पालकत्व

Submitted by meenakshi.vaidya on 29 December, 2014 - 09:36

**** पालकत्व ****
*** आयुष्यातील सोनेरी क्षण ***
‘पालकत्व’ हा साडेचार अक्षरी शब्द आहे परंतु त्याची व्याप्ती मोठी आहे. पालकत्व हा शब्द पालक म्हणजेच बाळाच्या आईवडलांशी संबंधीत आहे.पालकत्व ही पालकांच्या आयुष्यात शेवटापर्यंत चालणारी क्रिया आहे.
पालकत्वाची सुरुवात कधी आणि कशी होते हा प्रश्न ब-याच जणांच्या मनात असतो.त्याचं उत्तर मात्र सोपं आहे.
पालकत्वाची सुरुवात
*** --- पहिला टप्पा--- ***
‘आपण आपल्या बाळाला केव्हा आणि कशा मानसिक,भावनिक, शारीरिक,आणि आर्थिक परिस्थितीत जन्म द्यायचा ?’यावर जेव्हा पतीपत्नी एकमेकांशी मनमोकळेपणाने चर्चा वा विचारविनिमय करतात त्या क्षणापासुन पालकत्वाची सुरुवात होते.लग्न झाल्यावर निसर्गनियमानुसार स्त्रीला बाळ होणार याची खात्री असते.{अपवाद काही स्त्रिया} पण...आपल्या बाळाला आपल्या इच्छेनुसार जन्म द्यायचा की निसर्गाच्या ? ....हे ठरविण्याचा अधिकार पतीपत्नीला असतो.या अधिकारानुसार जे पतीपत्नी आपल्या सगळ्या क्षमता बाळाला वाढविण्यास आणि त्याचं पालन पोषण करण्यास समर्थ आहेत याची सजगपणे आणि डोळसपणे तपासणी करून मग निर्णय घेतात त्यांचा तो निर्णय योग्य ठरतो.


*** --दुसरा टप्पा--- ***
स्त्री जेव्हा गरोदर असते तो पालकत्वाचा चा दुसरा टप्पा होय.बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा त्याला आईची भावनिक ,मानसिक आंदोलनं कळत असतात.बाहेरच्या जगाचं अवधान त्याला नसतं.आपल्या बाळाला काय आणि कसं बनवायचं आहे हे जर पालकांच्या मनात पक्क असेल तर त्याच्यावर संस्कार करण्याचा हा सगळ्यात सुंदर कालावधी आहे.याचं उदाहरण म्हणून पराशर ऋषींच देता येईल.त्यांनी आईच्या पोटातून श्लोक म्हटले.याचाच अर्थ पोटात असतांनाच आई बाळाला उत्तम विचारांची ओळख आणि चांगले संस्कार देऊ शकते. या टप्प्यात आईबरोबर वडीलही सहभागी झालेत तर उत्तम.या गर्भसंस्कारामुळे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला शिकवणं सोपं जातं.पोटात ऐकलेल्या गोष्टी आणि जन्मानंतर बघितलेल्या त्याच गोष्टी यांच्यात त्याला संगती लावणं सोपं जातं.
*** -- टप्पा तिसरा— ***
१—३ वर्षे हा तिसरा टप्पा होय.यात मुलाला स्वत:च्या व्यक्तीमत्वाची जाणीव व्हायला सुरवात झालेली असते. त्याला स्वत:बद्दलचे निर्णय स्वत: घ्यायला आवडतात.उदा: कोणते कपडे घालावे,खायला काय हवे,बाहेर कोणाबरोबर आणि कुठे जायचे.इ. इथेच पालक त्याला आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला भाग पाडतात आणि त्याची निर्णय घेण्याची क्षमता वाढण्याच्या आत खच्ची करतात.या वयात त्याचे निर्णय त्याला घेऊ दिलेत तर त्यालाच पुढे फायदा होईल.
**३—ते६ ,**६—ते१२ ,**१२—१८,**१८—ते पुढे असे त्याच्या वयाचे टप्पे आहेत त्यात त्याच्या वयानुसार पालकत्वाची दिशा ठरवावी लागते.
३-
प्रत्येक मुल हे स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं हे पालकांनी त्याच्याशी वागतांना लक्षात ठेवले पाहिजे. हाताची पाच बोटं सारखी नसतात हे इथं लागू पडतं.भावंडा मध्येही प्रत्येकाशी वागतांना पालकत्वाची दिशा वेगळी असू शकते.
पुढची पिढी मानसिक,भावनिक, बौद्धिक,आणि सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत घडवायची असेल तर ‘पालकत्व’ अंगीकारून ते जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने पूर्ण करणं गरजेचं आहे.
पालकत्व हे अवघड असलं तरी अशक्य नाही.ही अवघड वाट सहज करण्यासाठी पालकांनी स्वत:मध्ये वेळोवेळी बदल घडवून स्वत:ला पाल्यांच्या जाणीवांना, भावनांना समजून घेण्याच्या पातळीवर आणलं पाहिजे.लहान मुलं निरागस असतात त्याचवेळी ‘पालकत्वाचं’ नाण खण-खणीत वाजवलं तर पुढल्या टप्प्यांमध्येही मुलांशी सुसंवाद साधण्यास आणि सशक्त नातेबंध निर्माण करण्यास सोपं जातं.
पालकच फक्त आपल्या पाल्यांना घडवतात असं नाही तर पाल्यही पालकांना त्यांच्या नकळत शिकवून जातात. तेव्हा पालकत्व ही सहकार्यांनी होणारी गोष्ट आहे. वयामुळे पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना या क्रियेत सामील करून घेतलं तर पालकत्व खूप सोनेरी क्षण दोघांच्याही ओंजळीत भर-भरून देतं.
लग्न होताच पतीपत्नीन ‘पालकत्वाच’ ज्ञान घेणं आवश्यक आहे.पूर्ण कुटुंबाच्या उत्तम प्रगतीसाठी ते फायाद्याच ठरेल.

------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users