नातं - भाग २

Submitted by शिरीष फडके on 4 December, 2014 - 00:32

नातं - भाग २
प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती.

वैयक्तिक नातं, कौटुंबिक नातं, सामाजिक नातं आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक नातं. या प्रत्येक नात्यामध्ये एक ठरावीक भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावत/निभावत असतो. पण जर त्या भूमिकांची सरमिसळ झाली तर काय होतं ते या कथेतून समोर येतं. या कथेतील चारही मुलांची त्या जंगलात घडलेल्या प्रसंगातील वागणूक किंवा प्रतिक्रिया म्हणजे चार वेगवेगळ्या विचारसरणी. चार वेगवेगळ्या विचारसरणी म्हणजेच चार वेगवेगळ्या भूमिका ज्यांची ते कौटुंबिक आयुष्यात सरमिसळ करून फार मोठी गल्लत करतात. ते कसं काय?

सर्वात मोठ्या मुलाची विचारसरणी किंवा भूमिका समजावून घेऊया. सर्वात मोठ्या मुलाला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे स्वतःची प्रतिमा (Image). ही प्रतिमा केवळ लोकांच्या नजरेतच नव्हे तर स्वतःच्या नजरेतदेखील कायम चांगली रहावी या गोष्टीला त्याच्या आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य आहे. मग ते कुठलंही आयुष्य (वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक) असो. त्या मुलाने आईवडिलांसाठी त्या जंगलात घडलेल्या प्रसंगात खूप काही केलं. काटेरी झाडा-झुडपातून प्रवास करत (अनेक शारीरिक जखमा सहन करत) सगळ्या गावकर्यांना बोलावून आणि विशेष करून त्या गड्यामार्फत जंगलात आपल्या आईवडिलांसाठी मदत पोहोचवली. याबद्दल त्याच्या आईवडिलांनी त्या मुलाचे आभारही मानले आणि कौतुकही केलं. पण सरतेशेवटी त्या मुलाने सर्वप्रथम स्वतःच्या प्रतिमेला प्राधान्य दिलं हेही तितकंच खरं आहे. जर आईवडिलांचं काही वाईट झालं आणि जर आपल्या माहितीवरून केवळ आईवडील त्या जंगलात गेले होते हे जर प्रत्येक भावंडाला कळलं तर आपली प्रतिमा सगळ्यांसमोर दूषित होईल ही भीती त्याला वाटत होती आणि याच भीतीने तो सर्वप्रथम सगळ्यांच्या पुढे जाण्याचं टाळत होता (खासकरून आईवडिलांच्या समोर जाणं टाळलं जेव्हा त्यांना मदत हवी होती). जेव्हा त्या मुलाला खात्री पटली की काहीही अघटित घडलं नाही तेव्हा तो सगळ्यांसमोर आला कारण तसं कुणीही आता त्याच्या नावाचा उल्लेख एकमेकांकडे करणार नव्हतं. कारण त्याच्याशिवाय कुणाचाच कुणाशीही संवाद नसल्यामुळे त्याची प्रतिमा ही यापुढेदेखील कुटुंबातील प्रत्येक सदस्यासमोर चांगलीच राहणार होती. पण ही एक अशाप्रकारची विचारसरणी आहे जिचा योग्य दिशेने उपयोग केला तर आपल्याला सामाजिक आयुष्यात किंवा सामाजिक नात्यांमध्ये फार लाभदायक ठरतं. केवळ ही प्रतिमा खरी असली पाहिजे यावर भर देणं त्यात महत्त्वाचं. पण याची जर सरमिसळ आपण कौटुंबिक आयुष्यात केली तर कौटुंबिक आयुष्यातील प्रत्येक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

दुसर्या मुलाच्या विचारसरणीचा किंवा भूमिकेचा आढावा आता घेऊया. त्या जंगलातल्या प्रसंगात दुसर्या मुलाने आईवडिलांना मदत करताना मागचा-पुढचा काहीही विचार न करता त्या दलदलीत झेप घेतली. म्हणजेच या मुलाचा समोरच्या व्यक्तिसाठी आपण काय करतोय यापेक्षा आपण किती करतोय यावर जास्त भर होता. अशा व्यक्ती बहुतेकदा कुठलंही पाऊल हे भावनेच्या भरात उचलतात. भावनाशील (Emotional) व्यक्ती आपण काय करतोय यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तिसाठी किती करतोय यावर अशासाठी भर देतात, कारण त्यांना स्वतःच्या भावनांची (आनंद, राग, दुःख, प्रेम, इत्यादी) तीव्र भूक भागवायची/शमवायची असते. पण ही एक अशाप्रकारची विचारसरणी आहे, ज्या विचारसरणीला योग्य ती दिशा दाखवली म्हणजेच योग्य पद्धतीने भावनांवर ताबा मिळवला तर ही विचारसरणी वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये उपयुक्त ठरेल. पण जर या विचारसरणीची सरमिसळ कौटुंबिक आयुष्यात किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये केली तर त्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

आपण आपल्यांसाठी (आपल्या माणसांसाठी) किती करतो यापेक्षा काय करतो यावर भर दिला तरच ते नातं सुदृढ

होईल. तिसरा मुलगा हा Practical आहे म्हणजेच त्याची विचारसरणी ही व्यावहारिक आहे हे त्या मुलाच्या आणि त्या गड्याच्या संभाषणातून सहज स्पष्ट होतं. त्या गड्यासमोर तिसरा मुलगा आईवडिलांनी त्याच्या लहानपणापासून केलेल्या कष्टांचा हिशोब मांडतो. ज्याच्या मोबदल्यात तो त्यांना मदत करत असतो

ज्याला तो कर्तव्य (Duty) असं Label (शिक्का/वर्ग) लावतो. असा हिशोब किंवा अशी विचारसरणी ही व्यावहारिक आयुष्यातील प्रत्येक नात्यात उपयुक्त ठरते. कारण त्यावर व्यवहारी/व्यावसायिक नात्यातील यश/अपयश अवलंबून असतं. पण हीच बाब जर कौटुंबिक आयुष्यात किंवा नात्यात लागू केली तर त्या नात्यात केवळ दुरावाच निर्माण होत नाही तर त्यात कृत्रिमपणादेखील येऊ शकतो.

सर्वात शेवटचा म्हणजेच धाकटा मुलगा. या मुलाची भूमिका किंवा विचारसरणी जाणून घेण्यासाठी आपण त्या मुलाच्या आणि आईवडिलांच्या मध्ये नक्की काय संभाषण झालं, ते बघुया. जंगलातल्या प्रसंगात आपल्या धाकट्या मुलाचं हटकून वागणं आईवडिलांना जरासं खटकलंच होतं. पण तरीसुद्धा काही झालं तरी त्याने आपला जीव वाचवला आहे. तेव्हा त्याच्याकडे जाण्यात काही कमीपणा नाही असा विचार करून आईवडील त्याच्या घरी गेले. ते आपल्या मुलाच्या घरी पहिल्यांदाच जात होते. त्यामुळे त्यांना थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यातून मुलाकडून कशी प्रतिक्रिया येईल याबद्दल त्यांना थोडीशी भीतीदेखील वाटत होती. आपल्या धाकट्या मुलाकडे पोहोचवल्यावर मात्र त्यांची भीती पूर्णतः खोटी ठरली. मुलाने आणि सुनेने अगदी आनंदाने आणि आदराने त्यांचं स्वागत केलं. सुनेने आधी काही गोड-धोड खायला केलं आणि नंतर सासू-सासर्यांसाठी आग्रहाचं जेवणही केलं. जेवण उरकेपर्यंत आईवडिलांमधील आत्मविश्वास थोडासा वाढला होता आणि त्यामुळेच त्यांनी मुलाला त्यादिवशी जंगलात घडलेल्या प्रसंगाबद्दल आणि त्याच्या वागणुकीबद्दल विचारलं. मुलाने अगदी शांतपणे आणि संयमाने त्यांना उत्तर दिलं. तुम्ही माझ्याबाबतीत लहानपणी जे केलं तेच मी त्यादिवशी तुमच्याबाबतीत केलं. लहानपणी पहिल्यांदा तुम्ही मला जेव्हा चालायला शिकवत होतात तेव्हा मी पडू नये किंवा मला आधी नीट उभं राहता यावं म्हणून तुम्ही माझा हात धरत होतात/आधार देत होतात आणि जेव्हा माझ्या पायांना एक ठरावीक गती/लय मिळायची तेव्हा तुम्ही माझा हात अलगद सोडून द्यायचात जेणेकरून मला स्वतःहून चालण्याचा आनंद मिळावा. मीही त्या दिवशी जंगलात तेच केलं. जेव्हा तुम्हाला दलदलीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी एक ठरावीक गती/लय हवी होती तेव्हा मी तुम्हाला मदत केली आणि ज्या क्षणी तुम्हाला ती गती मिळाली आणि जेव्हा कळलं की आता तुम्ही सुखरूप बाहेर पडाल तेव्हा मी तिथून निघून गेलो. बाहेर पडतानाचं तुमचे जे काही परिश्रम आणि योगदान होतं त्याला योग्य तो न्याय मिळावा म्हणून मी तसं केलं आणि राहता राहिला प्रश्न तो म्हणजे माझं तिथून लगेच निघून जाण्याबद्दल एवढच सांगेन की मी जर तसं केलं नसतं तर तुम्ही आज इथे माझ्या घरात उपस्थित नसता. इतर भावंडांच्याबाबतीत तुम्ही त्या प्रसंगाची मागणी होती म्हणून आभार मानले, कौतुक केलं आणि पुन्हा पूर्वपरिस्थितीत प्रत्येक नात्याला सोडून दिलं. त्या दिवसानंतर आजपर्यंत तुम्ही कुणीही कुणाशीच संपर्क ठेवला नाही. आज तुम्ही दलदलीतून बाहेर आल्यावर स्वतःवरचा सगळा मळ बाजूला सारून, स्वच्छ/निर्मळ होऊन म्हणजेच स्वतःमधला मी बाजूला सारून, मग तो तात्पुरता का असेना, माझ्या घरी आलात. मला यातून स्वतःला मान द्यायचा नव्हता आणि तुम्हाला मोठेपणाही द्यायचा नव्हता. लोकांनी याबद्दल तुमच्याकडे काही शक्यतादेखील वर्तवल्या असतील. लोक नेहमीच जे दिसतं त्याबद्दलच बोलतात. पण दिसणं आणि असणं यामध्ये फरक असू शकतो ना? आणि लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही कारण आपणही कधी ना कधी, कुणाच्या ना कुणाच्याबाबतीत लोकांमधलाच एक घटक असतो. आपलं नातं कसं दिसतं म्हणजेच ते चांगलं की वाईट यापेक्षा त्या नात्याच्या असण्यावर, त्या नात्याच्या खरेपणावर माझा नेहमीच जास्त भर होता. धाकट्या मुलाच्या या उत्तरातून त्याची भूमिका, विचारसरणी स्पष्ट होते. अशी विचारसरणी ही कौटुंबिक आयुष्यातील प्रत्येक नात्यांमध्ये नाती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि तसं झालं नाही तर कौटुंबिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं किंवा दुरावा हा पर्याय प्रत्येक कुटुंबातील सदस्याला निवडावा लागतो.

नातं कधीही वाईट नसावं, नातं कधीही चांगलंही नसावं, नातं नेहमीच खरं असावं. अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर साधारणतः किंवा अधिक तर नात्यांचे चार प्रकार असतात. वैयक्तिक आयुष्यातील वैयक्तिक नाती, कौटुंबिक आयुष्यातील कौटुंबिक नाती, सामाजिक आयुष्यातील सामाजिक नाती, व्यावहारिक/व्यावसायिक आयुष्यातील व्यावहारिक/व्यावसायिक नाती.

या चार प्रकारच्या नात्यांमध्ये, त्या नात्यांच्या अनुषंगाने येणार्या, प्रत्येक व्यक्तिच्या चार वेगवेगळ्या भूमिका असतात. महत्त्वाची बाब ही आहे की, कुठल्या नात्यामध्ये कुठली भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावतो किंवा निभावतो (कुठलीही सरमिसळ न करता) यावर त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं.

शिरीष फडके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khoop khup chaan....avaghadahi ahe....

khoop khup chaan....avaghadahi ahe....

सुंदर.. आपण कोणती भूमिका प्रत्येक नात्यामध्ये बजावतो याचा विचार करायला लावणारा लेख आहे.....

कुठल्या नात्यामध्ये कुठली भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावतो किंवा निभावतो (कुठलीही सरमिसळ न करता) यावर त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं.>> वाह!! अतिशय महत्वाचा लेख आणि तात्विक विचारांचा गुंता सोडवणारा लेख.

दोन्ही भाग सलग वाचले.तुमचे लेख्न खुप विचार करायला भाग पाडतात. खुप छान लिहिताय तुम्ही. Happy
पुढील लेखनास शुभेच्छा.

पहिला भाग वाचुन थोडे गोंधळायला झाले होते पण हा भाग त्या गोंध़ळाचे निराकरण करतो. खुप छान लिहिलेय.