प्रतिमा

Submitted by शिरीष फडके on 1 December, 2014 - 00:35

प्रतिमा
दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते. इवल्या इवल्याश्या हातात ती सुरी भली मोठ्ठी दिसत असते. मग तिचा मोर्चा वळतो रेफ्रिजरेटरकडे. काय बरं घेऊया? असा थोडा विचार केल्यावर ती चिरण्यासाठी कोथिंबिरीची जुडी निवडते. चॉपिंग बोर्ड, कोथिंबिरीची जुडी आणि सुरी घेऊन मॅडम स्वयंपाकघरातच मांडी घालून बसतात. आईप्रमाणे कमरेला एक छोटासा फडका गुंडाळायलादेखील ती विसरत नाही हां.

तेवढ्यात तिकडे (आतल्या खोलीत) आईला जाग येते. अरे, बाजूला मुलगी नाही, गेली कुठे असं म्हणत ती स्वयंपाकघरात येते. बघते तर मॅडम कोथिंबीर चिरायला बसल्या आहेत. अगं काय करतेस? एवढी मोठी सुरी हातात? लागेल तुला. बोट कापेल. अजून तू लहान आहेस. असं बरंच काही आई बोलते. आधी मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. नंतर आईकडून मुलीला थोडा ओरडादेखील बसतो. पण मुलगी अतिशय हट्टी. ती हट्टालाच पेटलेली असते की, मी कोथिंबीर चिरणार म्हणजे चिरणार. शेवटी आई हार मानते आणि निघून जाते.

परंतु जाताना मुलीला दटावते की तुला जे हवं ते कर. पण जर बोट कापलं तर मग रडू नकोस, आकांडतांडव करू नकोस आणि रडत रडत माझ्याकडे येऊ नकोस.

आईला स्वयंपाकघरातून जाऊन काही वेळच होतो आणि इकडे मोठ्ठा भोंगा वाजतो. आई धावत धावत स्वयंपाकघरात येते आणि बघते तर मुलीचं बोट कापलेलं असतं. बोटातून घळाघळा रक्त वाहत असतं. आई लगेच नळाखाली मुलीचा हात धरते. हळद लावते. औषधपाणी करते. रक्त वाहायचं तर थांबतं पण तिचं रडणं काही थांबत नसतं. अर्थातच एवढासा जीव खूप दुखत असणारच. आई तिला मांडीवर घेऊन बसते. तिचं लक्ष विचलित करण्यासाठी अनेक गोष्टी सांगते. कित्येक वेळानंतर मुलगी रडायची थांबते. मग आई मुलीला म्हणते, बघ मी तुला सांगितलं होतं ना बोट कापेल, रक्त येईल, बाऊ होईल आणि मग तुला खूप दुखेल. आईचं या पुढे ऐकायचं. तू शहाणी मुलगी आहेस ना? त्यावर मुलगी आईला विचारते, आई तू मला असं का सांगतेस? आई म्हणते मला तुझी काळजी वाटते ना म्हणून मी तुला असं सांगते. ऐकणार ना माझं? मुलगी हो म्हणते आणि आईच्या मांडीवरच दुपारची उरलेली झोप पूर्ण करते.

ज्यांना दिसणं महत्त्वाचं आहे किंवा दिसण्यापुरतचं कर्तव्य आहे अशांना वरील प्रसंग पाहिल्यावर किंवा वरील प्रसंगाविषयी वाचल्यावर असं वाटेल की आईने त्या मुलीसाठी खूप काही केलं आणि ते खरंदेखील आहे. मुळात त्या आईने मुलीसाठी खरंच खूप काही केलं आहे आणि असं करण्यामागे मुलीची काळजी आणि मुलीवरचं प्रेम कारणीभूत आहे. परंतु तिच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर? म्हणजेच आजी किंवा काकू किंवा मामी किंवा मावशी किंवा अन्य अनोळखी व्यक्ती असती तरी एखाद्वेळी त्यांनीदेखील हेच केलं असतं. (अर्थात आईचा हात आणि अन्य व्यक्तिंचा हात यात असणारा मूलभूत फरक हा नेहमीच राहणार). वरील प्रसंगात आईने मुलीसाठी खूप काही केलं पण तिने ते मुळात स्वतःसाठी केलं. याचा अर्थ आईला मुलीची काळजी वाटत नव्हती किंवा तिचं मुलीवर प्रेम नव्हतं असं नव्हे.

काळजी करणारी व्यक्ती किंवा

ज्या व्यक्तिला काळजी वाटते ती व्यक्ती जोपर्यंत काळजी घेत नाही किंवा विचारपूस करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तिला मनःशांती लाभत नाही आणि त्यात जर डोळ्यांसमोर आपल्याच व्यक्तिला काही दुखापत झाली असेल तर काळजी वाटणं आणि घेणं हे स्वाभाविकच आहे. पण हे दिसणं झालं. सांगण्याचं उद्दिष्ट असं की दिसणं आणि असणं यात फरक असू शकतो. म्हणजे नक्की काय? आईने मुलीची काळजी घेतली परंतु जबाबदारी घेणं टाळलं. काळजी घेणं आणि जबाबदारी घेणं यात काय फरक आहे हे वरील प्रसंगातून सहज स्पष्ट होतं. आईने जेव्हा पहिल्यांदा आपल्या मुलीला हातात सुरी घेतलेलं पाहिलं तेव्हा तिने काय करायला हवं होतं? या प्रश्नाच्या उत्तरादाखल आपण दोन टोकाच्या भूमिका किंवा प्रतिक्रिया बघूया. एक तर त्या आईने त्या मुलीच्या हातातून सुरी काढून घ्यायला हवी होती. मग भले तिने कितीही आकांडतांडव केला असता किंवा रडारड केली असती किंवा आईवर रुसून बसली असती किंवा आईचा त्रागा केला असता किंवा संध्याकाळी वडिलांकडे आईची Complaint केली असती किंवा अन्य काहीही केलं असतं तरी आईने तिच्या हातातून सुरी काढून घ्यायलाच हवी होती. अशावेळी मुलीच्या मनातील आपली चांगली प्रतिमा जपण्यापेक्षा किंवा पुढे येणार्या Issue/Problem ना किंवा कटकटींना टाळण्यापेक्षा किंवा स्वतःला दोष देण्याइतपत परिस्थिती येऊ नये यासाठी काळजी घेण्यापेक्षा मुलीच्या हट्टाला न जुमानता त्या आईने तिच्या हातातील सुरी काढून घ्यायलाच हवी होती. हे झालं एक टोक. दुसरं टोक म्हणजे आईने स्वतः मुलीचा हात आपल्या हातात धरून, तिच्या शेजारी बसून, तिला कोथिंबीर चिरायला मदत करायला हवी होती. तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. अशावेळी जर त्या मुलीने तिला तिथून जायला सांगितलं असतं किंवा तसा हट्ट धरला असता तरी दुरूनच, चोरट्या नजरेने का होईना तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. याउपरदेखील त्या मुलीला दुखापत झाली असती तरी आईने जबाबदारी टाळली असं कुणीही म्हणू शकलं नसतं. हे झालं दुसरं टोक. या दोन्ही टोकांमधले सोपे अनेक पर्याय असतील आणि ते पर्यायदेखील तिने वापरले असते तरी ते चाललं असतं.

आता प्रश्न उरतो तो वरील प्रसंगात ती आई असं का वागली? आपण व्यापक विचार करण्याचा प्रयत्न करूया. याची दोन मुख्य कारणं असू शकतात. तंटे, वाद, भांडणं, रडारड, Issue, Problem, कटकट, त्रागा, राग, दुःख अशा अनेक गोष्टींचा मनात तिटकारा निर्माण झालेला असणं किंवा भीती निर्माण झालेली असणं किंवा या सगळ्या गोष्टी नकोशा असल्यामुळे त्यांना सामोरं जाण्याऐवजी त्यापासून दूर पळण्याची किंवा या सगळ्यातून पळवाट काढण्याची वृत्ती अंगी बळावलेली असणं, हे एक कारण आणि त्यातूनच पुढचं म्हणजेच दुसरं कारण जन्माला येतं ते म्हणजे स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्याचा सतत प्रयत्न करणं. म्हणजे आपल्यावर कुणी टीका करू नये, आपल्याला कुणी दोष देऊ नये, आपल्याला कुणी उलटसुलट बोलू नये यासाठी सतत सुरक्षित पातळीवर जगणं. म्हणजेच प्रत्येक प्रसंगात (मग तो चांगला असो वा वाईट) स्वतःची बाजू Safe किंवा सुरक्षित असेल याची काळजी घेणं (मग भले त्यासाठी जबाबदारी घेण्याला तिलांजली दिली तरी चालेल). वरील प्रसंगात आईने जबाबदारी घेण्याऐवजी मुलीला पुढे काय होईल हे सांगितलं आणि एकप्रकारे स्वतःच्या समाधानाकरता जणू कर्तव्य पार पाडून ती मोकळी झाली. यालाच स्वतःचं स्थान स्वतःच्या मनात दरवेळी सुरक्षित ठेवणं असंदेखील म्हणतात. आपणच आपल्याकडे बोट दाखवू शकणार नाही याची सतत काळजी घ्यायची असंही आपण या भूमिकेबाबतीत म्हणू शकतो. याचा खरा अर्थ प्रकर्षाने जाणवेल जेव्हा ती आई आपल्या मुलीला म्हणते, बघ मी तुला सांगितलं होतं ना बोट कापेल, रक्त येईल, बाऊ होईल आणि मग तुला खूप दुखेल. यामागे हेतू (Intention) त्या आईचा चांगला आहे हे तिने स्वतःच्या मनाला पटवून दिलं असल्यामुळेच ती आई पुढे जाऊन असंही म्हणते की, मला तुझी काळजी वाटते ना म्हणून मी तुला असं सांगते. आपण कुणासाठी किती करतो यापेक्षा निःस्वार्थीपणे काय करतो हे जास्त महत्त्वाचं का आहे हेदेखील वरील प्रसंगातून कळतं.

पूर्वी आपापल्या मुलांना शाळेत सोडणारी आई आठवा. तेव्हा एखाद् दोन स्त्रिया अशा दिसायच्या ज्या रस्त्यातून चालताना रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्या मुलांना ठेवून स्वतः रस्त्याच्या आतल्या बाजूने चालायच्या. (आजकाल शाळेत जायला बस असते त्यामुळे असे प्रसंग क्वचितच दिसत असतील पण मुलांबरोबर फिरायला जाणारे काही आईवडील रस्त्याने जाताना असं करताना दिसतील.) त्या व्यक्ती एखाद्वेळी उजव्या असल्यामुळे तसं करत असाव्यात आणि तसं करणंच त्यांना त्यांच्यासाठी सोयीचं असावं. पण मागून येणार्या गाडीचा समजा ताबा सुटला तर पहिली इजा कुणाला होईल? रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या मुलालाच होईल ना. बरं अशा व्यक्ती किंवा स्त्रिया हे जाणिवपूर्वक किंवा जाणूनबुजून करत नसतात. त्यांच्याकडून ते अनावधानाने होत असतं. अर्थात त्यांना तशी जाणीव करून दिल्यावर त्यातल्या काही व्यक्ती स्वतःकडून अनावधानाने होणारी चूक कबूल न करण्यासाठी बराच केविलवाणा प्रयत्न करतात. असो. मुद्दा असा आहे की, त्या शाळेत मुलांना सोडणार्या आईने काय कमी मेहनत केली असेल का? सकाळी लवकर उठून सगळ्यांचा डबा बनवला असेल, मुलांचं आवरलं असेल, बरीच धावपळ केली असेल आणि मग जाऊन ती त्या मुलांना शाळेत सोडायला जात असेल. मग रस्त्यावर चालताना केवळ मुलांना बाहेरच्या बाजूला ठेवून त्यांचा हात पकडला तर तिला दोष देऊन तिने केलेल्या सगळ्या मेहनतीकडे दुर्लक्ष करायचं का? इथे प्रश्न कुणालाही दोष देण्याचा नाहीच मुळी. इथे प्रश्न आहे तो प्रतिमेचा आणि पर्यायाने पुढे निर्माण झालेल्या जबाबदारीला टाळण्याचा. ती आई जे काही मुलांसाठी करत होती ते ती स्वेच्छेने करत होती किंवा ती स्वतःच्या आनंदासाठी ते करत होती किंवा तिला करावंसं वाटतं म्हणून ती करत होती किंवा मुलांच्या काळजीपोटी ती हे करत होती किंवा अन्य काही चांगल्या कारणास्तव ती करत होती. पण याचा अर्थ एखाद्या आईने किंवा अन्य एखाद्या व्यक्तिने जर केवळ स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी जबाबदारी टाळली तर त्याची चिकित्सा करायची नाही का? निदान प्रत्येक व्यक्तिने स्वतःला ओळखण्यासाठी तरी तटस्थपणे स्वतःची चिकित्सा करायलाच हवी.

थोडक्यात सांगायचं तर स्वतःच्या मनातील स्वतःचीच प्रतिमा नेहमीच चांगली आणि सुरक्षित राहील याची दक्षता घेण्यापेक्षा स्वतःला ओळखून स्वतःची प्रतिमा नेहमीच खरी राहील याची दक्षता घेणं अधिक गरजेचं असतं.

शिरीष फडके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users