छावणी - ५

Submitted by स्पार्टाकस on 24 November, 2014 - 23:51

मिर्झा सिकंदरअली खान दर दोन - तीन दिवसांनी आपल्या मित्राची चौकशी करण्यासाठी छावणीत येत असत. येताना शहरातून काही आवश्यक वस्तूही आणत असत. प्रताप आणि उमा यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांनाही खूप वाईट वाटलं. महेंद्रनाथ आणि कमलादेवींचं सांत्वन करताना ते म्हणाले,

"आपल्या तकदीरमध्ये जे असेल ते भोगल्यावाचून आपल्या हाती काही नसतं महेंदर! अल्लाको जो बच्चे सबसे प्यारे होते है, अल्ला उन्हें अपने पास बुला लेता है! प्रताप और उमाबेटीके साथ जो बी हुआ उसका मुझे बहोत अफसोस है! मेरे मजहबके लोग जो कुछ भी कर रहे है, वो देखकर उन्हें मुसलमान तो क्या इन्सान कहनाभी गलत होगा! इन्सानियत के नामपर कलंक है ये लोग! आज अपने आपको मुसलमान कहलाते हुए मेरा सर शर्मसे झुक रहा है! इन्सान शैतान कैसे बन जाता है खुदा जाने!"

चार दिवसांनी आणखीन एक बातमी छावणीत येऊन थडकली.

वझीराबादहून येणारी एक रेल्वेगाडी गुजरानवाला स्टेशनवर आली. त्या गाडीत एकही जिवंत माणूस नव्हता! गाडीच्या प्रत्येक डब्यात होते ते फक्तं हिंदू आणि शीख स्त्री-पुरुषांचे मृतदेह! हा भयानक प्रकार पाहील्यावर रेल्वे स्टेशनचं मुख्य प्रवेशद्वार ताबडतोब बंद करण्यात आलं. गुजरानवाला स्टेशन एरवी नेहमी गजबजलेलं असे. रावळपिंडी, पेशावर, जम्मू, लाहोर आणि कराचीकडे जाणार्‍या गाड्यांची सतत वाहतूक सुरु असे. हमाल आणि पोर्टर लोकांची धावपळ, फेरीवाल्यांचा आरडाओरडा, प्रवाशांची लगबग यामुळे स्टेशनवरचं वातावरण नेहमी चैतन्यमय असे.

आज मात्रं स्टेशनवर स्मशानशांतता पसरलेली होती. केवळ हमाल, पोर्टर आणि कर्मचारी वर्गाचीच धावपळ सुरु होती. गाडीच्या डब्यांमधून मृतदेह ओढून काढण्याचं झाडूवाल्यांचं काम वेगाने सुरु होतं. जणू ते मुडदे म्हणजे कचराच होता! फलाटावर जागोजागी रक्ताची थारोळी साचलेली होती. एकीकडे फलाट धुवून काढण्याचं काम सुरु होतं. स्टेशनमास्तर आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी सर्व कामावर देखरेख करत होते. मधूनच काही सूचनाही देत होते.

रेल्वे स्टेशनला लागूनच मालगाडीच्या डब्यांतून उतरवलेला माल साठवण्याचं मोठं गोदाम होतं. या गोदामाच्या आवारातच मृतदेहांचे ढीग रचण्यात येत होते. हे सगळे मृतदेहही अखंड अवस्थेत नव्हतेच. कोणाचे हात तोडलेले तर कोणाचे पाय. लहान मुलांच्या आणि स्त्रियांच्या मृतदेहांचीही भयानक अवस्था होती. अनेक मृतदेहांच्या विघटनास सुरवात झाल्याने त्यांना भयानक दुर्गंधी सुटली होती! एकावर एक असे मृतदेहांचे एकूण चार मोठे ढीग रचून झाले. या मोठ्या ढिगार्‍यांशेजारीच एक लहान ढीग रचण्यात आला होता. या ढिगाकडे तर पाहवतही नव्हतं. हा ढीग होता तो तोडलेल्या अवयवांचा! हात - पाय, छाटलेली मुंडकी अशा वेगवेगळ्या अवयवांचा त्यात समावेश होता!

मृतदेहांचे ढिगारे नीट रचून झाल्यावर झाडूवाल्यांनीच त्यांना अग्नी दिला.... खरंतर आगी लावल्या! पालापाचोळा अथवा कचरा पेटवावा तसे ते पाचही ढीग त्यंनी पेटवून दिले! मधून मधून ढिगार्‍यांवरील प्रेतं घसरून पडत. ही प्रेतं लांब बांबूंच्या सहाय्याने पुन्हा आगीत ढकलण्यात येत होती. कवटी फुटल्याचे सतत आवाज येत होते. कितीतरी तासांपर्यंत ते सर्व ढीग जळत होते!

छावणीतील एका व्यक्तीने स्टेशनवर आणि गुड्स यार्डातील हा सगळा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहीला होता! त्याचा मोठा भाऊ वझीराबादहून येणार असल्याने तो मुसलमानी पोशाख करुन स्टेशनवर गेला होता. स्टेशनवरुन छावणीत परत येताना त्याची केशवरावांशी गाठ पडली होती. तो त्यांचा शर्मा नावाचा कचेरीतला सहकारी होता.

"काय हो शर्माजी, हा काय अवतार?" शर्माच्या मुसलमानी पोशाखाकडे पाहत केशवरावांनी चौकशी केली.
"स्टेशनवर गेलो होतो केशवजी! माझा भाऊ येणार होता वझीराबादहून! फार भयंकर प्रकार पाहीलाय मी!"
"भयंकर प्रकार? कसला शर्माजी?"
"अहो काय सांगू तुम्हांला केशवजी! प्रत्यक्ष डोळ्यानी पाहूनही विश्वास बसत नाही माझा!"

केशवराव शर्माशी बोलत असतानाच मागून चौधरी महेंद्रनाथ आले. प्रताप आणि उमाच्या मृत्यूनंतर ते खूपच सैरभैर झालेले होते. दिवसातून कित्येकदा ते छावणीच्या मुख्य प्रवेशद्वाराशी घोटाळत असत. काहीतरी चमत्कार होऊन आपला मुलगा परत येईल अशी त्यांना वेडी आशा वाटत होती. केशवराव नजरेस पडताच ते त्यांच्याजवळ गेले. केशवरावांनी चौधरींची शर्माशी ओळख करुन दिली. शर्मांनी स्टेशनजवळील गुड्स यार्डात पाहीलेला सगळा प्रकार दोघांना वर्णन करुन सांगितला.

शर्मांकडून ही हकीकत ऐकताच महेंद्रनाथांची उरली - सुरली आशा धुळीला मिळाली. त्या ढिगार्‍यातच आपल्या मुलाचं आणि सुनेचं दहन झालं असणार याची त्यांना खात्री पटली. त्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू खाली ओघळले. आपल्या तंबूत परत आल्यावर ते काही क्षण श्रीकृष्णाच्या तसबीरीकडे नजर लावून बसून राहीले. मग त्यांनी भग्वदगीता हातात घेतली आणि दुसरा अध्याय उघडून पठणास सुरवात केली,

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोSपराणि
तथा शरिराणि विहाय जीर्णान्
अन्यानि संयाति नवानि देही ||२२||

काही क्षण ते डोळे मिटून ते निश्चल बसून राहीले. मग त्यांनी पुढे वाचण्यास सुरवात केली,

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयंत्यापि
न शोषयति मारुतः ||२३||

महेंद्रनाथांना आता गुजरानवाला शहराबद्दल कोणतीही आत्मियता उरली नाही. कधी एकदा छावणी सोडून हिंदुस्तानात जातो असं त्यांना झालं होतं.

१५ ऑगस्ट १९४७!
हिंदुस्तान स्वतंत्र झाला! पंडीत जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान झाले!

आदल्या दिवशीच, १४ ऑगस्टला पाकीस्तान जन्माला आलं होतं!

हिंदुस्तान आणि पाकीस्तान यांच्या सीमारेषा ठरवण्याची जबाबदारी लॉर्ड माऊंट्बॅटननी सिरील रॅडक्लीफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर सोपवली होती. एका मोठ्या खंडप्राय देशाचे दोन-तीन तुकडे करताना सर्वांना समाधानकारक अशी प्रदेशाची वाटणी करणं महाकर्मकठीण होतं. रॅडक्लीफ समितीतले हिंदू आणि मुसलमान प्रतिनिधी आपापल्या धर्मियांच्या हितासाठी परस्परांशी अटी-तटीने भांडत बसले होते. निरुपायाने सर सिरील रॅडक्लीफ यांनी शक्यं तितक्या नि:ष्पक्षपणे सीमारेषा आखली आणि आपला अहवाल माऊंटबॅटन यांच्या हाती सोपवून १५ ऑगस्टलाच इंग्लंडला जाणारं विमान पकडलं!

१७ ऑगस्टला रॅडक्लीफ समितीचा अहवाल बाहेर पडला. प्रत्येकाला आपण आता हिंदुस्तानात आहोत की पाकीस्तानात याची नेमकी कल्पना आली. दोन्ही बाजूच्या लोकांची समितीने आपल्यावर अन्याय केला अशीच भावना झाली होती. शीखांचं प्रसिद्ध धर्मस्थळ नानकाना साहेब तसंच माँटगोमेरीची सुपीक शेती पाकीस्तानात गेल्यामुळे शीख खवळले होते, तर गुरुदासपूर जिल्हा हिंदुस्तानात गेल्यामुळे मुसलमान नाराज झाले होते.

प्रताप आणि उमाच्या मृत्यूच्या दु:खातून सरिता एव्हाना बर्‍यापैकी सावरली होती. एक दिवस भल्या पहाटे बाहेर पडलेली असताना तिची आदित्यशी गाठ पडली. जवळपास तीन महिन्यांनी दोघांची अशी भेट होत होती! दोघं छावणीतल्या एका बाजूला असलेल्या निर्जन भागात आले. मूकपणेच ती त्याच्या कुशीत विसावली. तिच्या नेत्रातून अश्रूंच्या सरींवर सरी वाहत होत्या. आतापर्यंत दाबून ठेवलेलं सारं दु:ख, सार्‍या वेदना पुन्हा उफाळून आल्या होत्या. आदित्य एक शब्दही न बोलता तिला थोपट्त राहीला. एकमेकांचा केवळ निकटचा सहवासही मनाला उभारी देण्यास पुरेसा होता.

१५ सप्टेंबर १९४७!

हिंदुस्तान आणि पाकीस्तान ही दोन नवीन राष्ट्रे उदयास आल्याला एक महिना झाला होता. दोन्ही बाजूकडील सीमारेषेजवळील शहरांमध्ये निर्वासितांच्या छावण्या गजबजलेल्या होत्या. पूर्व आणि पश्चिम पंजाबची सीमा ३७५ मैलांची होती. ही सीमा ओलांडण्यासाठी तीन तपासणी केंद्र - चेकपोस्ट ठेवण्यात आलेले होते. पंजाबच्या कोणत्याही भागातून या तीन चेकपोस्ट् पैकी एक पार करुनच सीमेपलीकडे जाता येत होतं. पंजाबच्या उत्तर भागातून येणारे बहुसंख्य निर्वासित हे डेरा बाबा नानक या चेकपोस्टवर येत होते. मध्य पंजाबातले आणि पश्चिमेकडील प्रदेशांतील लोक हे लाहोरजवळच्या वाघा या चेकपोस्टवर येत होते. पंजाबच्या दक्षिण भागातील बहावलपूर संस्थानातील लोकांना मॅक्लीऑड गंजच्या चेकपोस्टवरुन हिंदुस्तानात प्रवेश करता येत होता.

गुजरानवाला इथल्या लष्करी छावणीत अद्यापही निर्वासितांचा ओघ सुरुच होता. छावणीत नवीनच येणार्‍या या लोकांची अवस्था अगदीच केविलवाणी झालेली होती. त्यांच्या अंगावर अनन्वीत अत्याचाराच्या खुणा दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात मृतवत भाव होते. जे हिंदू आणि शीख शहरात मागे राहिलेले होते, त्यांच्यापैकी बहुतेकांना नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता आणि आता ते मुसलमान बनून पाकीस्तानात राहीले होते. त्यांचे धर्मांतर ही सरळसरळ बळजबरीच होती. अनेक हिंदू आणि शीख स्त्रियांचे अपहरण करुन कोणा-कोणाच्या जनानखान्यात त्यांची भरती करण्यात आलेली होती. काही देखण्या हिंदु स्त्रियांवर भर चौकात सामुहीक बलात्कार करण्यात आले होते. त्याहीपेक्षा भयंकर प्रकार म्हणजे तरुण स्त्रियांची संपूर्ण विवस्त्रावस्थेत शहराच्या मुख्य रस्त्यांवरुन धिंड काढण्यात आली होती. जमावातील कोणीही एखाद्या स्त्रीला उचलून भर रस्त्यावर तिच्यावर अत्याचार करुन पुन्हा तिला इतर स्त्रियांमध्ये ढकलत होता! या प्रकारातून गेलेल्या अनेक स्त्रियांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. कित्येकांना वेड लागलं होतं. ज्या काही स्त्रिया या सगळ्यातूनही जिवंत राहील्या होत्या, त्या छावणीत येऊन दाखल होत होत्या. जिवंत प्रेतासारखी त्यांची अवस्था झाली होती.

गुजरानवाला शहर हे पूर्वीसारखं राहीलं नव्हतं. पाकीस्तानला शोभेल अशी त्याची अवस्था झालेली होती.

छावणीचा ताबा इतके दिवस पंजाब बाऊंड्री फोर्स आणि ब्रिटीश लष्करी अधिकार्‍यांकडे होता. पाकीस्तान स्वतंत्र झाल्यावर पाकीस्तान लष्कराने छावणीचा ताबा घेतला! छावणीचा सर्वाधिकारी म्हणून एका लष्करी अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली होती.

एके दिवशी दुपारी आदित्य आणि प्रा. सिन्हा गप्पा मारत असतानाच एक लष्करी जीप त्यांच्या शेजारी येऊन थांबली. जीपमधून एक तरणाबांड लष्करी अधिकारी खाली उतरला आणि त्या दोघांच्या दिशेने आला. आदित्यला त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. आपण याला नक्की कुठेतरी पाहीलं आहे असं त्याला वाटत होतं, पण नेमकं कुठे ते मात्रं आठवेना. एव्हाना तो अधिकारी त्यांच्याजवळ येऊन पोहोचला होता.

"गुड आफ्टरनून सिन्हासर!" प्रा. सिन्हांशी हस्तांदोलन करत तो अधिकारी म्हणाला.
"गुड आफ्टरनून!" सिन्हांनी त्याला अभिवादन केलं.
"आपने पहचाना मुझे?"
"नहीं जी!" सिन्हा नकारार्थी मान हलवत उद्गारले.
"आपहीकी क्लास में था सर!"

आदित्यच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. वकार सईद! वकार त्याच्याच वर्गात होता. गुजरानवाला इथल्या एका मोठ्या खानदानी राजकीय कुटुंबातला हा मुलगा. कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचा तो प्रमुख होता. पाकीस्तानच्या मागणीसाठी त्याने कॉलेजातील मुसलमान विद्यार्थ्यांना संघटीत करुन मोठं आंदोलन उभारलं होतं. पण हा इथे कसा?

"अरे वकारमियां! तू तो बडा अफसर होऊन राहिला आहेस!" आदित्य म्हणाला.
"काहे का अफसर यार! मुझे सिर्फ कॅप्टन का औदा मिला है!"
"अरे वा! मुबारक हो वकार!" प्रा. सिन्हांनी त्याचं अभिनंदन केलं.
"वकारमियां, तू हिंदुस्तानी फौजेत अफसर झाला आहेस का पाकीस्तानी?"
"ऑफ कोर्स पाकीस्तानी आर्मीमें! या कँपचा कमांडंट म्हणून माझी नेमणूक झाली आहे! तुम्हाला कोणत्याही गोष्टीची तकलीफ असेल तर मला लगेच कळवा! अभी चलता हूं! खुदा हाफीज!"

काही दिवसांपूर्वीच निर्वासितांचा एक मोठा गट ग्रँड ट्रंक रोडने लाहोरच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. परंतु जेमतेम काही अंतर चालून गेल्यावर या गटावर गुजरानवाला आणि आजूबाजूच्या खेड्यातील मुसलमानांनी हल्ला चढवला होता. कित्येक निर्वासित अमानुषरित्या कापले गेले होते. अनेक स्त्रियांच अपहरण करण्यात आलं. कित्येक स्त्रियांना अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं. या हल्ल्यातून कसेबसे निसटलेले निर्वासित पुन्हा परतून छावणीच्या आश्रयाला आलेले होते. त्यांच्यापैकी जवळपास प्रत्येकाने आपला एक वा अधिक आप्तेष्ट हल्ल्यात गमावला होता!

या प्रकाराची माहीती मिळाल्यावर हिंदुस्तान सरकारने निर्वासितांना संरक्षण म्हणून हिंदुस्तानी लष्कराच्या तुकड्या पाठवण्यचा निर्णय घेतला. आता या तुकड्या छावणीत येईपर्यंत वाट पाहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

छावणीतील जीवन पूर्वीप्रमाणेच सुरु होतं. रोजच निर्वासितांची भर पडत होती. त्यातील बहुतेकजण जखमी होते. छावणीतील दवाखान्यातील डॉक्टर तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने त्यांच्यावर शक्य ते सर्व उपचार करत होते. कितीही गंभीर अवस्था असली तरी उपलब्ध सामग्रीतच उपचार करण्यावाचून पर्याय नव्हता! कधीतरीच छावणीतील दवाखान्याला औषधांचा पुरवठा होत असे, पण तोदेखील अत्यंत अपुरा पडत असे. अधूनमधून एखादा रोगी दगावत असे. उरलेले लोक म्हणत,

"सुटला बिचारा या हालातून!"

छावणीत जसे मृत्यू होत तशीच बालकं जन्मालाही येत असत. एखादी बाई अगदी टेकीला आल्यामुळे अडलेली असे. डॉक्टरांवर आधीच कामाचा बोजा प्रचंड असल्याने बर्‍यादचा त्यांच्याकडे नेऊनही वेळ लागत असे. अशावेळी आजुबाजूला असलेल्या जाणत्या स्त्रिया एकत्रं येऊन तिची 'सुटका' करत असत.

कॅ. वकार सईद अनेकदा छावणीच्या फिरतीवर असताना आदित्य आणि प्रा. सिन्हांशी गप्पा मारण्यासाठी थांबत असे. आपल्या छावणीचा कमांडंट या दोघांशी हास्य-विनोद करताना पाहून इतरांवर त्याच बराच प्रभाव पडत असे. आपलं लहानमोठं काम कमांडंट्साहेबांकडून करुन घेण्यासाठी अनेकजण आदित्य किंवा सिन्हांच्या मागे लकडा लावत. सुरवातीला त्या दोघांनी मदत म्हणून कॅ. वकारकडे शब्द टाकला होता. पण हा प्रकार रोजचाच झाल्यावर दोघेही वैतागले होते. शेवटी कॅ. वकार हा पाकीस्तानी लष्करी अधिकारी होता. रोज-रोज त्याला विनंती करणं दोघांनाही योग्य वाटत नव्हतं.

चौधरी महेंद्रनाथ यांच्या मुलाचा आणि सुनेचा दुर्दैवी अंत झाल्याचं आदित्यकडून कळल्यावर कॅ. वकारने दु:ख व्यक्तं केलं.

"सॉरी! उनकी मौतका अफसोस है मुझे!"
"ये सब क्या हो रहा है वकारमियां?" आदित्यने विचारलं, "आप लोगोंको पाकीस्तान चाहीये था, वह मिल गया! अब जो हो रहा है उसका क्या? आपके मजहबके लोग इतनी हैवानियत पर क्यों उतर आए है?"
"तुम सिर्फ एक नजरीयेसे बात को देख रहे हो आदित्य!" वकार उत्तरला, "पाकीस्तानमें जो हिंदू और सीख्खोंके साथ हो रहा है, वही हिंदुस्तानमें जहां हिंदुओंकी तादात ज्यादा है वहां मुसलमीनो़के साथ हो रहा है! आपको याद होगा सिन्हासर,कालेजमें पाकिस्तानकी मांगके वास्ते हमने हडताल करवाई थी! उस वक्त पाकीस्तान याने की मुसलमानोंका अपना अलग वतन, अलग मुल्क इतनाही हमनें सोचा था. अल्लाकसम, रेडीओपर पाकीस्तानका आगाज सुनकर हम बहोत खुश हुए थे! पर उसका ये अंजाम होगा ये सोचा नहीं था!"
"आपके कुराने शरीफका वास्ता देकरही तो लोगोंको भडकाया जा रहा है कप्तानसाहब!" त्यांचं बोलणं ऐकत बाजूला उभे असलेले सरदार कर्तारसिंग उद्गारले.
"इक बात बताओ वकार, कुराणामध्ये असं कुठे लिहीलेलं आहे का, की जो अल्लाला मानत नाही तो काफर आहे? त्याला जगण्याचा काही अर्थ नाही? त्याच्याविरुद्ध धर्मयुद्ध किंवा जिहाद करणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे?"

प्रा. सिन्हांच्या या थेट प्रश्नावर कॅ. वकार काहीक्षण गप्प राहीला. त्यांना काय उत्तर द्यावं याची तो मनाशी जुळवाजुळव करत असावा.

"माफ करना वकार अगर मेरी बात आपको...."
"आप माफी मत मांगिये सिन्हासर!" कॅ. वकार एकदम उत्तरला, "आपने मुझे कालेजमें सिखाया है, मेरे उस्ताद रह चुके है आप! कुरान-ए-पाकके नामपर लोगोंको भडकाकर उन्हें दुसरोंकी जान लेने के लिये उकसाना सच्चे मुसलमानको कभी गवारा नही होगा!"
"तो फिर आप इन्हे रोकते क्यों नही वकारमियां?"
"अगर मेरे हात में होता तो रोक देता! पर मै ठहरा एक मामुलीसा कॅप्टन! इस छांवनीके बाहर, शहरमें जो भी हो रहा वह मेरे बसके बाहर है! हमारी फौजमें कई सारे अफसर ऐसे है जिनकी सोच इन गुंडोंकी तरह है, वह चाहते है की ज्यादा से ज्यादा हिंदू और सीख्खोंको हिंदुस्तानसे पहले कत्ल कर दिया जाए! शायद इसीलिए हिंदुस्तान सरकार आप लोगोंको हिंदुस्तान ले जानेके वास्ते अपनी फौज भेज रही है!"

छावणीतील लोकांना आता निराळीच भिती वाट्त होती. लाहोरकडे निघालेल्या पहिल्या गटावर झालेल्या हल्ल्याच्या वेळेस निर्वासितांचा प्रतिकार किती दुबळा आहे याची गुंड आणि हल्लेखोरांना कल्पना आली होती. शस्त्रसज्ज गुंडांच्या टोळीने जर छावणीवर हल्ला केला तर? छावणीभोवती कडक पहारा बसवलेला होता खरा, पण हे पहारेकरीही पाकीस्तानी होते. आपल्या जातभाईंना ते कितपत अटकाव करतील याचा कोणालाच भरवसा वाटत नव्हता! प्रत्येक जण कधी एकदा हिंदुस्तानी फौज येते आणि आपण छावणीतून बाहेर पडून हिंदुस्तानच्या वाटेला लागतो याची वाट पाहत होता.

सुखदेव हा एकदम रंगेल गडी. विडी-सिगरेट, दारु असे सगळे शौक त्याला होते. लहानपणापासून रुक्सानाबानूने लाडावून ठेवल्याने कष्टाचा आणि मेहनतीचा त्याला तिटकाराच होता. छावणीत आल्यावरही तो दिवसभर सगळीकडे भटकत असे. छावणीच्या पाकीस्तानी पहारेकर्‍यांची खुशमस्करी करुन त्यांच्याकडून विड्या मिळवण्याचा तो कायम प्रयत्न करत असे. चंदाच्या कानावर हे गेल्यावर तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पालथ्या घड्यावर पाणी!

एक दिवस दुपारी छावणीच्या एका टोकाला सुखदेव आणि सरदार गुरकीरत यांची गाठ पडली. सुखदेवने मुसलमानांसारखा पेहराव केला होता. डोक्यावर लाल गोंड्यांची टोपी चढवली होती. डोळ्यात काजळ घातलं होतं. त्याचा तो अवतार पाहून गुरकीरत चकीतच झाला.

"सुखदेवभैय्या! हा काय प्रकार आहे? मुसलमान बननेका इरादा है क्या?"
"नाही रे बाबा, मुसलमान बनना नही है! पर कुछ देर के लिये शहर जा रहा हूं!"
"शहर? मगर किसलिये?"
"अरे तुझे कुछ पता नहीं क्या गुरकीरत? आज शहरातून नागव्या हिंदू बायकांची धिंड काढणार आहेत! ती पाहयाला जातो आहे मी!"
"हिंदू औरतींची धिंड? और तुम ये देखने जा रहे हो?"
"हां! बिलकूल!"
"तुम पागल हो क्य सुखदेव? आपल्याच आया-बहिणींचे हे धिंडवडे पाहण्याचा तू विचार तरी कसा करु शकतोस?"
"देख गुरकिरत, मुझे तेरा भाषण नहीं सुनना है! तू आनेवाला है क्या मेरे साथ?"
"ऐसा नीच काम करनेके लिये?"
"भाई गुरकीरत, त्या हिंदू स्त्रियांच्या नशीबी आलेले ते भोग आपण बदलू तर शकत नाही. पर मै जा रहा हूं उसके पीछे एक अलग वजह है!"
"कौनसी वजह?"
"देख!" सुखदेव आपलं तत्वज्ञान सांगू लागला, "हिंदुस्तानातही बहोत मुस्लीम आहेत. एकदा आपण हिंदुस्तानात पोहोचलो ना, की आपल्या हाती ज्या मुस्लीम स्त्रिया लागतील त्यांची आपणही अशीच धिंड काढू! आम्हीही काही कमी नाही हे कळूदे या पाकीस्तान्यांना!"
"गुंडा बनने का इरादा है क्या सुखदेव? इन्सानियत नावाची काही चीज आहे की नाही?"
"अरे या मुसलमानांना कसली आलीय रे इन्सानियत? आपल्या स्त्रियांवर अत्याचार करताना यांनी काही विचार केला का माणुसकीचा? मी तर म्हणतो हिंदुस्तानात पोहोचल्यावर एखादी मुसलमान मुलगी आपल्या हाती सापडली तर आपणही मजा करुन घेऊ!"
"बस्स सुखदेव! तुझे हे विकृत खयाल तुझ्याजवळच राहूदेत! मला नको काही सांगू!"
"अरे त्यात विकृत काय आहे? औरतीच्या बेइज्जतीचा बदला औरतीच्या बेइज्जतीनेच घेतला जाउ शकतो! पण हे तुम्हा लोकांना कधी कळणार कोणास ठाऊक!"
"हे बघ सुखदेव!" गुरकिरत त्याला समजावण्याच्या हेतूने म्हणाला, "तुझी औरत काय किंवा माझी काय, दोघीही तरुण आहेत, खुबसूरत आहेत. आपापल्या संसारात आपण सुखी आहोत. उगाच असली घाणेरडी इच्छा आपण कशाला मनात बाळगायची? माझं ऐक, तू पण हा गलिच्छ प्रकार पाहण्यासाठी शहरात जाऊ नकोस!"
"जाऊ दे! मी कशाला तुझ्याशी वाद घालत बसलो आहे! शेवटी तुला सांगून काही उपयोग नाही!"

सुखदेव आपल्याच धुंदीत छावणीतून बाहेर पडला. 'बारा बजेवाला सरदारजी लेकाच!' त्याने गुरकीरतचा विचार मनातून झटकून टाकला!

निर्वासितांचा जथा नेण्यासाठी हिंदुस्तान सरकारने पाठवलेली लष्करी तुकडी अखेर एक दिवस गुजरानवाला इथल्या छावणीत येऊन पोहोचली! ही लष्करी तुकडी कडव्या राजपूत सैनिकांची होती. या फौजेचं नेतृत्व मेजर वीरप्रताप चौहान यांच्याकडे होतं. मेजरसाहेबांच्या हाताखाली दोन कॅप्टन्स, बरेचसे लेफ्टनंट आणि सैनिक होते. सहा टनी ट्रकमधून हा जथा हिंदुस्तानच्या सीमेकडे निघणार होता. या ट्रक्सच्या जोडीला लष्करी अधिकार्‍यांसह जीपही होत्या. प्रत्येक सहा टनी ट्रकवर बंदुकधारी सैनीक असणार होते.

हिंदुस्तानी फौज आलेली पाहताच छावणीतील निर्वासितांच्या आनंदाला उधाण आलं. गुजरानवाला इथल्या छावणीतील त्यांचा मुक्काम आता लवकरच संपुष्टात येणार होता! हिंदुस्तानकडे निघण्याचा मार्ग मोकळा झाला होता! स्रर्वांनी उत्साहाने हिंदुस्तानी फौजेचं स्वागत केलं.

जय हिंद!

कोणीतरी दमदार आवाजात घोषणा दिली. चहूबाजूने हजारो मुखांतून त्याचे प्रतिध्वनी उमटले!

कॅ. वकार सईदने मेजर चौहान यांच्या स्वागताची सारी सिद्धता केली होती. मेजरसाहेबांनी आपल्याबरोबर हिंदुस्तानचा ध्वज आणला होता. छावणीत तो फडकावण्याची त्यांची मनिषा होती. परंतु कॅ. वकारने या गोष्टीला आक्षेप घेतला.

"मेजर चौहान, आपके जझबात मै समझ सकता हूं!" कॅ. वकार म्हणाला, "पर यहां पाकीस्तानकी सरजमीनपर हिंदुस्तानी झंडा लहरानेकी परमीशन मै नहीं दे सकता! मुझे इस बातकी इजाजत नहीं है!"

मेजर चौहाननी फारसा आग्रह धरला नाही! पाकीस्तानी भूमीवर पाकीस्तानी लष्करी अधिकार्‍याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता.

मेजरसाहेब कॅ. वकारबरोबर त्याच्या ऑफीसमध्ये आले. छावणीतील सर्व निर्वासितांची, तसेच उपलब्धं असलेल्या सर्व साधनसामग्रीची नोंद केलेले कागदपत्रं वकारने त्यांच्यासमोर ठेवले. निर्वासितांच्या संख्येची नोंद अद्ययावत नसल्याचं त्याने प्रांजळपणे कबूल केलं. छावणीतून निघण्यापूर्वी मेजरसाहेबांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचं त्याने आश्वासन दिलं.

काही दिवसांतच छावणीतील निर्वासित हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होते! त्यापैकी प्रत्यक्षात किती जण हिंदुस्तानात पोहोचणार होते एक त्या परमेश्वरालाच ठाऊक!

क्रमशः

छावणी - ४                                                                                                                                      छावणी - ६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही भाग चांगला झाला आहे स्पार्टाकस. एक दोन ठिकाणी मामुली शब्दांच्या चुका आहेत तेवढ्या बघून घे.

Sad
हाही भाग चांगला झाला आहे >>++

फक्त जिथे विषय बदलतो तिथे काहीतरी सेपरेटर टाकता येईल का? म्हणजे अचानक दचकायला नाही होणार.
उदा. या दोन परिच्छेदांमधे
....आपण छावणीतून बाहेर पडून हिंदुस्तानच्या वाटेला लागतो याची वाट पाहत होता."
===================
"सुखदेव हा एकदम रंगेल गडी. ........."

छान!

स्पार्टाकस,

शिवाजीमहाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर असलेल्या मराठी लोकांना सुखदेवला अभिप्रेत असलेला प्रकार भीषण वाटणं साहजिकच आहे :

>> "हिंदुस्तानातही बहोत मुस्लीम आहेत. एकदा आपण हिंदुस्तानात पोहोचलो ना, की आपल्या हाती ज्या मुस्लीम
>> स्त्रिया लागतील त्यांची आपणही अशीच धिंड काढू! आम्हीही काही कमी नाही हे कळूदे या पाकीस्तान्यांना!"

माझ्या माहितीप्रमाणे अमृतसरमध्ये खरोखरीच असा प्रकार झाला होता. मात्र त्यानंतर लाहोरातल्या हिंदू स्त्रियांची विटंबना थांबली. हे चांगलं की वाईट ते ठरवणं अवघड आहे. Sad

आ.न.,
-गा.पै.