बोच

Submitted by बेफ़िकीर on 5 December, 2014 - 10:09

गेली सुमारे सहा वर्षे मी विविध संकेतस्थळांवर वावरत आलो आहे. काही संकेतस्थळे फक्त गझलेसाठी होती, काहींवर इतरही लेखन होत होते, होत आहे आणि फेसबूकसारख्या स्थळावर मनुष्याला व्यक्त होण्याचे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत.

संकेतस्थळ कोणतेही असले तरी एक समान बाब प्रत्येकात असते. प्रत्येक स्थळावर माणूस व्यक्त होतो. प्रवेश घेणे, अभिप्राय, लेखन, चर्चा, मनोमिलाफ, वाद, आंतरजालीय वैर हे सर्व व्यक्त होण्याचे आविष्कार आहेत.

ही समान बाब विचारात घेऊन 'संकेतस्थळ स्पेसिफिक' असे लिहिण्याऐवजी मी फेसबूक ह्या स्थळाला बेंचमार्क मानून लिहीत आहे.

उदाहरणार्थ घेतलेल्या फेसबूक ह्या स्थळाचे अनेकांना लागलेले व्यसन सर्वज्ञात आहे. ह्या व्यसनाला वय, लिंग, जात, शिक्षण असे निकष लागू होत नाहीत.

आज फेसबूकचा वापर करण्यामधील सहजता, वारंवारता आणि सातत्य बरेच वाढलेले आहे. फेसबूक किंवा इतर कोणत्याही संकेतस्थळाची उपयुक्तता हा एक वेगळा भाग आहे. उपयुक्तता कमी लेखता येणार नाही. पण बहुधा हे मान्य होईल की फक्त उपयुक्ततेसाठी संकेतस्थळावर असणारे असे खूपच कमी असतात व व्यक्त होण्यासाठी आलेले अधेमधे उपयुक्ततेचाही विनियोग करतात.

तर बहुतांशी लोक व्यक्त होण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी (निव्वळ प्रेक्षक / वाचक म्हणून) अश्या स्थळांवर येतात.

जेथे संकेतस्थळ हे काही विशिष्ट हेतूने निर्माण झालेले असते तेथे त्या हेतूला अनुसरून सदस्य व्यक्त होतात तर फेसबूकसारख्या स्थळावर लोक कोणत्याही विषयावर भावना व्यक्त करताना दिसतात.

'कोणत्याही विषयावर' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती आता इतकी झालेली आहे की खासगी किंवा सार्वजनिक आयुष्यात घडलेली क्षुल्लक बाबही व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

क्षुल्लक म्हणजे खरोखरच क्षुल्लक!

हे सगळे बाळबोध मुद्दे मांडण्याचे कारण असे की आज सकाळी एक प्रसंग घडला. वडिलांचा उजवा हात जुलै महिन्यात फ्रॅक्चर झाला होता. गेल्या महिन्यापासून मी त्यांना सोसायटीतल्या सोसायटीत चकरा मारण्याची परवानगी दिली होती. काळजी वाटत असे म्हणून त्यांना मी बराच काळ घराबाहेर पडू देत नव्हतो, त्यांना जायचे असेल तेथे मीच त्यांना घेऊन जात होतो. घराला एक लाकडी व एक लोखंडी दार आहे आणि लोखंडी दाराची वरची कडी बाहेरून जाळीतून हात आत घालून काढणे शक्य आहे. खालची कडी तशी बाहेरून काढता येत नाही. वडिलांना आधी ती वरची कडी काढता येत असे पण हात दुखावल्यापासून ते त्यांना जमत नव्हते. आज त्यांना ते जमले.

८२ वर्षाच्या त्या माणसाच्या चेहर्‍यावर मोठा सात्विक आनंद होता की त्यांना ती कडी बाहेरून काढता आली. हा आनंद त्यांनी मला ते सांगून व्यक्त केला आणि मीही त्यावर आनंद प्रदर्शीत केला. मला मनात खरोखर बरेही वाटले की त्यांना ते जमू शकले.

नंतर मनात विचार आला की माझ्याबाबतीत असे घडले असते तर मी ते उदाहरणार्थ फेसबूकवर शेअर केले असते आणि त्यावर एक औपचारीकता म्हणा, काहींची मैत्री म्हणा, काहींची माणूसकी म्हणा किंवा आत्मीयता म्हणा, ह्या ना त्या कारणाने बरेच 'लाईक्स' आले असते आणि ते लाईक्स येतील हे माहीत असूनही मला त्याचे अप्रूप वाटलेच असते.

ह्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे माझा तो माझ्यासाठी असलेला मोठा पण जगासाठी असलेला क्षुल्लक आनंद अर्ध्या क्षणासाठी तरी सगळ्या जगाने साजरा केला असता व त्यातून माझा मीपणा तरी सुखावला असता किंवा 'आपल्याबाबत अनेकांच्या मनात क्षणभर तरी चांगली भावना आली' ह्यामुळे मी तरी सुखावलो असतो.

मनात एक बोच, एक हुरहुर आणि एक हळहळ निर्माण झाली.

ही सगळी स्थळे निर्माण व्हायच्या आधी काय होत होते?

आपल्या वाडवडिलांचे कित्येक आनंद, कित्येक दु:खे ही कदाचित व्यक्तच झालेली नसतील. कदाचित ती जाणवून घेण्याचा आपल्याला वेळही नसेल. कदाचित 'व्यक्त होण्याची' त्यांना सवयसुद्धा लागलेली नसेल. किंबहुना, 'त्यात काय आणि कोणाला सांगायचं' ही भूमिका बहुतांशींनी पचनी पाडलेली असेल.

वाईट वाटले. मला खूप लहानपणापासूनचे बरेच आठवते व नातेवाईकांमध्ये ते एक आश्चर्यच मानले जाते. पण आज ती आठवू शकण्याची दैवदत्त क्षमता मला एका वेदनेप्रमाणे भासली. असे कित्येक प्रसंग होते जेव्हा आई, बाबा आणि कित्येकजण व्यक्त होऊ इच्छीत असतील. व्यक्त होणे ही कोणाची गरज नसते? पण त्यांना 'हे सांगायचे कोणाला आणि कसे' हा प्रश्न पडत असेल. कदाचित, हा प्रश्न पहिल्या काहीवेळा पडल्यानंतर त्यांची मानसिकताच 'असेच असते, आपला आनंद आणि आपली दु:खे ही आपलीच असतात' अश्या स्वरुपाची होत असेल.

आज मी मनात कोणताही वरवर भारी वाटणारा विचार आला की 'व्हॉट्स ऑन यूअर माईंड'वर तो कॉपीपेस्ट करून टाकतो. तीस सेकंदही जात नाहीत तोवर 'आजवर ज्याचे तोंड पाहिले नाही आणि पुढे कधी पाहण्याची शक्यता नाही' तो येऊन तिथे 'लाईक' देतो आणि खाली काहीतरी असे लिहितो की मन भरून यावे. किती स्वस्त झालो आहे मी!

किती दुर्मीळ होत्या त्या लोकांच्या भावना ज्यांना मुखावाटे बाहेर पडता येते हेच ज्ञात नव्हते.

हा 'चांगले-वाईट, बरोबर-चूक' असा प्रश्नच नाही. पण मला हा मी ह्या पिढीत जन्मल्याचा गैरफायदा घेणे वाटत आहे. मला भावना साचवता येत नाही आहेत असे वाटत आहे मला! मी पूर्णतः व्यक्त आहे. माझ्यात अव्यक्त असे काहीही नाही असे वाटत आहे.

'खुदकी नजरोंसे गिरना' असे काहीसे वाटत आहे.

वाचताना हा एक विनोदच वाटेल की एका किरकोळ, क्षुल्लक आणि असंबद्ध प्रसंगाला किती हे खोटेनाटेपणाने रंगवणे! हास्यास्पद!

असेही वाटेल की हा हे आत्ता लिहितोय पण दोन मिनिटांनी हा कुठे जाऊन काय लिहील हे ह्यालातरी माहीत आहे का!

पण एखाद्या भावनेशी प्रामाणिक राहून काहीतरी लिहिण्याचा मी मनापासून प्रयत्न करत आहे, कदाचित ती भावना शब्दबद्ध करण्यास मी अपुरा पडत असेनही!

आपण सगळे इतके ब्लेस्ड आहोत त्याबद्दल तंत्रज्ञ, संशोधक ह्यांचे आभार! आधीची पिढी तितकी ब्लेस्ड नव्हती ह्यासाठी कोणालाही दोषी धरता येणारच नाही. हा प्रश्न निव्वळ जनरेशन गॅप, बदलता काळ, तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर टाकलेला प्रभाव असल्या गंजलेल्या शब्दप्रयोगांचा नाहीच आहे.

प्रश्न आहे तो हा, की व्यक्तच होता येत नसेल तर माणूस कसा बनत असेल?

आता आधीची, आंतरजालाशी अजिबात संबंध नसलेली पिढी व्यक्त होऊ शकत नव्हतीच असे आहे का?

तर तेही नाही. ते काही प्रमाणात व्यक्त होतही असत. अनेक लोक असेही असत जे गाजावाजाही करत! अनेक लोक असेही असत जे सतत रडगाणेही गात! त्यासारख्या लोकांनाही अपेक्षित तो प्रतिसाद समोरच्यांकडून मिळत असे.

पण कळीचा मुद्दा बहुधा हा आहे की मी जेव्हा फेसबूक वॉलवर माझ्या भावना लिहितो तेव्हा 'मी जे लिहिले आहे' त्यामागील भावना हेच एकमेव सत्य आहे व त्याला दुसरी कोणतीही काँट्रॅडिक्टिंग पार्श्वभूमी नाही असे गृहीत धरून चालणारे, वाचणारे व अभिप्राय नोंदवणारे लोकच बहुतांशी असतात.

आधीच्या पिढीतील लोक जेव्हा व्यक्त व्हायचे तेव्हा त्यांना अनेकदा अश्यांच्याच समोर व्यक्त व्हावे लागायचे ज्यांना आगा, पीछा सगळे ज्ञात असेल आणि त्यामुळे अभिव्यक्ती 'टोन' करावी लागायची.

माझ्या आजवरच्या आयुष्यातील बहुतांशी काळ मीही त्याच वातावरणात काढलेला आहे आणि नगण्य काळ 'व्यक्त होण्याच्या सुळसुळाटात' काढला आहे. तुमचे सगळ्यांचेही तसेच आहे.

अजून दहा, वीस वर्षांनी काय होईल त्याची काळजी आपल्याला असण्याची गरज नाहीच.

पण असे नाही वाटत का?

की कित्येक लहानमोठे आनंद, कित्येक मोठीछोटी दु:खे, कित्येक संकटे, कित्येक व्याधी, कित्येक भावना, संवेदना, मते, आक्रोश, टाहो, स्मितहास्ये, खळखळाट, भरलेले डोळे, कोरडे डोळे आणि कित्येक मृत्यू हे पुरेसे व्यक्तच होऊ शकले नाहीत?

वाईट वाटते यार!

====================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडिलांच्या प्रकृतीतील सुधारणेबद्दल वाचून बरं वाटलं. Happy

तुम्हाला एकाच वेळी आपल्यात काही अव्यक्त उरत नाही याचंही वाईट वाटतंय आणि पूर्वसुरींत ते कदाचित उरत असावं याचंही? Happy

>> ...अभिव्यक्ती 'टोन' करावी लागायची
कुणास ठाऊक, त्यांच्यापैकी अनेकांना ऐकणार्‍याला काही मागचापुढचा संदर्भ सांगायची आवश्यकता नाहीये याचं सुखही वाटत असेल.

मनात आलेला विचार तिसाव्या सेकंदाच्या आत शेअर केला जातो याचा एकंदर कलाविष्कारांच्या दर्जाशी काही संबंध असेल का असाही एक विचार आला मनात (आणि तो मी लगेच शेअर करत आहे. Happy ) म्हणजे सृजनशील व्यक्तीला तो विचार मनात रुजवायला, फुलवायला, त्याला वळण द्यायला (कलेत चॅनलाइज करायला) जो अवधी लागत आणि मिळत होता तो आता मिळत नाही / नाकारला जातो - असं होत असेल का?

(मी तुमच्या साहित्याबद्दल अर्थातच बोलत नाहीये - सद्ध्याच्या पिढीबद्दल आणि एकूणच कलाजगताबद्दल घाऊक प्रकट विचार मांडते आहे.)

पहिले वाक्य सोडून प्रतिसादातील प्रत्येक वाक्य विचारांस चालना देणारे!

पहिले वाक्य अतिशय सहृदयतेतून आलेले!

ह्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. Happy

>>>तुम्हाला एकाच वेळी आपल्यात काही अव्यक्त उरत नाही याचंही वाईट वाटतंय आणि पूर्वसुरींत ते कदाचित उरत असावं याचंही? स्मित<<<

होय. विचार केल्यावर वाटले की ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. माझी पिढी फेसबूकसारख्या ठिकाणी व्यक्त होण्याचा अतिरेक करत आहे आणि पूर्वसुरींना व्यासपीठच नव्हते ह्या दोन गोष्टी मी एकाच ललितात गुंफल्या खर्‍या तुलनेकरता, पण गुणात्मकरीत्या दोन्हींकडे स्वतंत्रपणे पाहणे शक्य होत आहे.

>>>कुणास ठाऊक, त्यांच्यापैकी अनेकांना ऐकणार्‍याला काही मागचापुढचा संदर्भ सांगायची आवश्यकता नाहीये याचं सुखही वाटत असेल.<<<

उत्तम! किंवा असेही असेल, की ज्याला संदर्भ सांगण्याची आवश्यकताच नाही, फक्त त्यालाच एखादी गोष्ट सांगू शकण्याची मानसिक क्षमता असणे!

>>>सृजनशील व्यक्तीला तो विचार मनात रुजवायला, फुलवायला, त्याला वळण द्यायला (कलेत चॅनलाइज करायला) जो अवधी लागत आणि मिळत होता तो आता मिळत नाही / नाकारला जातो - असं होत असेल का?<<<

गंभीर कलाकार 'अभिव्यक्त होणे तात्काळ शक्य' ह्या सुविधेचा वापर कदाचित करणार नाही. पण कोणतीही कला/साहित्यनिर्मीती करण्याचा हेतू वा क्षमता नसलेला/लीही ती सुविधा प्राप्त करू शकते असे म्हणणे आहे. 'तिसाव्या सेकंदाच्या आत' अभिप्राय येतो असे मूळ लेखात म्हंटले आहे, तिसाव्या सेकंदाच्या आत विचार शेअर केला जातो असे नव्हे, तरीही, तेही शक्य आहेच.

>>>(मी तुमच्या साहित्याबद्दल अर्थातच बोलत नाहीये - सद्ध्याच्या पिढीबद्दल आणि एकूणच कलाजगताबद्दल घाऊक प्रकट विचार मांडते आहे.)<<<

हे कंसात आहे त्यामुळे हे वरील विधानामागील भूमिकेचे मैत्रीपूर्ण स्पष्टीकरण आहे हे समजू शकतोच. पण कंस वगळून वाचायचे झाले तर सध्याची पिढी आणि एकुण कलाजगत हे थोडेसे विसंगत उल्लेख जाणवत आहेत.

त्यापैकी सध्याची पिढी ह्याबाबत - एक्झॅक्टली! सध्याच्या पिढीला हे असे व्यक्त होणे, स्वतःच्याच भावनांना कुरवाळून घेणे शक्य होत आहे.

त्यापैकी 'एकुण कलाजगत' ह्याबाबत - काहीच माहीत नाही. कदाचित सूज्ञ, जबाबदार व गंभीर कलाकार निव्वळ सुविधा उपलब्ध आहे म्हणून विचार झर्रकन् विरघळवून प्रकट होत नसावेत, असे वाटते.

प्रतिसाद द्यायला फार काही उरलेय असे वाटत नाही पण कुणा व्यक्तीने कुणा धाग्यावर नोकरी सोडून घरात राहून वडीलांची सेवा करणार्‍या एका सद्स्वभावी माणसाला अपशब्द काढून जे काही बोल लावले होते त्या व्यक्तीच्या मला तेव्हा तोंडात का वाजवावीशी वाटत होती ते आज जास्त समजतंय!!

डीविनिता, जानादो! Happy

तो माणूसही खूप सहृदय आहे आणि एच आय व्ही च्या रुग्णांसाठी एक डॉक्टर म्हणून झटत आहे हे मी इथे 'फुकटात' ललित लिहिण्यापेक्षा खूप मोठे कार्य आहे. Happy

नक्कीच करत असेल आणि आपल्याला आदर ही आहे, म्हणूनच तिथे काही प्रतिसाद नव्हता दिला! पण म्हणून इतराना कमी लेखले की स्वत:चे कार्य ना मोठे ठरते ना स्वत: व्यक्ती!

इथे काहितरी "गंभीर" चालू आहे ..

कदाचित ते गांभीर्य मला कळलेलं नाही .. पण तुम्हाला नक्की कसली बोच आहे ते कळलं नाही ..

>> हा प्रश्न निव्वळ जनरेशन गॅप, बदलता काळ, तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर टाकलेला प्रभाव असल्या गंजलेल्या शब्दप्रयोगांचा नाहीच आहे

का नाही आहे? आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचं प्रतीक असतो आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी आपलं प्रतीक असतात ना? मग जे काही आहे ते ऑर्गॅनिक आहे असं का नाही मानता येणार .. आधीच्या पिढ्यांकडे अशी व्यक्त व्हायची स्वस्त, जलद साधनं नव्हती .. पण त्यांच्याकडे इतर काही गोष्टी होत्या ज्या आता लोपलेल्या आहेत .. मग त्यांनींही बोच वाटून घ्यावी का त्याबद्दल .. म्हणजे मानवी भावना असणारच पण ह्या लेखनातून ती बोच म्हणजे एखादा सामाजिक प्रश्न असावा असं जाणवतंय तेव्हढा ज्वलंत प्रश्न असावा का हा?

अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला लेखनातून व्यक्त व्हायची आवड आहे, ती तुमची प्रकृती आहे अशी तुमची ओळख वाटते मला .. आणि तुम्ही कसलंतरी निमीत्त होऊन ती आवड पूर्ण करता .. आताच्या पिढीत आणि ह्याआधीच्याही पिढीत हे होतंच होतं .. साधनं वेगवेगळी ..

बेफि, सुंदर लिहिले आहे. ह्यातल्या आजच्या काळात व्यक्त होण्याच्या (लिखित माध्यमे) स्वस्त झालेल्या माध्यमांतून मोकळे होता येण्याच्या भावनेशी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या द्वान्द्वाशी सहमत. पण ह्यात लिहून व्यक्त होणे हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण सगळ्यांनाच तसे जमत नाही. प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. उदा. माझ्या काही मैत्रिणी कधीच ह्या social networking sites वर व्यक्त होत नाहीत. पण प्रत्यक्ष भेटलो मनमोकळ्या गप्पा होतात. त्यांच्याकरता बोलून मोकळे होणे हे लिहून मोकळे होण्यापेक्षा सोपे असते.
मायबोलीवर येणारे/लिहिणारे बहुतांशी लोकं हे लिहून मोकळे होऊ शकणारे/इच्छिणारे असल्याने आपण एकाच सबसेट मध्ये मोडतो. तुमचा लेख वाचून वाटले की ह्या लिहून व्यक्त होण्याच्या virtual माध्यमांनी आपल्या इतर प्रकारे व्यक्त होण्यावर काही परिणाम होत असेल का? ज्या व्यक्ति लिहून व्यक्त होऊ शकत नाहीत त्यांना काय social networking sites बद्दल वाटत असेल? हे जाणून घेण्यासाठी काय केले पाहिजे?

सामाजीक नाही, माझ्यामते व माझ्यापुरता हा भावनिक प्रश्न आहे सशल!

लक्षात घ्या, फेसबूक तुम्हाला आणि मला कोणीतरी दिलं! आपल्या दोघांसाठी फेसबूक देणारा त्रयस्थ असला तरीही फेसबूक आपण आपल्या वैयक्तीक बाबींसाठी वापरू शकतो.

त्या पिढीला असे व्यासपीठ नव्हते, जे काही व्यासपीठ होते ते आयदर त्यांनी स्वतःसाठी निओर्मिलेले होते किंवा सर्कम्स्टन्सेसमधून त्यांच्यासाठी निर्माण झालेले होते. उदाहरणार्थ, तेव्हाच्या सुना 'आज माझी सासू अशी वागली' असे स्टेटस टाकू शकत नव्हत्या वा त्यावर समविचार्‍यांकडून भावनिक 'लाईक्स' अपेक्षित करू शकत नव्हत्या.

तेव्हाच्या सुनांना स्वतःचे व्यासपीठ शोधायला लागत होते.

ते मिळतच होते असे नव्हे.

मिळाले तरी ते एक्स्क्ल्युझिव्हली त्यांचे होते असेही नव्हे.

असले तरी त्यात भावनिक भ्रष्टाचार होणारच नाही ह्याची खात्री होती असे नव्हे.

वगैरे!

>>>लिहून व्यक्त होण्याच्या virtual माध्यमांनी आपल्या इतर प्रकारे व्यक्त होण्यावर काही परिणाम होत असेल का? ज्या व्यक्ति लिहून व्यक्त होऊ शकत नाहीत त्यांना काय social networking sites बद्दल वाटत असेल? हे जाणून घेण्यासाठी काय केले पाहिजे?<<<

उत्तम प्रश्न!

(यथाशक्ती उत्तरे नंतर देईन)

किंबहुना जिज्ञासा, त्या प्रश्नांची उत्तरे देणे हे ह्या ललिताचे काम नाही. तो विषय बराच व्यापक व वेगळा आहे असे वाटत आहे. Happy

हे ललित एक विशिष्ट मानसिक अवस्था प्रदर्शीत करत आहे.

फाटे फोडणे हे नेहमीच दुर्लक्षण नसतेच! अनेकदा ते कंट्रिब्युटरी असते. पण येथे जे म्हणायचे आहे ते म्हणून झाले आहे. त्यानुसार उद्भवणारे इतर अनेक प्रकारचे प्रश्न हे चर्चाप्रस्तावाला शोभतील.

अर्थातच, तुमच्या प्रतिसादाचा संपूर्ण सन्मान व्यक्त करून मी हे लिहिले. कृपया राग नसावा,.

>> तेव्हाच्या सुना 'आज माझी सासू अशी वागली' असे स्टेटस टाकू शकत नव्हत्या

तेव्हाच्या सुनांनां शेजारणी होत्या, हळदी कुंकू, मंगळागौर इत्यादी नेटवर्कींग अव्हेन्यूज् होते .. दळण कांडण, लोणची घालणे, वाळवणं इत्यादी .. अर्थात त्या काळच्या संस्कृती प्रमाणे क्तपत व्यक्त होऊ शकता येत होतं ह्यावर आपल्या काळाच्या तूलनेत बंधनं होती .. पण ती जाचक अलिखीत बंधनं होती तेव्हा म्हणून कोणीतरी नवनविन साधनं शोधली ..

कालांतराने आज जी साधनं उपलब्ध आहेत ती येणार्‍या पुढच्या पिढ्यांनां समाधानकारक वाटायची नाहीत आणि आणखी नविन साधनं निर्माण होतील ..

माणूस व्यक्त आधीही व्हायचा आणि आताही होतो ..

>> की कित्येक लहानमोठे आनंद, कित्येक मोठीछोटी दु:खे, कित्येक संकटे, कित्येक व्याधी, कित्येक भावना, संवेदना, मते, आक्रोश, टाहो, स्मितहास्ये, खळखळाट, भरलेले डोळे, कोरडे डोळे आणि कित्येक मृत्यू हे पुरेसे व्यक्तच होऊ शकले नाहीत?

ह्यावरून हा तुमच्यापुरता प्रश्न आहे असं वाटत नाही ..

जरा कंफ्यूजिंग आहे...
आधीची पीढी असं उठसूठ शेयर करत नव्हती असं नाही पण माझ्या मते ते त्यांच्या प्रत्यक्ष गोतावळ्यात व्हायचं. प्रत्यक्ष गाठीभेठी होत अशा नेहेमीच्या वर्तुळाबरोबर व्हायचं.
आजचं ३० सेकंदातलं शेयरिंग करताना ऐकणारे/वाचणारे मोस्टली खूपच आउटर सर्कल मधले असतात.

मला नीट सांगता येत नाही पण आधीच्या पीढीतल्या लोकांना सगळ्या नातेवाइकांचे पगार वगैरे पण माहित असायचे. कोणाचं लग्न ठरलय्/मोडलय, कोण फ्लॅट घेतय/सोडतय, कोण आजारी आहे अशा आता खाजगी समजल्या जाणार्‍या अनेक गोष्टी त्यात काय लपवायचय अशा निरागसपणे शेयर होत होत्या...

आता आपण अशा गोष्टी शेयर करतो की त्या केल्या नाही केल्या तरी फार फरक पडणार नाही ?
कोण जाणे..
तुलना करण्यात काही अर्थ नाही हे खरं.

>>>ह्यावरून हा तुमच्यापुरता प्रश्न आहे असं वाटत नाही ..<<<

अ‍ॅक्च्युअली मी माझ्या मनात आलेला विषय मांडला सशल, तो आणखीन काहींसाठी त्यांचाही विषय होत असेल तर ते माझ्या नियंत्रणाबाहेर जाईल.

>>>तेव्हाच्या सुनांनां शेजारणी होत्या, हळदी कुंकू, मंगळागौर इत्यादी नेटवर्कींग अव्हेन्यूज् होते .. दळण कांडण, लोणची घालणे, वाळवणं इत्यादी .. अर्थात त्या काळच्या संस्कृती प्रमाणे क्तपत व्यक्त होऊ शकता येत होतं ह्यावर आपल्या काळाच्या तूलनेत बंधनं होती .. पण ती जाचक अलिखीत बंधनं होती तेव्हा म्हणून कोणीतरी नवनविन साधनं शोधली .<<<

तुमच्या ह्या म्हणण्यासंदर्भात कृपया मूळ धाग्यातील ही विधाने विचारात घ्यावीत अशी विनंती!

आधीच्या पिढीतील लोक जेव्हा व्यक्त व्हायचे तेव्हा त्यांना अनेकदा अश्यांच्याच समोर व्यक्त व्हावे लागायचे ज्यांना आगा, पीछा सगळे ज्ञात असेल आणि त्यामुळे अभिव्यक्ती 'टोन' करावी लागायची.

शूम्पी,

तुमच्या प्रतिसादातील मुख्य प्रश्नाचे उत्तर सशल ह्यांच्या प्रतिसादाला उत्तर देताना कव्हर झालेले आहे असे मला वाटत असल्याने पुन्हा तेच लिहीत नाही.

पण आजकाल टोन नाही करत का?
जसं मायबोली वर एक लिहितो/ फेस्बुकावर कदाचित वेगळं/ वेगळ्या सर्कल / ग्रुप मध्ये वेगळ्या गोष्टी शेयर करतोच की?

उदाहरणार्थ फेसबूक घेतलेलं आहे.

जेथे माणूस हवे ते लिहू शकतो.

माणसाने जे लिहिले आहे ते आणि तितकेच सत्य आहे असे वाचकांना (स्पेशली अननोन वाचकांना, जे बहुसंख्य असतात) वाटते.

त्यामुळे त्या माणसाला आपोआपच भावना सुखावणारे 'मित्र'(?) मिळतात.

हे आधी होत नव्हते असे म्हणायचा प्रयत्न केला आहे.

बाकी अमितव,

मायबोलीवर वेगळे, फेसबूकवर वेगळे असे लिहायचा मला अनुभव नाही व तशी माझीतरी सवय नाही.

त्यामुळे 'प्रतिसादमर्यादा' मान्य करतो.

तुम्हीच वर म्हणता की मनात आलेल्या भावना तुम्ही वॉलवर लिहिता (कदाचित माबोवर सगळ्याच नसाल लिहित) , ती पद्यात असेल तर आणि छान जमली तर गझल फॉर्म मध्ये असेल तर कदाचित गझल साईटवर टाकत असाल. वन लायनर असेल तर ट्वीट कराल. एखादं अपडेट फक्त जवळच्यांना शेयर करावसं वाटेल एखादं फक्त मित्रांत आणि ते कौटुंबिक लिस्टनी बघू नये असं वाटेल. हेच टोन डाऊन ना? असं सगळ्याचं होताही नसेल, पण होऊ शकतं इतकंच सांगायचय.

अवांतर - मायबोलीवर मी जितके फ्रॅन्कली लिहिले आहे व लिहू शकलो आहे तितके कोठेही लिहिलेले नाही व लिहू शकतो की नाही हे तपासत बसलेलो नाही. मायबोली प्रशासनाचे आभार!

==============

अमितव,

एखादे, एखादे, एखादे!

हे सर्व 'एखादे' वेगळी असू शकतात ना? Happy

मी जे मित्रांसमवेत बोलतो, बोलू शकतो ते बायकोसोबत बोलत नाही, बोलू शकत नाही, ह्याचा अर्थ तो विषय असा विषय होत नाही जो मला सर्वत्र व्यक्त करायचाच होता पण नाही करता आला.

माझ्याकडे वेगवेगळ्या फोरमवर / ग्रूपमध्ये बोलण्यासाठी वेगवेगळे विषय असणे हे वेगळे आणि एकच विषय मला सर्वत्र बोलावासा वाटत असूनही मला तो फार तर एखाद्याच ग्रूपमध्ये / व्यक्तीशी बोलता येणे किंवा तेथेही न बोलता येणे हे वेगळे! Happy

>>
की कित्येक लहानमोठे आनंद, कित्येक मोठीछोटी दु:खे, कित्येक संकटे, कित्येक व्याधी, कित्येक भावना, संवेदना, मते, आक्रोश, टाहो, स्मितहास्ये, खळखळाट, भरलेले डोळे, कोरडे डोळे आणि कित्येक मृत्यू हे पुरेसे व्यक्तच होऊ शकले नाहीत?

वाईट वाटते यार!>> वाईट वाटून घेण्याची काही गरज मला स्वतःला दिसत नाही. कालाय तस्मै नमः म्हणून पुढे जावं.
आपल्या पिढीला फेसबुक, ट्विटर इ सोशल साईट्स आहेत पावलोपावली व्यक्त व्हायला. आपल्या आईवडिलांच्या पिढीला ते नसलं तरी फोन आला होता, सोशल गॅदरिंग्ज, शेजारी पाजारी होते गप्पा मारायला. सुखं दुखः शेअर करायला. (आपल्या पिढीत ते थोडं कमी झालं असावं), पण त्यांच्या आधीच्या पिढीत ते होतं का?

आज फेसबुकने आपल्याला संधी दिली आहे हे खरं असलं तरी तिथे जाऊन व्यक्त होणं, न होणं हा चॉईस आपलाच आहे की.

काही प्रतिसाद वाचून मनात आले की:

ललित ह्या फॉर्ममध्ये मनात नैसर्गीकरीत्या आलेल्या काही भावना मांडल्या तर त्या डिफेंड का कराव्या लागाव्यात, अनलेस त्या भावना अमानवी, पाशवी, अन्याय्य, विकृत किंवा दुसर्‍याचे नुकसान करणार्‍या नाहीत?

त्या डिफेंड कराव्या लागणे हे 'येथे बोलणे शक्य आहे पण होकारात्मक बोलण्याची इच्छा नाही' ह्या विचाराचे लक्षण तर नाही?

>> सध्याची पिढी आणि एकुण कलाजगत हे थोडेसे विसंगत उल्लेख जाणवत आहेत
'आजच्या घडीचे कलाकार' असं वाचा ते. म्हणजे एखादी चमकदार कल्पना सुचली, शेअर केली, अमुक इतके लाइक्स आले - संपला विषय - अशी उदाहरणं तुम्ही पाहिली असाल. ते शेअर करणं इतकं सहजसाध्य नसतं तर ती कल्पना कवितेत किंवा लेखात इ. फुलवली गेली असती का असा विचार आहे तो.

व्यक्त होण्यासाठी रेडीमेड माध्यम आणि व्यक्त होता(क्षणी)च मिळणारं इन्स्टन्ट ग्राटिफिकेशन यामुळे अभिव्यक्तीचा दर्जा खालावत असेल का?

तुम्हाला-मला लिखित साहित्याचं अगत्य आणि तुम्ही फेसबुकचा धागा पकडून हा विचार मांडला आहात म्हणून त्यासंदर्भातलं उदाहरण देत आहे.

(नाहीतर अजून फाटे सुचले आहेत. :P) Happy

>> ललित ह्या फॉर्ममध्ये मनात नैसर्गीकरीत्या आलेल्या काही भावना मांडल्या तर त्या डिफेंड का कराव्या लागाव्यात, अनलेस त्या भावना अमानवी, पाशवी, अन्याय्य, विकृत किंवा दुसर्‍याचे नुकसान करणार्‍या नाहीत?

तुम्ही तेव्हढं "व्यक्त" व्हायचं पण आम्ही नाही का? Happy

>>>'आजच्या घडीचे कलाकार' असं वाचा ते. म्हणजे एखादी चमकदार कल्पना सुचली, शेअर केली, अमुक इतके लाइक्स आले - संपला विषय - अशी उदाहरणं तुम्ही पाहिली असाल. ते शेअर करणं इतकं सहजसाध्य नसतं तर ती कल्पना कवितेत किंवा लेखात इ. फुलवली गेली असती का असा विचार आहे तो.<<<

गंभीर कलाकार 'अभिव्यक्त होणे तात्काळ शक्य' ह्या सुविधेचा वापर कदाचित करणार नाही

असं त्यावर मी म्हंटलं होतं.

म्हणजे, कल्पना पुरेशी फुलवल्याशिवाय समाधानच होत नाही, असे लोक त्या सुविधेचा विनियोग करणार नाहीत.

(अर्थात कल्पना पुरेशी फुलवणं, तेही 'स्वतःच्यामते' हे ती व्यक्ती गंभीर कलाकारच असेल ह्याचे लक्षण आहे असे मुळीच म्हणायचे नाही, पण निदान गंभीर कलाकार स्वतःच्या निकषांनुसार ती शक्य तितकी फुलवेल असे म्हणायचे आहे) (एक फाटा कमी केला :डोमा:)

पण सध्याची पिढी कलाकार असो नसो, त्या पिढीच्यामते मनात आलेला जो विचार चमकदार असेल तो तात्काळ प्रकाशित करून ती पिढी मोकळी होऊ शकते.

सध्याची पिढी आणि एकुण कलाजगत ह्यातील तफावत (जी मला जाणवली असे मला वाटले ती) फक्त एलॅबोरेट करून पाहिली. Happy

>>>व्यक्त होण्यासाठी रेडीमेड माध्यम आणि व्यक्त होता(क्षणी)च मिळणारं इन्स्टन्ट ग्राटिफिकेशन यामुळे अभिव्यक्तीचा दर्जा खालावत असेल का?<<<

लेखनाबाबत गंभीर असणारे त्यांच्या निकषांनुसार तसे होऊ देणार नाहीत.

>> गंभीर कलाकार 'अभिव्यक्त होणे तात्काळ शक्य' ह्या सुविधेचा वापर कदाचित करणार नाही
१. कदाचित.
२. एखादा कलाकार इन द मेकिंग गंभीर होता होता राहिला असं होत असेल की काय.
(असो, हा फाटा पुरे.) Happy

>>>तुम्ही तेव्हढं "व्यक्त" व्हायचं पण आम्ही नाही का? <<<

तसं नव्हे सशल, ललित मी लिहिलं आहे. तुम्ही त्या ललितावर व्यक्त झाला आहात. तुम्ही स्वतंत्रपणे तुमचे मुद्दे लिहिलेत तर ते डिफेंड करायची वेळ आल्यावर कदाचित तुमच्या मनात तो विचार येईलही जो माझ्या मनात आला.

Happy

बाकी, यूअर रिप्लाईज आर मोस्ट वेलकम! Happy

Pages