भूल

Submitted by अमेय२८०८०७ on 13 December, 2014 - 10:00

गर्द दाटल्या वनराईचा
दिपवे वनसंभार
तेजकंकणे लेउन हाती
उजळे घनअंधार

पथीक वाटेवरती शोधे
चकव्यामधुनी खूण
शिळा धुळीशी बिलगुन आहे
युगजन्मापासून

कल्पनेतल्या अभिसाराचा
उधाण मनशृंगार
जाणिवेतले आठव करते
ओढ पिशी, अनिवार

चाहुल फुलता ऐसे वाटे
व्हावी देहादेही
दोन प्रपातांमधे नसावे
अंतर श्वासांचेही

भासतारके कुठल्या वेळी
जिवास पडली भूल
स्वप्नसुमांच्या तारुण्याला
जडली चांदणझूल

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाहुल फुलता ऐसे वाटे
व्हावी देहादेही
दोन प्रपातांमधे नसावे
अंतर श्वासांचेही >>> क्या बात है पंडीतजी! जियो!