आरोग्यासाठी योग - १

Submitted by कविता१९७८ on 8 January, 2015 - 01:45

मागच्या काही काळात एका संस्थळावर आरोग्यासाठी योग या विषयावर यावर स्नेहांकीता यांचे लेख वाचले आणि आवडले , योगाने मानसिक आणी शारीरीक आरोग्य सुधारण्याची ही पद्धत मला सोपी वाटली व यात रस असणार्‍या इच्छुकांनाही लाभ मीळावा म्हणुन मायबोली वरही ते प्रकाशित व्हावे या इच्छेने मी स्नेहांकीता कडुन अशी परवानही मागितली आणि स्नेहांकीता बरोबर झालेल्या भेटीत त्यांनी मला हे लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिलीही. (पुढील लेखन हे स्नेहांकीता यांनी केले आहे).

आरोग्यासाठी योग - १

गेल्या काही वर्षांपासून मी नियमित ध्यान करते आहे अन त्यापासून आरोग्याचे अतिशय चांगले परिणाम मिळालेत. एखादी गोष्ट पटली की तिचा जमेल तितका बारकाईने अभ्यास करायचा हा स्वभाव. मग मी ध्यान या विषयाच्या खनपटीला बसले अन त्यावर शोधून शोधून मिळेल ते सर्व वाचून काढले. त्यावेळी पातंजल योगदर्शन पहिल्यांदा वाचले. बऱ्याच भाष्यकारांनी त्यावर केलेल्या टिप्पण्या वाचल्या. योगाबाबत काही गोष्टी स्वत; अनुभवल्या आणि आचरणात आणल्या. या सगळ्याचं फलित म्हणजे उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य. आयुष्यातल्या टोकाच्या चढउतारांना अन कडेलोटाच्या प्रसंगांना शांतपणे अन खंबीरपणे तोंड देऊ शकले. आणि मुख्य म्हंजे ताण-तणावाच्या परिणामस्वरूप अशा उच्च-नीच रक्तदाब, मधुमेह अगर हृदयविकार यासारख्या शत्रूंपासून आजवर सुरक्षित अंतरावर आहे. या सगळ्या अभ्यास, चिंतन आणि अनुभवातून मला समजलेला 'योग' इथे सांगते आहे. आपण ज्याला ध्यान किंवा मेडिटेशन म्हणतो, तो ऋषी पतंजली यांच्या अष्टांगयोगाचा एक भाग आहे. अर्थात आठ अंगे मिळून 'योग' होतो.

'योग' म्हणजे काय ?
युज्यते इति योग:

परमेश्वराशी एकत्व, तादात्म्य, मीलन म्हणजे योग. शरीर, मन, प्राण, बुद्धी व आत्मा या सर्व स्तरांवर परमेश्वराशी एकत्व साधणे म्हणजे योग. योगाची उच्चतम अवस्था म्हणजे स्वत:च परमेश्वर होऊन जाणे . थोडक्यात, परमेश्वर 'सापडणे' हे योगाचे प्रयोजन आहे. ...परमेश्वराचे माहित नाही, पण आपण स्वत: तरी स्वत:स सापडतो, हे अनुभवाने निश्चित सांगू शकते ! आणि हे स्वत्व सापडल्यावर जीवनात सुख दु:खांच्या धोंड्यांवर कितीही आपट्या खाल्ल्या तरी शरीराचे स्वास्थ्य अन मनाची प्रसन्नता हरवत नाही.

पुष्कळ लोकांची अशी समजूत दिसते की योग म्हणजे योगासने अन प्राणायाम. योगासने ही संकल्पना हठयोगाशी संबंधित आहे व शारीर पातळीवर कुंडलिनी जागृत करून परमात्म्याशी मीलन हा हठयोगाचा उद्देश आहे. तथापि पतंजलींनी त्यावर फारसा भर दिलेला नाही. शरीर सुस्थितीत असावे इतकाच त्यांचा आग्रह दिसतो. शरीर व स्नायू बळकट, चपळ व कार्यक्षम राहण्यासाठी योगासने अतिशय परिणामकारक शास्त्र आहे. आठवड्यातून तीन दिवस तरी योगासने जरूर करावीत. योगासनांचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला माहिती आहेतच.

योग ही केवळ एक उपचारपद्धती किंवा रिलॅक्सेशन टेक्निक नसून ती संपूर्ण जीवनपद्धती Lifestyle आहे. सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा तत्सम इतर कोर्सेसही याचाच पुरस्कार करतात. नुसते ध्यान करण्यापेक्षा आचार-विचारांसह पूर्ण Lifestyle बदलली, तर ध्यानाचे संपूर्ण फायदे निश्चितपणे मिळतील.
जोपर्यंत मी फक्त ध्यान करत होते, तोपर्यंत मला मर्यादित परिणाम मिळाले. जेव्हा, 'योगा'ची कास धरली तेव्हा संपूर्ण जीवन एक शांत सरोवर बनले, ज्याच्यामध्ये स्वत:चे खरेखुरे प्रतिबिंब पाहता आले. द्वेष, मत्सर, हेवा, असमाधान हे तर लय पावलेच, पण इतरांशी सुसंवाद, वाद टाळणे, क्षोभाच्या प्रसंगी मन शांत ठेवणे, घटनांची अपरिहार्यता विना-त्रागा स्वीकारणे अन त्यातून पुढची वाटचाल आखणे हेही आपोआप होऊ लागले. काय केले अन कसे वागले म्हणजे आपले हित होईल हे त्यामुळे उमगू लागले. क्रोध व्यक्त करण्यात आपले कल्याण आहे, की तो अदृश्य ठेवण्यात, हे एकदा लक्षात आले, की मग त्याच्या अभिव्यक्तीवर आपोआपच नियंत्रण आले.

तीच गोष्ट मनस्तापाची. का हे असे माझ्या नशिबी आले आहे ? हा प्रश्न आयुष्यात एकदा तरी आपणा सर्वांना पडतोच. पण हा काथ्या कितीही कुटला तरी उत्तर सापडणार नाही, हे एकदा लक्षात ठेवले की झाले.
मागे वळून जरूर पाहावे, पण फक्त अनुभवातून शिकण्यासाठी. पश्चात्ताप किंवा मनस्ताप यासाठी नक्कीच नाही. चुका दुरुस्त होत नसतात. त्यांचे प्रायश्चित्त भोगावेच लागते. मग ते शांतपणे अन खंबीरपणे भोगलेले काय वाईट ?

ही एक धारणा आहे, विचार करण्याची पद्धत आहे. ती एकदा अंगिकारली की आयुष्य म्हणजे फक्त क्षण अन क्षण स्वीकारणे राहते. क्षणाच्या अंतरंगात शिरून तो उपभोगायचा आहे. सुखाचाही अन दु:खाचाही . आणि तो भोगून झाल्यावर पुन्हा निर्मम होऊन पुढच्या क्षणाचे उत्साहाने स्वागत करायचे . धैर्याने त्याचा सामना करायचा . नित्य नव्या अनुभवांना उत्कटपणे अनुभवायचे. क्षणोक्षणी सुख मिळवण्यासाठी योग नाही, तर क्षणांच्या अंतरंगात लपलेले सुख दिसण्यासाठीअन अनुभवण्यासाठी आहे. ते दिसण्यासाठी फक्त थोडे मनापासून अलिप्त व्हावे. मग आपोआप ते समोर येते. इतके जमले म्हणजे आपल्याला अर्धा योग साधलाच समजा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान लेख . सध्या आजूबाजूच निरीक्षण करता असे दिसते कि लोक डॉक्टर ला पैसे देण्यासाठीच पैसे कमवत असतात कि काय . त्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक आरोग्य का नाही कमवत Uhoh