चंद्रनंदन

Submitted by kulu on 3 January, 2015 - 18:06

(हा राग ऐकण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=cSrD8S54jnI )

चंद्रनंदन

stock-footage-stars-twinkle-in-the-night-sky-with-a-full-moon.jpg

खरं तर आजपर्यंत मी कधीही ठरवून वगैरे राग ऐकला नाही. काळवेळ आणि ऋतूनुसार जो योग्य वाटेल तोच नेहमी ऐकत आलो. पण एकदा पर्रीकराच्या वेबसाईटवर राग जोग विषयी माहिती वाचताना राग चंद्रनंदनचा उल्लेख आढळला. उस्ताद अली अकबर खानांची ही निर्मिती. बाबा अल्लाउद्दीन खानांची तालीम लाभलेलं हे व्यक्तीमत्व. मुळात बाबा स्वत:च परीसस्पर्श घेऊन जन्माला आलेले. ज्या ज्या शिष्यांना तालीम दिली त्यांच्या आयुष्याचं तर सोनं झालंच पण, शिष्यांच्या पुढच्या पिढ्यांना पण तोच वारसा मिळाला. लिहायला बसलं की वाहवत जातो असा माणूस गाण्याविषयी! मुद्द्यावर येतो, तर सांगायची गोष्ट अशी की अली अकबरांच क्रिएशन म्हणून तो राग ऐकायची इच्छा फार बळावली. पण पुढे लक्ष्यातुन गेलंच

आणि अचानक एका रात्री लॅब मधून घरी जाताना मोबाईल वर पं. ब्रजभुषण काबरा यांनी भारतीय स्लाईड गिटारवर वाजवलेला चंद्रनंदन सापडला, पं. काबरा हे अली अकबरांचेच शिष्य. मी लगेच सुरु केला तो राग ऐकायला! सुरु झाल्या झाल्या दुसऱ्याच स्वरवाक्याला माझ्या डोळ्यातून पाणी आलं. एरव्ही मला हे अश्रू बिश्रू प्रकरण फार ड्रामॅटीक वाटतं, पण काय करू, इतका विशुद्ध आलाप? फक्त स्वरांच्या शुद्धतेमुळेच एवढा आनंद झाला की तो व्यक्त करायला मार्गच नव्हता दुसरा.

काय सार्थ नाव असावं एखाद्या रागाचं तरी! डोळे बंद करून ऐकत होतो तरी डोळ्यासमोर कोजागिरीचा चंद्रच होता. तो सगळ्या परिसरावर प्रकाश पेरतोय. तिथे अंधार आजिबात नाही असं नाही, पण त्या अंधाराला सुद्धा चंद्राच्या शीतल प्रकाशाची रुपेरी कडा आहे. त्या प्रकाशात दु:खाला थारा नाही. हुरहूर जरूर आहे पण ती चंद्रप्रकाशाची, त्यातल्या सौंदर्याची. नंतर एकदा अली अकबरांची एक मुलाखत वाचताना कळलं की ह्या रागातून त्याना चंद्रप्रकाशात विहरणारे कृष्ण आणि गोपिका हेच व्यक्त करायचे होते. काय योगायोग आहे! कसे तेच भाव माझ्या मनात पं. काबरांनी उतरवले असतील? वादकाच्या प्रतिभेचा प्रवाह एखाद्या रागात इतकां संहत असतो का की तो ऐकणार्याच्या मनातही तसाच झिरपत जातो? की वादकाच्या प्रतिभेची बाधा श्रोत्याला पण होते ?

मुळात नवीन राग हा नुसता निर्माण करून चालत नाही. त्या रागाने स्वतःचा असा एक भाव प्रकट करावा लागतो. किशोरीताईंचा बागेश्री ऐकल्यानंतर जर कुणी मला विचारलं की कसं वाटतंय तर त्या प्रश्नाला दु:ख वाटणे, आनंद वाटणे यापेक्षाही "मला बागेश्री वाटतय" हेच उत्तर असू शकेल. कारण तिथे बागेश्री हाच एक भाव असतो, एक भावावस्था असते. आणि नवीन रागांच्या बाबतीत हे अवघड आहे कारण बागेश्री सारखा शतकांचा वारसा त्याला नाही लाभलेला. जर असे वातावरण नवीन रागाने सिद्ध होत नसेल तर ती एक नवनिर्मितीच राहते, त्याचा राग होत नाही. पण चंद्रनंदन मात्र असा तयार केलाय की तो राग पौर्णिमेच्या रात्रीचे भाव तर जागवतोच पण एक चित्र देखील उभं करतो. आणि काबरांच्या गिटारीतून जेव्हा तो राग स्रवू लागतो तेव्हा आपण फक्त त्यात वाहत रहायचं!

आणि हा राग पण किती अवघड! यात जोगकंस , मालकंस आणि कौशी कानडा याचे दोर गुंफलेत. याचा धैवत मालकंसाचा, गंधार जोगकंसाचा आणि रिषभ कौशी कानड्याचा आणि असं असूनही हे सगळं एकट्या चंद्रनंदनाचं! एक अशी मींड कोमल धैवतावरून गंधारावर घेतलीय काबरांनी, जसं की पानगळ होताना एखादं सोनेरी पान अलगद जमिनीवर पडावं आणि धुळही उडू नये! हे गिटारीवर अवघड अशासाठी कारण त्याला फ्रेट्स नसतात. तारांवर सरसर वेगात फिरणारा रॉड जर हाताने पटकन आवरला नाही तर स्वर चुकीचा लागतो आणि त्यात अशा हळुवार मींडीला किती भयंकर नियंत्रण लागत असेल! ती एकच मींड सगळ्या रागाला चंद्र प्रकाशाची शीतलता आणि तरलता देते. कृष्णानं जसा करंगळीवर गोवर्धन धरला; तसंच त्या मींडीच्या शेवटी येणाऱ्या कोमल गंधारावर पूर्ण चंद्रनंदन पेललाय पं. काबरांनी. आणि त्यात कृष्णाचा गोपिकांबरोबर असणाऱ्या खेळाप्रमाणे षड्ज कधी कोमल गंधाराला कुरवाळतो तर कधी शुद्ध गंधाराशी सलगी करतो. सगळा रागच असा हळुवार पण मोकळ्या स्वरांनी उलगडत जातो.

कधी कधी असं होतं की गुरु निर्माण करतो आणि शिष्य त्या निर्मितीला एक वेगळी उंची प्रदान करतो. पं. काबरांनी चंद्रनंदनला तीच उंची बहाल केलीय. सहज डोळे उघडून बसच्या बाहेर बघितलं ! बाहेर खरंच पूर्ण चंद्र सांडला होता. ध्यानीमनीही नाही की ती पौर्णिमेची रात्र होती. कोमल आणि शुद्ध गंधाराप्रमाणे माझ्या मनातल्या आणि समोर दिसणाऱ्या त्या दोन चंद्रांनी माझ्या मनात चंद्रनंदन अगदी कोरला! चंद्रनंदन म्हणजे तो चंद्र, ती मींड, तो गंधार आणि ते पं. काबरा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलू ... तुमच्या लेखणी मधून आता छान कलाकृती उतरायला लागल्या आहेत. शुद्धलेखन पण खूप नीट झालेय...
आता तुम्ही rulalat माबो वर ... स्वागत आहे ... असेच नवनवीन लेख आणि कथा लिहत जा ...

पुढील लेखनाला शुभेच्छ्या !!!

बापरे नुसते वाचत असतानाच भावसमाधी लागल्याचा अनुभव आला. ऐकल्यावर तर काय होईल. _/\_
दाद आणि दिक्षितबुवांच्या प्रमाणे तुम्ही पण आमच्या सारख्या अनेक अजाण बालकांवर कृपा करत आहात असे काही मधुरतम लिहून. Happy

बापरे नुसते वाचत असतानाच भावसमाधी लागल्याचा अनुभव आला >>>>> महेश धन्यवाद! Happy आज दिड वर्षाने अचनक जाग येउन धगा चेक केला, त्यामुळे उशीर!

जोडराग  "चंद्रनंदन". 
लेखाचं वाचन हेच एक सुरेख अनुभूती. 
अश्रू बिश्रू प्रकरण फार ड्रामॅटीक वाटतं, परंतु   मन जे असतं ते भावनाशुन्य नसतं. तो राग   देखील जोगकंस , मालकंस आणि कौशी कानडा यांचे सुरेल मिश्रण. पंडित रामूभय्या दाते यांनी म्हटलंय "दर्दी कोण तर ज्याला गायन ऐकल्यावर दर्द होत." दर्द  झाल्यावर  अश्रु येणारच.   
पराग घारपुरे 

Pages