क्षितिजावरचा संन्यासी

Submitted by संतोष वाटपाडे on 8 December, 2014 - 06:51

रानफ़ुलांचा तवंग आला भल्या पहाटे पाण्यावरती
धुंद गोठल्या पाचोळ्याची सळसळ झाली काठावरती
आणि अचानक पाण्यामधुनी एक बुडबुडा उंच उडाला
शांत तळ्यातिल गारठलेल्या थंड जलाच्या वाफ़ेवरती...

धुके पांढरे सरपटणारे अडखळले घनझाडांवरती
परतून आले तसेच मागे अरुंद पाऊलवाटांवरती
लक्ष चुंबने देत फ़ुलांना सरकत गेले पुढे पुढे अन
खुणा उमटल्या दाट धुक्याच्या हिरव्या हिरव्या पानांवरती....

तलम कोंदणे जागोजागी थरथरणारी चमचमणारी
फुsलपाखरे रंगीत त्यावर मुग्ध होऊनी भिरभिरणारी
तळ्यास खेटून उभ्या तरुंवर कैक पाखरे पटपट जमली
सुर्य उगवता निळ्या नभाशी घेण्यासाठी उंच भरारी...

मखमल जमिनीवरची हिरवी रजतकणांनी झाली ओली
खडकांमधले पाणी निर्मळ उतरून आले होते खाली
चित्र प्रकटले असे कि जणू डोळ्यांनाही वाटून गेले
कागदावरी रंग शिंपुनी कुणी खरोखर जादू केली...

दवबिंदूची झालर आणिक वृक्ष लतांची महिरप झाली
क्षितिजावरच्या संन्याशाचे दर्शन घेण्या पहाट गेली
वार्‍यावरती सनई चौघडे नृत्य धरेचे लाजत थिरकत
उंच भरजरी वस्त्रे नेसून वाजत गाजत सकाळ आली...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुके पांढरे सरपटणारे अडखळले घनझाडांवरती
परतून आले तसेच मागे अरुंद पाऊलवाटांवरती
लक्ष चुंबने देत फ़ुलांना सरकत गेले पुढे पुढे अन
खुणा उमटल्या दाट धुक्याच्या हिरव्या हिरव्या पानांवरती.... >>> अग्दी चित्रदर्शी ...

सुरेख कविता... Happy

अतिशय सुंदर. एकदम डोळ्यांसमोर उभी राहिली ती पहाट!
आम्हाला अभ्यासक्रमात अशीच तळ्याकाठच्या हिवाळ्यातल्या पहाटेचं वर्णन करणारी कविता होती. कुणाची ते नेमकं आठवत नाही पण बहुतेक कवी अनिलांची असावी!

धुके पांढरे सरपटणारे अडखळले घनझाडांवरती
परतून आले तसेच मागे अरुंद पाऊलवाटांवरती
लक्ष चुंबने देत फ़ुलांना सरकत गेले पुढे पुढे अन
खुणा उमटल्या दाट धुक्याच्या हिरव्या हिरव्या पानांवरती....

मखमल जमिनीवरची हिरवी रजतकणांनी झाली ओली
खडकांमधले पाणी निर्मळ उतरून आले होते खाली
चित्र प्रकटले असे कि जणू डोळ्यांनाही वाटून गेले
कागदावरी रंग शिंपुनी कुणी खरोखर जादू केली...

व्वा!! सुंदर चित्रण! अप्रतिम कल्पना.

चित्रदर्शी कविता.
जुन्या कवितांची, त्या कालखंडाची आठवण आली.
आवडलीच..

सुंदर !
पहाटतेजाचे केशरी वस्त्र नेसलेल्या सूर्याला दिलेली 'क्षितीजावरचा संन्यासी' ही उपमा तर फार आवडली.