नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण!)

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2014 - 10:33

"
मै जीना चाहता हू मॉं ...
"
रात्री सव्वातीन साडेतीनच्या सुमारास एक केविलवाणा आवाज माझा कानांत खणखणला. क्षणभर वाटले कोणीतरी माझ्या पोटातूनच बोलतेय.. पण "मॉं" .. मला कोणी कॉ बोलेल?
भास झाला असेल किंवा स्वप्नातले काहीतरी असेल म्हणत मी चादर अंगावर ओढत कुस बदलली.
डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा,

"मै तुम्हारे अंदर से बोल रहा हू मॉं .."

मै मै तर एकदम बैं बैं स्टाईल होते जणू बकरीचे पिल्लूच. आणि अंदरसे म्हणजे पोटातूनच तर येत नसावा, कारण आवाजही थोडाफार तसाच घुमून येत होता.
मी स्वत:च्याच पोटावरून हात फिरवून आत काही जाणवतेय का बघू लागलो. आदल्या रात्रीचे जेवण आठवू लागलो. हाल्फ चिकन तंदूरी रिचवल्यावर अख्खी अंडा बिर्याणी आत टाकली होती. पण ते चिकन पोटातल्या फॅक्ट्रीत जाऊन मटण कसे बनले? बनले तर बनले, बोलू कसे लागले??

इतक्यात तेच कारुण्यस्वर पुन्हा उमटले. मी दचकून पाहिले तर व्हरांड्यात बांधलेल्या बकरीच्या पोटून हा आवाज येत होता. ती बकरी पोटूशी आहे हा शोधही अर्थात मला तेव्हाच लागला. कदाचित त्या पिल्लाला त्याचे भविष्य समजले असावे. तो जन्माला येणार होता ते कोणाच्या तरी पोटाची आग शांत करायला. मग तो नराधम मी असेल वा कदाचित आणखी कोणी. पण जन्माला येणारी शेळी, बोकड जे काही असेल, ते कधी ना कधी जीवानिशी जाणार होते एवढे मात्र खरे.

इतक्यात त्या पिल्लाने थेट माझ्याशीच संवाद साधायला सुरुवात केली..
"रुन्मेऽऽष.. रुन्मेषजी..."
बहुधा त्या कोकराला ‘ऋ’ बोलता येत नसावा. चालायचेच, इथे तरी कुठे सगळ्यांना जमतेय.

"मै जीना चाहता हू रुन्मेऽऽष.."

"हो रे बाळा, कोणीही तुझ्या आईचा गर्भपात नाही करणार, ते फक्त आम्हा माणसांमध्येच होते..", मी अर्धवट झोपेतच एक सेंटी चिपकवला.

"तसे नाही रे बाबा, पण ‘मै अपनी पुरी जिंदगी जीना चाहता हू.. मला कुर्बानीचा बकरा नाही बनायचेय. कोणाच्या हळदीच्या समारंभात नाही कटायचेय. कोण्या एका मनुष्याच्या पोटाची एकवेळची आग शमवण्यासाठी बलिदान देणे यातच माझ्या आयुष्याचे सार्थक नाही मानायचेय."

"हो रे, ते ही खरेय. यात आयुष्याचे सार्थक नसतेच. पण तरीही आता हेच तुझ्या आयुष्याचे प्राक्तन आहे.." , एक अवजड वाक्य मी देखील फेकले.

पण यावर प्रत्युत्तरादाखल एकच प्रश्न त्याने मला विचारला की मी निरुत्तर झालो. मला म्हणाला, "जर तू नवीन जीव जन्माला घालू शकत नाहीस, तर केवळ खाण्याच्या लालसेपोटी एक जीव घेण्याचा तुला काय अधिकार आहे??"
आणि खाडकन माझे डोळे उघडले. खरेच!.. एक ‘पुरुष’ म्हणून मला मांसाहार करत एक जीव घेण्याचा काही एक अधिकार नव्हता.

"अरे पण मी कुठे फुकट खातो, पैसे मोजतो ना त्याचे.." मी माझ्या मनुष्यस्वभावाला जागत त्याला व्यावहारीक द्रुष्टीकोन पटवून देऊ लागलो. जो मुळात मलाच पटत नव्हता.

पण एवढ्यात थांबेल तो बोकड कसला. एक गुगली मला अजून टाकला.
म्हणाला, "तू हिंदू आहेस की मुसलमान?"

मी काहीतरी सर्वधर्म समभावचा डायलॉग चिपकवणारच होतो... इतक्यात तोच म्हणाला, "काय फरक पडतो मित्रा, जर तू हिंदू असशील तर बड्याचे खात नसशील कारण ते तुम्हाला पवित्र आणि मुसलमान असशील तर डुकराला खात नसशील कारण मग ते तुम्हाला निषिद्ध. पण आम्हा बोकडांवर मात्र तुम्ही हिंदू-मुसलमान दोघेही एकत्र येऊन सारख्याच जोशात तुटून पडतात"
.... आणि अचानक मला त्या बोकडामध्ये हिंदू-मुसलमानांना एकत्र आणणारे ‘अमन की आशा’चे प्रतीक दिसायला लागले.

"कसे जमते रे मित्रा, (हे आता मी त्या बकरीच्या पिल्लाला मित्रा म्हणालो), कसे जमताहेत तुला जन्माला यायच्या आधीच हे एवढे उच्च विचार?"

बें बें .. बें बें ... यावेळी तो फक्त हसला.

.......आणि ते कोकरू सांगू लागले,

क्रमश:

------------------------------------------------------------------------------------------------
-- भाग दुसरा - चंदा की कहाणी, चंदा की जुबानी --
------------------------------------------------------------------------------------------------

.......आणि ते कोकरू सांगू लागले,

"तर मित्रा, हि आटपाट खाटमांडू चिरफाड नगरीतील गोष्ट आहे.. (एखाद्या नगरीचेही असे पुर्ण नाव असते हे मला नव्यानेच समजत होते)

तो माझा या आधीचा जन्म होता. जसे तुम्ही माणसे मागच्या जन्मात माणसेच असतात, तसेच मी मागच्या जन्मात बकरी होते. माझे नाव चंदा होते. नक्की साल-महिना तुम्हा माणसांनाच ठाऊक, पण मोबाईलचे कॉलयुग अवतरले होते. मी कासार गल्लीतल्या गणेश मंदिराच्या पुजार्‍याकडे सुखासमाधानाने नांदत होते. त्याच्या पोराबाळांना अगदी पोटभर नाही तरी किमान घोटभर दूध पाजत होते. त्याबदल्यात मिळणारा दोन वेळचा मुबलक चारा गिळून मस्त गुबगुबीत झाले होते. त्यामुळे शेजारपाजारच्या वाडीतील बकर्‍यांपेक्षा खाटिकांचाच डोळा माझ्यावर जास्त होता. पण पुजार्‍याची बकरी असल्याने कोणाची काय बिशाद जे माझ्या केसालाही धक्का लावण्याचा विचार मनात आणतील.

.... आणि मग एके दिवशी अचानक जागतिक मंदीचे वारे वाहू लागले. रिसेशन रिसेशन नावाचे काहीसे आले. चारचाकीवाले दुचाकीने प्रवास करू लागले, दुचाकीवाले बसने जाऊ लागले, बसने जाणारे पायी पायी करू लागले. एकंदरीत सारेच पाई पाई वाचवू लागले. या आर्थिक संकटातून वाचव रे बाबा म्हणत विश्व मॅनेजमेंट जगत् गुरूला साकडे घालायला लोक मोठ्या संख्येने मंदिरात येऊ लागले. एखाद्याला वाटेल की चांगलेच आहे की, याने मंदिर ट्रस्टींची आणि पुजार्‍यांची कमाई वाढलीच असेल. पण कसले काय. याने फक्त मंदिरांवर अतिरीक्त ताणच पडला, इन्कम नाही वाढले. येणारे रिसेशनग्रस्त भक्त दानपेटीत १० च्या नोटे ऐवजी १ रुपयाचे नाणे टाकू लागले. आधी जे देवाला मोठमोठाले हार वाहायचे, ते आता सुट्ट्या फुलांवर काम चालवू लागले. तर सुट्टी फुले वाले दुर्वांवर आले. नारळ देवाला वाहण्याऐवजी नुसता मंदिराच्या पायथ्याशी फोडून, करवंट्याचा कचरा करत खोबरे घरी नेऊ लागले. मंदिर ट्रस्टीने आयोजित केलेल्या महाप्रसादाला मात्र तेवढी गर्दी झाली. पण ती फक्त जेवायलाच! देणगी देण्याच्या नावाने खडखडाट! जोरजोरात घंटानाद करत देवाला (पर्यायाने पुजार्‍याला) फक्त आश्वासने देण्यात येऊ लागली. कहर तर तेव्हा झाला जेव्हा काही लोकांनी आरतीच्या ताटात पैसे टाकण्याऐवजी गपचूप पैसे उचलायला सुरुवात केली.

पण या अश्या परिस्थितीतही काही धार्मिक लोक मात्र एक गोष्ट न चुकता करत होते. ते म्हणजे देवाला खुश करायला बोकडाचे जेवण. अर्थात देवाच्या नावावर बोकड कापत स्वत:च रिचवणे. त्याचबरोबर रिसेशनमुळे दारूचे व्यसन लागलेल्यांनाही सोबतीला मांसाहाराची गरज भासू लागली. त्यामुळे एकीकडे पुजार्‍याच्या घरी ददात चालू असतानाच खाटीकांचा धंदा मात्र तेजीत आला. गल्ली मोहल्ल्यातील कित्येक बोकड खटाखट कापू जाऊ लागले. उरले सुरले भितीने चळचळ कापू लागले. आजवर मी निर्धास्त होते, पण पुजार्‍याच्या घरची हालाखीची परिस्थिती पाहता तो आज-ऊद्याला माझा सौदा तर नाही ना करणार हि चिंता मला सतावू लागली.

आणि अखेर तो दिवस आलाच. जेव्हा आमच्या दारात उभा राहिला, रहमतुल्लाह-उल-हबीब!..

नावाचा पुर्वार्ध धार्मिक आणि उत्तरार्ध रसिक वाटत असला तरी होता तो एक खाटीक!.. जाळीदार पांढरी बनियान आणि जवळपास त्याच कापडाने शिवलेली गोलाकार टोपी. नजरेत तळपत्या कोयत्यासारखे धारदार विखार ठेवत, माझ्याकडे बघत जेव्हा तो आमच्या अंगणात शिरला, तेव्हाच मी नखशिखांत भेदरून गेले. तब्बल साडेसात मिनिटे त्याने माझ्या मालकाशी चर्चा केली. त्या चर्चेचा निकाल त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. आजवर पुजार्‍याने मंदिरासाठी भाविकांकडून चंदा गोळा केला होता, पण आज त्यानेच खाटिकाला आपली चंदा देऊ केली होती.
त्या रात्री मग मला झोप लागलीच नाही, आणि त्यानंतर भल्या पहाटे कधीतरी डोळा लागला तो पुन्हा कधी न उघडायलाच!.."

"ओह्ह .. असे आहे तर!" एवढा वेळ शांतपणे तिची रामकहाणी ऐकत असलेलो मी म्हणालो, "पण हे सारे मला का सांगत आहेस?"

"कारण कटल्यानंतर माझे काळीज खाणारा पहिला मनुष्य ‘तू’ होतास रुन्मेऽऽष!.." त्या पिल्लाचे बोल जळजळत्या रश्श्यासारखे माझ्या कानात उतरले. कलेजी हा माझा आवडता प्रकार आहे हे कबूल होते मला, पण माझी हि आवड अशी सामोरी येईल याची कल्पना नव्हती.

तरीच...! सुरुवातीला मला त्या पिल्लाचा आवाज माझ्याच पोटातून आल्यासारखा का वाटत होते’ या रहस्याचा आता उलगडा झाला होता.

"पण आता माझ्याकडून तुला काय अपेक्षित आहे..?", किंचित भीतभीतच मी विचारले. खून का बदला खून, तसे काळीज का बदला काळीज तर नाही ना या भितीने माझे काळीज एव्हाना धडधडायला लागले होते.

"मला उत्तर हवेय रुनम्या.. या माझ्या खालील प्रश्नाचे.. आणि जर ते तुला देता नाही आले, तर आयुष्यभर तू "नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... मासे सुद्धा नाही खायचे", अन्यथा तुझ्या काळजाला शंभर खपल्या धरतील... असे म्हणत, मला प्रश्नात टाकून चंदा अंतर्धान पावली.

तर मित्रांनो, गतजन्मीच्या चंदाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधायला मला मदत करा. जो बरोबर उत्तर देईल तोच मायबोलीचा विक्रमवेताळ!

प्रश्न : चंदाच्या मृत्युला जबाबदार कोण? त्या पशूवधाचे पाप नक्की कोणाच्या माथी?

१) स्वताचे पोट भरण्यासाठी तिला खाणारा मी?
२) उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिला कापणारा खाटीक?
३) स्वत:चे आणि स्वताच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचा सौदा करणारा पुजारी?

.
.
.
.

उत्तर :- चंदाच्या मृत्युला जबाबदार रिसेशन असे प्रतिसादात उत्तर आले आहे तेच. थोडक्यात परिस्थिती. जी पापपुण्याचे सारे निकष बदलून टाकते. म्हणून माणसाने कधीही प्राप्त परिस्थितीत आदर्शवादाचा अहंकार बाळगू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ॠ.............भाउ ...जरा सिरियसली घ्या की ,नाही म्हणजे ते ब्रेक घ्यायचे म्हनतोय मी ... >> उडन खटोलाजी, ' भाउ' माझ्याचकरता आहे का ? अहो, त्या टीव्हीवरच्या ब्रेकना कंटाळून तर मीं इथ येतो तर इथं मलाच ब्रेक घ्यायला सांगताय ! शिवाय, पोलीसांचा खास टेलेफोन नंबर असतो माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाना कुणी असा त्रास दिला तर ... माहित आहे ना !!! Wink

Happy हो भाउ सगळ्यांनाच ब्रेक ची गरज स्पेशली तुम्हाला, उडन खटोला,ऋन्मेऽऽष यांना आणि मला Proud तशीही मी अमानवीयच आहे कधीही गायब होउ शकते. Proud
उडन खटोला हे तुम्हाला त्रास देत नाहीत तर तुमच्या तब्बेतीच्या काळजीनेच सांगत आहेत. Happy

स्वीट टॉकर यांच्या प्रतीसाद पटला.

<< भाऊ नमसकर जी तुमाला नै म्हन्ल बुवा >> माझ्या पोस्ट नंतर ताबडतोब तसं म्हटलंत म्हणून वाटलं . घाबरलात ? अहो, उगीचच पोलीसांच्या फोन नंबरची हूल दिली होती तुम्हाला ! तेवढाच ब्रेक, आणि काय !!:डोमा:

मज्जा आली वाचताना...( कारुण्याची झालर होती हे मान्य.)

स्वीट टॉकर याचं म्हणण पटल. भाऊ नमसकर यांचा युक्तिवादही पटला.

तरीही चंदाच्या मृत्यला कोणीही जबाबदार नाही अस वाटतंय. कारण, उगाचच एखाद्या गोष्टीचा (इथे प्राण्याचा) अतिविचार करून निसर्गाचा समतोल बिघडवण्यात काय अर्थ आहे?

तुम्ही जेवढा विचार करता तेवढा विचार बॉस या प्राण्याला करता आला असता तर किती बर झाल असत ना?

चंदाच्या मृत्युला जबाबदार कोण? त्या पशूवधाचे पाप नक्की कोणाच्या माथी?

रिसेशनच्या माथी !
त्या अगोदर सगळ निवांत होता Wink

चंदाच्या मृत्युला जबाबदार कोण?

एका मायबोलीकराने या धाग्याचे उत्तर तुम्ही अजून दिले नाही अशी विचारणा केली असल्याने माझ्यामते योग्य उत्तर देत आहे.

चंदाच्या मृत्युला जबाबदार रिसेशन असे वर उत्तर आले आहे तेच. थोडक्यात परिस्थिती. जी पापपुण्याचे सारे निकष बदलून टाकते. म्हणून माणसाने कधीही प्राप्त परिस्थितीत आदर्शवादाचा अहंकार बाळगू नये. Happy

Pages