हलव्याचे दागिने

Submitted by मनीमोहोर on 28 December, 2014 - 10:04

डिसेंबर महिना सुरु झाला की वेध लगतात ते नव्या वर्षाचे पण ज्यांची संक्रांत पहिली आहे त्यांना नवीन वर्षाबरोबरच वेध लागतात ते काळी साडी, हलव्याचे दागिने यांचे.

माझ्या नणंद बाई हलव्याचे दगिने करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांना करायची खूप हौस पण आहे . माझ्या मुलीच्या बोरनहाणाच्या वेळी त्यांनी सुंदर कृष्णाची हलव्याची वाडी केली होती आणि आता त्याच मुलीचे लग्न होऊन तिची पहिली संकांत आली तेव्हाही त्या तिच्यासाठी हलव्याचे दागिने करायला तयार, आता जवळ जवळ ऐंशीच्या घरात असूनही. हलव्याचे दागिने बनवणे कौशल्याचे, कष्टाचे आणि चिकाटीचे काम आहे. पण परमेश्वर कृपेने त्यांच्याकडे अजूनही ती क्षमता अहे. पूर्वी त्या हलवा ही घरीच करीत असत. पण आता हलवा विकत आणतात. हलव्याचे सर करण्यासाठी खाली बसावे लागते आणि पाय लांब करुन पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरुन त्यात हलवा जिग च्या सहायाने फिक्स करावा लागतो. त्यांनी केलेल्या दागिन्यांचा फोटो खाली देत आहे .

From mayboli

हातात बांगड्या पाटल्या तोडे, गळ्यात मंगळसूत्र, तन्मणी आणि हार, दंडात वाकी , नाकात नथ, कपाळावर बिंदी, कानात झुमके आणि कुड्या (काय हव ते घाला ), बोटात अंगठी असे सगळे दागिने त्यांनी स्वतः तयार केले होते आणि जावयांसाठी दोन पदरी हार आणि पुष्पगुच्छ (ऑरगंडीची फुलं मी नेट वर बघुन केली आणि त्यावर हलव्याचे सर सोडले त्यामुळे नंतर ही तो पुष्प्गुच्छ म्हणून वापरता आला. )

जावयांसाठी हत्ती वर हलव्याच्या गोणी ( पोती) टाकुन तो हत्ती ही जावयांना देण्याची प्रथा आहे. तो ही फोटोत दिसतो आहे. हत्तीच्या पाठीवर सजवलेली झूल घालुन त्यावर हलव्याच्या गोणी लादल्या आहेत. विविध आकाराच्या पिशव्या करुन त्यात हलवा भरुन देण्याची पद्धत आहे. त्या पिशव्या ही मी स्वतः केल्या आहेत. या सगळ्यात माझा ही वेळ छान गेला.

From mayboli

From mayboli

जावयांसाठी हलव्याने भरलेली वाटी आणि लेकीसाठी काळी साडी घ्यायलाच हवी. अशी सगळी तयारी झाली संक्रांतीच्या सणाची. लेक आणि जावई यायचे तेवढेच बाकी होते. पण कहाणीमध्ये ट्विस्ट आली. ती होती सिंगापूरला आणि ऑफिसमध्ये आयत्या वेळेस अर्जंट काम निघाल्याने तिला यायला जमणार नाही असे कळले. इकडे आम्ही सगळेच हिरमुसलो. नणंदबाईनी किती हौसेने दगिने केले होते. पण इच्छा असली की मार्ग निघतोच. ते सगळ वाण आणि दगिने घेऊन आम्हीच तिकडे जाण्याचा बेत केला पण इतके नाजुक दगिने नेणार कसे ? त्यावर ही तोडगा निघाला. पेठे सराफांकडे जाऊन मी रिकामे ज्वेलरी बॉक्स देण्याची त्यांना विनंती केली आणि नवल म्हणजे काहीही कुरकुर न करता त्यानी ते देण्याचे लगेचच मान्य केले . मग काय त्या ज्वेलरी बॉक्स मधुन ही ज्वेलरी अगदी अल्गद एक ही हलवा न पडता सिंगापूरला पोचले खरी पण एक खंत लागुन रहिली ती म्हणजे नणंद बाई काही येऊ शकल्या नाहीत तिकडे वयोमानामुळे. त्यांना फोटो वरच समाधान मानावे लागले. तो हा फोटो.
From mayboli

संक्रांतीच्या आधीच फोटो टाकला आहे कारण दागिने करण्यात जर कोणाला रस असेल तर फोटोचा उपयोग होऊ शकेल. तसेच कोणाला हलवा करायचा असेल तरी आता त्याची कृती ही दिनेश दानी दिली आहे.

सुमेधा यानी हलवा कसा तयार करतात ते दिनेशदा यांना विचारले होते. नेहमीप्रमाणे दिनेशदा यांना ते माहित होतेच त्यांनी प्रतिसादात हलव्याची अगदी परफेक्ट कृती दिली आहे. तीच खाली देत आहे. म्हणजे ती सगळ्यानाच पहिल्या पानावर दिसेल.

दिनेशदा यांनी दिलेली हलव्याची कृती :

इथे सर्वांच्या सोयीसाठी हलव्याची कृती देतोय.

एक वाटीभर साखर घेऊन त्यात वाटीभर दूध घालायचे. साखर विरघळली कि ते गरम करत ठेवायचे. उकळी आली कि मग त्यात अर्धी वाटी ताक टाकायचे. थोड्या वेळाने मळी वर येते. ती काढून टाकायची. पाक थोडा उकळून चौपदरी फडक्याने गाळून घ्यायचा. पाक शुभ्र होणे महत्वाचे आहे. हा पाक सतत गरम ठेवावा लागतो.

मग एका परातीत किंवा कढईत तीळ ( अर्धी मूठ ) भाजायला घ्यायचे. ते सतत हलवत रहायचे. त्यावर अर्धा अर्धा चमचा पाक टाकत रहायचा. तो सुकला कि परत टाकायचा. थोड्या वेळाने त्याला काटा येऊ लागतो. हे काम पहाटेच्या थंडीतच करायचे असते तर चांगला काटा येतो. परातीला पाक चिकटला तर तीळ काढून परात स्वच्छ धुवायची, पुसायची आणि परत हे काम सुरु करायचे.

तीळासोबत खसखस, वेलची दाणे, काकडीच्या बिया वगैरे पण वापरतात. रंगीत करायचा असेल तर बेसिक काटा आल्यानंतर पाकातच रंग टाकायचा. तयार हलवा थोडा वेळ उनात ठेवायचा.

बाजारी हलव्यात परात स्वच्छ करत नाहीत म्हणून त्यावर पांढरट थर दिसतो, घरचा हलवा चमकदार होतो. ( माझी आई घरी करत असे पुर्वी. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो........नणंद ग्रेटच आहे. ८० च्या घरात असूनही इतका उत्साह!
मस्त आहेत दागिने! आणि तुम्ही केलेल्या पिशव्याही.

तुम्हाला सगळ्यांना दागिने इतके आवडले नणंद बाईच्या कलेच चीज झाल्यासारखं वाटतय.

दिनेश दा, हलव्याची कृती टाकते हेडर मध्ये.

मनीमोहर तुमच्या नणन्दबाईनी दागिने एकदम सुरेख आणी सुबक बनवलेत. तुम्ही पण इटुकल्या पिशव्या मस्त केल्यात.:स्मित:

दागीने, पिशव्या, हलवा, मांडणी सगळंच सुबक, सुरेख . ह्या वयात करतात म्हणून जास्तच आत्याचे भाचीवरचे प्रेम ... छान वाटलं.

फारच सुरेख. वन्सबाइच खरच कौतुक वाटत.याही वयात एव्हडा उत्साह. भाचीच कौतुक. त्यांना नमस्कार सांग हं . तुझही कौतुक वाटत. प्रत्येक क्षेत्रातल कौशल्य. केव्हा आणि कस करतेस ग हे सगळ ? लेकीचा आनंदी चेहराहि बघायला आवडेल बर. तेव्हा फोटो अवश्य पाठव. येथुनच द्रुष्ट काढते. तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत.'' तिळगुळ घ्या गोड गोड बोला.''
नविन वर्ष आनंदाचे व सुख-सम्रुद्धीचे जावो.
हीच शुभे च्छा व आशिर्वाद.

सगळ्याना परत एकदा धन्यवाद. प्रभाताई, तुमचा प्रतिसाद खूप आवडला. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमी आम्हाला लाभोत हीच इच्छा. नणंदबाई सध्या कोकणात गेल्या आहेत. आल्या परत की त्यांना संपूर्ण धागाच दाखवते. त्यांना खूप छान वाटेल सगळ वाचून.

दिनेशदा, हलव्याची कृती हेडर मध्ये टाकली आहे.

विशेष म्हणजे मायबोलीचे आभार. मायबोलीमुळेच नणंदबाईंची ही कला आपल्यापर्यंत पोहचु शकली.

थोडे विषयांतर, पण हेमाताई तुमच्या जाऊबाईंनीच माझ्या आईला खुप वर्षापुर्वी हलवा कसा करायचा ते दाखवलं होतं. त्यांनीपण सुंदर केला होता.

मला अगदी तो सीन डोळ्यासमोर उभा राहीला Happy

खूपच छान आहेत सगले दागिने.तुमच्या नणन्दबाइना धन्यवाद सान्गा.दिनेशदा रेसिपीबद्दल धन्यवाद.

खूप सुरेख दागिने.
हलव्याचे दागिने करण्यासाठी काहि टिप्स आहेत का? अमेरिकेमधे मिळणार्या गोष्टि पासुन?

स्टेप बाय स्टेप क्रुती कोणी देउ शकेल का? १ वर्षे वयाच्या मुलासाठी बनवायचा आहे.

हलव्याचे सर करण्यासाठी खाली बसावे लागते आणि पाय लांब करुन पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरुन त्यात हलवा जिग च्या सहायाने फिक्स करावा लागतो. >>>>> माझी आजी करायची, तिच्याबरोबर मी पण केलय लहान असताना. ती तीनपदरी दोरा घ्यायची..

काय मस्त दिसताहेत दागिने सारेच..व्वाह व्वा..
पाकृ सुद्धा भारी हं दा..
ग्रेट आहात तुम्ही लोक्स.. _/\_

ओ एम जी... इतकी अप्रतिम कलाकृती कशी निसटली माझ्या नजरेतून.. तुझ्या आणी तुझ्या नणदबाईंच्या उत्साहाला खरोखरंच सलाम.. किती निगुती ने केलेलेत दागिने..शिवाय घरपोच देऊन ही आलीस.. कौतुक!! कौतुक वाटलं नुस्तं.. एकेक दागिना सुबक, सुंदर दिसतोय.. एकेक पिशवी गोड आहे..

धन्यवाद सर्वांना.
सुरभि, मला काही माहित नाहीये अमेरिकेत हलव्याचे दागिने करायला काय करायचे ते.

वर्षु, तू प्रतिसाद किती सुंदर देतेस. तुझे प्रतिसाद मला नेहमीच आवडतात.

अमा, जरुर दाखवा हे फोटो तुमच्या नातेवाईकांना. कोणाला तरी उपयोग झाला तर आनंदच वाटेल.

अतिशय सुरेख झालेत हे दागिने. मांडणी, हत्ती, आणि त्या पिशव्या, फुले सगळच मस्त जमलय.
तुमच्या नणंदबाइंना आमचा सलाम सांगा … या वयातही असा उत्साह! ग्रेटच

प्राची, दागिने आणि क्लायंट दोन्ही खूप गोड. थोड्या मोठ्या मुलींना दागिने घालण्याची आयडिया खूप आवडलीये.
कोणी असेच केले असतील तर ते ही पाहायला आवडेल
आर्या, प्रतिसादाबद्दल धन्स. सांगते नणंदबाईना.

धन्यवाद. खूप पूर्वी टीव्ही वर पाहिलं होतं कसं करायचं ते. करताना कळलं किती कष्ट पडतात. म्हणून तिच्या साठी करून हौस फिटली Wink

Pages