मुक्तांगण, फर्स्ट एक्सटेन्शन इनचार्ज, प्रधान सर

Submitted by अतुल ठाकुर on 24 November, 2014 - 08:02

जुन महिना हा तसा मुक्तांगणमधला गजबजलेला महिना. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या महिन्यात येतो. त्या निमित्ताने मुक्तांगणचे अनेक अवेअरनेस कार्यक्रम सगळीकडे होत असतात. मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता मॅडमचा वाढदिवस याच महिन्यात असतो. मुक्तांगणमध्ये रक्तदान शिबीरही ठेवले जाते. शिवाय नेहेमीप्रमाणेच या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी देखिल व्यसनमुक्तीचा वाढदिवस असतोच. मात्र या वाढदिवसाचेदेखिल एक वेगळे महत्त्व यासाठी असते कि जुन महिन्यात खुद्द मुक्तांगणच्या अनेक काऊंसिलर्सच्या व्यसनमुक्तीचा वाढदिवस या महिन्यात येतो. एक वाढदिवस जन्माचा आणि एक व्यसनमुक्तीचा. व्यसनमुक्ती हा मुक्तांगणमध्ये पुनर्जन्म मानला जातो. त्यामुळे निर्व्यसनी राहुन वर्ष घालवलेले मित्र या दिवशी आपल्या व्यसनमुक्तीचे प्रतिक म्हणुन मेडल मिळवतात. ही सुंदर संकल्पना प्रत्यक्षात कशी आकाराला येते ते पाहण्यासाठी जुन महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गेलो होतो. व्यसनमुक्त शिलेदार खुर्च्यांवर बसले होते. त्यांचे नातेवाईक सजुन धजुन आपल्या माणसाचे कौतुक पाहण्यासाठी आले होते. समोर त्यावेळी उपचार घेणारी रुग्णमित्रमंडळी जमीनीवर बसली होती. एकंदरीतच हा प्रसंग अतिशय हृद्य असतो. अनेकांना आनंदाने अश्रु आवरत नाहीत. त्यादिवशी प्रधानसरदेखिल खुर्चीवर बसले होते. त्यांच्याही व्यसनमुक्तीचा आज वाढदिवस होता. ते अतिशय भावनावश झाले होते. ज्यांनी मला येथवर येण्यासाठी मदत केली त्यातील कुणीही माझा हा कौतुक सोहळा पाहण्यास नाही हे सांगताना त्यांचा गळा दाटुन आला. त्यांनी प्रयत्नपूर्वक अश्रु आवरले. त्यादिवसापासुन या माणसाने माझ्या मनात घर केलं होतं. तसा मी जेव्हापासुन मुक्तांगणला संशोधनाच्या निमित्ताने जाऊ लागलो तेव्हापासुन प्रधान सरांना पाहात होतो. पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. नमस्कार करण्यापलिकडे ओळखही नव्हती. मात्र मुक्तांगणला गेल्यावर तुमचे लक्ष प्रधान सरांकडे आपोआप जातेच. त्यांची राहणी, त्यांचा पोशाख अतिशय नीटनेटका असतो. शर्ट पँटवर जरादेखिल चुण्या नसतात. शर्टच्या बाह्या नेहेमी पुर्ण मनगटापर्यंत राखलेल्या असतात. केसांचा व्यवस्थित भांग काढलेला, गुळगुळीत दाढी केलेली असते आणि खणखणीत आवाजात ते रुग्णमित्रांना आपापल्या ग्रुपकडे जाण्याच्या सुचना देत असतात. तर या प्रधान सरांशी केव्हातरी बोलायचे होते. पण ते सतत व्यस्त असत. शिवाय मुक्तांगणचे काम इतके दिवस पाहिल्यावर अलिकडे मला हा प्रश्न पडु लागला आहे कि अशा तर्‍हेने झोकुन काम करणार्‍या इथल्या माणसांची प्रेरणा काय असेल? भरपूर पैसा? नाही. ग्लॅमर? ते देखिल नाही. तरीही या माणसांमध्ये इतरांना मदत करण्याची तळमळ सतत जाणवते. आणि ही माणसे बोलु लागली ही त्यांच्या प्रेरणेचा स्रोत काय आहे हे कळुन येतेच. पण प्रधान सरांशी बोलण्याचा योग येत नव्हता. शेवटी त्या दिवशी काउंसिलर्सचे वर्कशॉप होते. पेशंटची काउंसिलर्सकडे जाण्याची लगबग थंडावली होती. मुक्तांगण शांत होते. आणि प्रधानसर बोलु लागले.

एक थक्क करणारी कहाणी समोर उलगडु लागली. सिगारेट प्यायल्याने तणाव दुर होतो असा समज असलेल्या प्रधान सरांनी नववीत वार्षिक परीक्षेचा अभ्यास करताना पहिली सिगारेट शिलगवली. मित्रांबरोबर हे करत असताना भीती होतीच. पण सिगरेट पिणे सुरु झाले. त्याच दरम्यान केव्हातरी अभ्यासाला बसलेल्या या मुलांमध्ये बाहेरचा आणखी एक मित्र आला. त्याला दारुचा कार्यक्रम करण्यासाठी जागा हवी होती. या मुलांनी परवानगी दिली. पुन्हा परीक्षेच्या तणावावर उपाय म्हणुन एक पेग घेण्याची शिफारस झाली आणि प्रधान सरांनी दारुचा पहिला घोट घेतला. या पहिल्या घोटाने दिलेली मजा डोक्यात फिट्ट बसली होती. दारु वारंवार मिळावी असे वाटु लागले होते. पण अजुनही घरच्यांची भीती होती. लपुन छपुन पिणे सुरु झाले. पदवी मिळाल्यावर एका ट्रान्सपोर्ट कंपनीत प्रधान सर गोडाऊन किपर म्हणुन कामाला लागले. तेथील हमाल दिवसभर प्रचंड कष्टाची कामे करीत आणि गोडाऊनमध्येच संध्याकाळी त्यांचा दारुचा कार्यक्रम असे. त्यातल्या काहींना प्रधान सर हे "घेणार्‍यांतले" आहेत याची कुणकुण लागली. मग एक दिवस संध्याकाळी प्रधानसरांनाच "ऑफर" केली गेली. कधीतरी दारु पिणारे प्रधानसर आता रोज संध्याकाळी घेऊ लागले. घेतल्याशिवाय घरी जात नसत. अजुनही पिणे मर्यादेत होते. मात्र घरी जायला उशीर होऊ लागला. नोकरी सुरु होती. घरच्यांनी लग्न करुन दिले. पहिले सहा सात महिने आपण किती चांगले पती आहोत हे बायकोला दाखवण्यात गेले. पण दारुची आठवण अनावर होत होती. राहवेच ना तेव्हा सरांनी आपल्या पिण्याच्या सवयीबद्दल बायकोला सांगीतले. बायको अकांडतांडव करील अशी अपेक्षा असलेल्या प्रधान सरांना बायकोने त्यांची इच्छा मान्य केल्याने आनंदाचा धक्काच बसला. फक्त तिची एकच अट होती. जे काय करायचं ते माझ्यासमोर करायचं, बाहेर केलेलं चालणार नाही. मग काय रानच मोकळे झाले. आपल्यासारखी नवर्‍याला समजुन घेणारी बायको सर्वांना मिळावी असे सरांना क्षणभर वाटुन गेले आणि आजवर बाहेर असलेल्या दारुने घरात प्रवेश केला. बायकोला सरांचे घरी दारु पिण्याचे प्रमाण माहित होते. पण सर त्याआधी बाहेरुन दारु रिचवुन घरी येतात आणि मग साळसूदपणे ठरलेल्या प्रमाणात घरी घेतात याची तिला कल्पना नव्हती. पुढे बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली. मुलगा झाला. प्रधानसर आनंदात होते. पण बायको माहेराहुन परत येईना. प्रधान सर तिला आणायला गेल्यास काहीतरी कारण सांगुन त्यांची बोळवण होत असे. काहीतरी चुकत होतं. सरते शेवटी सरांचे सत्त्याऐशी वर्षाचे वृद्ध वडील सरांबरोबर गेले आणि त्यांनी निर्वाणीचे विचारले तेव्हा तुमचा मुलगा व्यसन करतो हे आमच्या मुलीला आवडत नाही म्हणुन आम्ही तिला सासरी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे असे मुलिच्या आईने सांगीतले. आजवर बायकोवर हात देखिल न उगारलेल्या प्रधान सरांवर व्यसन करुन मुलगा आमच्या मुलिला मारहाण करतो असा आरोप देखिल तिच्या घरच्यांनी केला. हे सारं विश्वास ठेवण्यापलिकडलं होतं. प्रधानसरांना हा धक्का सहन झाला नाही. आणि त्यांचं व्यसन अनिर्बंधपणे सुरु झालं.

आता प्रधानसरांना व्यसनासाठी निमित्तच मिळालं होतं. व्यसनाच्या पूर्णपणे अधीन झालेले सर दिवसादेखिल व्यसन करु लागले. पुढे व्यसनामुळे नोकरी सुटली. दुसरी लागली तीही व्यसनामुळेच सुटली. संकटांची मालिका सुरु झाली. व्यसनामुळे नोकर्‍या मिळेनात. प्रधानसर बेकार झाले. त्यातच त्यांच्या भावाला ब्रेन ट्युमर निघाला आणि तो वारला. त्याचे कारण प्रधानसरांच्या व्यसनामुळे त्याने घेतलेला तणाव होता अशी घरच्यांची समजुत झाली. भावाच्या मृत्युचं खापर सरांवर फोडण्यात आलं. आपण वाईट आहोत ही भावना सरांच्या मनात घट्ट बसली आणि व्यसन आणखि वाढले. एके दिवशी प्रधान सरांच्या वृद्ध वडीलांनी अक्षरशः सरांचे पाय धरले आणि हे भयानक व्यसन बंद करण्याची हात जोडुन विनंती केली. सरांना गहिवरुन आलं होतं. पण व्यसनाने पुरता कबजा घेतला होता. ज्या दिवशी वडिलांनी हात जोडले होते त्याच रात्री मांजर आडवी जाण्याचे निमित्त होऊन वडिल पडले आणि आठवड्यातच त्यांचे निधन झाले. ही गोष्ट सरांच्या मनाला प्रचंड यातना देऊन गेली. सारा दोष सरांनी स्वतःवर घेतला. व्यसनाला घरबंधच राहिला नाही. पुढे मधुमेहाचं निमित्त होऊन आई गेली. भरलं घर रिकामी झालं. या दरम्यान दु:खाला फक्त एक सोनेरी किनार होती. थोरल्या बहिणीने खुप साथ दिली. त्यांना व्यसनातुन बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला, मदत केली. पण तिला यश येत नव्हते. ए ए मिटिंग्ज करुन सुद्धा सरांचे पिणे सुरुच राहिले. शेवटी २००७ साली बहिणीने सरांना मुक्तांगणमध्ये दाखल केले. प्रफुल्ला मोहीते, ज्यांना सारे जण आत्या म्हणुन ओळखतात त्या सरांच्या काउंसिलर होत्या. उपचार झाले. सर बाहेर आले. सहा सात महिने व्यवस्थित गेले पण एकटेपणाने मात केली आणि पुन्हा व्यसन सुरु झाले. सुरु झालेल्या व्यसनाने मागचा पुढचा सर्व बॅकलॉग भरुन काढला. २००८ च्या जानेवारीत सर पुन्हा मुक्तांगणमध्ये दाखल झाले. यावेळी मात्र आत्यांनी त्यांना सांगीतलं कि पहिली अ‍ॅडमिशन कॅज्युअली घेतलीस. आता मी सांगेन तोपर्यंत डिसचार्ज घ्यायचा नाहीस. यावेळी उपचार झाल्यावर प्रधानसर आफ्टर केअरमध्ये राहिले. ज्यांना उपचारा नंतरही मुक्तांगणमध्ये राहण्याची आवश्यकता असते त्यांना या वॉर्डमध्ये ठेवले जाते. तेथे दोन महिने गेले आणि सरांवर वज्राघात करणारी बातमी आली. आजवर सरांना साथ देणार्‍या थोरल्या बहिणीचे निधन झाले होते.

मुक्तांगणच्या काउंसिलरनी प्रधान सरांना स्मशानात नेले होते. बहिणीचा पार्थिव देह समोर होता. तिच्या पायावर सरांनी डोके ठेवले. जणुकाही सारा अहंकार अभिमान गळुन गेला. यापुढे व्यसनाचा आधार कधीही घेणार नाही आणि व्यसनात पडलेल्यांना मदत करेन असा निश्चय सरांनी केला. तेथुन ते तडक आत्यांकडे आले. त्यांना सांगीतले कि तुम्ही म्हणाला होता कि मी सांगेपर्यंत डिसचार्ज घ्यायचा नाही. आता मी तुम्हाला सांगतो कि मी सांगेपर्यंत तुम्ही मला डिसचार्ज द्यायचा नाही. आणि तेथुन त्यांचा मुक्तांगणमधला प्रवास सुरु झाला. हा प्रवास म्हणजे एक तर्‍हेचं प्रायश्चित्तच होतं. सरांनी अगदी टॉयलेट साफ करण्यापासुन ते हॅल्युसिनेशनमध्ये गेलेल्या रुग्णाचे शौच केलेले कपडे स्वच्छ करण्यापर्यंत सारी कामे केली. एक वर्ष पुर्ण झाले. व्यसनमुक्तीच्या वाढदिवशी प्रधानसरांचा कौतुकसोहळा झाला. सरांनी हॉलच्या दरवाजाकडे पाहिले. इतरांचे नातेवाईक आपल्या माणसाचे कौतुक पाहण्यासाठी आले होते. प्रधान सरांचे मात्र कुणीही नव्हते. तेव्हा सरांच्या डोळ्यात पाणी आले. जवळचे कुणीही शिल्लक नाही. माणुस असताना त्याची किंमत नसते. गेल्यावर किंमत कळते. आता पश्चात्तापाशिवाय काहीही करता येत नाही. या सार्‍या गोष्टींसाठी प्रधानसर स्वतःलाच जबाबदार धरतात आणि म्हणुनच ते अतिशय तळमळीने येथे येणार्‍या रुग्णमित्रांना मदत करतात. ते हात जोडुन या रुग्णमित्रांना सांगतात कि आमचं एवढं गेलं, व्यसनामुळे तुमचंही जाऊ शकतं. तेव्हा आपल्या माणसांचं मोल जाणायला शिका. प्रधानसर सांगत होते,' मुक्तांगणमध्ये मी पडेल ते काम करतो. घरचे हयात असताना त्यांना काही करुन दाखवु शकलो नाही कि ज्यामुळे त्यांना माझं कौतुक वाटावं. पण आता रुग्णमित्रांच्या घरच्यांचा दुवा मिळतो हेच माझे समाधान. आता मुक्तांगणचा घट्ट धरलेला हात सोडावासा वाटत नाही. या रुग्णमित्रांकरताच माझा दिवस आहे या प्रेरणेतुनच मी येथे राहतो. प्रधान सरांनी आपले बोलणे थांबवले. माझ्या मनात विचार आला आपल्या समाजात किती जण अशा तर्‍हेने झालेल्या नुकसानासाठी स्वतःला जबाबदार धरुन प्रायश्चित्त करीत असतील? ही गोष्ट दुर्मिळच होती. आणि येथे तर सरांनी स्वतःला कामात झोकुनच दिलं होतं. प्रधान सरांवर असलेल्या जबाबदार्‍या पाहिल्या आणि हा माणुस किती निरनिराळ्या स्तरांवर मुक्तांगणमध्ये कार्यरत आहे हे लक्षात आले.

प्रधानसर मुक्तांगणमध्येच राहतात. तेथील फर्स्ट एक्सटेन्शन नावाच्या विभागाचे ते प्रमुख आहेत. त्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते. संध्याकाळी ते काउंटरवर बसतात. मुक्तांगणला अ‍ॅडमिशनच्या दिवशी रुग्णमित्रांची झडती घेण्याचे अतिशय महत्त्वाचे काम त्यांच्याकडे असते. मुक्तांगणमध्ये तंबाखु खाण्यास परवानगी नाही. आणि तंबाखुचे व्यसन फार चिवट मानले गेले आहे. फरसाणच्या पिशवीत तंबाखुच्या पुड्या आणण्याचा प्रकार केला जातो. प्रधान सर आता फक्त पिशवी वरुन चाचपडुन त्यात तंबाखुची पुडी आहे कि नाही ते ओळखु शकतात. मुक्तांगणची मोठी लायब्ररी आहे. त्याचीही काही जबाबदारी सरांवर आहे. मला सर्वात महत्त्वाचे वाटले ते हे की सर ग्रुप थेरेपी घेतात. आर्ट थेरेपी, म्युझिक थेरेपी आणि ग्रीटीग कार्ड बनवण्याचा वर्ग ते घेतात. इतक्या जबाबदार्‍या मुक्तांगणने ज्या माणसावर दिल्या आहेत त्याने मुक्तांगणचा किती विश्वास संपादन केला असेल. सरांशी बोलताना माझं मन या ग्रुप थेरेपी मध्ये अडकलं होतं. सरांना त्याबद्दल विचारलं. ते म्हणाले व्यसनात असताना काय होतं कि आपण हातात ग्लास घेऊन दु:खी गाणी ऐकत राहतो. समोर दु:खाने गाणे म्हणणार्‍या नायकाचे दु:ख आपले करुन टाकतो आणि आपली परीस्थिती आणखी बिकट करुन घेतो. आपल्या बहुतेकांना गाणे गुणगुणायची सवय असते. आपण काही रफी किंवा मुकेश नसतो. आपण कदाचित बाथरुम सिंगरच असु पण चांगल्याशा गाण्याने आपला दिवस एका सुंदर तालात सुरु होऊ शकतो. सर आपल्या ग्रुपशी अंताक्षरीचा खेळ खेळतात. त्यांना गाणी म्हणायला लावतात. सारे त्या खेळात रंगुन गेल्यावर हळुच विचारतात किती जणांना गाताना व्यसनाची आठवण आली? कूणालाच व्यसनाची आठवण आलेली नसते. आर्ट थेरेपीचेही तसेच. लहानपणी आपल्याला मातीत खेळण्याची सवय असते. मुक्तांगणमध्ये पॉटरी मेकींगसारख्या गोष्टी करवुन घेतल्या जातात. व्यसनापासुन दुर राहण्यासाठी एखाद्या छंदाचे महत्त्व अपार आहे. त्याचीच जणु आठवण या आर्ट थेरेपीद्वारे दिली जाते. ग्रीटींग कार्ड बनवण्याचं महत्त्व तर आगळंच आहे. व्यसनाच्या दरम्यान आपण अनेकांना दुखावलेलं असतं. अशावेळी त्यांची क्षमा मागण्यासाठी त्यांना स्वतःच्या हाताने तयार केलेले ग्रिटींग कार्ड देण्याइतका सुंदर मार्ग दुसरा नसेल. माणसे जोडण्याच्या या सुरेख संकल्पने बद्दल सांगताना सरांना आपल्या रुग्णमित्रांबद्दल कौतुक वाटत होते. "अहो इतकी सुंदर कार्डस बनवतात काय सांगु" सर म्हणाले. माणसात असलेली सृजनशिलता व्यसनाला दुर ठेवण्यासाठी वापरण्याची ही अभिनव कल्पना मुक्तांगण आपल्या उपचार पद्धातीमध्ये राबवित आहे आणि हे काम सरांच्या हाताखाली चालविले जाते.

सरांचा जास्त वेळ घेता येणार नव्हता. बोलणे संपवुन मी उठलो. परतताना विचार करत होतो. आपण एक अगदी आगळा माणुस पाहिला होता. व्यसनाच्या वादळात अनेकांची गलबतं भरकतात, फुटतात. या वादळात प्रधानसरांनी तर सर्वस्व गमावले होते. बर्‍याच जणांच्या आयुष्याला तेथेच पुर्णविराम लाभतो. सरांसारखा एखादाच जो वादळात सर्वस्व गमावुन देखिल दीपस्तंभ बनुन उभा राहतो. कारण या दीपस्तंभाला मार्गातल्या खाचाखोचा माहित असतात. प्रायश्चित्त करण्याचा असा प्रकार मी क्वचितच पाहिला होता. मुक्तांगण हे गांधीतत्वावर चाललेले आहे म्हणुन त्याबद्दल मला अधिक जवळीक वाटते. येथे गांधीतत्व कसे आणि कुठे झिरपलेले आहे हे पाहणे तर माझा आवडीचा छंद. प्रधान सरांशी बोलल्यावर मला गांधी चित्रपटातला एक प्रसंग आठवला. दंगलीच्या वेळी गांधी उपोषण करीत असताना मुसलमानाच्या मुलाला मी भिंतीवर आपटुन मारले सांगत एक हिंदु गांधीजवळ येतो. कारण मुसलमानांनी त्याच्या मुलाला मारलेले असते. गांधी त्याला त्याच्या मुलाइतक्याच वयाच्या मुसलमान मुलाचे मुस्लिम धर्माप्रमाणे पालन करायला सांगतात. प्रधानसरांनी आपली माणसं गमावली पण व्यसनमुक्तीचे काम करुन हजारो रुग्णमित्रांच्या आपल्या माणसांना नवजीवन देणारे सर कळतनकळत गांधीतत्त्वाचेच पालन करीत आहेत असे मला वाटते.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशजी यांच्याबद्दल आधी लिहिले नव्हते. पण जून महिन्याच्या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाबद्दल लिहिले होते त्यामुळे सुरुवात सारखीच झाली आहे. Happy

हा लेख तर तुमच्या शैलीला साजेसा आहेच पण एकुणातच तुमच्या लेखातुन हे जे मुक्तांगणचे दर्शन घडते ते खुपच छान आहे.

सुंदर लेख, खरंच मुक्तांगणातील एकेक व्यक्ति हा हीरा आहे, दुसर्‍यांची मनोभावे सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होत नाही आणि ते ही दारु सारख्या व्यसनाधीन असलेल्या माणसांची जे स्वत:च्या कुटुंबाला खुप त्रास देतात ते दुसर्‍यानाही त्रास देतातच, पण समोरचा आपला कुणी नातलग नसुनही त्यांची अशी सेवा करणे, त्यांना व्यसनातुन सोडवणे म्हणजे खुपच जोखमीचे काम ही माणसे इतक्या प्रेमाने करतात.

ह्या सर्वांनाच सलाम.