आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

Submitted by अभय आर्वीकर on 15 November, 2014 - 11:26

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्‍यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयात साखर २५ रुपये कीलो नी मिळेल...
आर यु शुअर? हे तुम्हाला कस काय माहीत? जरा काही ऑथेटींक माहीती असेल तर शेअर करा प्लिझ.

@ आर्विकर..
>> एक पाऊस जरी वेळेवर पडला नाही तर कोरडवाहु शेती हा जुगार होतो... असे मी म्हणालो... शेती करणे हा जुगार आहे असे म्हणालो नाही.
>> जोडधंदा हा नेहमी मुख्य धंद्याला जोडुन येतो... गावात ज्याच्याकडे जमिन आहे तोच गायी पाळु शकतो... आता सकाळी उठाल्या-उठल्या शेणात हात घालणे प्रतिष्ठेचे समजले जात नाही तो भाग वेगळा.

आयात साखर २५ रुपये कीलो नी मिळेल...
आर यु शुअर? हे तुम्हाला कस काय माहीत? जरा काही ऑथेटींक माहीती असेल तर शेअर करा प्लिझ.>>>>>>>

३७५ ते ४०० डॉलर पर टन आहे रेट ( लँडेड ). सरकार बरेच आधी ब्राझील शी कॉट्रॅक्ट करुन अजुन स्वस्त मिळवू शकेल. आणि शेतकरी, साखरकारखाने, खत ह्यावरची सबसीडी पण वाचेल ( हा अजुन एक फायदा ). पाण्याची नासाडी टळेल, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी मिळेल.

टोचा ,
साखर निर्यात करणारा पहिल्या ३ पैकी येका देशानी साखर आयात करायला सुरुवात केली तर साखरेची लँडेड प्राईस तिच राहील का?

साखरेवरचा आयात कर नुकताच दहा टक्क्यांनी वाढवून २५ टक्के करण्यात आला आहे. तो ४० टक्के करावा अशी साखर कारखानदारांची मागणी आहे. ऊस उत्पादकांना पैसे देण साखर कारखान्यांना अजूनही शक्य झालेले नाही. साखरेच्या जगातील व भारतातीलही विक्रमी उत्पादनामुळे भाव कोसळलेत.
गेली दोन-तीन वर्षे साखर जागतिक बाजारात भारतापेक्षा बरीच स्वस्त आहे.
भारत जगातला दुसर्‍या क्रमांकाचा (१५%) साखर उत्पादक असला तरी निर्यातीत (५%) सहाव्या क्रमांकावर आहे.

यंदा भारतात, यसेच जगात कपाशीचेही विक्रमी पीक आले आहे व लागवडीखालील जमीनही वाढलेली आहे. सरकारने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला अधिक कपाशीची खरेदी करायचे आदेश दिल्याची गेल्या आठवड्यातली बातमी आहे.

एक फ्रेश नावाची चेन काढुन डायरेक शेतक्र्याकडुन घ्यायचा माल!
असे जमेल सहज कुणाही अंबान्याला तत्सम,) पण मनावर कोण घेतो?

कुणाकडे पैसा असेल तर इथेच एक टीम बनु शकते!

http://www.loksatta.com/vishesh-news/non-cooperation-of-market-committee...

असहकारी बाजार समित्या

राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शेतकरी-केंद्रित नाही, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकऱ्याला पडत्या भावांचे नुकसान सोसायला लावून महागाई वाढते, त्याचे प्रमुख कारण या समित्यांनी नफेखोरीला दिलेले मुक्तद्वार.

शेतकर्‍यांची आत्महत्या हा प्रश्न केवळ विदर्भापुरता मर्यादित नाही. संपुर्ण महाराष्ट्रात अगदी मुख्य शहरांपासून काही अंतरावरही अशा घटना घडत आहे ही चिंतेची बाब आहे. शेतीतील कष्ट आणि गुंतवणूक बघता त्यातून बहुतेक वेळा मिळणारा निव्वळ नफा हा जेमतेम असतो किंवा नसतोच. सरकारचा दोष नाही असे अजिबात म्हणता येणार नाही. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधली साखळी कमी करणे हे काम सरकारचेच आहे.
पुण्याच्या मार्केट यार्डात एक चक्कर टाकल्यास जे भाव शेतक-यांना दिले जातात ते तपासले तर ही लोक शेती का करतात हा गहन प्रश्न पडण्यासारखा आहे. शेतीमाल शेतात पिकवणे, त्याची वाहतूक करणे यानंतर तिथले अडते आणि दलाल भीक दिल्यासारखी किंमत मोजतात. आधीच कर्जात बुडालेल्या शेतक-यांना तिथून माल परत फिरवणे अशक्यच असते. मिळेल त्या किंमतीत माल विकण्याची लाचारी तो पत्करतो.
योग्य मोबदल्यात माल विकत घेणे, त्याची साठवणूक योग्य पध्तीने करणे यात सरकारी यंत्रणा तितकी कार्यक्षम नाही ही खेदाची बाब आहे. सधन शेतकरी हळूहळू कमी होत आहेत.

सधन शेतकरी हळूहळू कमी होत आहेत. >>>>> आमच्या आय्टी मधली सधनता आता कमी होत आहे. २००६ साली ट्रेनीला ३ लाख देउन घ्यायचे आता ९ वर्षानी ३.१ लाख देउन घेतात.
पण कोणी असले लेख लिहुन बाकीच्या समाजाला असंवेदनशील ठरवत नाहीये.

Pages