेण्या आहेत तो खूप उंच असल्याने आम्ही विचार करत होतो की लेण्यांमध्ये पोचायला किती वर चढायला लागेल आणी कधी. पण सखाराम सांगत होता की थांबा आत्ता लेण्यात पोचू. मग असेच जंगल चालत असताना अचानक सखाराम म्हणाला की आल्या लेण्या. आम्ही हैराण झालो. ह्या इथे, इतक्या खालच्या लेव्हलला आणि इतक्या जंगलात. विश्वास बसत नव्हता पण खरेच होते. समोर लेण्यांचा मुख्य चैत्य दिसत होता. मग अक्षरशः पळत शेवटचा ५ मिनीटाचा चढ चढून लेण्यात दाखल झालो.

याच साठी केला एवढा अट्टहास! गेली १.५ वर्ष जे पहायचे म्हणून मागे लागलो होतो त्या लेण्यांत आम्ही पोचलो होतो. आता मी काही लेणी अभ्यासक नाही व मला लेण्यातले फार काही कळत नाही पण अधाशासारखा लेण्यात फिरलो. ह्या लेण्या नि:संशय प्राचीन आहेत. वर म्हटल्याप्रमाणे ठाणाळे, भाजे लेण्यांच्या काळातल्या किंवा त्याहूनही प्राचीन. एका इंग्रजी सी आकाराच्या डोंगरात दोन भागात ह्या लेण्या आहेत. त्यापैकी मुख्य लेणी समूहात (पांडवलेणी) जाता येते व ह्यापासून ५०० मी. अंतरावरच्या चांभारलेणी ह्या छोट्या लेणी समूहावर वरच्या डोंगराचा फार मोठा कडा कोसळल्याने जाता येत नाही. तसा मुख्य लेणी समुहावर पण एक छोटा कडा कोसळून वरचे मोठे दगड पडले आहेत व मुरुमी दगडामुळे आणी पाणी झिरपून लेणी भग्न झाली आहेत पण आपण व्यवस्थीत फिरू शकतो. एक मोठे चैत्यगृह आणी बाकीचे सगळे छोटे विहार अशी ह्याची रचना आहे. फार कोरीवकाम नाही पण मुख्य उद्देश कोरिवकाम नसून बौद्ध भिक्खूंसाठी लेणे खोदलेले वाटते. लेण्यांची प्राचीनता आणि कोरिवकामाचा अभाव बघता हिनयान काळातल्या ह्या लेण्या असाव्या. कुठेतरी वाचलेले आठवले की ह्या लेण्यातला चैत्यगृह हा महाराश्ट्रातील इतर लेण्यांतील चैत्यगृहापेक्षाही मोठा आहे. एका लेण्यातला बर्यापैकी मोठा स्तूप सोडला तर एक दोन विहार आणी मोठा चैत्य वगळता बाकीच्या लेण्या ह्या साध्या, बिनकोरीवकामाच्या आणी साध्या वाटल्या. लेख कुठे काही आढळले नाहीत.

६. खडसांबळे लेण्यांचे काही फोटो

चैत्य आणी त्याला जोडून असलेले विहार

असलेला एवमेव स्तूप

लेण्यांवरती कोसळलेला कडा

ह्याच लेण्यांच्याइथून वाट पुढे चांभारलेणी समूहाकडे जाते पण खूप गवत, कोसळलेला कडा आणी मोडलेली वाट ह्यामुळे आम्हाला जाता आले नाही

चैत्याच्या आतून दिसणारे बाहेरील दृष्य

लेणी फिरून झाल्यावर बराच वेळ मधल्या चैत्यगृहात बसलो होतो. सभोवताली निरव शांतता होती, स्वतःच्या श्वासाचा सोडला तर अगदी जंगलाचा देखील आवाज येत नव्हता. असाच बराच वेळ गेल्यावर तिथून उठलो आणी परत गावाकडे यायला निघालो. परत येताना मनात विचार चालू होता की ह्या लेण्या बघायच्या ह्या एका उद्दीष्टासाठी किती मेहनत घेतली, किती शोध घेतला. काल कुठून सुरुवात केली आज कुठून चालतोय. आज जेव्हा लेणी बघून परत चाललो होतो तेव्हा एक समाधान होते की ज्या एका गोष्टीच्या मागे लागलो होतो ते साध्य झाले होते. असाच आपल्या आपल्याशीच संवाद करत परत कधी गावात आलो कळलेच नाही.

७. परतीच्या वाटेवरचे काही फोटो

गावात चौकशी केली तेव्हा कळले की इथे परतीचे वाहन मिळायचे नाही तेव्हा तंगड्या तोडत २.५ किमी नेणवली पर्यंत चालणे आले Sad . हे एवढे अंतर चाललो तेव्हा नेणवलीत एक वाहन मिळाले, त्याने मजल दरमजल करीत, दोन तिन वाहने बदलीत पालीला आलो आणि परतीच्या वाटेला लागलो.

८. खडसांबळ्याहून नेणवलीला जातानाचे काही फोटो ज्यात नाळेची वाट आणी लेण्यांचा परीसर दिसतो

परतीच्या वाटेवर खडसांबळे लेण्या जरी मनात घर करून बसल्या होत्या तरी मनाच्या दुसर्या कोपर्यात गोमाशी लेण्या कुठे असतील त्याची शोधाशोध सुरु झाली होती Happy
परत भेटू अश्याच एका ट्रेक ला ..

धन्यवाद.

---------------------------------------------------------------------------------------
जाता जाता:
मी जेव्हा ह्या लेण्या बघायच्या ठरवल्या तेव्हा मला कुठेही संदर्भ मिळाले नाहीत पण ह्या लेण्या अप्रकाशीत नक्कीच नव्हत्या. पण मला संदर्भ मिळाले नाहीत, कदाचीत माझा मित्रपरीवारांत ह्यांचा संदर्भ कोणाकडे नसावा म्हणून मला मिळाला नसावा. पण गेल्या काही वर्षात इथे गेलेले बरेच ट्रेक ग्रुप आढळले. खरे पाहाता ह्या लेण्या पाहण्यास काहीच कठीण नाही आतातर खडसांबळेपर्यंत गाडीरस्ता आहे त्यामुळे ह्या एका दिवसात सहज शक्य आहेत.
तसेच वरीलपैकी एकही फोटो मी काढलेला नाही. माझ्या कॅमेराची लेन्स पहील्या फोटोच्या वेळीच लॉक झाल्याने वरील सर्व फोटो, विराज, सुबोध आणी विजय ह्यांच्या कॅमेरातले आहेत.

आणखी एकः लेख सलग लिहीलेला नाहीये त्यामुळे लिहीण्यात एकसंधता नव्हती. कामाच्या गडाबडीमुळे एवढे सगळे लिहायलाच ६ महीने लागले Happy . त्यामुळे लेखात काही त्रुटी असू शकतात Happy .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे फोटो टाक ना लिंक ऐवजी. फ्लो जातो वाचायचा. एकतर राहून गेलेली भटकंती आहे त्यामूळे नीट वाचायचय. Happy

तिसरा फोटो दिसत नाहिये बघ अजून. Sad

घनगडला गेल्यावर्षी गेलो होतो. शिडी जरा डेडलीच आहे. Wink शेवटची स्टेप घेतली की एकदम डावीकडे सरकावे लागते. खाली खोल दरी. Happy तिथे तो उजव्या बाजूला मोठा प्रस्तर सरकून पडलाय तो स्पॉट पण मस्त आहे.

तैलबैला तर प्रेमात पडावे इतका सुंदर दिसतो ह्या सर्वमार्गावरुन.

कोकणात उतरणार्‍या सर्वच वाटा वेड लावतात. फोटो सुंदर आहेत. Happy लेणी फारच बिकट अवस्थेत आहेत Sad

सुरेख लेख.. फोटोही मस्त! मी घनगडला गेलो होतो तेव्हा शिडी नव्हती. आम्ही धडपडत वर चढलेलो..
नाणदांड नंतर केलास की नाही? नसेल तर करुया बरोबर.. असेल तर चल बरोबर Happy

सुंदर लेख! च्यायला लग्नाच्या आधीच हे सगळ फिरलं असतो तर बर झाल असत, आता वेळच मिळत नाही.

मुलानो, लवकर लग्न करू नका रे, भरपूर हिंडून घ्या, पहा नाहीतर लेख लिहायलासुद्धा ६-६ महिने लागतात. Rofl

सेन्या... तिसरा फोटो लोड व्हायला वेळ लागतोय, का माहीत नाही पण लोड होतोय..आणी ती शिडी डेंजरस आहेच Happy

हिम्या... लेख सार्वजनीक केला आहे..

हेम... येस, आम्हीही पहील्यांदा गेलो होतो तेव्हा शिडी नव्हती. ह्या ट्रेक झाल्यावर नंतर ४ महीन्याने मी नाणदांड घाट केलाय.. पण तो नाळेच्या वाटे सारखा कठीण नाहीये..

यो आणी सुनटून्या धन्यवाद.

मनोज भाऊ... आतापर्यंतच्या वृत्तांतापैंकी हा एकदम बेस्ट लिहिला आहेस... धन्यवाद लिहिल्याबद्दल >>यो +१ Happy
लेख वाचताना नक्कीच थरार जाणवतो.

मस्तच जागा आहे. सुंदर फोटो.. वातावरणातली शांतता अगदी जाणवतेय.
सध्या सहज जाण्याच्या आवाक्यातली आहे, गैरवापर होत नसावा अशी आशा करतो.

दिनेशदा
एक वाईट बातमी सांगतो. तैलबैला आणि परिसर माजी पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांना लवासाच्या धर्तीवर विकसित करण्यास देण्यात आलेला आहे. गेल्या राजवटीत प्रस्ताव मंजूर होण्याच्या मार्गावर होता आणि सध्याच्या राज्यकर्त्यांनी तातडीने तो मंजूर केलेला आहे.

क्या बात है, मनोज!!!!
भारी वृतांत आणि फोटोज Happy

मुलानो, लवकर लग्न करू नका रे, भरपूर हिंडून घ्या, पहा नाहीतर लेख लिहायलासुद्धा ६-६ महिने लागतात.>>>>>:खोखो:

मनोज मस्त लेख,

तुम्ही नळीच्या वाटेने सरळ गेला असतात तर खडसांबळे गावात पोचला असतात अन नदी ओलांडावी लागली नसती... बहुतेक वाट चुकल्याने झाले असावे...

सर्वांना धन्यवाद..

दिनेशदा, सुनटून्या म्हणतोय ते खरे आहे. हा सर्व भागात "महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू" ह्या कंपनीने बरीच जमीन विकत घेतली आहे आणी तिसरी हिल सिटी बनवण्यादिशेने पावले पडत आहेत Sad

गिरी, होय, नळी उअतरून झाल्यावर जंगलात कुठेतरी चुकलो खरे.. उजवीकडे जायच्या ऐवजी सरळ उअतरत राहीलो असतो तर खडसांबळ्यात पोचलो असतो आणी तेही लवकर.

ऱोमा.. ह्या भागात अजून एक घाटवाट राहीली आहे.. ती प्लॅन करताना तुला सांगेन Happy

स्वच्छंदी Is BACK !!!!

हा वृत्तांत लिहून तू सगळ्यात मोठी चूक अशी केली आहेस की हे इतकं जबरी लिखाण तू सहज करू शकतोस हे नजरेत आणून दिलंस !!! अब तेरा बचना मुश्किल है !!!! आता ह्यापुढे एक ट्रेक एक वृत्तांत असंच आलं पाहिजे !! यो,इंद्राच्या बरोबरीने तुझ्या वृत्तांतानेही हा धागा समृद्ध होवो ही सदिच्छा.

मनोज:
सर्वप्रथम घाटवाटा ट्रेकच्या ब्लॉगसाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद!!!
पोतडीतून अजून खूप अपरिचित घाटांचे लेख-फोटो अवश्य बाहेर येऊ देत...

तेलबैला-सुधागड-घनगड हा तुझा अति लाडका भाग आहेच... दुर्ग - घाट - लेणी असं एकत्र कोडं सोडवण्याची मज्जा लुटलीत तुम्ही... मस्त मस्त!!!!!!!!

(अवांतर: आमच्या खडसांबळे - नाणदांड - अंधारबन - गाढवलोट - कोंडजाई ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.. खूप खूप धन्यवाद :))

प्रतीसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

सह्याद्रीमित्र.. Happy . अरे हेच लिहायला एवढा वेळ लागला Happy

डिस्क्या .. सह्याद्रीचा हा भाग माझ्या खास आवडीचा आहे हे खरेच.. खूप भटकंती केलीय या भागात Happy .

तेलबैला-सुधागड-घनगड हा तुझा अति लाडका भाग आहेच... दुर्ग - घाट - लेणी असं एकत्र कोडं सोडवण्याची मज्जा लुटलीत तुम्ही... मस्त मस्त!!!!!!!! >>> +१

सह्याद्रीचा हा भाग माझ्या खास आवडीचा आहे हे खरेच.. खूप भटकंती केलीय या भागात >> मुंबई पासुन जवळ असुनही या भागातील एकही ट्रेक झालेला नाही... आणि आता तर तुझ्या लेखाने उत्सुकता वाढवली आहे.

कधी निघायच ते सांग फक्त...

Pages