लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

Submitted by अभय आर्वीकर on 7 January, 2015 - 22:38

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने

                             - गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगाधरराव,

'लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या' असं सावरकर म्हणून गेलेत. अर्थात, ते विदेशी राजवटीच्या बाबतीत. स्वदेशी राज्यात लेखणीच बंदुकीसारखी चालवायची असते!

तुमची लेखणी समर्पक आहे. आवडली! Happy

आ.न.,
-गा.पै.

स्वदेशी राज्यात लेखणीच बंदुकीसारखी चालवायची असते!<< वाह गामाजी डायलॉग ऑफ द डे !!
मला आपला हा विचार स्वतंत्र विचार ंम्हणून खूप पटला भिडला

धन्यवाद