बाईपण ! / रिती !

Submitted by अवल on 9 January, 2009 - 03:02

तुम्हीपण पाहिले, अनुभवले असतील असे गड !
ज्यांना चढण्यासाठी आहेत पायर्‍या अन शेजारचा
काहीसा खडबडीत पण सोपाच चढ !

माझ्या समोरपण आला असा एक गड - संसाराचा !

तुम्ही आणखी एक पाहिलंत ?
साधारणतः बायका चढतात पायर्‍या
अन पुरुष चढ !

तर मी ही गड चढायला लागले.
अर्थात तोही होताच बरोबर !
मी आपली प्रेमवेडी,
हात धरून पायरी चढायला
पुढे केला हात...
अन त्यानेही हसून धरलान की हो हात !

मी मोहरले.
अन आत्मविश्वासाने, त्याच्यावरच्या प्रेमासह
खाली नीट पाहून
चढू लागले
पहिली पायरी !

अन मला त्या पायरीवर कितीतरी गोष्टी दिसल्या.
नवे घर, त्यातल्या नव्या रूढी-परंपरा, सवयी, आवडीनिवडी,
नवी माणसं, नवी नाती, त्यांच्या नव्या अपेक्षा.....
बाई, बाई, कित्ती गोष्टी वाट पहात होत्या, माझ्यासाठी !
मी पुन्हा मोहरले.
भरभर त्या सगळ्या गोष्टी नीट मांडू लागले.
मनाजोगत्या, मनापासून ठेऊ लागले..
कधी वर्ष सरलं कळलच नाही की... !

मग दुसरी पायरी !
तिथे तर माझं सर्वस्व भेटलं मला !
माझं बाळ !
त्याची अंगडी, टोपडी, लंगोट, दुपटी, ...
दूध, खेळणी, फॅरेक्स, ...
अबब केवढ विश्व उभं केलं मी माझं !

मग पुढे होत्याच पायर्‍या !
कधी बाळाचं हसणं, रडणं, पडणं, खेळणं, ...
त्याचे कपडे, बूट, शाळा, दप्तर, अभ्यास, ...
कधी आजारपणं -
बाळाची, बाळाच्या आजी - आजोबांची.
कधी माझ्या नोकरीतल्या जबाबदार्‍या.
आला - गेला, पै-पाहूणा, लग्न- बारशी- मुंजी.

सगळ्या पायर्‍यांवरचे हे पसारे
किती मन लावून, मनाजोगते रचत गेले.
सुखावत गेले.
वाटलं, माझा तो,
माझ्या त्याची माणसं
किती सुखावताहेत !

आणि कशी कोण जाणे
पंधराव्या पायरीवर चढताना
थोडी थकले बरं का !
स्वतःला म्हटलं,
" अंमळ श्वास घे थोडा.
सारखी चढण चढून लागतो थोडा दम.
अन आता अपरिहार्य अशी
कामंही थोडी कमीच झालीत.
थांब थोडी ! "

त्याला विचारावं , सांगावं
म्हणून मान वर केली ...
अन गोंधळले थोडी,
तो आहे कुठे ?
अन हसूच आले.
" अगं तो पुरूष !
तो थोडाच तुझ्यासारखा
पायर्‍या चढणार आहे ?
पहिल्याच पायरीवर
तुझाच हात धरून
तो वर नाही का चढला ?
तो मजेत गेला बघ
चढावरून - टणाटण !

अरेच्च्या !
त्याच्या वाटच्या
सगळ्या संसारातल्या गोष्टी
त्याच्या चढावर
राहिल्याच नव्हत्या मुळी !
त्या आपल्या घरंगळून
आल्या होत्या माझ्या पायर्‍यांवर !
अन मी वेडी
त्या सगळ्या माझ्याच म्हणून
भरभर, भर्भर करत आले की !

मनात आलेलं बोलायला
पुन्हा जरा अधिकचं मान वर करून
त्याच्याकडे पाहिलं,
तर ,
हातातली काठी नाचवत म्हणाला ,
" अगं चल लवकर.
किती वेळ लावतेस.
एवढा काठीचा भार घेऊन
या चढाच्या अवघड, खडबडीत रस्त्यावरून
मी भरभर वर आलोय.
आणि तुला साध्या पायर्‍या चढायला इतका वेळ ?
चल लवकर.
आणि आपलं झेंड्याचं कापड ?
आपला सुखी संसार,
लोकांसमोर आदर्श दिसायला नको का?
चल आटप लवकर.
दे ते झेंड्याचं कापड ! "

" अन मी ,
आपल्या झेंड्याच्या कापडावर
प्रत्येक पायरीवरचे तारे
शीवत शीवत धावतेय
तुझ्याही जबाबदार्‍या पार पाडत ,
त्याचं रे काय ? "
माझा स्वर झालाच थोडा
रडवेला,
कापरा,
अन तापलाही थोडा !

" तुम्ही बायका ना
प्रत्येक बाबतीत रडता,
कटकट करता,
अन तक्रारी करता !
अगं मी नाही का
हा काठीचा भार घेऊन
या अवघड रस्त्यावरून
चढून वर आलो !
चल,
फार भाऊक होता बुवा तुम्ही बायका ! "

मी हातातल्या किती निगुतीने
सारे तारे जडावलेल्या
झेंड्याच्या कापडामध्ये
शोधत राहिले
माझ्या खुणा !
पण जितकं शोधावं तितकं
प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !

कसे बसे त्याच्या हातातल्या काठीत
अडकवले ते झेंड्याचे कापड.
मग त्याने ,
अत्यंत जबाबदार व्यक्तीप्रमाणे,
कृतकृत्य होऊन,
तो, झोकात फडकविला की
गडाच्या माथ्यावर !

मी आपली खालीच
पायर्‍यांवर.
रिकाम्या ओंजळी,
झिजलेल्या तळव्यांनी
कशीबशी स्वतःला सावरत,
'कोणी पहात असेल तर '
असं वाटून
हसरा चेहरा करून उभी !
अंतर्बाह्य
पूर्ण रिती !
पूर्ण रिती !

गुलमोहर: 

धन्यवाद गौरी, कुलदिप आणि माधुरी !
माधुरी खुप दिवसांनी ?

डॉ.मुझफ्फर सलीम शेख
आरती बहेन बहोत खूब! हे असे होते न म्हणूनच स्त्रियाना उदद्देशून मजाझ लखन्वी या
उर्दु शायर ने लिहिले आहे:
येह आन्चल तेरे माथे पर बोहोत ही खूब है लेकिन
तू इस आन्चल से इक पर्चम बना लेती तो अछा था !

आरती,
खुप छान लिहिलं आहे तुम्ही!!
खुप आवडली कविता!!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

डॉ.मुझफ्फर सलीम शेख

आर्ती बहेन बोहोत खूब! स्त्रियान बरोबर असे होते म्हणूनच उर्दु कवि मजाझ लख्नवी
ने त्याना उदद्देशून म्हटले आहे:

येह आन्चल तेरे माथे पर बोहोत ही खूब है लेकिन
तू इस आन्चल से इक पर्चम बना लेती तो अछा था!

धन्यवाद डॉ. मुझफ्फर शेख, नितीनचिंचवड ! ज्या पद्धतीने आपण वाढवले जातो अन ज्या सामाजिक परिस्थितीत आपण घडत जातो त्यातून हे घडत असावं नाही का?

पायर्‍या आणि चढ एकमेकांना समांतर जाता जाता कधी चार पावले सोबत ,तर कधी एकमेकांच्या वाटेने चालता आले तर्....अजूनही कुठेच असे होत नसेल का?

आरती आणि मल्लिकानाथ,
सुन्दर.
दोन्ही कविता काळ्जला भीड्ल्या.....

आरतीने स्त्रिचे तर मल्लिकानाथने पुरुषाची बाजू समर्पक मान्डलीय.

अभिनन्दन.

कवितेचा आशय, भाव खरंच छान आहे.
लांबी कमी असती तर अधिक परिणामकारक झाली असती.
“त्या आपल्या घरंगळून
आल्या होत्या माझ्या पायर्‍यांवर !

झेंड्याच्या कापडामध्ये
शोधत राहिले, माझ्या खुणा !

'कोणी पहात असेल तर '
असं वाटून, हसरा चेहरा करून उभी !”

….. हे विशेष उल्लेखनीय.
------------------------------------
अवांतर :
अखेरपर्यंत एकमेकाचा हात धरून संसाराचा गड चढत जाणारी उदाहरणंही असतात.

अवलजींची कविता वाचली
ति मनाला पट्ली,
मल्लिनाथांची कविता वाचली
तिसुद्धा मनाला पटली,
संसार नावाचा गड चढताना
ही दोन्ही चाकं जरुरीच ना?

Pages