उतरी धैवत

Submitted by kulu on 18 December, 2014 - 05:22

(व्याकरणातील चुकांबद्दल माफ करा, किशोरीताईंबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे, त्यांच्याप्रत्येक रागातल्या प्रत्येक श्रुतीवर, आणि प्रत्येक श्रुतीच्या लगावावर पी एच डी करता येईल इतकं अथांग समुद्रासारखं आहे ते. त्यात डुबकी मारण्याचा हा प्रयत्न! ऐकण्यासाठी http://play.raaga.com/hindustani/album/Live-Concert-Swarutsav-2000-Kisho... किंवा http://gaana.com/album/live-concert-swarutsav-2000-kishori-amonkar-vol-1 )

उतरी धैवत!

त्यादिवशी कधी नव्हे ते पहाटे जाग आली. दिवाळीचा पहिला दिवस होता. ! प्रसन्न वातावरण! एवढ्या लवकर काय करायचं हे कळेना म्हणून अंगणात आलो. आई रांगोळी काढत होती. मग माझं नेहमीचं काम सुरु केलं आणि ते म्हणजे गाणी ऐकणे! माझं शास्त्रीय संगीताच वेड आईला माहितीय आणि सुदैवाने त्याला वेड न समजता एक कला समजणारी अशी आई मला लाभल्याने "बघेल त्यावेळी हेडफोन कानात" वगैरे फालतू गोष्टी मला कधीही ऐकाव्या लागल्या नाहीत! असो! मोबाईलवर किशोरीताईंचा बिभास सुरु केला आणि कठड्याला टेकून डोळे मिटून ऐकत बसलो!

हे नरहर नारायण..... ताईनी "हे" म्हणताना अशी काही साद घातलीय की अंगावर सर्रकन काटा आला. तो धैवत आहे हे कळत होतं, पण तो असाही असू शकतो? ताईंच्या ह्या बिभासाबद्दल ऐकलं होतं, त्यांच्या "भिन्न षड्ज" ह्या माहितीपटात ताई त्याविषयी बोलल्यात पण ; पण त्यादिवशी तो बिभास मी अनुभवला! त्या धैवातासाठी काय सुरेख शब्द वापरलाय...उतरी धैवत! खरंच तो शुद्ध धैवतावरून धैवताच्या किंचित कोमल अशा श्रुतीवर अलगद उतरतो! आणि उतरत असताना पूर्ण बिभासालाच एक पवित्रता बहाल करतो. किती अचाट आहे हे! कारण मुळात धैवताचा भाव बीभत्स आहे. म्हणजे रुढार्थाने बीभत्स नव्हे, पण इतर स्वरांमध्ये जो एक प्रसन्न भाव आहे तो धैवतामध्ये तसा नाही. याचं सुंदर उदाहरण म्हणजे राग भूपेश्वरी किंवा प्रतीक्षा , भूपातला धैवत कोमल केला की हा राग मिळतो. एकच स्वर बदलला पण त्यासोबत पूर्ण भावविश्व बदललं. पंचमावरून येऊन या कोमल धैवतावर थांबल्यावर एक विचित्र भावावस्था तयार होते भूपेश्वरीत, तो भाव म्हणजे बीभत्स म्हणता येईल! पण अशा या दोन बीभत्स धैवतामध्ये बसलेली धैवताची ती पवित्र आणि तरल श्रुती शोधून काढायची म्हणजे साक्षात गानसरस्वतीच हवी तिथे!

हे अवघड अशासाठी की हा अमुक एक गंधार, हा म्हणजे रिषभ, यासारखं उतरी धैवत हा काही pinpoint करता येईल असा स्वर नव्हे, ती मींडही नव्हे आणि कणही! आणि नेमक्या याच गोष्टींमुळे तो नेहमी बरोबर लागेलच असं सांगता येत नाही! पण ताईन्च्या बिभासात तो फक्त तांत्रिकदृष्ट्या, किवा भावाच्या दृष्टीनेच नव्हे तर केवळ त्या रागाचा म्हणून तो उतरी धैवत वेगळा आणि नेमका असतो. "भिन्न षड्ज " मध्ये ताईनी स्वरमंडलावर बिभास जुळवलाय त्यामध्ये पहा, स्वर म्हणून एक षड्ज सोडला तर इतर कोणीच नेमका नाही पण बिभास मात्र तिथे नेमका ऐकू येतो! ही जादू आहे श्रुतीची आणि ताईनी केलेल्या जाणीवपूर्वक अभ्यासाची! पुन्हा ताई हा धैवत फक्त आलापातच संथ लयीतच घेतात असही नाही. पुढे बोल-आलाप, बोलतान, तान या सगळ्यात तो उतरी धैवत जसाच्या तसा येतो आणि आपण फक्त आ वासून बघत राहतो. माझे सर म्हणतात त्याप्रमाणे खरंच काय प्रचंड बाई आहे ही! खरंच प्रचंड! आणि हे करताना आता मी उतरी धैवत लावतेय असा आविर्भाव कुठेही नाही. सगळ अगदी स्वाभाविक, सहज आणि उत्स्फूर्त! बरेचजण शुद्ध धैवताचा बिभास गातात , त्याच्या ताना सुरु झाल्या की देसकाराचा आभास होतो. ताईनी देखील द्रुत शुद्ध धैवताची गायिलेय पण कुठेही उतरी धैवताने उभ्या केलेल्या बिभासाच्या भावविश्वाला तडा गेला नाही. असा ताईन्चा बिभास ऐकला की काही दुसरं ऐकू नये असं वाटत! हा बिभास म्हणजे ज्याप्रमाणे लालसर क्षितीज हे सूर्योदयाची नांदी देतं, तस असीम विश्वाच्या उत्पत्तीच्या आधीची शांतता दाखवत असावा!

ताईनी गायिलेला बिभास आणि बाकीच्यांचा बिभास यातला नेमका फरक हा फक्त स्वरात नाही तर त्या रागाच्या वातावरणनिर्मितीत पण आहे. ताईन्चा बिभास हा शांत,पवित्र आणि शुचित आहे, ...अगदी दिवाळी पहाटेसारखा! त्यामध्ये "हे नरहर" म्हणत देवाला साद जरूर घातलीय पण तोडीप्रमाणे अतिकरुण वगैरे असं काही नाही त्यात! ताइन्चा बिभास ऐकताना एखाद्या शांत डोहातल्या पाण्याप्रमाणे मनातल गढूळ असं सगळं तळाशी जात, आणि उरत ते नितळ मन! तेव्हा ताईपण बिभास होतात आणि ताईन्बरोबर आपणही!

जेव्हा समाधीतून बाहेर आलो तेव्हा क्षितीजावर प्रकाश नुकताच येत होता. आईची रांगोळी पूर्ण झालेली. दिव्यांच्या मंद प्रकाशात सारं अंगण उजळून निघालं होतं. सगळीकडे प्रसन्न पावित्र्य नांदत होतं, ते ताईन्च्या बिभासाचं. आणि आई माझ्याकडे एकटक पाहत होती, मी न सांगताच बिभासाचा तो भाव तिच्यापर्यंत पोहोचला असावा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो !!

तेव्हा ताईपण बिभास होतात आणि ताईन्बरोबर आपणही!>> खरंय अगदी.
मायबोलीवर बर्‍याच दिवसांनी फिरकतोय, पण आल्याचं सार्थक झालं बघ.
लिहीत रहा.

काहीजणांकडे वर दिलेली लिंक उघडत नाहीय. म्हणुन ही लिंक देतोय.

http://gaana.com/album/live-concert-swarutsav-2000-kishori-amonkar-vol-1

याच्याच vol 2 मधला अल्हैया बिलावल पण फार सुंदर आहे!

Pages