शांत का झालात इतके ?

Submitted by निशिकांत on 8 December, 2014 - 22:59

वादळांनो शांत का झालात इतके ?
पण कपाच्या आत का तोर्‍यात इतके ?

आव आणती जे कुणी ना गुंतल्याचा
पापण्याच्या आत का भिजतात इतके ?

पाळली, उपदेशली श्रध्दा सबूरी
देवपण त्याचेच का वादात इतके ?

व्हायचे झाले, पुन्हा होणार आहे
ताकही फुंकून का पीतात इतके ?

का भुते घोंगावती आशा धरोनी ?
काय असते एवढे शीतात इतके ?

वृत्त, मात्रा, कायदेही क्लिष्ट असुनी
गुंतती शायर किती गझलात इतके ?

आरशाला हे कधी कळलेच नाही
मुखवटे लावून का फिरतात इतके ?

माळता गजरा सखीने मोगर्‍याचा
मखमली रोमांच का फुलतात इतके ?

जायचे तर जा पुढे "निशिकांत" तूही
गुंतण्याला काय रे! माझ्यात इतके ?

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाळली, उपदेशली श्रध्दा सबूरी
देवपण त्याचेच का वादात इतके ?

आरशाला हे कधी कळलेच नाही
मुखवटे लावून का फिरतात इतके ?

जायचे तर जा पुढे "निशिकांत" तूही
गुंतण्याला काय रे! माझ्यात इतके ?<<< शेर आवडले निशिकांतजी!

>>>आव आणती जे कुणी ना गुंतल्याचा<<< वृत्त बिघडत आहे.

आव आणती जे कुणी ना गुंतल्याचा
पापण्याच्या आत का भिजतात इतके ? <<<खयाल अत्तिशय आवडला

आव आणत ते कुठे ना गुंतल्याचा....
पापण्याच्या आत का भिजतात इतके ? <<<<अस वाचून पाहिले

या वरून माझा एक शेर आठवला काका,

कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने

धन्यवाद !

-सुप्रिया.