एकटेपणा

Submitted by शिरीष फडके on 21 November, 2014 - 01:09

एकटेपणा
आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा…

एक चित्रकार. तसा तो या कलेच्या क्षेत्रात नवीनच. फारसं नाव नसलेला किंवा या क्षेत्रापुरतं म्हणायचंच झालं तर अनोळखी. या चित्रकाराचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे त्याला आवडणार्या एका सुंदर व्यक्तिचं रूपचित्र (Portrait) काढणं. अर्थात त्याकाळी ती व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान असल्यामुळे आपलं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच थोडी शंका होती. कारण अशी प्रसिद्ध आणि नावाजलेली व्यक्ती एका नवशिक्या चित्रकाराला स्वतःचं रूपचित्र काढण्यासाठी वेळ आणि परवानगी का बरं देईल? पण त्या चित्रकारामध्ये मेहनत करण्याची जिद्द होती. दिवस-रात्र एक करून त्या चित्रकाराने अनेक वेगवेगळी चित्रं काढली. काही चित्रांची प्रशंसादेखील झाली. परंतु हवं तसं यश मात्र मिळत नव्हतं.

एके ठिकाणी एका पारितोषिक समारंभात त्या सुंदर व्यक्तिचं प्रत्यक्ष दर्शन चित्रकाराला झालं. त्या दिवशी त्या सुंदर व्यक्तिसाठी फार आनंदाचा क्षण होता कारण त्या व्यक्तिसाठी त्या सोहळ्यात पारितोषिक मिळवणं हे कैक वर्षांपासूनचं स्वप्न होतं, जे आज पूर्णदेखील झालं होतं. इथे चित्रकाराचादेखील आनंद गगनात मावत नव्हता. का कुणास ठाऊक आणि कसं पण त्या चित्रकाराने त्या दिवशी त्याला आवडणार्या व्यक्तिला भेटून थेट प्रश्न विचारला की, ‘मला तुमचं रूपचित्र (Portrait) काढायची मनापासून इच्छा आहे. हे माझं आतापर्यंतचं काम (असं म्हणून त्याने आतापर्यंतची सर्वात चांगली चित्रकृती/चित्रकला त्या व्यक्तिला दाखवली). आपण मला वेळ दिलात आणि संमती दिलीत तर मी मला भाग्यवान समजेन.’ त्यावर त्या व्यक्तिने आनंदाच्या भरात, त्या चित्रकाराला होकार दिला. पण नंतर त्या व्यक्तिच्या मनात विचार आला की आपण होकार देऊन चूक तर केली नाही ना? पण शब्द पाळणंदेखील तितकंच गरजेचं होतं.

पुढे अनेक काळ रूपचित्र काढण्याच्या निमित्ताने त्या दोघांची वरचेवर भेट होऊ लागली. त्या दोघांनाही एकमेकांची सवय होऊ लागली, एकमेकांचा सहवास आवडू लागला. काही वर्षांनी त्याचं प्रेमात रूपांतर झालं. तोपर्यंत चित्रकाराने काढलेल्या अनेक चित्रांना प्रसिद्धीही मिळाली होती (खास करून त्याच्या आवडत्या व्यक्तिच्या चित्रांना). चित्रकाराकडे तर आता कित्येक विद्यार्थी चित्रकला शिकण्यासाठी येऊ लागले होते. आता तर त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पुढे लग्नही झालं आणि एक मुलदेखील झालं. परंतु एकेदिवशी एक दुर्दैवी घटना घडली. एका वाहन अपघातात त्या चित्रकाराच्या बायकोचा मृत्यू झाला. जणू काही त्या चित्रकारावर एकप्रकारे आभाळच कोसळलं होतं. त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं हे त्या चित्रकाराला उमजत नव्हतं. तो जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तितकाच तो त्यात आणखीन बुडत होता. नंतर नंतर तर स्वतःच्या कामाकडेच नव्हे तर स्वतःच्या मुलाकडेदेखील दुर्लक्ष होत आहे याचं त्याला भान उरलं नव्हतं. आयुष्यातले सगळे रसच बेचव झाल्यासारखे त्याला वाटत होते. सगळं मिळत असूनसुद्धा त्याला एकटेपणा जाणवू लागला होता. प्रत्येक बाब अपूर्ण वाटत होती. असं बराच काळ चाललं होतं.

एकेदिवशी त्या चित्रकाराच्या गुरुंना या एकूण परिस्थितीबद्दल कळलं आणि त्यांनी आपल्या शिष्याची भेट घेण्याचं ठरवलं. गुरू जेव्हा आपल्या शिष्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना त्या चित्रकारातील एकटेपणाची जाणीव त्वरित झाली. गुरू काय घडलं आहे आणि काय घडत आहे ते पुन्हा एकदा त्या चित्रकाराच्या तोंडून ऐकतात. ‘माझ्या आयुष्यात सतत काहीतरी कमी आहे असं मला वाटतं’, हे वाक्य त्या चित्रकाराच्या तोंडून ते अनेकदा ऐकतात. त्यावर ते गुरू आपल्या शिष्याला विचारतात, ‘मला सांग तू काढलेल्या वेगवेगळ्या चित्रांपैकी तुला सर्वात जवळची चित्रं कोणती वाटतात? ती सगळी चित्रं तू मला दाखवू शकशील?’ तो चित्रकार त्याला जवळची वाटणारी सगळी निवडक चित्रं आपल्या गुरुंसमोर मांडतो. गुरुंच्या चेहर्यावर जरासं हास्य उमटतं. कारण ती सगळी चित्रं त्याच्या शिष्याच्या मृत बायकोची असतात. गुरू आपल्या शिष्याला (त्या चित्रकाराला) म्हणतात, ‘तुझ्या दृष्टीने तू काढलेली सगळी चित्रं ही वेगवेगळी असली तरी मी जिथून पाहतोय तिथून तर ती सगळी चित्रं मला एकच वाटतात. ही सगळी चित्रं तुझ्या प्रिय बायकोची म्हणजेच एकाच व्यक्तिची आहेत म्हणून मी असं म्हणेन की या सगळ्या चित्रांमध्ये केवळ एकच भावना समोर येते आणि ती भावना म्हणजे आनंद. तू तिच्याबरोबर प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत केलास. ज्या व्यक्तिचं केवळ एक रूपचित्र काढणं हे तुझं स्वप्न होतं त्या व्यक्तिबरोबर तुला संसार करण्याचं भाग्यदेखील लाभलं होतं. तिच्याकडून तुला मिळालेलं प्रेम आणि तिच्याकडून मिळालेला आनंद हे तू आजही विसरू शकत नाहीस. आयुष्यात अनेक चढ-उतार आले असतील आणि अशा प्रसंगातही तिने तुला आनंदच दिला असेल. त्यामुळे तुला जवळच्या वाटणार्या तुझ्या प्रत्येक चित्रात ‘आनंद’ ही एकच भावना प्रकट होते. तुझ्या प्रिय बायकोमध्ये इतर कुठल्याच भावना तुला दिसल्या नाहीत का? राग, करुणा, माया, ममता, दुःख इत्यादी अनेक भावनांकडे तुझं एखाद्वेळी दुर्लक्ष झालं असेल. कळत-नकळत किंवा आनंदाच्या मोहापायी त्या भावना तू उघड्या डोळ्यांनीदेखील बघू शकला नसशील. या भावनांचा तू शोध घे. तुझ्या बायकोचं शरीर जरी मृत झालं असलं तरी तिचे विचार, आठवणींच्या रूपात तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण नेहमीच जिवंत ठेव. तिच्यातील इतर सगळ्या भावनांचा आदर कर. तिच्यात नावीन्य शोध म्हणजेच तिच्यातील प्रत्येक नवीन बाब जी याआधी दुर्लक्षित झाली असेल त्याचा शोध घे. तिला आणि तिच्या आठवणींना शिळं समजू नकोस. पण यापुढे तू एखाद्या नवीन सोबतीबरोबर आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त करून दे. म्हणजेच आपल्या मृत बायकोच्या आठवणींमध्ये अडकू नकोस त्याऐवजी त्या आठवणींचा सन्मान वा आदर कर. तुला आता जो एकटेपणा जाणवतोय त्यावर उपाय म्हणून किंवा एखादा पर्याय म्हणून तू तुझ्या मुलाचा किंवा भविष्यात येणार्या नवीन जोडीदाराचा वापर करू नये या कारणास्तव आज मी तुला इथे भेटायला आलो. मी जर आज इथे नसतो आलो तर तू कधी ना कधी तुझ्यातल्या एकटेपणावर मात केलीच असतीस. कारण कुणाच्याही जाण्याने माणसाचं आयुष्य कायमचं थांबत नाही. पण त्यासाठी तू एखाद्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा, पर्याय किंवा चालून आलेली संधी म्हणून वापर करू नयेस आणि याची दक्षता घेण्यासाठी तुला सुचवावं या हेतूने, एक गुरू या नात्याने, मी इथे आलो आहे. तुझ्या बायकोच्या अशा अचानक जाण्याने जो एकटेपणा तुला जाणवत आहे, तो एकटेपणा तू तिच्या आठवणींची, तिच्यातील नावीन्याची व्याप्ती वाढवून दूर करावा किंवा साभार तिच्याकडेच परत करावा. तू जर तुझ्या मुलाच्या संगोपनात मन गुंतवलं असतं किंवा तुला एक समवयस्क सोबत मिळाली असती जिच्यात तू मन गुंतवलं असतं आणि या सगळ्यामागे तुझा एकटेपणा दूर व्हावा हा जर हेतू असता तर तो त्या व्यक्तिंचा, कळत-नकळत का होईना, नैतिक अपमान झाला असता.’ हे सगळं ऐकल्यावर आपल्या गुरुच्या प्रत्येक शब्दामध्ये तो चित्रकार वेगवेगळे अर्थ शोधू लागला. ते बघून गुरू पुन्हा जरासे हसले आणि त्यांनी आपल्या शिष्याचा निरोप घेतला.

जेव्हा आयुष्यात घडणार्या घटना (मग त्या घटना प्रिय असो वा अप्रिय असो) वारंवार घडत असतात. म्हणजेच त्या घटनांमध्ये तोच-तोचपणा असतो, त्यात काहीही नावीन्य सापडत नाही. तेव्हा स्वतःला शोधण्यासाठी आणि त्या नावीन्याचा अभाव असलेल्या

परिस्थितीपासून (मग ती

परिस्थिती अप्रिय असो वा प्रिय असो) दूर जाण्यासाठी माणसाला एकांत हवा असतो. एकांताची गरज ही नेहमीच तात्पुरती असावी. परंतु तसं झालं नाही म्हणजेच एकांताची सवय लागली की एक दिवस एकाकीपणा आयुष्यात येतो. मग मनुष्य या एकाकीपणावर उपाय शोधू लागतो. कधी कधी तात्पुरता का होईना पण उपाय सापडतोदेखील. पण एकवेळ अशी येते की हे सगळे उपायदेखील अशक्य किंवा अप्राप्य वाटू लागतात. एकप्रकारे एकाकीपणाच्या शेवटी पूर्णविराम (Full Stop) दिसू लागतो. आयुष्याचं चित्र चांगलं असतं पण ते पूर्ण नसतं यालाच म्हणतात एकटेपणा. यावर एकच उपाय म्हणजे जिथून हा सगळा प्रवास चालू झाला तिथे जाणं म्हणजेच नव्याने नावीन्याचा शोध घेणं. एकटेपणा कधीही नष्ट होत नाही किंवा विरून जात नाही किंवा विरघळतदेखील नाही. एकटेपणा नेहमीच स्थलांतरित होतो (मग तो जिथून आला आहे तिथेच परत जातो किंवा

ज्यांच्यामुळे तो गेला आहे त्यांच्याकडे तो स्थलांतरित होतो). नावीन्याचा शोध हा घटक जर दैनंदिन जीवनाचा भाग असेल तर एकाकीपणा आणि एकटेपणा क्वचितच अनुभवास येईल किंवा असलाच तर तो धूसर असेल किंवा फारसा जाणवणारा नसेल.

मानसशास्त्रानुसार एकटेपणा आणि एकाकीपणा यात फरक आहे. माणसाला एकाकीपणा जाणवत असला तरी तो आपलं मन वेगवेगळ्या गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझा एकाकीपणा जायला केवळ हाच एक उपाय आहे असं वाटू लागलं वा ते अप्राप्य वाटलं की तो माणूस एकटा पडतो. माणसाने एकटेपणा घालवला की एकाकीपणाही आपोआप दूर होतो.

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटलंय, माणसाचं मनच मोठं विचित्र. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो वा विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो. कितीही नाही म्हटलं ना तरी जीवनाचा अर्थ त्याला एकांतातच मिळतो. कारण गर्दीत जरी तो स्वतःला हरवायला शिकत असला तरी एकांतात तो स्वतःला सापडायला शिकतो.

शिरीष फडके

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, आवडले, पटले.. इन्फॅक्ट अपना भी कुछ ऐसाही है.. नंतर लिहितो सविस्तर Happy

फडकेसाहेब, हे आपण इतर संकेतस्थळावर लिहिले आहे ना ? मग त्या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित असा उल्लेख करावा, अशी मायबोलीची प्रथा आहे. आपण ती पाळावी अशी नम्र विनंति.

मी आणि माझ्या ग’फ्रेंड मध्ये हि चर्चा नेहमी चालते. तिचा काहीतरी पत्रिकादोष आहे, मंगळ वगैरे. माझा विश्वास नाही. पण ती मात्र घाबरते. आपले लग्न झाल्यावर कोणाच्या तरी जीवाचे बरेवाईट होईल अशी भिती तिला सतत वाटते. याचबरोबर तिच्यामते मी प्रॅक्टीकल आहे. म्हणजे आता जरी तिच्यावर खूप प्रेम करत असलो, तरी तिच्या जाण्यानंतर मी एकटा झालो तर मी त्यातून सावरून दुसरीही शोधेन. अर्थात हे खरेही आहेच, मी सुद्धा कबूल करतो. किंबहुना तिनेही असाच विचार करावा म्हणून मी प्रयत्नशील असतो. पण ती मात्र मला हे जमणार नाही असे बोलते. अर्थात ते ही खरेच आहे. पण त्यामुळे माझ्या मनात कधी मरणाचा विषय आला तर माझ्यापाठी तिचे काय होईल हाच विचार माझ्या मनात आधी येतो. जर मेल्यानंतर आपला आत्मा बाहेर पडतो हे खरे मानले तर मी मेल्यावर ती मला आयुष्यभर उदास दिसली तर माझा आत्मा नक्कीच तळमळत भटकत राहील. त्यामुळे तशीच मरायची वेळ आली आणि मला त्या आधी तिच्याशी बोलायची संधी मिळाली तर मी नक्कीच तिच्याकडून हे वचन घेऊनच मरेन.

असो, बरेचदा रोमॅंटीक गप्पा मारताना मध्येच अचानक हा विषय निघतो, पण या जर तर च्या गोष्टी असल्याने मग तेच ते नेहमीचे संवाद झाले की थांबतो.

हे झाले आमचे, त्याच्याशी वरील लेख रिलेट झाला म्हणून आवडला, आणि त्यातील विचार जवळपास माझेच असल्याने ते पटले. आयुष्य संपत नाही यार असेच. जर ती माझ्या आयुष्यात यायच्या आधीही माझे आयुष्य सुखकरच होते तर ती येऊन जाण्याने अचानक पोकळी कशी निर्माण होईल. बस्स ती आपण स्वत:ला सवय लाऊन घेतलेली असते. प्रेम असतेच, ते राहतेच, माणूस असो वा नसो, पण तो माणूस किंवा कोणत्याही नात्यातला माणूस आपल्याला आयुष्यभर साथ देत नाहीच. मग तो संसाराचा जोडीदार असो, भाऊ-बहीण, मित्र वा आईवडील. या सत्याचा स्विकार केलाच पाहिजे.

पुर्ण लेख छान.:स्मित:
पु. काळे यांनी म्हटलंय, माणसाचं मनच मोठं विचित्र. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो वा विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो. कितीही नाही म्हटलं ना तरी जीवनाचा अर्थ त्याला एकांतातच मिळतो. कारण गर्दीत जरी तो स्वतःला हरवायला शिकत असला तरी एकांतात तो स्वतःला सापडायला शिकतो.>> या ओळी तर चांगल्याच मेळ खातात या तुमच्या लेखाला.

विचार करायला लावणारा विचार.<<माणसाने एकटेपणा घालवला की एकाकीपणाही आपोआप दूर होतो.>> मस्तच अगदी पटले.