'माणसा'सारखा काय वागतोस?

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 21 November, 2014 - 07:09

'माणसा'सारखा काय वागतोस?

मुंबईतील लोअर परेल येथे स्थायिक टाटा मेमोरिअल हॉस्पिटल. जगप्रसिद्ध. फ़ेब्रुअरि १९४१ पासूनचा पाया असणार, कर्करोग ग्रस्तांसाठी झटणार हॉस्पिटल. तिथे इंटरव्यूसाठी गेले, सरकारी नोकरी मिळाली म्हणून खुशही झाले.. पण पुढे अशा काही घटना घडत गेल्या, पाहत गेले कि "आयुष्य आणि मृत्यू" या सार्याची नव्याने ओळख झाली. इतक काही साठवल आहे कि कधी तरी त्यावर एखाद छोटस का असेना पुस्तक लिहायची मनातील एक सुप्त इच्छा आहे... असो... आज इथे याचा उल्लेख करण्याच कारण फार वेगळ आहे.

दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. अर्थात मार्केटिंग सारखाच. मी व्यस्त आहे वा त्या क्षणी निवांत बोलू शकते कि नाही याची चौकशी न करताच समोरची व्यक्ती, पाठीमागे वाघ लागल्यासारखी धावत पळत सार काही बोलून मोकळी झाली. थोडक्यात सांगायचं झाल तर ती एका एन.जी.ओ. तर्फे बोलत होती. अभिषेक नावाचा २ वर्षाचा मुलगा, कर्करोगी. त्याला मदत करायची आहे म्हणे. तो टाटा मेमोरिअल (त्यानंतर त्या हॉस्पिटलचा थोडा फार इतिहास आणि वर्तमान हि सांगून झाला) मध्ये अड्डमिट आहे. हॉस्पिटलचे नाव ऐकताच मी कान टवकारले. त्या लहानग्याबद्दल माहिती देताना थोडाफार अभ्यास तिने केल्याच लक्षात येत होत. पण बाई साहेबांना एकंदर हॉस्पिटल आणि त्याच्या रचनेबद्दल काहीही माहिती नव्हती. रुग्ण कुठे अडमिट आहे, काय उपचार चालू आहेत, वोर्ड आणि तत्सम बरेच काही. धादांत खोट बोलत होती ती. मला ती जे बोलत होती त्या सार्याची संपूर्ण कल्पना होती, माझ्या विविध प्रश्नांपुढे तिची सहनशक्ती संपली... मी तिला एवढच म्हटलं, "मी जॉब करते टाटा मेमोरिअल मध्ये" पुढच्याच क्षणाला फोन कट होऊन "टु.... टु.... " माझ्या कानात रेंगाळू लागल. मला चार पाच शिव्या तिने हासडल्याच…, नकळत ऐकू आल. (तो फोनहि नंतर स्विच ऑफ दाखवत होता.) ज्या पद्धतीने ती बोलत होती, एखादा दयावान (आणि धनवान) नक्कीच भाळला असता. (अन तिचा शिकार झाला असता.) असा कोणताही लहानगा अस्तित्वात नव्हता, म्हणजे तिच्या प्रत्यक्षात ओळखीच्या व्यक्तींच्या यादीत नव्हता. चक्क फसवी कृतज्ञता दाखवून तिला पैसे उकळायचे होते. थोडक्यात फसवा फसवी च्या व्यवसायात ती "इम्प्लोयी" होती. त्यानंतर डोक्यातील विचार चक्र चालू झाल. राग त्या मुलीचा आलाच नव्हता, राग होता तो माणूस किती खालच्या पातळीवर पोहोचला आहे या सत्याचा.

कितीतरी हॉस्पिटलमध्ये २ वर्षे काय त्यापेक्षाही लहान बालके वेगवेगळ्या यातनांना सामोरी जात असतात. वेगवेगळ्या वेदनांनी तळमळत असतात. औषध, इंजेक्शन्स, सलायन, शस्त्रक्रिया..अशा कितीतरी क्लेशकारक गोष्टी त्यांनी त्यांच्या बंद मुठीत जन्मताच आणलेल्या असतात. या असल्या गोष्टींच भांडवल केल जात? का? स्वतःच पोट भराव म्हणून... मन, आत्मा, हृदय अशा नावाचा काही प्रकार अस्तित्वातच नाही का? नसेलच, म्हणून तर दुसर्यांच्या वेदनांनी स्वतःच्या संवेदना जिवंत ठेवतात अशी लोक. हि झाली नाण्याची एक बाजू. मानसिक विकृती, ती कदाचित बदलण आपल्या हातात नाही, हा स्वतःचा स्वतःच विचार करायला हवा. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा जरा...

नाण्याची दुसरी बाजू म्हणजे या माणसांच्या साजूक मिठ्या बोलांवर भाळणारी सामान्य जनता. हि बाजू असणारच नाहीतर या लोकांचा व्यवसाय चालूच झाला नसता. गिर्हाईक आल तरच दुकान चालेल ना? सदसदविवेकबुद्धीही अशा वेळी काम करण बंद होते. घाईघाईत, सत्कर्म होईल आणि वेळही वाचेल असा त्रिगुणी फायद्याचा विचार करून माणस मदत करतात. पण तस काही होतच नसत. हेही लक्षात ठेवायला हव. आज बहुतेकांकडे इंटर नेट, गुगल ह्या सुविधा उपलब्ध आहेत... करा थोडा "सर्च" अशा वेळी. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आजकाल ऑनलाईन डोनेशन हा प्रकार असतो. आरामात आपण गरजूंना मदत करू शकतो. थोडीशी जागरुकता दाखवली तर आपल्या हातूनही एखाद सत्कर्म घडून येईल.

एखादा चुकला, विचित्र वागला तर आपण कधीतरी त्याला उपाधी देत म्हणतो,"काय जनावरा सारखा वागतोस?" खर तर जनावर परवडली. कुत्रा प्रामाणिकपणा शिकवतो, गाय वासराला दुध देते त्यात माणसाचाही चहा बनून जातो, पोट भरल असेल तर वाघही उगाचच शिकार करत नाही. आणि अशीच किती तरी उदाहरण. इसापनीती आणि पंचतंत्र कर्त्याला देखील माणसांपेक्षा प्राणी जास्त जवळचे वाटले असावेत. मला तर वाटत जंगलामध्ये एखादा छावा मस्ती करता करता चुकला तर त्याची सिंहीण आई त्याला म्हणत असेल, "अरे, काय करतो आहेस? 'माणसा'सारखा काय वागतोस? मूर्ख आहेस का?"

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्...असे खुप जण असतात्...
एकदा ऑफीसमधुन घरि येताना वाडीया कॉलेज जवळ एक आंधळा दिसला लहानच होता.नववी दहावीत असणारा.तो येणार्या जाणार्या गाड्यांना हात करत होता दिवसच होता मी गाडी थांबवुन त्याला लिफ्ट दिली कोरेगाव पार्क मध्ये तो उतरला...येता येता बोलु लागला..माझ्याकडे सगळी पुस्तके आहेत पण अजुन काहि पुस्तके घेण्यासाठी काहिशे रुपयांची गरज आहे..मी पुस्तके वीचारली तर नावे सांगेना...मग मी पैसे देण्यास नकार दिला.तसेपण मी त्याला पैसे देणारच नव्हते माझीच हालत बेकार होती..

पण एक कळाल काही लोक दयेला पात्र असतात.पण काही लोक त्याचा गैरफायदा घेतात.

आता एकमात्र ठरवलय खुप किव आलीतर भीकार्याला ड्बा द्यायचा जेवणाचा...पैसे कोणी मागीतले तर शहानिशा करुन वस्तु घेऊन द्यायची...खुपच वाईट वाटतय आणि सामाजिक कार्य करायच तर अनाथाआश्रमामध्ये जायच आणि द्यायच काय ते.

<<एखादा चुकला, विचित्र वागला तर आपण कधीतरी त्याला उपाधी देत म्हणतो,"काय जनावरा सारखा वागतोस?" खर तर जनावर परवडली. कुत्रा प्रामाणिकपणा शिकवतो, गाय वासराला दुध देते त्यात माणसाचाही चहा बनून जातो, पोट भरल असेल तर वाघही उगाचच शिकार करत नाही. आणि अशीच किती तरी उदाहरण. इसापनीती आणि पंचतंत्र कर्त्याला देखील माणसांपेक्षा प्राणी जास्त जवळचे वाटले असावेत. मला तर वाटत जंगलामध्ये एखादा छावा मस्ती करता करता चुकला तर त्याची सिंहीण आई त्याला म्हणत असेल, "अरे, काय करतो आहेस? 'माणसा'सारखा काय वागतोस? मूर्ख आहेस का?">>>

अगदी अगदी १००% खरे आहे.

माणसांपेक्षा जनावर खुप परवडली.माणसांनी जनावराकडुन खुप काही शिकायला पाहिजे....
लिहित रहा....

एका कुत्र्याच्या धाग्यावर माणसांचे प्रतिसाद वाचुन असे वाटत होते की एक चुकलेला कुत्रा माणसाच्या तावडित सापडला आहे व चारिबाजुनी माणस त्याचे लचके तोडत आहेत. ( मयुरी चवाथे-शिंदे ह्यांच्या लेखावर अवांतर लिहिल्याबद्दल क्षमस्व)

छान लेख! पटला!

मला अशीच एक कॉलेजमधील १८-२० वर्षे मुलांची टीम भेटलेली. फसवणारी होती का नाही खात्रीने सांगू शकत नाही, पण मला फावला वेळ असल्याने मी त्यांचे बोलणे ऐकून घेतले, संस्थेचे नाव पाहिले, त्यांनीच दाखवलेली कागपत्रे पाहिली. अर्थात समजले काही नाही पण बस्स मनाच्या समाधानाकरता. कॅन्सर पेशंटची मदत करणारे होते. ते पाहता मग १०-२० रुपये द्यायच्या विचारात असलेल्या मी १०० रुपये दिले. पावतीची अपेक्षा ठेवली. अर्थात एकाच्या हातात पावतीपुस्तक दिसले म्हणून, अन्यथा माझी ट्यूब पेटली नसती. पण मी पावती मागताच समोरून उत्तर आले की पावती हवीय का? अर्थात यामागे नक्की काही लबाडी होती वा नाही का आणखी काही हे सांगता येत नाही. पण पावती नाही याचा अर्थ ते पैसे ते तरी गडपणार होते किंवा ज्याच्याकडे ते सुपुर्त करणार ते तरी हडपणार होते. अश्यांना मदत किंबहुना अश्यांतर्फे मदत करायची इच्छा मग राहीलीच नाही. पावती न मागता सरळ माझे शंभर रुपये परत घेतले आणि आता तुलाच राहू दे ती पावती म्हणत टाटा बाय बाय केले.

मयुरी तुम्ही जे ऑन्लाईन मदतीबद्दल लिहिले आहे ते जरा डिटेल मध्ये लिहा ना. असे कॉल्स अनेक येतत. आम्ही एंटर्टेन करत नही पण अनेक लोक बळी पडतात त्याला.

अशाच प्रकारचा एक फोन मला मागील आठवड्यात आला होता. तो मुलगा म्हणाला कि आम्ही स्टुडंट्स आहोत आणि आम्ही एक संस्था स्थापन केली आहे जी लहान मुलांना वैद्यकीय खर्चासाठी सहाय्य करते. मग नेटवरून एक साइट पाहायला सांगितली जिथे त्या मुलाचं (ज्याला मदतीची गरज आहे) प्रोफाईल्,फोटो, आजार, अंदाजे खर्च इ.इ. माहीती होती. कॉल चालूच होता, तो म्हणाला कि आम्ही जी मदत मागतोय ती जेन्युइन रिजन साठी आहे याची तुम्हाला खात्री पटावी म्हणुन ही सर्व माहीती देत आहोत.
मग अमुक एक रक्कम जमा झाली आहे आणि अजुन एवढी हवी आहे याची माहीती देण्यात आली. आणि त्या साइटवर लिंक आहे तिथे क्लिक करून रक्कम ऑनलाइन भरता येइल अस सांगितलं.

इथपर्यंत मी ऐकुन घेतल कारण मला तरी त्यात काही वावग वाटलं नाही आणि झालीच तर त्या लहानग्याला मदत होइल अस वाटत होत. मग मी कॉल करणार्‍याला म्हटल, ठीकेय मी पाहतो पुढ काय करायच ते. तर तो म्हणायला लागला ५च मिनिट लागतील मी तुम्हाला सांगतो ना कस ट्रआन्सफर कराय्चे पैसे ते.
मी म्हणालो, धन्यवाय एवढी माहीती दिलीत त्याबद्द्ल पण मला नेटबँकींग अवगत आहे आहे मी माझ्या विचाराने करेन काय करायच आहे ते. पण तो पिच्छाच सोडेना, मग मी मला ५ मिनिटांत मिनिटींगला जायच आहे (खरचं जायच होत) अस जरा खडसावल आणि फोन ठेऊन दिला.

नंतर पुन्हा दुपारी त्याच मुलाचा फोन आला आणि म्हनाला सर मी सकाळी फोन केलेला, त्या मुलाचा दररोजचा खर्च अमुक आहे आणि आजच्या खर्चासाठी अमुक पैसे कमी आहेत. जर तेवढे पैसे भरले नाहीत तर आजचे उपचार होणार नाहीत, अन खुपच अ‍ॅग्रेसिव्हली बोलत होता.

पण मग त्याच्यावरचा माझा होता नव्हता तेवढा पण विश्वास उडाला आणि मी फोन ठेऊन दिला.

आबासाहेब, मलाही सेम अनुभव आला. आणि तो बोलणारा ऑलमोस्ट जबरदस्तीच करत होता.
नंतर ट्रान्स्फर करेन असं सांगितल्यावर डायरेक्ट "केले का ट्रान्सफर? अजुन का नाही केले?" असे अरेरावीचे फोन यायचे.
मग चांगलं दमात घेतलं. त्या जबरदस्तीनेच वैतागले मी.

हा नवीन प्रकार सुरु झालाय का "टेलीमार्केटींगचा" ?. खरं तर थेट हॉस्पिटलमधे अश्या अनेक संस्था कार्यरत असतात. मदत तिथे मिळू शकते आणि असे मदत करणारे लोकही कमी नसतात. पण असे मधल्यामधे मलिदा खाणारे दलाल, या क्षेत्रातही शिरलेत, हे वाचून वाईट वाटले.