मासिक राशिभविष्य डिसेंबर २०१४

Submitted by पशुपति on 30 November, 2014 - 20:31

राशिभविष्य
डिसेंबर २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ दशमात असून रवि अष्टमात आहे. त्यामुळे प्रकृतीस जपणे आवश्यक आहे. द्वितीय भावाचा स्वामी शुक्र अष्टमात आणि गुरु चतुर्थात असल्यामुळे घरासंबंधी काही कामे असल्यास ती पार पाडण्यात अडचण येईल. ह्या महिन्यात वाहने देखील जपून चालवणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. नोकरीमध्ये थोडा ताणतणाव जाणवतील, मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. तरी योग्य ती काळजी घ्यावी. अष्टम भावात ४ ग्रह असल्याने काही व्यक्तींना इन्शुरन्स अगर वारसा हक्काने आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. तसेच जे रिटायर्ड झाले असतील त्यांच्या पेन्शनची कामे मार्गी लागतील. एकंदरीत महिना सगळ्याच बाबतीत जास्त सावधगिरी बाळगण्याचा आहे.
(वरील सर्व भविष्य ज्यांची मेष रास व मेष लग्न आहे अश्यांना लागू पडते, इतर लग्न राशीच्या लोकांना वरील सर्वच अनुभव येतील असे नाही.)

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र सप्तमात आणि गुरु तृतीयात प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे. आर्थिक आवक सर्वसाधारण राहील. ज्या लोकांचा वैयक्तिक व्यवसाय आहे त्यांच्या बाबतीत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हा काळ जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याशी मित्रत्वाने वागून आपले काम साधणे हिताचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास जास्त करणे श्रेयस्कर राहील, नाहीतर वर्गात मागे पडण्याची शक्यता आहे. सप्तम स्थानातील ग्रह विवाहोत्सुक तरुण-तरुणींना योग्य काळ असल्याने विवाह ठरवण्यास मदतीचे ठरतील. ज्या लोकांचा वैयक्तिक व्यवसाय आहे अश्यांना हा काळ उत्तम आहे. नवमातील मंगळ थोड्याफार सहली घडवून आणू शकेल. नोकरी करणाऱ्यांना हा महिना सर्वसाधारण राहील. महिन्याच्या सुरुवातीला, पहिल्या आठवड्यात काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना सर्वसाधारणपणे मध्यम स्वरूपाचा राहील.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध षष्ठात असून शनी देखील षष्ठातच आहे, त्यामुळे प्रकृतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहींच्या बाबतीत जुनी दुखणी देखील तोंड वर काढण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोकरी अगर व्यवसायाच्या संदर्भात बरेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे...त्याचे कारण चंद्र लाभात, गुरु द्वितीयात आणि काही ग्रह षष्ठात अशी ग्रहस्थिती आहे. घरात मामा-मामी, मावशी इत्यादी पाहुणे रावळे ह्यांचा राबता होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चाची तयारी ठेवा. मुलांचा अभ्यास व्यवस्थित होईल..काळजीचे कारण राहणार नाही. कौटुंबिक वातावरण थोड्याफार कुरबुरी वगळता उत्तम व खेळीमेळीचे राहील. नोकरीच्या संदर्भातील काळ आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. लाभेश मंगळ अष्टमात व रवि षष्ठात हे ग्रह भागीदारीच्या व्यवसायात अनुकूल वातावरण ठेवतील. एकंदरीत हा महिना उत्तम आहे, मात्र प्रकृतीच्या दृष्टीने विशेष सावधानता बाळगण्याचा आहे.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या सुरवातीला दशमात आहे. काही लोकांच्या बाबतीत अचानक प्रमोशनचे योग येण्याची शक्यता आहे. गुरु तुमच्याच राशीत लग्नी असल्याने शरीर प्रकृतीची विशेष काळजी राहणार नाही, मात्र तो षष्ठेश असल्याने प्रकृतीच्या थोड्याफार तक्रारी राहतील. द्वितीयेश रवि पंचमात व बुध देखील पंचमात असल्याने आर्थिक बाबतीतील व्यवहार काळजीपूर्वक करावेत. ह्या महिन्यात तुमचा बराच काल घरगुती बाबींमध्ये व मुलाबाळांत रमण्यात जाईल असे दिसते. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नोकरी अगर व्यवसाय असणाऱ्यांना महिना लाभापेक्षा व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम आहे, ह्याचाच अर्थ ह्या महिन्यात तुमचे क्रेडिट वाढेल ह्या दृष्टीने प्रयत्न करावेत. एकंदरीत हा महिना उत्तम आहे. .

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि चतुर्थ स्थानात आणि बुध देखील चतुर्थ स्थानात, त्यामुळे विद्यार्थ्यांना हा काळ अतिशय चांगला आहे.. तसेच कौटुंबिक वातावरण आनंदी राहील असे दिसते. ज्यांचा व्यवसाय अगर नोकरी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असेल त्यांना हा काळ उत्तम आहे. मंगळ षष्ठात असल्याने किरकोळ स्वरूपाचा उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे, बाकी प्रकृतीबाबत विशेष काळजी करण्याचे कारण नाही. नवम स्थानातील चंद्र निश्चित जरी सांगता आले नाही तरी काही लोकांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अचानक प्रवासयोग घडवून आणू शकेल. निश्चितपणे न सांगता येण्याचे कारण म्हणजे शुक्र चतुर्थ स्थानी आहे व तो प्रवासाला विरोध करील. दशमेश शुक्र व्यवसाय अगर नोकरीमध्ये फारश्या घडामोडी न होता समाधानकारक ठेवील. एकंदरीत हा महिना घरगुती बाबतीत उत्तम व नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने सर्वसाधारण राहील.

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध तृतीय स्थानात, शनि तृतीय स्थानात त्यामुळे तुमच्या साहसी प्रवृत्तीला चालना देण्याचे योग आहेत. लेखक मंडळी, पुस्तक विक्रेते, डिस्ट्रीब्युटर्स ह्यांना उत्तम काळ आहे. काही लोकांना नवीन घर बुक केले असल्यास गृहप्रवेश करण्यासाठी उत्तम काळ आहे, अन्यथा बुक करण्यासाठीही चांगले योग आहेत. मुलाबाळांच्या अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक आघाडीवर थोड्याफार कुरबुरींना तोंड द्यावे लागेल. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग आहेत. दशमस्थान बलवान झाल्याने काही लोकांना थोडीफार प्रसिद्धी मिळण्याचेही योग आहेत, किंवा नोकरी करणाऱ्यांच्या कामाची विशेष दखल घेतली जाईल. लाभातील गुरु अनेक प्रकारचे लाभ मिळवून देईल ह्यात काही शंका नाही. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र द्वितीय स्थानी असून बुध देखील तिथेच आहे, त्यामुळे ह्या महिन्यात तुमच्या मनात आर्थिक चिंता सतत राहील असे दिसते. द्वितीय भावात चार ग्रह असल्याने आर्थिक प्राप्ती बऱ्यापैकी होईल तरीही वर सांगितल्याप्रमाणे चिंता तरी राहीलच. चतुर्थातील मंगळ व द्वितीयातील रवि हे घर अगर जमिनीसंबंधी काहीतरी लाभ नक्की मिळवून देतील. किंवा काही लोकांच्या बाबतीत नवीन जमीन घेण्याचे योग येऊ शकतील. षष्ठातील गुरु दशमात व बुध द्वितीय स्थानी शरीर प्रकृती व्यवस्थित ठेवतील. मुलांची प्रगती व अभ्यास समाधानकारक राहील. सप्तमेश मंगळ चतुर्थात व रवि द्वितीयात असल्याने कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील असे दिसते. कदाचित कौटुंबिक बाबतीत काही खर्च होण्याची शक्यता आहे. दशमातील गुरु व द्वितीय स्थानातील बुध नोकरी अगर व्यवसायासंबंधात चांगले फायदे करवून देतील असे योग आहेत. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल असे दिसते.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ तृतीय स्थानी व रवि तुमच्याच राशीत त्यामुळे प्रकृतीसंबंधी काळजी करण्याचे कारण नाही. प्रथम स्थानातील ग्रह तुमचे सामाजिक स्थान भरभक्कम ठेवतील. हे ग्रहयोग तुम्हाला अनेक गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करतील. द्वितीय स्थानातील गुरु नवम स्थानी व बुध तुमच्या स्थानी ही ग्रहस्थिती तुम्हाला भाग्यकारक आहे. ह्यामुळे खूप आर्थिक लाभ जरी नसला तरी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीचे समाधान नक्कीच मिळून जाईल. पंचम स्थानातील गुरु नवम स्थानी व बुध प्रथम स्थानी म्हणजेच १-५-९ हा त्रिकोण तयार होतो, त्यामुळे अध्यात्मिक प्रकृतीच्या लोकांना हा काळ अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे व उत्तम राहील. नवमातील गुरु व तृतीयातील मंगळ अनेक लोकांना धार्मिक प्रवास घडवून आणतील. दशम भावातील रवि प्रथम स्थानात व बुध पण प्रथम स्थानात ही ग्रहस्थिती ऑफिसमध्ये तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाण्यासाठी कारणीभूत ठरेल. एकंदरीत हा महिना आर्थिक लाभ कमी पण मानसिक समाधानाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरेल असे दिसते.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात आणि बुध बाराव्या स्थानी त्यामुळे कामाचा ताण अधिक जाणवेल असे दिसते. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी असल्याने खर्चाची बाजू बरीच वाढेल. तृतीयेश शनि बाराव्या स्थानी, पंचमात चंद्र व नवमेश रवि बाराव्या स्थानी हे ग्रहयोग बऱ्याच लोकांना प्रवास दाखवतात. कुठल्याही बाबतीतील गुंतवणूक सावधानतेने करावी असा ग्रहांचा संदेश आहे. प्रकृतीच्या बाबत जरा सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सप्तमेश बुध बाराव्या स्थानी असल्याने कौटुंबिक बाबतीत थोड्याफार कुरबुरीला सामोरे जावे लागेल. दशमातील राहू नोकरी बाबतची अनुकुलता दाखवत आहे पण शुक्र बाराव्या स्थानी असल्याने निश्चित निदान करता येत नाही. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात असल्याने बऱ्याचशा गोष्टी उशिरा का होईना तुमच्या मनासारख्या घडण्याचा योग आहे. तृतीयेश शनि देखील लाभातच असल्याने आर्थिक दृष्ट्या हा महिना उत्तम आहे. शिक्षणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींना हा महिना बराच लाभदायक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्र चतुर्थात आणि मंगळ प्रथम स्थानात त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या आईशी सुसंवाद साधण्याचा योग आहे. ह्याचा अर्थ जी मंडळी नोकरी अगर शिक्षणामुळे घरापासून लांब राहतात अश्या लोकांना आईची गाठभेट होण्याचा योग आहे. मुलाबाळांचे शिक्षण आणि प्रगती समाधानकारक राहील, त्याबद्दल चिंता नसावी. ज्यांचा शेअर ब्रोकिंग वगैरे व्यवसाय आहे त्यांना देखील हा महिना लाभदायक आहे. प्रेमीजनांना त्यांच्या मनातले व्यक्त करायला हरकत नाही...यश मिळण्याची शक्यता आहे!! सप्तमातील गुरु कौटुंबिक बाबतीत वातावरण समाधानी आणि खेळीमेळीचे ठेवेल. नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना हा माहिना प्रगतीचा राहील, काही लोकांना प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात असल्याने तुमचा सामाजिक दर्जा तुमच्या प्रयत्नांमुळे खूप चांगला राहील. द्वितीयेश गुरु षष्ठात व बुध दशमात असल्याने कुंभ राशीच्या अनेक लोकांना प्रमोशनचे चान्सेस बरेच आहेत. महिन्याच्या सुरुवातीला अनेक लोकांना कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. घरासंबंधी काही कागदपत्रे अपूर्ण राहिली असल्यास पूर्ण होतील. तसेच काही लोकांना नवीन कार घेण्याचे पण योग आहेत. मुलाबाळांची शिक्षणातील प्रगती समाधानकारक राहील. षष्ठातील गुरु प्रकृतीचे किरकोळ त्रास वगळता प्रकृती चांगली ठेवेल. सप्तमेश रवि दशमात व बुध ही तिथेच असल्याने त्यामुळे तुम्ही कामात एवढे व्यस्त राहाल की कौटुंबिक बाबतीत लक्ष बरेच कमी राहील. दशमात चार ग्रह असल्याने निश्चितपणे तुमच्या नोकरी अगर व्यवसायात भरपूर वाढ व आर्थिक लाभ अपेक्षित आहेत. एकंदरीत हा महिना कुंभ राशीला उत्तम आहे, त्यामुळे जेवढा लाभ करून घेता येईल तेवढा जरूर करून घ्यावा!

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात व शुक्र नवमात त्यामुळे १-५-९ ह्यांचे आपसात योग झाल्याने तुमची धार्मिक बाबींमध्ये विशेष रुची राहील. द्वितीयेश मंगळ लाभात व रवि नवमात, जी मंडळी उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तसेच ज्यांचा व्यवसाय धार्मिक क्षेत्राशी संबंधित आहे अश्यांना ही व्यवसाय वाढीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. तृतीयेश शुक्र नवमात आहे व बुध देखील नवमात आहे, त्यामुळे लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. घरातील वातावरण बहुतांशी धार्मिक कार्यामध्ये गुंतलेले राहील. गुरु पंचमात व बुध नवमात हे ग्रहयोग मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहेत, पण आर्थिक गुंतवणूक करताना पुरेशी सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण देखील उत्तम राहील. दशम स्थानातील गुरु पंचमात उच्चीचा व बुध नवमात ही ग्रहस्थिती भाग्यकारक आहे, पण व्यवसायाच्या दृष्टीने तेवढे पूरक नाहीत. ह्याचा अर्थ तुमची नोकरी अगर व्यवसाय आर्थिक प्राप्ती पेक्षाही समाधानकारक जास्त राहील. एकंदरीत हा महिना काही बाबींकडे दुर्लक्ष केले तर मानसिक समाधानाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks!

अर्रे!!!!!!!!!!!!!!
माझा ज्योतिष वगैरे वर विश्वास नाही फारसा. मी असच गंमत म्हणून वाचलं आणि चक्क आम्हा ४ही जणांचं भविष्य चक्क खर ठरेल अशी लक्षण दिसतायेत. Happy

आम्हा ४ही जणांचं भविष्य चक्क खर ठरेल अशी लक्षण दिसतायेत>> रिया, प्रमोशन , पगारवाढ का? Wink

मी देखील माझ्या लग्नराशीनुसार तेच वाचुन आनंदी मुड करुन बसलोय.
जन्म राशीनुसार त्रास आहे.