वयाचे मोरपंखीपण कुठे डांबून ठेवावे..

Submitted by सुशांत खुरसाले on 3 December, 2014 - 01:21

मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे
वयाचे मोरपंखीपण कुठे डांबून ठेवावे

तिचा होणार आता मी,अता होणार ती माझी
नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे

किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन न्याहाळता यावे

कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे

कपाळावर टिळ्यांचा एवढा भडिमार झाला की-
कुण्या पंथात आहे मी मला लागेल शोधावे

किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
>> व्व्वाह!

किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे
>> आवडला..

मस्त मस्त मस्तः

>>>

मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे
वयाचे मोरपंखीपण कुठे डांबून ठेवावे

किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन न्याहाळता यावे

कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे

कपाळावर टिळ्यांचा एवढा भडिमार झाला की-
कुण्या पंथात आहे मी मला लागेल शोधावे

किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे

<<<

वैवकु ,जयदीपजी मनःपूर्वक आभार !

अजून एक शेर सुचलाय -

असावा फरक बहुधा एवढासा आपल्यामध्ये-
कुणी पस्तावुनी बोले,कुणी बोलून पस्तावे

Happy

सुंदर

किनारा पाहिजे लागायला कवितेत
एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन
न्याहाळता यावे...>>> मस्तच.. Happy

१) मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे या ओळीत अनेकवचन आहे कि एकवचन
आणि
२) नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे याऐवजी "नशा चढणार नाही यामुळे तर आणखी प्यावे" असे असायला हवे होते का या दोन शंका मनात आल्या...रचना बेहतरीन आहे यात शंकाच नाही....कृगैन ...माहिती मिळवणे हा एकंच हेतू आहे....

धन्यवाद मंडळी .

संतोषजी,
१) मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे<< इच्छा अनेक असल्या तरी त्यांचा मिळून पिसारा एकच .
म्हणून एकवचन. Happy

२) नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे << 'नाही' सुध्दा चालेल . मी यामुळे नशा चढणार नसेल(नसली) तर ....अशा अर्थाने लिहिलेलं .

मनमोकळ्या चर्चेबद्दल आभारी आहे. Happy

धन्यवाद .

आभार सर्वांचे ! Happy

याच जमिनीत सुचलेला आणखी एक शेर :

झळांवर प्रेम असल्याचे तुला सांगून बसलो मी
अता देशील का तलखी जिला वाटेल सोसावे ?

--सुशांत..

<<कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे<<

क्या बात, फारच सुंदर.. आवडली! Happy