पु. ल. आणि आजकालची मुलं

Submitted by ललिता-प्रीति on 11 January, 2009 - 23:29

स्त्री मासिकाच्या जुलै-२०१२च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.

-----------------------------

लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे. इयत्ता सातवी किंवा आठवीत मराठीच्या पुस्तकात ’परोपकारी गंपू’ असा एक धडा होता. तो मला वाचल्यावाचल्याच अतिशय आवडला होता. आमच्या सुदैवानं तेव्हा शाळा-शिक्षकही चांगले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरही बाई तो धडा केव्हा शिकवायला घेतील याची मी आतुरतेनं वाट पाहिल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. ’पु. ल. देशपांडे’ या असामीशी ती माझी पहिली भेट होती. आमच्या अजून एका मोठ्या सुदैवानं त्या धड्याच्या सुरूवातीलाच कंसात एक टीप दिलेली होती की हा धडा पु. ल. देशपांडे लिखित ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घेतलेला आहे. वाचनालयातून ताबडतोब आणून तेही पुस्तक मी अधाश्यासारखं वाचून काढलं होतं...
त्याच्या पुढच्याच वर्षी (बहुतेक इयत्ता नववीत) ’अपूर्वाई’ पुस्तकातला एक उतारा धडा म्हणून होता. सविस्तर उत्तरे लिहा, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, लेखकाचा दृष्टीकोन स्पष्ट करा अश्या सगळ्या रुक्षपणाला तो धडा पुरून उरला आणि नववीचं वर्ष सरता-सरता ’अपूर्वाई’नं मनात कायमचं घर केलं. अश्या रीतीनं पु. लं. च्या भक्तगणांत मी तेव्हा जी सामिल झाले त्याचं सगळं श्रेय त्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांना जातं.

... काळ एका पिढीनं पुढे सरकला...
माझ्या मुलाची शाळाप्रवेशाची प्रक्रिया नुकतीच पार पडली होती आणि आमचं वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे त्याला नाईलाजास्तव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं लागलं होतं. घरात एका कार्यक्रमानिमित्त जमलेल्या पाहुणेमंडळींत ’इंग्रजी की मराठी माध्यम’ याच विषयावर गप्पा रंगलेल्या होत्या.
कुणीतरी बोलायच्या ओघात म्हणालं, "... इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या आपल्यासारख्या घरातल्या १३-१४ वर्षांच्या मुलांना मग पु. लं. चं लेखनही उमगत नाही! "...
मी एकदम चमकले. मुद्दा एकदम बरोबर होता... त्यावर काही दुमत होणं शक्यच नव्हतं! मनात आलं - आपल्या मुलाच्याही बाबतीत असंच झालं तर...?? मला ती कल्पनाच सहन झाली नाही आणि मी पद्धतशीरपणे कामाला लागले.
मुलाच्या सुदैवानं घरात बोलताना मराठी भाषेचा(च) वापर होता. पण आता त्याला मराठी भाषा वाचायला शिकवणं गरजेचं होतं. मी त्याला अ, आ, इ, ई शिकवलं, बाराखडी शिकवली, त्याच्या वयानुसार दरवर्षी महाराष्ट्रातून मराठीची प्राथमिक पाठ्यपुस्तकं आणत गेले. ती मी त्याला रोज वाचून दाखवायचे... उद्दीष्ट एकच - मोठं झाल्यावर पु. लं. ची पुस्तकं त्यानं मारून मुटकून, केवळ मी म्हणते म्हणून नाही तर आवडीनं वाचली पाहिजेत. त्याच्यासाठी मराठी गोष्टींचीही भरपूर पुस्तकं घेतली. मराठी वाचनाची त्याला गोडी लावली, म्हणी-वाक्प्रचार यांची ओळख करून दिली... उद्दीष्ट एकच - मोठं झाल्यावर ’... मी पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन त्याचे घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात ते त्या दिवशी कळले’ या पु. लं. च्या बहारदार शाब्दिक कोटीला त्यानं उस्फूर्त दाद दिली पाहिजे; ’मला वटवृक्षाची उपमा दिलेली पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पारंबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले... ’ हे वाक्य वाचून त्यानं पोट धरून हसलं पाहिजे...

अशीच सहा-सात वर्षं मी माझ्या नकळत प्रयत्न करत राहिले. तरी, इंग्रजी माध्यमातल्या रंगीबेरंगी, चित्रमय पाठयपुस्तकांची सवय लागल्यामुळे असेल पण माझा मुलगा पु. लं. ची पुस्तकं ’वाचायला’ इतका उत्सुक नसायचा. मग मी त्यांच्या कॅसेटस, सी. डी.ज आणल्या, त्याच्यासोबत बसून त्या एकेकदा ऐकल्या आणि आज मला आनंदानं, मनापासून संगावंसं वाटतं की ’असा मी असामी’चे तीनही भाग, सखाराम गटणे, मी आणि माझा शत्रुपक्ष इ. ची त्यानं गेल्या सहा-आठ महिन्यांत अगणित पारायणं केली आहेत!...
अजूनही काही विनोद, शाब्दिक कोट्या त्याच्या डोक्यावरून जातात, ’अंतू बर्वा’ किंवा ’रावसाहेब’ मधले नकळत काढलेले चिमटे त्याला म्हणावे तितके जाणवत नाहीत, धोंडो भिकाजी जोशींनी पार्ल्यातल्या मावशीचा पत्ता रस्त्यातल्या सायकलवाल्याला विचारल्यावर तो जेव्हा "कोनला तरी घाटीला इचारून घ्या" असं म्हणतो तेव्हा त्या उत्तरातली खोच माझ्या मुलाला पूर्णपणे कळतेच असं नाही पण तो इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणाचा side effect आहे असं मला वाटतं.
त्याची पिढी ’म्हैस’मधल्या एस. टी. प्रवासाच्या वर्णनाची किंवा बटाट्याच्या चाळीच्या वर्णनाची आपल्याइतकी मजा घेऊ शकत नाही पण त्यात त्या पिढीचाही दोष नाही. ऐसपैस घरांत राहणारे आणि वातानुकुलित गाड्यांमधून प्रवास करणारे आपणच त्याला कारणीभूत आहोत! पण तरीही, आज ’असा मी असामी’मधला ’शंकर्‍या’ हे त्याचं आवडीचं पात्र आहे, "कुळकर्ण्याने तो हॉल एक-बाय-अर्धाचा आहे असे म्हटले असते, तरी मी "अरे वा! "च म्हटले असते" या वाक्याला आज तो पोट धरधरून हसतो.

हळूहळू पु. लं. च्या भक्तगणांत तो पण सामिल होईल असं आत्ता तरी दिसतंय. माझ्या लहानपणी जे काम बालभारतीच्या पुस्तकानं केलं ते माझ्या मुलासाठी मी केलं यातच मला समाधान आहे! कारण, हे कुणीही कबूल करेल की ही आजकालची मुलं जर ’व्हिंदमाता’चा उखाणा ऐकून खळखळून हसली नाहीत तर आपली मायमराठी हमसून हमसून रडेल आणि...

’डायवर कोन हाय? ’ या प्रश्नावर त्यांचा जीव जडला नाही तर ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला माफ करणार नाही...

गुलमोहर: 

खरंच, आपल्या दोन पिढ्या समृद्ध करुन टाकल्या आहेत पु. ल. नी. आता पुढची पिढी या सगळ्या संस्काराच्या खजिन्यापासुन वंचित होवु नये म्हणुन प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. तुमचे त्या दृष्टीने केलेले प्रयत्न खुप महत्वाचे आहेत.
आणि हो लेख छानच जमलाय. आभारी आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

बापरे ललिता ताई किती मनातल लिहील आहेस. माझ्या मुलीला पण नाईलाजाने इंग्रजी माध्यमात घातलय.
शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचताना जास्त करुन बाबा साहेब पुरंदर्यांच्या गोष्टी वाचताना सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो.मी जेव्हा तिला महाराजांच्या गोष्टी वाचुन दाखवत होते तेव्हा जाणवल आपल्या ला जे भारावलेपण यायच ते ह्या मुलांमधे येतच नाही. 'आई घोडे चोखुर उधळले म्हणजे काय ग ? घोरपड म्हणजे इग्वाना का ? त्या वरुन कस चढुन जातात? बापरे तेव्हा कळल ह्या मुलांना तो फील येणारच नाही. मी पण अट्टहासाने तिला मराठी गोष्टी वाचुन दाखवते. ती पण आता व्यवस्थित मराठी वाचते. शिवाजी महाराजांच जीवन चरित्र कळण्यासाठी मी तिला जाणता राजाला नेहमी घेउन जाते. खुप जुन्या मराठी कविता आपल्या वेळ्च्या वाचुन दाखवते पाठ करुन घेते, जेणे करुन ज्या मराठी कवितांमुळे, साहित्या मुळे आपण समृद्ध झालो त्या पासुन आपली भावी पिढी वंचित रहायला नको. पण तिला पण जुन्या मराठी कविता आवडतात. मी त्यांचा एक संग्रह केलाय अगदी माझ्या आजीच्या काळा पासुनच्या कविता आहेत त्याच्या मधे.
पण तरी ह्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांमधे ती आवड निर्माण होइल की नाही शंका आहे. कारण जेव्ह्ढ्या सहज इंग्रजी ते वाचतात तेव्हढच अडखळत मराठी वाचतात. ह्याला खरतर आपणच जबाबदार आहोत नाही का?

खरयं. मीही प्रयत्न करतोय माझ्या मुलाने हे मिस करू नये म्हणून. सध्यातरी हा भाग त्याची आईच सांभाळतेय. मा़झा यात चु़कूनमाकून कधी कधी सहभाग होतोच.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

ललिता, छान लेख, अन चान्गलाच स्त्युत्य प्रयत्न!
खर तर तोच तो वादग्रस्त विषय, शैक्षणीक माध्यमाचा, पण वादाच्या त्या घोळात न अडकता, वस्तुस्थिती मान्य करुन त्यात अपेक्षित बदल घडवुन आणण्यासाठी केलेले सकारात्मक प्रयत्न! व्हेरी गुड!
मला तर अस वाटत की आमच्यासारख्यान्ची मुले मराठी माध्यमात असली, तरिही वर केलेले प्रयत्न त्यान्च्यासाठी सुद्धा आम्ही केले पाहिजेत! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

ललिता सुरेख लेख.
वस्तुस्थिती मांडली आहेस..
लिंबुटिंबु, तुझं म्हणणं पण खरय.. मराठी माध्यमत असली तरी अशी अभिजात वाचनाची आवड लावणं हे आपलं काम आहेच.
-----------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

बार्बी, सिंड्रेला, पीटर रॅबिट, मिस्टर बीन, तर्‍हेतर्‍हेचे 'मॅन'- ही कॅरेक्टर्स जगणार्‍या मुलांना पु.लं.च्या कोट्या, अंतू बर्वाचा खडूस-कुजकटपणा, निरागस पण विनोदी सखाराम गटणे अन ती जगप्रसिध्द हिंदमाता कळण्यासाठी आणखी एखादा जन्म घ्यावा लागेल बहूतेक.. Sad

हजारो जणांची खंत असेल ही. पण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करून पाहिलात, हे थोरच.

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

वरती एक उल्लेख आला हे ऑडिओ कॅसेट्स्-सीडीज चा!
माझाही अनुभव असाहे की एकन्दरीतच, हल्लीची मुले वाचनाचा कण्टाळा करतात! टीव्ही व कॉम्प्युटर गेम मधील रेडीमेड दृष्य अनुभुतीमुळे, मजकुराच्या वाचनातून डोळ्यासमोर वैचारिकदृष्ट्या कल्पनाशक्ती लढवुन चित्र उभे करणे त्यान्ना कण्टाळवाणे वाटते वा जमतच नाही!
त्याकरता मी देखिल, जमल तेव्हा वर्‍हाड निघालय लन्डनला, पुलन्च्या गोष्टी इत्यादिन्च्या कॅसेट्स ऐकवुन बघितल्या, तर एकण्यामधे वाचण्यापेक्षा कमी कष्ट पडत असल्याने आमच्या आयतोमजी मुलान्ना ते ऐकणे आवडले व त्यातली गम्मत त्यान्ना समजलि! Happy (अर्थात म्हणून ते वाचू लागले असे नाही, पण किमान तोन्डओळख तरी झाली)
तर, ओडिओ कॅसेट्स्-सीडीज चा वापर जरुर करुन बघावा! Happy अगदी मुले लहान असतान पासून
...;
आपला, लिम्बुटिम्बु

बार्बी, सिंड्रेला, पीटर रॅबिट, मिस्टर बीन, तर्‍हेतर्‍हेचे 'मॅन'- ही कॅरेक्टर्स जगणार्‍या मुलांना पु.लं.च्या कोट्या, अंतू बर्वाचा खडूस-कुजकटपणा, निरागस पण विनोदी सखाराम गटणे अन ती जगप्रसिध्द हिंदमाता कळण्यासाठी आणखी एखादा जन्म घ्यावा लागेल बहूतेक..

हे मला नाही पटत... जाणीवपुर्वक प्रयत्न करुन, पुस्तकं नाहीतर निदान ध्वनीमुद्रिकेच्या माध्यमातून तरी आपण हे सगळं मुलांपर्यंत नक्कीच पोचवू शकतो आणि त्याचा आनंद घ्यायलाही शिकवू शकतो.

lalita-preeti :- लेख फारच मस्त जमलाय!!
smitagadre : जुन्या कवितांचा संग्रह मायबोलिकरांसाठी उपलब्ध करुन दिला तर बरे होइलं.

हजारो जणांची खंत असेल ही. पण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करून पाहिलात, हे थोरच...........
हे हि तितकच खरं.........................
________________________________
________________________________

की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !
नाना बुध्दीचे वैरागर ! निर्माण जाले !!
दासबोध..........

लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे - mala majhya shaletlya divasanchi athvan zhali - ajunahi shejarchya mulanchi - marathi, hindi, english gheun vachate....

सुरेख! खरोखर चिंतनीय आहे. पुढच्या पिढीला जोपर्यंत आयुष्यातल्या खडतर म्हणा किंवा ऐशोआराम नसलेल्या असं म्हणू हवं तर, राहणीमानाचा स्वानुभव नाही तोपर्यंत त्यांना या साहित्यातला खरा विनोद कळणे नाही. मराठी तर यायलाच पाहिजे (म्हणजे हा तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा) पण त्या लाल डब्ब्याच्या एसटी मधून ६ तासांचा कोकणाचा प्रवास केल्याशिवाय खरी गंमत कळणार नाही! कायम सेलफोन नि आयपॉड कानाशी आणि पित्झा पास्ता नि चिकन नगेट्स खात एसी कार मधे बसून फिरणार्‍या नवीन पिढीचे खरंच कठीण आहे (असं आपलं आपण म्हणायचं!) Happy

आवडलं!

ललिता-प्रिती, अगदी अगदी मनातलं लिहिलय.
'याला, पुलं कळणार नाहीयेत... म्हणजे किती कठिण ना? कसं होणारय याचं?' असं मला माझ्या लेकाबद्दल वाटायचं. थोडंफार मराठी वाचता येणं या पलिकडे त्याचं मराठी वाचन नाही. पण मी वाचून दाखवलेल्यातला विनोद बर्‍यापैकी कळतो. मी वाचताना हसले तर 'पुलंचं वाचतेयस का?' इतका विनोदी प्रश्नं विचारू शकतो Happy
पण इतकच!
तुमची जिद्द आणि प्रयत्नं जबरी खरे. हे करत रहायला हवं होतं असं मला (आत्ता) वाटतय... अजूनही कॅएसेट्स आणि सीडीजचा प्रयोग करायला वेळ आहे...
पण धन्यवाद... तुमचा लेख अगदी आत पोचला!

छान लिहिलंय ललिता-प्रीति .... आवडलं Happy

बार्बी, सिंड्रेला, पीटर रॅबिट, मिस्टर बीन, तर्‍हेतर्‍हेचे 'मॅन'- ही कॅरेक्टर्स जगणार्‍या मुलांना पु.लं.च्या कोट्या, अंतू बर्वाचा खडूस-कुजकटपणा, निरागस पण विनोदी सखाराम गटणे अन ती जगप्रसिध्द हिंदमाता कळण्यासाठी आणखी एखादा जन्म घ्यावा लागेल बहूतेक..

---- हे मला पण म्हणावं तितकं पटलं नाही. पण एक मात्र आहे, आपण जर काहीच प्रयत्न केले नाहीत तर मात्र या सगळ्या मुलांना दुसरा जन्म नक्कीच घ्यावा लागेल.

ललिता-प्रीती,मी एवढेच म्हणेन की नुसत्या cassets एकून बर्‍यापैकी काही समजू शकते. काही कारणामुळे (पप्पांच्या फिरतीमुळे, मराठी सहवास नाहीच आजूबाजूला, शाळेत मराठी भाषा नाही,घरी कोकणी भाषा नी भारताबाहेर काळ वगैरे वगैरे) मराठीचा तेव्ढासा नीट संबध माझ्या लहानपणी आला नाही पण पु लं ह्यांची खरी ओळख आईच्या किचनमध्ये जेवन बनवताना किंवा असेच खास बसून cassets एकण्याच्या सवयीमुळे मला ते एकायला सवय/आवड झाली. बाकी आई तशी बरीच इतर मराठी पुस्तके वाचायची पण ती वाचायचा मला कधी खास interest नाही झाला.काही cassets मधील खवचट जोक्स आईला विचारून कळायचे तेव्हा. (हे काही मी मोठ्या प्रोढीने नाही सांगत आहे पण एक अनुभव म्हणून शेयर करत आहे). मुद्दा हाच की बाकी कुठल्याही मराठी लेखकाचे लिखाण नाही वाचले वा एकले वा स्वत मराठीत काही लेख नाही लिहिले पण पु ल च्या cassets एकल्या आहेत भरपूर. गेल्या तीन वर्षत मायबोलीने भरीच भर टाकली बाकी मराठी लेखांविषयी , लेखकांविषयी नी माझ्या मराठीत लिहिण्याविषयी. असो.
पण जन्मत इथे वाढलेली माझी भाची हे काही पु लं चें जोक्स नक्कीच समजू शकत नाही जरी तीला कोकणी वा मराठी बोलायला बर्‍यापैकी येते तरीही.
मतीतर्थ की थोडेफार यश हे मिळतेच.

ललिता, तुमचा लेख आवडला. तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक आहे तुमचे.

मनुस्विनी, तुझं कौतूक करावे तेवढे कमी आहे. कारण मराठी माध्यमातून जर शिक्षण झाले नसेल तर इतके छानं, जसे तू लिहितेस आता, तसे मराठी येणे कठिण आहे. तुझे प्रयत्न दिसून येतात. तुझे अगदी सुरवातीचे मराठी मला अजून आठवते. आता तू अगदी रसाळ लिहितेस. असो.. मायबोलिवर येणार्‍या प्रत्येकाचेच मराठी सुधारते. मग ती व्यक्ती मराठी माध्यमातली का असेना.

प्रिती, छान!

तुमच्या सहनशक्ति चि दाद (आयडि नव्हे ) दिली पाहिजे!!!! इतका patience टिकवुन ठेवणं काहि सोपी गोश्ट नाहि.

Suggestion :- अनुभव म्हणुन किन्वा इतर लोकांना मार्गदर्शन म्हणुन तुम्हि ( आणि तुमच्या सारखे प्रयत्न करण्यार्र्यां नि) सविस्तर माहिति पर लेख उदहरणा सहित लिहिला तर खुप उपयोग होइल. for ex: म्हणी , वाक्.प्रचार , हे कसं काय समजवायचं? कारण एक समजावलं कि त्यातुन १०० प्रश्ण तयार असतात. तर काहि tips असतिल तर जरुर सान्गा Happy

मुलांना वाचनाची आवड लावणं एवढंच आपण करू शकतो, मग ते कुठल्याही भाषेतलं असो. आपण स्वतः मराठी असल्यानं आपली मुलं मराठी वाचत नाहीत म्हणून आपण हळहळतो. मी मराठीतनं शिकलो. पण त्यामुळे इंग्रजीतल्या साहित्याला मुकलो. पी. जी. वुडहाउसच्या गोष्टींमधेही भरपूर खडूसपणा आहे असं म्हणतात. एकदा आवड निर्माण झाली की माणूस सगळ्या अडचणींवर मात करून वाचतोच. खुद्द पु.लं. स्वतः बंगाली शिकले टागोरांचं साहित्य वाचण्यासाठी. आपण संस्कृत किंवा बंगाली का नाही शिकलो कालिदास टागोर वाचण्यासाठी? तेही आपल्याच संस्कृतीशी निगडीत आहेत ना?
असो. ललिता, लेख छान आहे व तुझे प्रयत्न स्तुत्य आहेत. त्या निमित्तानं एका प्रश्णाला वाचा फुटली.

बी, माझी आई मला शिकवायची श्लोक वगैरे आणि हिंदी येत असेल तर बरेच जमते. तसेही मला बरीच बघून बघून, कॉपी करून्(शब्द उचलून ) घ्यायची सवय आहे. Happy
असो, विषयांतर झाली;माफी असा.

छान! मनातलं लिहिलयं.

>>> तसेही मला बरीच बघून बघून, कॉपी करून्(शब्द उचलून ) घ्यायची सवय आहे.
मनुस्विनि,
अगदी बरोबर! ज्यांना भाषाविषयाची मुळातच आवड आहे, ते असं आपसूकच करतात. मला गुजराथी भाषा अशी ऐकून ऐकून आणि निरिक्षणातूनच समजायला लागली. मराठीच्या वेगवेगळ्या प्रकारांप्रमाणे मी स्वतःशीच गुजराथी बोलीभाषेचेही २-४ प्रकार identify केले होते. (बोलायचा प्रयत्न मात्र मी फारसा केलाच नाही कधी ...)
चिमण,
इंग्रजी साहित्याला मुकलो असं का म्हणतोस तू? एकदा शालेय शिक्षण मातृभाषेतून घेतलेलं असलं की थोड्या प्रयत्नाने (आणि इच्छाशक्तीने) आपण इंग्रजी साहित्याचा आनंद घेऊ शकतो असं मला वाटतं.

व्वा फारच छान लिहीलय. आणि मुलाला आवड निर्माण करण्याचे प्रयत्नही कौतुकास्पद आहेत.

http://www.maayboli.com/node/721

ही माझी पुलंना वाहिलेली श्रध्दांजली (कविता)....

लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे......

सेम्,मीसुद्धा असेच करायचो..अगदि भावाबहिनीची पुस्तके सुद्धा ...

खुप छान लिहीलय

प्रीति, बेश्ट लिहिलयस बघ......... एकदम झकास!

मस्त!
वर सगळ्यांनी लिहिलंय त्यापेक्षा वेगळं अजून काय मत असणार माझं! Happy
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

ललिताचं 'ललित' जेवढं नेमकं, तेवढेच अभिप्राय सुद्धा वाचनीय आणी विषयाच्या अनुशंगाने सुन्दर विचार व्यक्त करणारे. मला तर वाटलं, ह्यातील काही अभिप्रायांचेही संकलन करणे अवश्यक आहे. Happy

ललिता-प्रिती,सुंदर लेख.तुम्हाला वाटली ती भिती मलाही वाट्तेय,त्यामुळे जास्तचं भावले.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

तुम्हाला हा अनुभव आला की नाही ते माहीत नाही.
पण आमच्या शाळेतले मास्तर बाकीचे धडे नीट शिकवायचे, पण पु. लं चे धडे एकदा वाचून, किंवा कुणालातरी वाचायला लाऊन सोडून द्यायचे..

पु. ल. कळले ते घरी वाचून.. एकाने वाचायचं आणि सगळ्यान्नी पोट दुखेपर्यंत हसायचं असा कार्यक्रम..

पण शाळेने मात्र या धड्यांवर पूर्ण निराशा केली Sad

विनय

Pages