अंधार्‍या रस्त्यावर दिलेली ती लिफ्ट

Submitted by स्वीट टॉकर on 21 November, 2014 - 07:20

मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy. पण मोबाइल टेलिफोन कंपन्यांच्या मराठी रेकॉर्डिंगमध्ये ‘व्यस्त’ हा शब्द चुकीच्या अर्थानी वापरलेला ऐकून ऐकून ऐकून ऐकून आता तो कोणालाच चुकीचा वाटत नाही. त्यातून बहुतेकांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं. असो.) मुंबईला इतका पाऊस असूनदेखील वर्षानुवर्ष वीज जायची नाही. पुण्याला मात्र सर आली की वीज गेली अशी अवस्था आमच्या भागात होती.

रात्री आठचा सुमार होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. अर्थातच वीज नव्हती. मी आणि माझी अर्धांगिनी शुभदा गाडीनी चाललो होतो. हाउसिंग सोसायट्यांच्या जवळपास घरांमधल्या इन्व्हर्टर्समुळे रस्त्यावर अंधुक का होईना, प्रकाश पडतो तरी. आमचा भाग नवीन. त्यामुळे रस्ते देखील नवीन आणि रुंद, घरं नावालाच. रस्ता निर्मनुष्य. मिट्ट काळोख. फक्त आमच्या हेडलाइट्सचा उजेड.

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मुलींनी लिफ्ट मागितली. मी गाडी थांबवेपर्यंत आम्ही वीस तीस मीटर पुढे गेलो होतो. माझं आणि शुभदाचं discussion. या मुलींना शूर म्हणायचं का मूर्ख? का या वेगळ्याच प्रकारच्या बायका आहेत. आणि त्यांना लिफ्ट देणं धोकादायक होईल?

गाडी नुकतीच विकत घेतली असल्या कारणानं चोरीला जायला खिशात पैसे उरेलेच नव्हते. लिफ्ट द्यायची आणि या फाजील आत्मविश्वास असलेल्या मुलींना चांगलं फैलावर घ्यायचं असं शुभदानी ठरवलं. रिव्हर्स गियर टाकला तोपर्यंत दोघीही गाडीपर्यंत येऊन पोहोचल्या देखील. छोटी चण असलेल्या कॉलेजकुमारी वाटल्या. त्यांची स्कूटर बंद पडली होती. दोघींना गाडीत घेतलं. त्यांना आमच्या घराच्या जवळच्या एका चष्म्याच्या दुकानात जायचं होतं.

एक मुलगी बडबडी होती. दुसरी शांत. मी मनातल्या मनात बडबडाबाईचं नाव ‘प्रफुल्ला’ ठेवलं. दुसरीचं ‘शांता’. प्रफुल्लानी दोघींची नावं सांगितली. बहिणी असाव्यात असं मला उगीचच वाटलं.

“मुलींनो, तुम्हाला वाटत नाही की तुम्ही मोठा धोका पत्करलात?” शुभदानी उलटतपासणीला सुरुवात केली. मागच्या सीटवर शांतता.

“आम्हा दोघांऐवजी कोणी भलतेसलते असते म्हणजे?” तरी शांतता.

“काय गं? तुमच्या आईला कळलं की तुम्ही एकट अंधार्‍या रस्त्यावर अशी लिफ्ट घेतलीत तर तुमची आई काय म्हणेल?” शांतता कायम.

“ऐकू येतय् का मी काय म्हणतिये ते?” हे अगदी मृदु आवाजात.

मला या मृदु आवाजाचा फार कठोर अनुभव आहे. आवाज अचानक मृदु होणं ही स्फोटाची पूर्वसूचना असते. आमच्या गाडीत नेहमी हलक्या आवाजात संगीत चालू असतं. मी ते बंद केलं. (नाटक सुरू होण्याची वेळ झाली की मोबाईल सायलेंट करावा.)

शांत मुलगी तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलली.

“वा ! चारचारदा प्रश्न विचारल्यावर कंठ फुटला का आपल्याला? ज्ञानाचे चार मोती आमच्याकडे देखील भिरकवा की!” राग आल्यावर साधारण माणसाला शब्द पटापट सुचत नाहीत. हिचा म्हणजे झराच सुरू होतो.

“मीच तिची आई.” शांता म्हणाली.

“काऽऽऽ य?” शुभदा जवळजवळ किंचाळलीच. मी क्षणभर गोंधळलो पण मला आश्चर्य वाटलं असं मी म्हणणार नाही. कारण मला तिचं बोलणं खोटंच वाटलं. खोटं वाटायचं कारण काय?

मी शाळेत असताना आमच्या वर्गातल्या एका टवाळ मुलानी “तुझ्या पालकांना घेऊन ये” असं बाईंनी सांगितल्यामुळे आपल्याच गल्लीतल्या एका दारुड्या अंकलला आणलं होतं. व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. त्याला पैसे दिले होते. बाईंनी तक्रार केली रे केली की भाडोत्री बापानी भयंकर राग आला आहे असं भासवून मित्राच्या पाठीत धपाटा घालायचा प्रयत्न करायचा. मित्र पळून जाणार. मग अनावर रागांत बाप त्याला “घरी येच, मुस्काट फोडतो की नाही बघ!” असं म्हणून, मग बाईंना उद्देशून, “काढून टाका सालेतनं याला. त्याला अन् त्याच्या मायला गावाकडं शेतीलाच लावतो.” असं म्हणत अंकलनी तरातरा निघून जायचं – असं ठरलं होतं.

प्रचंड दूरदृष्टी. आत्ताचाच प्रॉब्लेम नव्हे, तर बाईंची कायमचीच सहानुभूती मिळविण्याचा प्लॅन होता मित्राचा.

अपेक्षेप्रमाणे बाईंनी अंकलकडे तक्रार केली. मात्र रागानी लालबुंद होण्याऐवजी अंकलनी “असं का रे वागतोस बाळा,” असं म्हणत मित्राला जवळ घेतलं. “उफ्फ ! असल्या बापाचं पोर असंच असणार” असा चेहरा करून बाईंनी छताकडे डोळे फिरवले. स्क्रिप्टमध्ये अनपेक्षित बदलाव आल्यामुळे मित्र गोंधळला. Guidance साठी आळीपाळीनी आमच्याकडे आणि अंकलकडे बघायला लागला. असे काही सेकंद गेले, आणि अंकलनी दातओठ खाऊन अचानक मित्राच्या कानशिलात सणसणीत भडकावली !

तो लवंगी फटाक्यासारखा आवाज आणि त्या क्षणीचा मित्राचा चेहरा मी आयुष्यभर विसरणार नाही. आश्चर्या च्या पलिकडे असतो तो शॉक. शॉकच्या परिसीमेच्या पलिकडे जे काय असेल ते त्याच्या चेहर्‍यावर क्षणभरच दिसलं. तो गेला भेलकांडत. अंकल उलटपावली वळला आणि तरातरा निघून गेला.

मित्र शॉकच्या पलिकडे आणि आम्ही सगळे हसून हसून मुरकुंडीच्या पलीकडे ! वर्गातला प्रत्येक मुलगा बाकावर नाहीतर जमिनीवर गडाबडा लोळत होता! ते दृष्य अफलातूनच असणार. हे सारं बाईंच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. “दुसर्‍याच्या दुःखाला हसता काय रे नालायकांनो” असं म्हणत बाईंनीही जमेल तितक्या मुलांना बदडलं.

भरपूर पण मजेदार violence झाला होता.

तात्पर्य काय, तर माझा काही तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

मी गाडीतला दिवा लावला. शुभदा सीट बेल्ट काढून पूर्ण मागे वळली. शांताचा चेहरा नीट न्याहाळल्यावर लक्षात आलं की ती खरं सांगत होती. दोघी मायलेकी होत्या ! मुलगी अठरा-वीस वर्षाची होती. म्हणजे त्या आई आम्हाला दहा पंधरा वर्ष सीनियर होत्या ! आपण त्यांना फाडफाड काय काय बोललो ते आठवून शुभदा ओशाळली. शांतेचं नाव मनातल्या मनात बदलून मी ‘शांताकाकू’ केलं.

मात्र embarrassment मधून पुढे सरकणं जरूर होतं. मी शुभदाचाच प्रश्न पुन्हा विचारला. “तुम्हाला वाटंत नाही की तुम्ही मोठी रिस्क घेतलीत म्हणून?”

“अजिबात नाही.” शांताकाकू उत्तरल्या.

आता मात्र मला फारच आश्चर्य वाटलं. इतक्या अनपेक्षित उत्तराला काय प्रतिप्रश्न करावा या विचारात मी असतानाच त्यांनी पर्समध्ये हात घालून काहीतरी काढलं.

“अय्याऽऽऽऽ.” शुभदा.

“काय आहे?” मी.

शांताकाकूंनी मला आरशात पिस्तुल दाखवलं !

“आइच्चा घो !” मी तोंड आवरायचा आत शब्द निघालेच.

“मला बघू, मला बघू .” शुभदा.

मुली बाहुल्यांशी खेळतात आणि मुलगे बंदुकींशी. इथे या दोघी बंदूक–बंदूक खेळत होत्या आणि मी स्टिअरिंगवर ! मी कचकन् गाडी थांबवली.

“हाः हाः हाः हाः. सारे जेवर मेरे हवाले कर दो. हाः हाः हाः हाः.” हिंदी चित्रपटातल्या खलनायकाच्या आवाजाची नक्कल करत त्यांनी बंदूक माझ्या कानशिलाला लावली.

माझी क्षणभर फाटली. पण प्रफुल्ला हसत होती त्या अर्थी त्या विनोदच करंत असणार.

“भंकस नको. चुकून गोळी सुटेल.” मी.

“छे हो. खोटी बंदूक आहे.” असं म्हणत त्यांनी ती माझ्यापुढे केली. हुबेहूब खर्‍यासारखीच दिसत होती. Beretta. जेम्स बॉन्डची आवडती बंदूक. खरोखर धातूची होती. वजनदेखील खणखणीत.

मग त्यांनी त्यांची हकीकत सांगितली.

बीडला राहात असत. यजमानांची बँकेत नोकरी. एकदा त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि दुर्दैवानी त्यात यजमानांना वर्मी घाव लागला. ते वाचू शकले नाहीत. मग बँकेनी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली.

जर चोरांकडे व्यवस्थित हत्यारं असतील तर आपल्या कुलुपांचा काहीच उपयोग नसतो. फारसा आवाज न करता कितीही कुलपं तोडता येतात. (ज्यांच्या घरी घरफोडी झाली आहे त्यांनी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.) त्या काळात कॉम्प्यूटर नव्हते आणि CCTV कॅमेरे परवडण्याच्या पलिकडे होते.

घरी आई आणि मुलगी दोघीच. त्यामुळे त्या कायम टेन्शनमध्ये असायच्या. काम नवीन, मुलगी लहान. वेळीअवेळी जाग यायची आणि मग रात्रभर झोप लागायची नाही. तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. स्वतः आजारी पडल्या की मुलीची आबाळ व्हायची. तेव्हां त्यांच्या भावानी त्यांना ही बंदूक आणून दिली. तेव्हांपासून त्या निश्चिंत झाल्या. दोघींची आयुष्यं हळुहळु परत रुळावर आली.

घरी तर छकुली माझ्याबरोबर असतेच. रात्री बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना मी नेहमी छकुलीला बरोबर घेते असं त्या म्हणाल्यामुळे मला वटलं त्या आपल्या मुलीबद्दल बोलताहेत. मग कळलं की त्यांनी बंदुकीला ‘छकुली’ असं नाव ठेवलं होतं !

छकुली ! छकुली ? हे काय बंदुकीला ठेवण्यासारखं नाव आहे? डोक्यात प्रश्न आला की लगेच तो विचारायची सवय असल्यामुळे मी कारण विचारलंच. ते त्यांनी सांगितलं ते असं.

त्या लहान असताना त्यांच्या बाहुलीचं नाव होत ‘छकुली’. त्यांची आई सावत्र होती. वारंवार घायाळ झालेल्या बालमनातले सगळे विचार, शंका, घालमेल, एकटेपणा, दुःख – सगळ्या सगळ्याची वाटेकरी असायची ती छकुली. कधी न कुरकुरता, न कंटाळता, एकही शब्द न बोलता ती छोटीला धीर द्यायची. तिची समजूत काढायची. जोपर्यंत छकुली आपल्या कुशीत आहे तोपर्यंत आपलं काहीही वाईट होणार नाही अशी त्या कोवळ्या मनाची खात्री होती. आणि ती खरी देखील ठरली.

पुढच्या आयुष्यात त्या बंदुकीनेही नेमकं हेच काम केलं. म्हणून तिचंही नाव ‘छकुली’ !

किती समर्पक ! काही मिनिटांपूर्वी मला हेच नाव हास्यास्पद वाटलं होतं. आपण कित्येकदा आपली मतं किती पटकन् आणि अपुर्‍या माहितीनिशी बनवतो ! माझ्या उथळ विचारांची मलाच लाज वाटली.

चष्म्याच्या दुकानापाशी सोडताना शुभदा त्यांना म्हणाली, “चाळिशी?.”

त्या हसल्या. म्हातारीच्या कापर्‍या आवाजाची नक्कल करंत म्हणाल्या, “मुलांऽऽनोऽऽ, चाळीशी म्हणजे काय ते तुम्हाला कळायला खूप वेळ आहे.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

सीमा२७६, प्रसाद आणि रिया,
कॉपी पेस्टचा प्रयत्न केला. काही केल्या होत नाही. वेळ काढून पूर्ण टाइप करण्याचा प्रयत्न करतो.

एक प्रश्न.
मी बर्‍याच वेळा प्रतिसाद मध्ये >>+१ असं पाहिलं आहे. त्याचा अर्थ काय?

एक प्रश्न.
मी बर्‍याच वेळा प्रतिसाद मध्ये >>+१ असं पाहिलं आहे. त्याचा अर्थ काय?
>>>
म्हणजे मलापण तेच म्हणायचे आहे...उदा.समजा मला एखादे लेखन आवडले मी 'मस्त' ही प्रतिक्रिया दिली आता तुम्हाला पण हे लिखान खुप खुप आवडलय मग तुम्ही 'मस्त आणि +१' टाकता म्हणजे तुंम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त आवडलय...
म्हणजे थोड्क्यात त्याच प्रतिसादाला अनुमोदन.+११११११ म्हण्जे खुप खुप अनुमोदन...

मस्तच लेख .किस्सा खुप आवडला. Happy विशेषकरुन जे लोक केवळ न ओळखुन जज करतात आणि मग चकित होतात. जसे यात शांताकाकू सगळ्यांना चकित करतात. Happy

छान आहे खरच किस्सा.
एकट्या दुकट्या राहनार्‍या मुलिंनी 'छकुली' ला जवळ बाळगण्यास काहीच हरकत नाही.

मी लिहिलंच आहे. खिशात चोरीला जायला पैसे नव्हतेच!

जोक्स अपार्ट, जेव्हां दोन मुली अंधार्या एकट रस्त्यावर दिसतात, तेव्हां आपल्या मनात त्यांच्या सुरक्षिततेचा विचार येतोच. पुरुष म्हणून आम्ही जास्त धोका पत्करू शकतो. आणि पत्करावा देखील.

मस्त

रात्री बेरात्री रस्त्यावर उभारलेल्या अनोळखी व्यक्तीना (त्यांचे जेंडर कोणतेही असो) लिफ्ट देणे धोकादायक आणि बेजबाबदारपणाचे आहे. लेख विनोदी ढंगाने लिहायचा प्रयत्न अजिबात रुचला नाही.

>> पुरुष म्हणून आम्ही जास्त धोका पत्करू शकतो. आणि पत्करावा देखील.

संदेश आवडला नाही. केवळ भावनिक विधान आहे. व्यावहारिक व जबाबदारपणाचे नव्हे. त्यांना मदतच करायची होती तर तुम्ही तिथून पोलिसांना फोन करून सांगणे हा योग्य मार्ग होता. अर्थात तुम्ही स्वत: पोलीस असाल किंवा याप्रकारची मदत करण्याचे स्कील व साधने तुमच्याकडे असतील तर भाग वेगळा. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी हा थेट चुकीचा संदेश आहे.

कुटुंबातील व्यक्ती जाऊनसुद्धा त्यातून काहीही धडा न घेता खोटी बंदूक "आधार" म्हणून वागवणाऱ्या व त्या भरोशावर रात्री बेरात्री मुलीला घेऊन फिरणाऱ्या त्या स्त्रीची सुद्धा कीव येते. पण आपल्या देशात असे निष्काळजी लोक पदोपदी भेटतात.

बरेचसे गुन्हे आपल्या निष्काळजीपणामुळे घडतात.

इनामदार,

तुमचं म्हणणं बरोबर आहे.
"बरेचसे गुन्हे आपल्या निष्काळजीपणामुळे घडतात." मी पूर्णपणे या विधानाशी सहमत आहे.

प्रश्न फक्त 'काळजीपूर्वक' आणि 'निष्काळजी' याच्या मधली रेघ प्रत्येक परिस्थितीत थोडी वेगवेगळी असते. जर ते पुरुष असते तर आम्ही नक्कीच थांबलो नसतो.

हे सर्वज्ञातच आहे की पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक गुन्हे (लैंगिक गुन्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्तच आहे) हे जवळच्या व्यक्तीकडून केले जातात. म्हणून मग 'निष्काळजीपणा' होवू नये म्हणून सर्व आप्तेष्टांपासून आपण दूरच राहातो का?

आज आपल्याकडे अपघात झाल्यावर बघ्यांची गर्दी होते पण त्यात मदत करायला फार थोडे पुढे येतात यामागे 'त्याचं काही का होई ना, मला त्रास होता कामा नये' हा 'व्यावहारिक' विचार असतो. हा विचार चुकीचा आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. मला तसा विचार करायला आवडणार नाही इतकंच. मदत करताना आपल्याला धोका उत्पन्न होण्याची शक्यता नेहमी असतेच. मात्र पुरुषाला धोका पत्करणं सोपं असतं आणि आपल्या धोका पत्करण्यामुळे दुसर्याला काही मदत होणार असेल तर तो पत्करावा असं माझं मत आहे. कुणालाही संदेश देण्याची माझी इच्छा नाही आणि पात्रताही नाही.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे 'तिथून' पोलिसांना फोन करायचा. 'तिथून' म्हणजे कुठून? तेव्हां मोबाइलचा शोध तर लागलेला नव्हताच, लोकांना लॅन्ड लाइनसाठी देखील नंबर लावायला लागत होता.

बरं, स्कूटर बंद पडल्यावर त्या दोघींसमोर दोनच पर्याय होते. चालत निघायचं किंवा लिफ्ट मागायची. बहुदा त्यांनी दोन्ही केलं असावं.

पुण्यासारख्या शहरात रात्री आठ वाजता चष्म्याच्या दुकानाकडे जाणार्या जोडगोळीला 'रात्री बेरात्री मुलीला घेऊन फिरणारी स्त्री' असं मी तरी म्हणू शकत नाही.

आयुष्याकडे विनोदी ढंगाने बघण्याचा आजार मला लहानपणापासून आहे. सगळ्यांना रुचेलच असं नाही.

माझ्या आयुष्यात ज्या सांगण्यासारख्या घटना घडल्या त्यातली एक ही आहे. इतकच. समाजप्रबोधन, संदेश, त्या बाईंचं धैर्य / बेजबाबदारपणा वगैरेंमध्ये शिरून कोणाचं बौद्धिक घेण्याची माझी इच्छा नाही.

प्रतिक्रिया म्हणजे सगळा कचराच आहे. एकीकडे आम्ही पुरुष म्हणून धोका पत्करू शकतो म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांसाठी म्हणून थांबलो पुरुष असते तर मात्र पळालो असतो असले दांभिक विचार, गुन्हे होतात म्हणून आप्तेष्टांपासून आपण दूर राहतो का असला काहीही तर्कहीन प्रश्न, अपघातग्र्स्ताला केलेली मदत आणि रात्री बेरात्री निर्मनुष्य रस्त्यावर कुणालातरी लिफ्ट देणे यांची मुर्खासारखी केलेली तुलना इत्यादी इत्यादी अनेक मुद्दे बालिश आणि केवळ काहीतरी वाद घालायचा म्हणून मांडले आहेत.

>> पुण्यासारख्या शहरात रात्री आठ वाजता चष्म्याच्या दुकानाकडे जाणार्या जोडगोळीला 'रात्री बेरात्री मुलीला घेऊन फिरणारी स्त्री' असं मी तरी म्हणू शकत नाही.

तुम्ही का म्हणू शकत नाही? एक स्त्री होती आणि दुसरी तिची मुलगी होती हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग? आणि माझ्या एका साध्या वाक्याचा कोणी व्यक्ती जर काही गैरअर्थ काढत असेल (अन्यथा "मी तरी म्हणू शकत नाही" अशा कॉमेंटचे काय कारण?) तर त्यातून त्या व्यक्तीचेच संस्कार दिसून येतात. असो. दिवंगत पतीच्या माघारी तरुण मुलीची जबाबदारी घेऊन एकटे राहणे सोपे नाही. पण तरीही काही स्त्रिया अगदी आजही सुरक्षिततेचा म्हणावा तितका विचार करत नाहीत. रात्री बेरात्री निर्मनुष्य रस्त्यावर एका स्त्रीने मुलीला घेऊन बाहेर पडणे हेच मुळात धोकादायक व ते टाळता येऊ शकत होते हे सांगण्याचा माझा मुख्य उद्देश होता. पण एका सडक्या कॉमेंटमुळे अजून कोणाचा गैरसमज नको म्हणून हे स्पष्टीकरण.

Pages