कित्येक दिवस झालेत

Submitted by joshnilu on 2 December, 2014 - 13:09

कित्येक दिवस झालेत...

खरच कित्येक दिवस झालेत...

एरंडाच्या पानांचे बुडबुडे उडवून
पानांच्या डिन्काचा आरसा करून
लाजाळुच्या पानांना हाताने लाजवुन
कित्येक दिवस झालेत...

भर पावसात ओलेचिम्ब भिजुन
वाळुतल्या शिम्पल्यांचा आकार शोधून
लाटांना न जुमानता वाळुचा बंगला बांधून
कित्येक दिवस झालेत...

रातकिड्यांची किरकिर ऐकून
ढगांमध्ये वेगवेगळे आकार शोधून
चांदण्यांची अविरत लुकलुक बघून
कित्येक दिवस झालेत...

झाडावर चढून पेरू तोडून
कैरीने दात आंबट करून घेवुन
आवळे चिंचा दगड़ाने पाडून
कित्येक दिवस झालेत...

शांत एकांतात शिळ वाजवून
काठीदोरीचा धनुष्यबाण करून
टायर काठीची गाड़ी करून
कित्येक दिवस झालेत...

स्वत: कागदी होडी बनवून
चपटा दगड पाण्यात भिरकावून
काठीने पाण्यात तरंग काढून
कित्येक दिवस झालेत...

नकली पिस्तुलाने चोरपोलिस खेळुन
पत्यांचा बारामजली बंगला बनवून
पाच तिन दोन,भिकार सावकार खेळुन
कित्येक दिवस झालेत...

चित्र स्पष्ट यायला एंटेना फिरवून
लगोरच्या व आबाधुबी खेळुन
फुटलेल्या फुग्याचा डमरू करून
कित्येक दिवस झालेत...

मंदिरातील घंटा उड्या मारत वाजवून
लाकडातील भुंगे हाताने पळवून
देवासमोरील साखर फुटाणे खावुन
कित्येक दिवस झालेत...

जगाबरोबर धावण्यासाठी स्वत:चा वेग वाढवुन
करतोय ते चुक की बरोबर हे न समजुन
काही कमावण्यासाठी बरेच काही गमावून
कित्येक दिवस झालेत...
खरच सांगतो कित्येक दिवस झालेत...

---निलेश जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users