कैलास मानससरोवर यात्रा: भाग ७ - ने मजसी ने....

Submitted by Adm on 16 November, 2014 - 21:17

भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024
भाग चौथा : http://www.maayboli.com/node/51358
भाग पाचवा : http://www.maayboli.com/node/51433
भाग सहावा : http://www.maayboli.com/node/51506
-------------------------------------------------------------------

दिवस १७ : तकलाकोट ते गुंजी
लवकर झोपायला गेलो खरे पण नेमकी त्याच रात्री झोप येईना. फुटबॉल मॅचची एक्साईटमेंट, उद्याच्या लिपूलेखच्या प्रवासाचं थोडसं दडपण किंवा प्रवास संपत आल्याची जाणीव अशी कारणं अनेक होती. मग मी आणि केदार बराच वेळ गप्पा मारत बसलो. धर्म, आध्यात्म, घरातलं त्याबद्दलचं वातावरण, स्वतःची मतं वगैरे नेहमीचे यशस्वी विषय होते. अखेर गप्पा आवरत्या घेतल्या कारण उद्याचा मोठा प्रवास होता. आधी २० किलोमिटर बस प्रवास, नंतर ३ किलोमिटर लिपूलेखची चढण नंतर लिपूलेख ते नाभीढांग, नाभीढांग ते कालापानी आणि कालापानी ते गुंजी असे २५/२६ किलोमिटर चालत म्हणजे एकूण २८ किलोमिटरचा ट्रेक होता. लिपूलेखपासून पुढे सगळा उतार आहे. त्यामुळे येताना सारखा नाभीढांगला मुक्काम नव्हता. भारतातून येणारी सातवी बॅच आम्हांला लिपूलेखला भारतीये वेळेनुसार सात वाजता भेटणार होती, त्यामुळे आम्ही ४ वाजता तकलाकोटहून बसने निघणार होतो. मी फुटबॉल फायनल पहाण्यासाठी एकचा गजर लाऊन दीड/ पावणेदोनच्या सुमारास उठलो. बघतो तर मध्यंतर झालेला आणि गोलशून्य बरोबरी होती. माझा जर्मनीला पाठिंबा होता. निर्धारीत वेळ संपली तरी गोल काही झाला नाही. पेनल्टी शुट आऊटची वेळ येऊ नये अशी मनोमन इच्छा होती कारण मेस्सी आणि कंपनीचा पेनल्टी शुट आऊटमध्ये भरोसा वाटत नव्हता. अखेर एक्ट्रा टाईममध्ये जर्मनीने गोल मारला आणि मी पण खोलीत जोरदार ओरडा केला. त्या आवाजाने केदार उठलाच. मग आवरता आवरता बक्षिस समारंभ बघितला. मर्केल बाई भारी उत्साहात होत्या आणि मेस्सीचा चेहेरा अजिबात बघवत नव्हता. मला ती टीम आवडत नसली तरी त्याच्याबद्दल जरा वाईटच वाटलं. माझी आवडती टीम जिंकल्याने मी पण एकदम उत्साहात होतो. फुटबॉल वर्ल्डकपच्या गेल्या पाच फायनल मी डोंबिवली, पुणे, सेंट लुईस, अटलांटा आणि आता तकलाकोट अश्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या, त्यामुळे पुढच्या फायनल साठी नवीन ठिकाणाची शोधाशोध आत्तापासूनच करायला हवी हे ठरवून टाकलं.
तोपर्यंत चहा आणि नाश्ता तयार असल्याची खबर आली. तिथेही मॅचची चर्चा सुरू होती. शिवाय अचानक कुठूनतरी घरी परत गेल्यावर काय काय खायचं ह्याचा विषय निघाला. सगळे एकदम सुटलेच! जोरदार हसाहशी चालू होती. हायमा म्हणे इथे लोकांना 'लो माऊंटन सिकनेस' झालाय. मेंदूला जास्त ऑक्सिजन सोसत नाहीये त्यामुळे हे असं काहीतरी बरळतायत!

सामान ट्रकमध्ये भरून, पुन्हा कस्टमचे सोपस्कार पार पडून तकलाकोट सोडलं. हळूहळू फटफटायला लागलं होतं. लक्षात आलं की हवा ढगाळ आहे. लिपूलेखच्या खाली बस जिथपर्यंत जाते तिथे पोहोचेपर्यंत ढग, वारं, धुकं आणि हलकासा हीमवर्षाव (फ्लरीज) सुरू झाला.

थंडीही खूप होती. बसमधून उतरून छोट्या जीपमध्ये बसलो. बसलो म्हणण्यापेक्षा स्वत:ला त्यात कोंबलं. तशा वातावरणात जीपवाला अगदी कौशल्याने जीप चालवत होता. येताना लिपूलेखमध्ये अगदी व्यवस्थित ऊन आणि अल्हाददायक वगैरे हवा होती. पण सगळे अनुभव यायला हवेत ना, त्यामुळे हवा आता अशी झाली होती. जीपवाला तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणाला 'जल्दी उपर जाईये, बादल खराब हो रहे है!' जीप सोडून सामान पाठीवर घेतलं आणि चालायला सुरूवात केली. जीपने बरच वर आणलं होतं त्यामुळे सुमारे दिड किलोमिटरचाच चढ बाकी राहिला होता. गेल्या आठ दिवसांत इथे बराच बर्फ पडला होता. त्यामुळे बर्फावरूनच चालावं लागत होतं. कुंद हवा, अंगात घातलेले खूप कपडे, पाठीवर जड सॅक, ऑक्सिजनची कमतरता आणि हलकासा हीमवर्षाव ह्यामुळे उघड्यावरही घुसमटायला होत होतं. मजल दरमजल करत पुढे जात राहिलो आणि शेवटची चढण आली. दरम्यान पलिकडून सातव्या बॅचचे यात्री उतरून यायला लागले. ते आमची आपुलकीने चौकशी करत होते आणि प्रवास, दर्शन कसं झालं विचारत होते. काही यात्रीतर आमच्याच पायाला हात लाऊन नमस्कार करत होते. हे असं काही झालं की फार अवघडून जायला होतं. एका काकांना सांगितलं की तुम्ही कैलासाला नमस्कार करा, आम्हांला नको.

शेवटच्या वळणावर आयटीबीपीच्या अधिकार्‍यांचे ओळखीचे चेहेरे दिसले आणि त्यांचं अभिवादन स्विकारत भारताच्या हद्दीत प्रवेश केला. अक्षरश: सुटल्यासारखं झालं! यात्रेआधी चिन सरकार प्रत्येक यात्रीकडून एका निवेदनावर सही करून घेतं त्यात असा मजकूर असतो की जर यात्रेदरम्यान तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमचे 'remaining' (ह्यात तुमचा देहही आला!) भारतात आणले जाणार नाहीत. त्याची तिथेच विल्हेवाट लावली जाईल. आता भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यावर जाणीव झाली की आता काहीही झालं तरी आयटीबीपीच्या मदतीने उभे किंवा आडवे कसे का होईना पण निदान घरी तरी पोहोचू! आमच्या एलओनी चिनी अधिकार्‍यांच्या साक्षीने गुरूला 'फिडबॅक फॉर्म' भरून दिला. त्यात अगदी स्वच्छ शब्दांत 'Not satisfied' असा शेरा मारला. गुरूची अशी अपेक्षा होती की बक्षिशी देऊ नका पण फॉर्मवर असे शेरे मारू नका. पण आम्ही आधी उच्चायुक्ताकडे तक्रारही केली होतीच.

थोडसं पुढे आल्यावर केदारचा घोडेवाला भेटला. त्याने येऊन आधी आमच्या बॅगा घेतल्या. तो म्हणाला कमान खाली नाभीढांगला थांबलाय कारण त्याची तब्येत अजूनही बरी नाहीये. त्याने न सांगता केदारच्या बॅगेबरोबर माझी बॅगही घोड्यावर बांधली. माझं जॅकेट त्या भुरभुर बर्फाने ओलं झालं होतं. पण तो म्हणाला खाली हवा चांगली आहे. रेनकोट घालायची गरज नाही. आता नाभीढांगपर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता असल्याने आम्ही टणाटण उड्या मारत निघालो.

येताना ह्यातला जवळ जवळ पाऊण प्रवास अंधारात केला होता. त्यामुळे नक्की किती चढ चढलो होतो ह्याची आता जाणीव होत होती. मी, केदार, भीम आणि बन्सलजी बरोबर होतो. श्यामला एलओंनी मागे काहितरी कामाला लावलं होतं. आता नाभीढांगला लवकर पोहोचून ॐ पर्वत दिसतो का ते बघायचं होतं. नाभीढांगच्या कॅम्पच्या थोडं आधी एक कोसळलेलं हेलिकॉप्टर दिसलं. ते काही वर्षांपूवी कोसळलं म्हणे. आमच्या बॅचमधल्या अतिउत्साही विरांनी त्या अवषेशांवर बसून स्वतःचे फोटो काढून घेतले!

नाभीढांगच्या कॅम्पला पोहोचेपर्यंत हवा छान उघडली होती. कोवळं ऊन पडलं होतं पण ॐ पर्वत मात्र येताना इतकाही दिसला नाही. संपूर्णपणे ढगात गुडूप होता. भारतात आल्याची पहिली जाणीव म्हणजे पोहोचल्या पोहोचल्या हातात कोमट पाण्यातल्या मधूर सरबताचा ग्लास मिळाला आणि आपुलकीने चौकशी झाली. केएमव्हीएनच्या ह्या आपुलकीची चिनमध्ये फार आठवण व्हायची. एकंदरीत चिनमध्ये फार दडपणाखाली असल्यासारखं वाटायचं, अजिबात मोकळेपणा जाणवला नाही. (ह्याला जोडून 'अमेरिकेत नाही होत कधी असं!!' हे वाक्य मायबोलीवरच्या लेखात टाकलं तर पुढे काय 'चर्चा' होईल ह्याचे मी आणि केदारने थोडावेळ अंदाज बांधले.. ) इतक्यात मागून आलेलं कोणितरी सांगायला लागलं की लिपूलेख चढून वर आल्यावर निलम काकूंना अचानक त्रास झाला. त्यांना गुदमरल्यासारखं होऊन श्वासच घेता येईना. आयटीबीपीच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडर काढून ते लावायची तयारी केली होती पण तोपर्यंत त्या सावरल्या. हा एक प्रसंग वगळता आमच्या संपूर्ण प्रवासात कोणालाही त्रास झाला नाही.

नाभीढांगला गरम गरम चमचमीत छोले आणि गोड दलिया असा नाश्ता मिळाला. तिथल्या थंडीत बसून हे खायला मस्त वाटलं. खाता खाता गप्पा सुरूच होत्या. आम्ही मानससरोवराच्या काठी होतो तेव्हा पौर्णिमा होती तर आज कुठली तिथी असेल असा काहितरी विषय सुरू होता. तर त्यावर केदारने 'आज एकादशी असूच शकत नाही. कारण महिन्यात एकच पौर्णिमा आणि एकच अमावस्या असते तशी एकच एकादशी असते' असं काहीतरी धक्कादायक विधान केलं. केदार सारख्या हिंदू संस्कृतीच्या अभ्यासकाने हिंदू कॅलेंडर संबंधी केलेलं हे विधान ऐकून मला आयुष्यातला सगळ्यांत मोठा धक्का बसला होता! पण मग तो केदारचा दोष नसून नाभीढांगच्या हवेत नसलेल्या ऑक्सिजनचा आहे असं ठरलं. पण तरी मी पुढे केदारला ह्यावरून पिडायची एकही संधी सोडली नाही. काही मंडळी ॐ पर्वत दिसतो का हे पहाण्यासाठी तास दोन तास थांबूया म्हणाली पण तिथे इतके जास्त ढग होते की आम्ही त्या मोहात न पडता पुढे निघायचं ठरवलं. नाभीढांगला कमान भेटला, तसच अभिलाष न येता त्याचा भाऊ आला होता. दोघांनीही आपुलकीने प्रवास कसा झाला वगैरे चौकशी केली.

नाभीढांग ते कालापानी प्रवासही पूर्ण उताराचा होता. बन्सलजी आमच्या बरोबर निघाले पण नंतर मागे पडले. नंतर आम्ही एकेठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलेलो असताना मागून धावत पळत आले आणि म्हणाले आता पुढे गेलात बघा! तुम्हांला गाठायला इतके श्रम होतात आणि गाठलं की तुम्ही पळून जाता. लिपूलेखला असलेल्या ढग, वारा, बर्फाचा आता मागमुसही नव्हता. त्यामुळे पुढचा प्रवास अगदी आरामात होऊन आम्ही १०.३०लाच कालापानीला पोहोचलो. कालापानीला जेवणाची सोय होती पण आम्ही लवकर पोहोचल्यामुळे जेवण तयार नव्हतं. शिवाय इथे परतीची पासपोर्ट तपासणी असल्याने सगळे येईपर्यंत थांबायला लागणार होतं. तिथला माणूस म्हणाला आत खोल्या आहेत तुम्हांला आडवं व्हायचं असेल तर व्हा. रात्री एक पासून जागरण झालेलं असल्याने पडल्या पडल्या लगेच झोप लागली. एकदम स्वप्नच पडायला लागली आणि स्वप्नात काय दिसावं तर ऑफिस !!! प्रवास, सुट्टी संपत आल्याची तीव्र जाणिव मेंदूपर्यंत गेलेली होती तर! अर्ध्या पाऊण तासांच्या त्या झोपेने एकदम मस्त वाटलं. तोपर्यंत बाकीची मंडळीही यायला लागली होती. ॐ पर्वताचं दर्शन झालच नाही. जेवणावर ताव मारून पासपोर्ट घ्यायला गेलो. आता कालापानी कॅम्पवरून भारतात शिरल्याचा शिक्का मारला गेला. कालापानीहून गुंजीपर्यंत आयटीबीपीचा ट्रक जातो असं कळलं. पण तो निघाला तर तीन वाजता निघतो, त्यामुळे त्यासाठी न थांबायचं आम्ही ठरवलं. कारण तीन पर्यंत थांबून ट्रक मिळाला नाही तर पुढचा प्रवास जिवावर आला असता.आता फक्त मी आणि केदारच बरोबर होतो. बाकीचे एकतर पुढे गेले होते, मागे पडले होते किंवा ट्रकसाठी थांबले होते. आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मायबोलीचा विषय फारसा निघाला नव्हता. पण ह्या आठ नऊ किलोमिटर दरम्यान नेहमीचे यशस्वी बाफ, आयडी, गटगातल्या गंमतीजमती वगैरेंबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. गुंजीपासून दोन तीन किलोमिटरवर असताना आयटीबीपीचा ट्रक आम्हांला मागे टाकून पुढे गेला. थांबलेल्या लोकांचा पेशन्स फळला होता!

आज मोठा प्रवास झाला होता, शिवाय आता बरच खाली आल्याने थंडीही कमी होऊन उन्हाचा चटका बसायला लागला होता. एकंदरीत थकायला झालं होतं खरं! साधारण चारच्या सुमारास गुंजीला येऊन पोहोचलो. यात्रा पूर्ण झाल्याबद्दल आयटीबीतर्फे त्यांच्या मेसमध्ये आमच्यासाठी आज 'बडा खाना' आयोजित केलेला होता. त्यावेळी एलओंनी आमच्या बॅचतर्फे आयटीबीपीचे आभार मानले. आयटीबीपीच्या जवानांचं आमच्याशी इतकं आदबीनी वागणं फार अवघडून टाकायचं. त्यांना तसं सांगितल्यावर ते म्हणाले की हा आमच्या कामाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही काही वाटून घेऊ नका. यात्रा पूर्ण झालेली असली तरी बुधी ते गाला दरम्यानच्या प्रवासात येताना सारखीच शक्य तितकी काळजी घ्या, अजिबात हलगर्जीपणा करू नका अशी सुचना द्यायला आयटीबीपीचे अधिकारी विसरले नाहीत.

दिवस १८ : गुंजी ते बुधी
गुंजीला असं समजलं की परतीच्या वाटेवर बुधी ते गाला दरम्यानच्या ४४४४ पायर्‍या टाळून थेट धारचुलाला पोहोचता येतं. ४४४४ पायर्‍यांना असलेला पर्यायी रस्ता नदीच्या पात्रातून जातो आणि गाडी सस्त्यापाशी नेऊन सोडतो. त्यामुळे गालाचा मुक्काम टाळून जीपने धारचुलाला जाता येतं. आता सगळ्यांनाच घरी लवकरात लवकर जायची ओढ लागली होती. त्यामुळे दिवस वाचवून लवकर घरी पोहोचता येईल का ह्याची सगळे जण चाचपणी करायला लागले. पण भक्तगण ग्रुपचं असं म्हणणं होतं की वाचलेल्या दिवशी आपण जागेश्वरला जाऊ आणि तिथे दर्शन घेऊन दिल्लीला ठरलेल्या दिवशीच पोहोचू. मग आम्ही समविचारी लोकांचा कंपू करून बुधीला एलओंशी बोलायचं ठरवलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता बुधीसाठी प्रयाण करायचं होतं. पण झालं असं की हे दिवस वाचायचं ठरलं आणि त्यामुळे आमचं चालायचं अंतरही वाचणार होतं हे लक्षात आलं. त्यामुळे काही यात्रींच्या सुपिक डोक्यातून अशी कल्पना आली की जर आपण कमी अंतर चालणार तर त्या कमी झालेल्या अंतराचे पैसे पोर्टर आणि घोडेवाल्यांच्या पैशांतून कापून घ्यायचे! आता हे घोडेवाल्यांच्या आणि पोर्टरच्या कानावर गेल्यावर अर्थातच ते वैतागले आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं की जर आम्हांला पूर्ण पैसे मिळणार नसतील आम्ही इथून पुढे येणारच नाही. खरतर हे यात्री त्या बिचार्‍या कष्टकर्‍यांची अडवणूक का करत होते काय माहित! इतके पैसे खर्च करून आता ७००-८०० रूपये वाचवण्याची इतकी का धडपड करावी आणि ती ही ह्या अश्या मार्गानी? आमच्या पोर्टर आणि घोडेवाल्यांना खात्री होती की आम्ही पैसे कापणार नाही, पण त्यांना त्यांच्या लोकांच्या विरूद्धही बोलता येईना. त्यामुळे ते आमच्या सॅक घेऊन जरा पुढे जाऊन थांबले. इथे खरतर आमच्या एलओंनी मध्यस्थी करून यात्रींना समजावयला हवं होतं पण त्यांनी त्यांची नेतेगिरी भलतीचकडे केली आणि त्या पोर्टर आणि घोडेवाल्यांनाच धमकावले. सगळ्या यात्रींना सांगितलं की आपण त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. हा निर्णय अत्यंत चुकीचा होता कारण कित्येक ठिकाणी लोकांना पोर्टरचा हात धरल्याशिवाय चालता यायचं नाही. निर्णय चुकीचा होता ह्याची प्रचिती गुंजीच्या कॅम्पबाहेरच्या पहिल्याच उतारावर आली. मी स्वतःच एकावेळी निलम काकू, गुप्ते बाई आणि मराठे काकांना मदत करत होतो आणि बाकी प्रत्येक जण कोणाना कोणा ज्येष्ठ नागरीकांना मदत करत होता. तो उतार गेल्यावर सगळ्यांनाच जाणवलं की हे वाटतं तितकं सोपं नाहीये. मग ज्यांची पैशांबद्दल कटकट नव्हती त्यांनी आपल्या पोर्टरना पूर्ण पैसे देऊ सांगितलं आणि मग बाकीच्यांनाही तयार केलं. अखेर सगळा जत्था बुधीच्या दिशेने निघाला.

वाटेत गरब्यांग लागलं. येताना आम्ही इथे समोसा खाल्ला नव्हता. आज आम्हीच कमानला म्हटलं की समोसा खाऊ. मग तिथल्या एका टपरीवर एकदम चविष्ठ समोसा खाल्ला. थोडं पुढे आलो तर गुंजीच्या दिशेने जाणार्‍या आठव्या बॅचमधली लोकं भेटायला लागली. बरीच मराठी मंडळी भेटली. त्यांनी माहिती विचारली. मग आमच्या जवळ उरलेले युवान लगेच त्यांना विकून टाकले. एलओ म्हणे, हे बरय तुम्ही इथे हवाला सुरू केला.
आता चियालेखच्या मागच्या बाजूची चढाई लागली. लिपुलेख, डोलमा वगैरेच्या चढाया करून झालेल्या असल्याने ही चढाई येताना पेक्षा बरीच सौम्य वाटली. चक्क व्यवस्थित श्वास घेता येत होत आणि छाती आत्ता फुटेल की मग असं वाटण्याइतकी जोरात धपापत नव्हती.. !

येतानापेक्षा चियालेखच्या खाईत बरीच फुलं फुललेली दिसत होती. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसाचा परिणाम असावा. पासपोर्टची अखेरची तपासणी झाली आणि आम्ही चियालेखच्या माथ्यावर पोहोचलो. इथे मस्त ढगाळ हवेत गरम गरम छोले पुर्‍या खाल्ल्या. आता चार किलोमिटरचा उतार उतरला की बुधीचा कॅम्प! 'चढापेक्षा उतार त्रासदायक' ह्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं. ही चार किलोमिटरची उभी उतरंड उतरताना पायात चांगलेच गोळे आले. नेहेमीप्रमाणे आम्ही लवकर बुधीला येऊन पोहोचलो. त्या पायातल्या गोळ्यांनी हालत इतकी खराब झाली की कॅम्पमधल्या चार पायर्‍या उतरतानाही झोकांड्या जायला लागल्या.

आमच्या बॅचमध्ये डॉक्टर मयुरीबेन साधारणपणे सगळ्यात शेवटी कॅम्पवर पोहोचायच्या. आम्हांला आतल्या गोटातून अशी खबर कळली होती की त्यांच्याकडे खूप खाऊ शिल्लक आहे. बुधीला सगळ्यांना फारच भुक लागली होती आणि जेवायला अवकाश होता. त्यामुळे सगळेजण मयुरीबेनची फार आतुरतेने वाट पहात होते. त्या आल्याआल्या सगळ्यांनी त्यांना गरडा घातला. आपल्या येण्याची इतकी जणं वाट बघत आहेत हे पाहून त्यांचा थकवा एकदम पळूनच गेला. त्यांनी बराच गुज्जू खाऊ काढून दिला आणि आम्ही यछेच्छ ताव मारला.
काही वेळाने बरेच गावकरी कॅम्पच्या दिशेने धावत यायला लागले. आम्हांला कळेना की झालं काय. थोड्यावेळाने एक हेलिकॉप्टरही घोंगावायला लागलं. हल्ली रुग्णांना शहरातल्या दवाखान्यात हलवायचं असेल तर हेलिकॉप्टरची सोय केलेली आहे. गावातल्या एका रुग्णाला तातडीने शहरात न्यायचं होतं म्हणून हेलिकॉप्टर आलं होतं. आमच्या कॅम्पजवळ हेलिकॉप्टर उतरायची सोय होती. त्यामुळे सगळेजण कॅम्पवर आले होते. अशी सोय मर्यादीत प्रमाणात का होईना पण उपलब्ध होत असेल तर ते गावकर्‍यांच्या दृष्टीने फार चांगलं आहे.
काल ठरवल्याप्रमाणे बुधीला एलओंशी बोलायचं होतं पण एलओ संध्याकाळच्या मिटींगला आलेच नाहीत. त्यांनी फक्त निरोप पाठवला की उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आणि नदीला पाणी नसेल तर थेट धारचुलाला जायचं. अर्थात आम्ही नंतर त्यांना पकडलच. पण दिल्लीला लवकर पोहोचायची आमची मागणी त्यांनी सपशेल फेटाळली. म्हणे परराष्ट्र मंत्रालयातून सक्त ताकीद मिळाली आहे की वेळापत्रकात बदल करून लवकर यायचं नाही कारण त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेचा बोर्‍या वाजतो आणि ऐनवेळी धावपळ होते. आम्ही म्हटलं धारचुलाहून दिल्लीला आम्ही आमचं जातो कारण तिथून थेट बसही मिळू शकते. तर त्यालाही नाही म्हणे. मी तुम्हांला absconding जाहीर करेन! एकंदरीत आमच्या एलओंचे नेतृत्त्वगुण फार भारी नव्हते हे लहान सहान प्रसंगांवरून दिसून यायचं. सगळ्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली पण काही उपयोग नव्हता. अखेर सगळे जण तो प्रकार विसरून जाऊन पुन्हा टवाळक्या करायला लागले.

दिवस १९ : बुधी ते धारचुला
आज बुधी ते गाला/धारचुला हा प्रवासातला शेवटचा अवघड टप्पा होता. पुन्हा कालीनदीच्या काठूनचा तो अरूंद रस्ता, खालून रोरावणार्‍या कालीनदीचा प्रवाह आणि आज भरीस भर म्हणून पाऊस. जर आम्ही धारचुलाला गेलो असतो तर आजचा शेवटचा ट्रेक. आत्तापर्यंत कुठेही पाऊस लागला नाही, पण हा ही अनुभव हवाच. त्यामुळे शेवटच्या दिवशी पाऊस आला. बुधीहून निघायच्या आधीपासून पाऊस सुरूच होता. त्यामुळे निघतानाच रेनकोट चढवून निघालो. कमानने सांगितलं की मी सांगेन तिथेच फोटो काढायला थांबायचं. जर पाऊस वाढला तर कॅमेरा आत ठेऊन द्यायचा. म्हटलं ठिक आहे बाबा. व्यवस्थित घरी पोहोचलो तर त्या फोटोंचा उपयोग. त्यामुळे तू सांगशील तसं. ऊन नसल्याने आज थकायला अजिबात होत नव्हतं. पावसामुळे सगळी हिरवळ मस्त टवटवीत झाली होती आणि सावलीमुळे हा परिसर आज अजूनच सुंदर दिसत होता. पण वाट घसरडी झालेली होती, चिखल होता शिवाय घोड्यांची तसच प्रवाशांची ये-जा आज जास्त होती. त्यामुळे खूपच काळजीपूर्वक चालावं लागत होतं. सगळे निवांतपणे आपापल्या लयीत चालले होते. जेवायच्या ठिकाणी समजणार होतं की आम्ही थेट धारचुलाला जाणार की ४४४४ पायर्‍या चढून गालाला जाणार. खरतर त्या पायर्‍यांचे कष्ट वाचावे असं वाटत होतच पण आज ट्रेक संपणार ह्याबद्दल हुरहुरही वाटत होती. गेले तीन आठवडे दिवसभर चालायचं, मस्त दमायचं, छान अंघोळ करायची, पोटभर जेवायचं आणि ताणून द्यायची, शिवाय गप्पाटप्पा, टिंगळ-टवाळ्या, शुद्ध हवा, वेळच वेळ, ट्रॅफिक नाही, घाई नाही, कसलीही चिंता नाही असं सगळं सवयीचं होऊन गेलं होतं. ते सगळं आज संपणार होतं!
त्यामुळे ह्या शेवटच्या नितांत सुंदर रस्त्याचा क्षण अन् क्षण सगळे जण अनुभवत होते. लामारी कॅम्पला जाताना प्रमाणेच चहा मिळाला आणि मग मालपाला जेवायला थांबलो. थोड्यावेळाने एलओ आणि केएमव्हिएनचे गाईड जोशीजी आले. त्यांनी सांगितलं की नदीपात्रात रस्ता चालू आहे, त्यामुळे त्या मार्गाने गाडी रस्त्यापर्यंत जा. तिथे जीपची व्यवस्था केलेली आहे. आमच्या ट्रेक आज संपणार हे नक्की झालं. जेऊन पुढे निघालो. पायर्‍याच्या सुरुवातीला खाली जाणारी एक छोटी वाट होती. ती नदीच्या प्रवाहाच्या अगदी जवळून, दगडांवरून जात होती. ही वाट बर्‍यापैकी अवघड होती. पण पुढे बघितलं तर गावातले लोकं सर्रास त्या रस्त्याने ये-जा करत होती. शाळेतली छोटी छोटी मुलंही एकटी तिथून जात होती. तो रस्ता जरी त्यांच्याकरता रोजचा आणि सवयीचा असला तरी त्या मुलांना असं एकटं-दुकटं जाताना बघून भितीच वाटली! ह्या रस्त्यावर दोन तीन ठिकाणी वरून पडणार्‍या झर्‍यांच्या मधून जावं लागलं. पण शेवटचाच दिवस असल्याने त्याचीही मजा वाटत होती. कपडे वाळले नाही तर काय वगैरे काही भिती नव्हती. आता डोंगरावरून दिसणारा गाडी रस्ता दिसायला लागला. शेवटी साधारणा ८०० मिटरची उभीच्या उभी जवळ जवळ ७० अंश कोनातली चढण आली. ती चढून वर गेलं की गाडी रस्ता लागणार होता. ह्या चढणीवर दगड लाऊन 'क्रुकेडेस्ट स्ट्रीट' सारखी वळणा-वळणांची वाट बनवली होती. तिच्या पायथ्याशी उभं राहून वर पाहिलं तर छातीच दडपावी अशी चढण होती ती. सौम्या म्हणायला लागला मी येतच नाही वर, माझं जे काय करायचं ते इथेच करा! पोर्टरने आणि इतरांनी बरच समजावून त्याला वर नेलं. मी, केदार आणि भीम साधारण ५-७ मिनीटे खाली थांबलो, पाणी प्यायलं आणि मग हिय्या करून निघालो. मस्त दमछाक होत वीस-बावीस मिनिटांत वर पोहोचलो. ट्रेकचा शेवट ह्या अश्या दणदणीत चढणीने व्हावा ह्याचा आम्हांला फार आनंद झाला! मात्र बर्‍याच यात्रींची ह्या चढावर वाट लागली. घोड्यावर बसावं तर ते फारच भितीदायक होतं, कारण एकतर घोडा दरीच्या बाजूने चालतो आणि चुकून खाली लक्ष गेलं तर भोवळ येईल असं दृष्य आणि घोड्यावर न बसावं तर प्रचंड दमछाक! काहीजण तर अक्षरश: रडकुंडीला आले.

वर एका टपरीवर जेवायची व्यवस्था केलेली होती आणि जीपही तयार होत्या. कमान तसच घोडेवाल्याला निरोप द्यायची वेळ आली होती. त्यांचे पैसे तसेच बक्षिशी त्यांना दिली. कमानने त्याचा पत्ता, फोन नंबर दिला. म्हणे परत आलात तर नक्की मला फोन करा. मी माझ्याजवळचे काही कपडे, जॅकेट, रेनकोट वगैरे त्याला दिलं. म्हटलं तुला हवं तर तू वापर नाहीतर गावात कोणाला तरी दे. ह्या गोष्टी डोलमापासमध्ये टाकण्यापेक्षा ह्यांना दिल्या तर कोणीतरी वापरेल तरी. आम्हांला पोर्टर, घोडेवाले किंवा कॅम्पमधले कर्मचारी कोणाचाही काही त्रास झाला नाही. सगळे अतिशय चांगले वागले. पुढे एका बस ड्रायव्हरने येऊन सांगितलं की 'पुरे बॅचमे आपका ग्रुपही हमसे तमिजसे बात कर रहा है..'. त्याला म्हटलं, आम्ही असू कितीही भारी पण ते आमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये, पण आत्ता तूच महत्त्वाचा आहेस ना.. आम्हांला थोडीच हिमालयात बस चालवता येणार आहे. त्यामुळे तमिज सोडून करणार काय? माझी आई नेहमी सांगते की बोलणं जरा गोड ठेवलं आणि हात थोडा सैल ठेवला की समोरचा सगळी मदत करतो. महत्प्रयासाने का होईना दोन्ही गोष्टी थोड्याफार जमवल्या खर्‍या!
जीपचा तासभर प्रवास झाला आणि दरड कोसळून रस्ता बंद झालेला दिसला. थोडावेळ थांबलो पण बुल्डोझर यायची चिन्ह दिसेना. ढिगार्‍याच्या पलिकडेही काही जीप थांबलेल्या दिसल्या. मग केदारने जाऊन त्या जीपवाल्याला पटवलं आणि आम्ही त्या बाजूच्या जीपमध्ये आणि ते लोकं आमच्या जीपमध्ये असं साटंलोटं करून पुढचा प्रवास सुरू केला.
धारचुलाच्या गावात शिरता शिरता हे सुंदर इंद्रधनुष्य दिसलं. प्रवासाची रंगिबेरंगी सांगता झाली!

दिवस २० : धारचुला ते पिठोरागड
आता गालाच्या वाचलेल्या मुक्कामाऐवजी धारचुला ते दिल्ली प्रवासात पिठोरागड आणि जागेश्वर असे दोन मुक्काम होते. पुन्हा एकदा जागेश्वरला न जाता थेट पिठोरागड ते दिल्ली असा प्रवास करावा का ह्यावर बरच चर्वितचर्वण झालं पण काही जणांना जागेश्वरला दर्शन घेऊनच पुढे जायचं होतं. म्हटलं आता एव्हडं महाकैलासाचं दर्शन झालं की! पण शेवटी दोन्ही मुक्काम करायचे असं ठरलं.

धारचुलाहून पुन्हा एकदा त्या पाय ठेवायला जागा नसलेल्या बस मधून निघालो. धारचुला ते पिठोरागड प्रवासादरम्यान मिरथीचा कॅम्प लागला. आमच्या बॅचच्या कॉमन फंडमधून उरलेले पैसे आम्ही आयटीबीपीच्या शाळेला देणगी म्हणून दिले. मिरथीच्या कॅम्पवर पुन्हा एलओंनी बॅचतर्फे आयटीबीपी तसच केएमव्हिएनचे आभार मानले. आयटीबीपीतर्फे सगळ्या यात्रींना यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याचं प्रशस्तीपत्रक तसच बॅचचा लॅमिनेट केलेला फोटो दिला गेला. हा समारंभही आयटीबीपीच्या शिस्तीत पार पडला.

पिठोरागडला चारच्या सुमारास पोहोचलो. पिठोरागड डोंगरदर्‍यांवर वसलेलं एकदम टुमदार गावं आहे. जिल्ह्याचं ठिकाण असल्याने मोठं आहे. संध्याकाळ मोकळी असल्याने आम्ही बाजारात चक्कर मारली. तिथेही आम्हांला बघून लोकं कुठून आलात, कश्यासाठी आलात वगैरे चौकशी करत होते. कैलासमानसला जाऊन आलो आहे म्हटल्यावर काहींनी फळं देऊ केली! एकंदरीत त्या बाजारात आम्ही प्रचंड खा खा केली. गरम गरम जिलब्या, भजी नंतर एका हॉटेलात चाट, डोसे, चायनीज जे काय असेल ते मागवून खाल्लं. नंतर एका मिठाईच्या दुकानात गेलो. श्यामला म्हटलं काय चांगलं असेल, तर तो म्हणे सगळच थोडं थोडं घेऊ. मग किलोभर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई घेऊन तिचा फडशा पाड्ला. सौम्या आणि रानडे गेस्ट हाऊसलाच थांबले होते. उरलेली मिठाई त्यांच्यासाठी बांधून घेऊन आलो. ते म्हणे तुम्ही असे दुष्काळी भागातून आल्यासारखे काय खात सुटला आहात? त्या रात्री इंग्लंड विरुद्धची क्रिकेटची मॅच बघत बसलो.

दिवस २१ : पिठोरागड ते जागेश्वर
दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर उठून जागेश्वरला जायला निघालो. आता तीन दिवसांत आम्ही घरी पोहोचणार होतो!
जागेश्वर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक असं शंकराचं देवस्थान आहे. पिठोरागड ते जागेश्वर अंतर फार नाहीये. त्यामुळे दुपारपर्यंत पोहोचून जाऊ असा अंदाज होता. मात्र पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. प्रवासाचा वेग कमी होता. प्रवास होता मात्र सुंदर. अगदी हिमालयातला प्रवास असतो तसा. मधे एकेठिकाणी झाड रस्त्यात पडलेलं होतं. ते आम्हीच मिळून बाजुला करून बस जाण्याइतकी जागा काढली.

अजून पुढे आलो तर दरड कोसळलेली दिसली. हा दरड मोठी होती आणि अजूनही वरून राडारोडा रस्त्यात येऊन पडतच होता. समजलं की बुल्डोजर येतो आहे. नंतर गावकरी सांगत आले की पुढे दोन अडीच किलोमिटरवर ह्यापेक्षाही मोठी दरड आहे आणि बुल्डोजर तिथे येऊन काम करत आहे. मग बस मधून उतरून चालत त्या दुसर्‍या दरडीपाशी गेलो.

तिथला ढिगारा खरच खूप मोठा होता आणि एका बुल्डोजरने तो हटेना. साफ केलं की पुन्हा वरून कोसळत होतं. मग त्यांनी दुसरा बुल्डोजर बोलावला. एलओने तिथेही उगीच नेतेगिरी करून त्या काम करणार्‍या लोकांना दरडावलं. मधे एक टपरी सापडली. तिथे चहा, मॅगी, भजी , बिस्कीटं असं काय काय मिळत होतं. केदार आणि फुडकमिटीने मिळून सगळ्या बॅचसाठीच चहा, खाणं मागवलं. तो टपरीवाला इतकी मोठी ऑर्डर बघून एकदम खुष झाला. म्हणे माझा जेव्हडा शिधा एक महिना पुरतो, तो आज एका दिवसातच संपणार आहे! आता खूप उशीर झालेला असल्याने आणि हवा चांगली नसल्याने खरोखरच जागेश्वरला जायचं की थेट भीमताल/ नैनिताल/काठगोदामला मुक्काम करायचा ह्यावर बरीच चर्चा झाली. एलओ सकट आमच्या कंपूचं म्हणणं होतं की पुढेच जाऊ. पण भक्तगणांनी जागेश्वरला जायचच म्हणून खूपच ओरडा केला. शेवटी एलओंनी सांगितलं की परिस्थिती पाहून जो काय निर्णय असेल तो मी घेणार आहे! केएमव्हिएन गाईड जोशीजींनी बरीच फोनाफोनी करून कुठे रहायची सोय होईल का ह्याची चौकशी केली. मग असं ठरलं की जर इथून निघायला बराच उशीर झाला तर जागेश्वरला रहायचं कारण ते जवळ आहे आणि त्यामुळे रात्रीचा प्रवास टळेल. ह्या सगळ्या फोनाफोनी दरम्यान एक रोमहर्षक घटना घडली. जोशीजींचा फोन बंद पडत होता. त्यामुळे ते मधेमधे माझा फोन वापरत होते, त्यामुळे कधी त्यांना येणारे फोन मी उचलत होतो, निरोप देत/घेत होतो, बोलणं अर्थातच हिंदीत सुरू होतं. सगळं बोलणं झाल्यावर त्यांनी मला विचारलं की तू कुठून आलास. मी सांगितल्यावर ते म्हणे, 'आपकी मातृभाषा हिंदी न होते हुए भी आप बोहोत अच्छा हिंदी बोल लेते है! आजकल ये देखनेको नही मिलता!' मी त्यांना म्हटलं तुम्ही प्लिज लगेच, आत्ताच्या आत्ता हे माझ्या घरी आणि मित्र-मैत्रिणींना फोन करून सांगा किंवा परत बोला म्हणजे मी ते रेकॉर्ड करून घेतो. एखाद्या 'तेहेजीब से' हिंदी बोलणार्‍या उत्तर प्रदेशीय माणसाने माझ्या हिंदीचं कौतूक केलेलं बघून मला एकदम 'सातवे आसमानपर' गेल्यासारखं वाटलं !!
आम्हांला इथे अडकून पडून आता जवळ जवळ साडेतीन तास झाले होते. तो दुसरा बुल्डोजर एकदाचा आला. तो जास्त शक्तीशाली होता. त्या दोघांनी मिळून वाहतूक सुरू होईल इतका रस्ता उघडला आणि मग आमच्या बसजवळच्या दरडीपाशी आला. तिथला आता ढिग वाढला होता. पण त्याने ते भराभर साफ केलं आणि अजून राडा यायच्या आत पुढे हला असं सांगितलं. वरून लहान लहान दगड असूनही पडतच होते. त्यामुळे बस तिथून जात असताना जरा भिती वाटली. ह्या दरडींमुळे आम्ही तब्बल सहा तिथे अडकून पडलो होतो आणि जेवणाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळचे साडेचार झाले. पाऊस अजून सुरूच होता. जेवणं आटोपून जागेश्वरला जायला सात वाचले. देऊळ आठला बंद होतं आणि त्याआधी आरती, पुजा असते. देवळातल्या पुजार्‍यांनी लगेच यायला सांगितलं. ह्या देऊळाच्या परिसरात खूप देवळं आहेत. एकंदरीत परिसर सुंदर आहे.

देवळाच्या गाभार्‍यातही छान, प्रसन्न वाटत होतं पण यात्रींनी जास्तितजास्त पुढे जाण्यासाठी चक्क धक्काबुक्की केली! गर्दी पांगल्यानंतर छान दर्शन झालं. आजचा प्रवास दरडीमुळे कंटाळवाणा झाला होता शिवाय उद्या दिल्लीपर्यंत मोठा प्रवास असल्याने आणि हवा चांगली नसल्याने पहाटे चार वाजता निघायचं होतं.

दिवस २२ : जागेश्वरे ते दिल्ली
सकाळी काही मंडळी पुन्हा देवळात जाऊन दर्शन घेऊन आली आणि आम्ही सव्वाचार साडेचारला निघालो. आज सात साडेसातच्या सुमारास नाश्ता अल्मोड्याला तर बाराच्या सुमारास जेवण काठगोदामला होतं. काठगोदामहून पुढे वॉल्वो बस मिळणार होती. एकंदरीत ह्या यात्रेमध्ये गणपतीबाप्पाचा फारच अनुल्लेख होतो. प्रवासाच्या सुरूवातीला 'हरहर महादेव', 'वीर बजरंगी जयवीर हनुमान', मग कुठली तरी दत्ताची घोषणा असं काय काय म्हणायचे पण 'गणपती बाप्पा मोरया' नाहीच! होमहवनाच्या सुरूवातीलाही गणेश पुजन झालं नाही. प्रत्येक गोष्टीची 'श्री गणेशाय नमः' ने सुरूवात करणार्‍या मराठी मंडळींना शेवटी शेवटी हे फारच जाणवायला लागलं. मग आज चौबळ साहेबांनी त्यांच्या मोबाईलवरची गणपतीच्या गाण्यांची मोठी प्लेलिस्ट ऐकवून सगळ्यांना गणपतीबाप्पाची आठवण करून दिली!

पाऊस सुरू होता परंतु तरीही वेळेत अल्मोड्याला पोहोचलो. पुन्हा पुरीभाजी किंवा छोले नको असं म्हणत असतानाच गरम गरम बटाट्याचे पराठे दिसले. सगळे अक्षरशः त्या पराठ्यांवर तुटून पडले. पुढचा प्रवास सुरू झाल्यावर कोणीतरी भजन म्हणायला सुरूवात केली. ते संपल्यानंतर आम्ही त्या भजनाचं शेवटचं अक्षर घेऊन कोणालातरी पुढचं भजन म्हणायला सांगितलं. अल्मोड्यापर्यंतच्या प्रवासात सगळ्यांची चांगली झोप झाली होती आणि आता पोटही भरलं होतं, शिवाय अंताक्षरीची झलक दिसल्यावर सगळे एकदम उत्साहात आले. बायका विरूद्ध पुरूष अश्या पार्ट्या पडून अंताक्षरी सुरू आणि मग लोकांनी जे काय सुर लावलेत त्याला तोड नाही. यात्रेदरम्यान 'ही असली' गाणी म्हणण्याचा भानुभाई पटेल, कृष्णा वगैरेंनी निषेध करायचा प्रयत्न केला पण त्यांना कोणी दाद दिली नाही. तिकडून निलम काकू, अंजू, हायमा, मयुरीबेन वगैरे तर इकडून केदार, मी, भीम, श्याम, अनिरुद्ध, मलकेशभाई वगैरे खिंड लढवत होतो. केदारने काही काही गाणी 'ऑन द फ्लाय' रचली. अंताक्षरीतली अजून एक मजा म्हणजे मी 'या अली' गाणं कडव्या आणि मधल्या म्युझिक सकट अगदी ताला सुरात म्हटलं आणि थोड्यावेळाने निलम काकूंनी तेच म्हणायला सुरूवात केली. त्यांना म्हटलं आत्ता हेच ते गायलं की पाच मिनीटांपूर्वी !! तर त्या अगदी दिल्ली ढंगात म्हणे 'हँ, वो ये गाना था, हमे पताही नही चला...' म्हटलं झालं, सगळं मुसळ केरात! हायमा मला आणि केदारला म्हणायला लागली की तुम्ही संगीताच्या क्षेत्रात न जाता आयटीत गेलात ते फार बरं झालं, नाहीतर भारतीय संगीत बंद पडलं असतं.
ह्या अंताक्षरीमुळे प्रवास बराच सुसह्य झाला. पायांना होणारी अडचण जाणवली नाही, तसच कंटाळा आला नाही.
काठगोदामला समितीतर्फे पुन्हा एकदा हार, तुरे, सत्कार झाला. केएमव्हिएनतर्फे प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू मिळाल्या. काठगोदामला व्हॉल्वोत बसलो. एव्हड्या मोठ्या लेगस्पेसचं करायचं काय ? पाय नक्की कुठे कुठे ठेवायचे ? असे प्रश्न पडायला लागले! काठगोदामपासून यात्री पांगायला सुरूवात झाली. रामनरेशजी उत्तराखंडातले असल्याने ते तिथूनच घरी गेले, रामसेवकजी रस्त्यात उतरून बिहारमधल्या त्यांच्या गावी गेले. आता खरच प्रवास संपल्याची जाणीव झाली आणि फारच रुखरुख वाटायला लागली.
ह्या प्रवासातही बसमध्ये बराच दंगा झाला. दिल्लीच्या बाहेर बराच ट्रॅफिक लागेल आणि आम्हांला उशीर होईल असा स्थानिकांचा अंदाज होता, पण चक्क फारसा ट्रॅफिक नव्हता. दिल्लीच्या जवळ आल्यावर एकदम ट्रॅफिक, गर्दी, आवाज, धुळ, धुर सगळ्याची जाणीव झाली. मजल दरमजल करत साडेसहा सातला गुजराथी समाजात पोहोचलो. तिथे परत हार, टिळे, आरती वगैरे झालं. दिल्लीकरांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. सगळेच सगळ्यांचं अभिनंदन करत होते, जोरदार गप्पाटप्पा चालल्या होत्या. दिल्ली सरकार तसच परराष्ट्र मंत्रालयातर्फेही यात्रा पूर्ण झाल्याची प्रशस्तीपत्रक मिळाली. तेव्हा अंजू मला एकदम म्हणाली, 'जरा बताओ तो आप कहा तक पढे हो?' मी म्हटलं बापरे ही एकदम माझं शिक्षण का काढायला लागली. सांगितल्यावर म्हणे 'क्या वो पढाई खतम होने पर भी इतने सर्टीफिकट्स मिले थे ? जितने यहा मिल रहे है ?' ते मात्र खरं होतं अगदी! आरतीनंतर प्रसाद म्हणून खूप भारी चवीची रबडी मिळाली. केदार आणि रानड्यांनी खूप गोड खूप गोड करत खाल्ली नाही आणि माझ्याकडे बरेच तुच्छ कटाक्ष टाकले. पण मी अजिबात लक्ष न देता दिलेली सगळी संपवली.
सामानाचा ट्रक आल्यावर दिल्लीकर निघायला लागले. घरी जायची ओढ सगळ्यांना होतीच पण ते निरोप घेणं नको वाटत होतं. सौम्या, अंजू, निलम काकू वगैरे मंडळी घरी गेली. रानडे त्यांच्या मित्राकडे गेले. आम्ही खोलीत येऊन दुसर्‍या दिवशीच्या विमान प्रवासाच्या दृष्टीने सामान बांधून टाकलं. केदार एकंदरीत त्या दिवशी गुजराथी समाजात झालेल्या आरती, पुजा वगैरेला बराच वैतागला होता. म्हटलं नको त्रास करून घेऊस. आता एकच रात्र फक्त!

दिवस २३ : दिल्ली ते पुणे
आमचं विमान दुपारचं होतं त्यामुळे सकाळी वेळ असल्याने मायबोलीकर अल्पनाला भेटायचं ठरलं होतं. आम्ही लवकर पोहोचल्याने चांदनी चौकातलं गालिबचं घर बघायला गेलो. नंतर हल्दीराममध्ये अल्पनाला भेटलो. ती फोटोतल्या पेक्षा फारच वेगळी दिसते. त्यामुळे आम्हांला वाटलं की तोतया अल्पना आली की काय. भीमही आमच्याबरोबर होता. फक्त एका वेबसाईटवरच्या ओळखीवर एकटी मुलगी दोन अनोळखी मुलांना भेटायला आली आणि भेटल्यानंतर आम्ही तिघेही वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारख्या गप्पा मारतो आहोत ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं! त्याला म्हटलं ओळख आहेच वर्षानुवर्षांची, फक्त प्रत्यक्ष भेटलो नव्हतो कधी. केदार आणि अल्पनाचं मराठवाडा कनेक्शन असल्याने त्यांच्या बर्‍याच ओळखी निघाल्या. हल्दीराममध्ये दहीभल्ले, कचोरी वगैरेंवर ताव मारला.

नंतर परत खुर्चन मिळवायचा प्रयत्न केला पण ते नसल्याने रबडीवर समाधान मानून घेतलं.
मला घरी नेण्यासाठी मिठाई घ्यायची होती. केदारने तसं करण्यापासून मला परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला. शिवाय अल्पनाने दिल्लीतली मिठाई कशी ओव्हररेटेड असते, आम्ही कशी घेत नाही वगैरे मुद्दे मांडून त्याला माफक साथ दिली. शेवटी मी म्हटलं तुमच्या मराठवाड्यात कायमच दुष्काळ असल्याने तुम्हांला गोड खायची सवय नाही. तेव्हा मला घेऊ द्या. अल्पनाने दुकान आणि मिठाईबाबत चांगल्या सुचवण्या केल्या. दोड्डा बर्फी आणि घिवर फार अप्रतिम होतं!
परतीचा विमानप्रवास विनासायाय पार पडला. मी झोपायचा, वाचायचा प्रयत्न केला पण काहीच जमलं नाही. महिन्याभराच्या प्रवासातल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. शिवाय कधी एकदा रियाला भेटतो असं झालं होतं. एअरपोर्टवर सगळ्यात शेवटचा निरोप केदारचा घेतला. आम्ही दोघांनीच 'नम: पार्वतीपदे.. ' ची घोषणा दिली.
आई, वहिनी, शिल्पा आणि रिया घ्यायला आल्या होत्या. मी महिनाभर दाढी केली नव्हती, केस वाढले होते आणि बराच बारीकही झालो होतो (म्हणे) त्यामुळे त्यांनी मला दुरून ओळखलच नाही! रियानेही 'मी बाबाला ओळखलं नाही' असं जाहिर करून टाकलं पण जरावेळाने माझ्याकडे आली. तिला उचलून घेतल्यावर अगदी बरं वाटलं. माहिनाभराचे सगळे श्रम पळून गेले पण अतिशय सुंदर,अविस्मरणीय आणि हव्याहव्याशा वाटणार्‍या अश्या यात्रेच्या आठवणी मात्र कायम राहिल्या!

-----------------------

समारोप : http://www.maayboli.com/node/51589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी हूरहूर लागतेच अगदी

मस्त लिहिलेयस

आता पुढच्या वर्षी कोण कोण मायबोलीकर जाणार कैलास मानस ला ?

सुंदर लेखमालिका. छोट्या छोट्या डीटेल्सनी खूप मजा आणली. तुम्हा दोघांमुळे घरबसल्या यात्रा केल्याचा आनंद मिळालाय.

अ‍ॅडमिन याची प्लीज लेखमाला कराल का हो?

वा! वा! मस्तच शेवट Happy

पहिला फोटो डेंजर आहे एकदम!

परतीच्या प्रवासाचं वर्णन सुरू झाल्यापासूनच जाताना उतरलेल्या ४४४४ पायर्‍या येताना कशा चढलात - याची उत्सुकता होती. पण ती वेळच आली नाही तर.

स्वप्नात ऑफिस, महिन्यात एकच एकादशी >>> जाम हसले याला Biggrin

खरंच सुंदर झाली ही लेखमालिका. आम्हांला पण आता हे वाचायला मिळणार नाही याची हूरहूर लागेल.

हिमालयातल्या फोटोंइतकाच शेवटचा फोटोही कातिल आहे एकदम. Proud

धन्यवाद पराग घरबसल्या यात्रा घडवल्याबद्दल.

केदार आहे नां अजून यात्रेतच अडकलेला?

मस्त झाली लेखमालिका. आता पुढच्या भागाची वाट बघायची नाही हे जाणवून थोडं खट्टू वाटलं.

दोन एकादश्या ---- एक केदार एकादशी व एक पराग एकादशी

खूप छान लिहिलं आहेस पराग. Happy
पूर्ण लेखमालिका आवडली. आता अगदी (लेखमालाही संपल्यामुळे) कृतकृत्य वाटत असेल ना Happy

यात्रा पूर्ण केल्याबद्दल तुम्हा दोघांनाही शाबासकी! आणि व्हर्च्युअल पायलागू Wink

खुप सुरेख झाली हि मालिका.
फोटो आणि डिटेल वर्णणामुळे. Happy
पुढचा भाग नसणार याची चुटपुट लागली. Happy

दोन एकादश्या ---- एक केदार एकादशी व एक पराग एकादशी>>>> Happy Happy

सगळेच लेख छान झालेत. एका पेक्षा एक सुंदर फोटो आहेत सगळ्या लेखांमधले.

यामुळे आम्हांला वाटलं की तोतया अल्पना आली की काय>>> हो तिथे तूच म्हणालास ना अल्पनाचा डुआयडी आलाय का? Happy
तिथेही ट्रेक कसा झाला हे सांगण्यापेक्षा दोघांनाही माबोवर सध्या काय खास चालू आहे? कुठले बाफ पेटले आणि कुठले बंद पडले हे आधी विचारलं. Lol

व्वा...सुन्दर सान्गता झाली प्रवासाची! Happy
बुधी ते धारचुला प्रवासातली ती ७० अन्शातली चढण बघुन खरच धडकी भरली.

सुन्दर आणि सुरेख प्रवासवर्णन, सुन्दर ट्रेक, सुन्दर देवदर्शन, सुन्दर आत्मदर्शन सर्व एकाच वेळी घडते फक्त हिमालयात.

ह्म्म्म्म. संपला प्रवास! Happy

सुरेख झाली लेखमालिका. फोटो तर उच्च आहेत. दोघांनीही लिहिलेत, पूर्ण केलेत म्हणून तुमचे स्पेशल आभार. आम्ही कैलासची परिक्रमा करायची गरजच राहिलेली नाही. या लेखमालिका आहेत ना! Happy

अप्रतिम प्रवासवर्णन. सुंदर फोटो.

फोटो केदार ह्यांच्या प्रवास डायरीतले जास्त आवडले. एकच प्रवास असला तरी दोन्ही लिखाणांनी वेगळे अनुभव दिलेत.

सुंदर! शेवटचा फोटो माबोच्या परंपरेला साजेसा झाण्याचा टाकलास ते एक बरे केलेस !! Happy
मस्त झाली ही पूर्ण मालिका!!

पराग, निव्वळ अप्रतिम लेखमालिका!

३ आठवड्यांवर हा प्रवास घडला. तरी प्रत्येक दिवसाचे डीटेल्स किती बारकाईनं लक्षात ठेवले आहेस! (की रोज प्रवास डायरी ल्याहायचास?)

एरवी प्रवासवर्णनं कंटाळवाणी व्हायला वेळ लागत नाही. पण तुझी लेखनशैली फारच धमाल आहे. कुठेही अगदी किंचितशीसुद्धा रटाळ होत नाही.

फोटो तर अफलातून सुंदर आहेत!

>>शेवटी मी म्हटलं तुमच्या मराठवाड्यात कायमच दुष्काळ असल्याने तुम्हांला गोड खायची सवय नाही. Lol
आई काय हवं ते सांगो. आपण आपलं मूळपदी यावं Proud

पराग, खुप मस्त लिहिलंय रे! अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखं.
प्रतिक्रिया शेवटी देतेय पण सगळेच लेख खूप आवडले. मनातल्या मनात मी पण चढले अन उतरले. प्रत्यक्ष असं काही जमेलसं वाटत नाही.

आई काय हवं ते सांगो. आपण आपलं मूळपदी यावं>> मॄ मधली जै माता दी जागी झाली Lol

Pages