ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १६

Submitted by स्वप्ना_राज on 15 November, 2014 - 10:57

कधी कधी माझा राजपुत्र सिध्दार्थ होतो. त्याला आधी दु:खाची ओळख नव्हती आणि इथे दु:खाला ओळख सांगावी लागत नाही एव्हढाच काय तो फरक. पण दु:ख मनात मावेनासं झालं आणि डोळ्यातून बाहेर काढायची सोय नसली की उगाच भीती वाटत रहाते की अनोळखी लोकाना सुध्दा आपल्या डोळ्यात ते दु:ख दिसेल की काय म्हणून. मग डोळे चुकवत चालताना राजपुत्र सिद्धार्थाला दिसली तशी आजूबाजूची दु:खं मला दिसायला लागतात. कधी बांधावर थकून बसलेला चणेवाला दिसतो. नाना नानी पार्कातल्या एखाद्या बेंचवर उदासपणे बसलेला एखादा वृध्द दिसतो. आईबाप फुलांचे गजरे करत जवळच बसले असले तरी बेवारश्यासारखी आजूबाजूला खेळणारी उघडीनागडी धुळीने माखलेली त्यांची कच्चीबच्ची दिसतात. जोराचा पाउस आल्यावर सगळी जनता दुकानांच्या आडोश्याला धावत असते तेव्हा तुफान वार्याने उडवून लावलेले फुगे गोळा करत भिजत रस्त्यात धावणारा फुगेवाला दिसतो. पाउस थांबला तरी घरी जाऊन कपडे बदलण्याची सोय नसते त्याला. गर्दीने फुललेल्या बाजारात फक्त खडा मसाला विकणारी म्हातारी दिसते. तिच्याकडे खरेदी करायला कोणीच आलेलं नसतं.

ठेच लागून आंधळं झालेल्या बोटाला पुन्हा पुन्हा तिथेच लागत रहावं तसं माझ्या मनाचं होतं. आयुष्याची ही चित्रं चुकीची आहेत हे कळतं पण ती पुसून पुन्हा नीट कशी काढायची ते नाही कळत. मग आधीच दुथडी भरून वाहणारया ओढ्यावर धुवांधार पावसाने संततधार धरावी तसं होतं. आपण खूप दु:खी असतो तेव्हाच आपल्याला दुसर्याची दु:खं जाणवतात. हे असं का? एकदाच पण खूप मोकळेपणाने पोटभर रडून घ्यावं असं वाटतं. ते स्वत:साठी असतं कां बाकीच्यांसाठी? आपण असे दुसऱ्यांसाठी रडतो तेव्हाच खरे रडतो ना?

मग एके दिवशी रहाटाच गाडगं भरतं. थोड्या काळासाठी का होईना, वाट चुकून का होईना, पण सुख येतं. आणि मग मला आजूबाजूची दु:खं दिसली तरी जाणवत नाहीत. म्हणूनच म्हटलं ना कधी कधी माझा राजपुत्र सिध्दार्थ होतो. कधीकधीच.

मेरे मनमे परि गई ऐसी एक दरार
फाटा फटिक पषान ज्यूं, मिलै न दूजी बार

आणि तरीही कबीर म्हणतात तसंच प्रत्येक दु:खाच्या प्रसंगी मनाला एक नवी भेग पडत जाते ती सुख आलं तरी सांधली जातच नाही.
-----------------------

भगवद गीता अ‍ॅज इट इज वाचायला घेतलं तेव्हा कसला आनंद झाला. एकेक शब्द जुळवून वाचत का होईना पण ह्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी शाळेत शिकलेलं संस्कृत पुन्हा असं भेटत होतं. १० तले ३-४ शब्द कळले तरी 'पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा' अशी स्थिती होत होती. श्लोकाश्लोकाला गोखले* सरांची आठवण होत होती. आठवीला जरी मी दुसऱ्या क्लासला असले तरी नववी आणि दहावीला माझा संस्कृतचा मस्त अभ्यास करून घेतला होता त्यांनी. 'मेघदूत' मूळ संस्कृतात वाचायची स्वप्नं पडायची तेव्हा - दहावी झाल्यावर संस्कृत सुटणार आहे हे माहीत असूनसुद्धा. संस्कृत स्कोरिंग ला बरं असला व्यवहारी विचार करून सुरु केलेला अभ्यास आपण एक प्राचीन सुरेख भाषा शिकतोय ह्या अभिमानापर्यंत आणून ठेवला होता सरांनी. आज शेकड्यातलं दहावीस आठवत होतं ती त्यांचीच मेहनत होती. खरंच सरांना भेटायला जायला पाहिजे. इतक्या वर्षांनी आपल्याला बघून चकित होतील पण भगवद गीता संस्कृतातून वाचतेय ह्याचा खूप आनंदही होईल त्यांना. पुढच्या विकेंडला जमवायचंच असं ठरवून टाकलं. पण आपल्यासारख्या लोकांचं ठरवणं आणि करणं ह्यात जमीन-अस्मानाहून जास्त अंतर असतं तेच ह्या बाबतीत झालं. तो विकेंड गेला आणि पुढचे अनेक गेले. माझं जाणं काही झालं नाही.

आणि मग अचानक एके दिवशी सर दिसले. गर्दीने तुडुंब भरलेल्या रस्त्याच्या एका बाजूच्या फुटपाथवर मी आणि दुसर्या बाजूच्या फुटपाथवर ते. व्हीलचेअरवर. एक केअरटेकर ती चेअर ढकलत होता. मला धक्काच बसला. सर म्हातारे झाले असतील पण व्हीलचेअर? काय झालं असेल? लोकांचे धक्के खात मी दुसर्या बाजूला जायला मिळतं का ते पहायला लागले. 'सर, ओळखलं का मला? मी स्वप्ना. तुमच्या अमुक सालच्या बॅचला होते. मला संस्कृतमध्ये १०० पैकी १०० मिळणार ह्याची खात्री होती सर तुम्हाला.' मी मनाशी वाक्यं जुळवत होते. आणि अचानक सरांकडे बघता बघता जाणवलं की काहीतरी चुकलंय. खूप चुकलंय. सरांची नजर आसपास फिरत होती पण त्या नजरेत एक अनोळखी भाव होता. जणू काही ते त्या गर्दीत होते आणि नव्हते पण. मी गोंधळले. रस्ता क्रॉस नाही केला.

गणपतीचे दिवस आले आणि एक मैत्रीण अचानक म्हणाली 'ए, ह्या वर्षी आमच्याकडे गणपतीला यायचं हं. आणि हो, आडारकर* सरांनी पण बोलावंलय तुला खास त्यांच्या घरी.'
'आडारकर सर? ते तुला कुठे भेटले?'
'कुठे म्हणजे काय? आमच्याच सोसायटीत रहातात खालच्या मजल्यावर. एकदा बोलताना माझी मैत्रीण म्हणून तुझा उल्लेख आला आणि ते म्हणाले की तुला ओळखतात. म्हणाले तुझ्याकडे आली की माझ्या घरी घेऊन ये'

मैत्रिणीच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यावर दोघी आडारकर सरांच्या घरी गेलो. किती म्हातारे दिसत होते सर. पण उत्साह तितकाच. काल संध्याकाळीच क्लास मध्ये भेटले असावेत असं बोलणं सुरु केलं त्यांनी. माझ्या बॅचला कोणकोण होतं ते अगदी नावासकट पाठ. इथे आम्हाला सकाळची गोष्ट संध्याकाळी आठवत नाही. मी म्हटलं पण त्यांना तसं. सर हसले.

'सर, गोखले सरांना भेटायची फार इच्छा होती हो. त्या दिवशी पाहिलं त्यांना रस्त्यात' मला पुढे बोलवेना. सर पण गंभीर झाले.
'आणखी दोघं-तिघं पण अगदी हेच म्हणाले बघ मला. पाणी होतं त्यांच्या डोळ्यात.'
'पण सर, काय....'
'स्मृतीभ्रंश झालाय. नाव सांगितलंस तर नमस्कार वगैरे करतात पण ओळखत नाहीत. झाली ५-६ वर्षं'. पुढचं मी काही ऐकलंच नाही.

लांडीलबाडी करणारे, प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे, 'माणूस' म्हणवून घ्यायला नालायक असलेले पण तरी दोन हात आणि दोन पाय आहेत म्हणून ज्यांना माणूस म्हणावं लागतं असे किती जण आहेत जगात. मेघदूतातल्या ओळीच्या ओळी पाठ म्हणणारे, कितीही पेपर्स सोडवून दिले तरी न कंटाळता तपासून देणारे, हाताचं काही न राखता शिकवणारे, 'शिक्षक' म्हणून सर्व अर्थाने आदर्श असलेले असे आमचे सर.

हा असला आजार द्यायला तेच दिसले देवाला?
--------------------
'नाही स्वप्ना, देव-बिव काही नसतं. सब झूट है.' मृण्मयी* बोलत होती आणि मी अवाक होऊन ऐकत होते. गुरुवारचे, आषाढी एकादशीचे उपवास करणारी हीच माझी मैत्रीण? विश्वास बसत नव्हता. कबूल आहे की उपवास वगैरे करण्याचा आणि देवावर विश्वास असण्याचा काही संबंध नाही. नेमके ह्यावरच आमचे हिरीरीने वादही व्हायचे. पण तिने उपास सोडले नाहीत आणि मी कधी केले नाहीत. आणि आज ही असं बोलायला लागली होती.

मला एकदम वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला. वर्षापूर्वीचा? छे! ७-८ च महिने झाले असतील. आम्ही नेहमीप्रमाणे भेटलो होतो आणि आल्या-आल्याच ती म्हणाली 'स्वप्ना, आईला ब्रेस्ट कॅन्सर आहे.' हे असे आजार नेहमी अमुकच्या तमुकच्या भावाच्या मित्राच्या वहिनीच्या कोणालातरी होतात, आपल्या कुटुंबात किंवा मित्र-मैत्रिणींपैकी कोणाला होत नसतात......असं आपल्याला वाटत असतं. छातीत एकदम धसकल्यासारखं होतं ना, जे शब्दात नाही सांगता येत, तसं झालं मला एकदम. मावशींचा चेहेरा डोळ्यासमोर आला. 'अग, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. आजकाल खूप ट्रीटमेन्टस्....'.

'नाही ग, लास्ट स्टेज आहे.'

ह्यावर बोलायला काय शब्द असतील कोणाकडे? असले तरी फुटतील तोंडातून?

मग मृण्मयीचा वाढदिवस आला. बरोबर रात्री १२ वाजता एसएमएस करायचा असं ठरवून ऐनवेळी विसरले. मग सकाळी 'अजून एक वर्षांनी घोडी झाल्याबद्दल अभिनंदन' असा मेसेज केला. उत्तरादाखल 'घोडीचे अभिनंदन केल्याबद्दल गाढवीणीचे आभार' असा काहीतरी मेसेज अपेक्षित होता. पण काहीच नाही. १-२ तासानंतर मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. असल्या शंका नेहमी खर्या ठरतात. 'आई सिरीयस आहे. काल रात्रीच हॉस्पिटलमध्ये ठेवलंय' तिचा मेसेज आला. त्या दिवशी मी देवाकडे एकच प्रार्थना केली - प्लीज मृण्मयीच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी तिच्या आईला नेऊ नकोस. कधी नव्हे ते देवाने ऐकलं. मृण्मयीच्या आईला ४-५ दिवसानी घरी घेऊन आले. पण दुखणं विकोपाला गेलं होतं. २ महिन्यात ती गेली. तिचं शेवटचं दर्शन घ्यायला जायची हिम्मत माझ्यात नव्हती.

मृण्मयीची आस्तिकता तिच्या आईबरोबरच गेली. शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर बसलेल्या साठीपुढच्या बायका बघून ती म्हणाली 'असं आईला आरामात गप्पा मारत बसलेली बघायचं होतं मला. कसल्या कसल्या दुखण्यातून माणसं बरी होतात ना? माझ्या आईला बरं करता आलं असतं देवाला. नाही केलं त्याने. एक तर तसं करता यायची ताकद त्याच्यात नव्हती. आणि ताकद असेल तर तसं करायचं नव्हतं. असल्या देवाला मी देव मानतच नाही. काय माझं करायचं आहे ते करू देत. अजून काय वाकडं करणार आहे?' ती उद्वेगाने बोलत होती आणि समोरच्या उद्यान गणेशच्या देवळातून देव ऐकत होता. म्हणजे तिथे तो अजून मध्येमध्ये येत असावा असं मला वाटतं. सिद्धीविनायकाच्या देवळासारखा भक्तीचा बाजार इथे अजून तरी नाहीये.....कदाचित.

माझी देवावर श्रद्धा असली तरी मला आपलं वाटतं की आपण त्याला मानलं काय किंवा नाही मानलं काय, त्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला पडतो. म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच जणांना. आपण कोणाचं वाईट केलं की आपलं वाईट होतं ही समजूत किती भाबडी वाटली तरी कित्येक वेळा ती आपलं पाउल चुकीच्या वाटेवर पडू देत नाही. देव म्हणजे आपला मित्र, सखा, सोबती हे सगळं म्हणायला ठीक असलं तरी खरं तर आपण God-fearing असतो. 'आपण आपलं काम केलं, पुढची काळजी देवाक' असं म्हटलं की एका अर्थाने 'कर्मण्येवाधिकारस्ते' च्या थोडंफार तरी जवळ आपल्यासारखी माणसं पोचतात. जगायला कश्यावर तरी श्रद्धा असावी लागते. माझ्या ह्या मैत्रिणीने एक श्रद्धास्थान मनाच्या गाभाऱ्यातून उखडून फेकून दिलंय. तिला दोष देत नाही मी. तिच्या जागी मी असते तर कदाचित हेच केलं असतं. पण तिच्या मनाचा गाभारा अजूनही रिकामाच आहे.

म्हणूनच तिचं हे नास्तिक होणं मला अस्वस्थ करतंय.
---------------------------------------
'आज गेल्या गेल्या आधी ते रेझ्युमेज बघायला हवेत. नाहीतर एचआरची बयो थेट इंटरव्ह्युला आणून बसवेल एकेकाला. पल्लवला तो नव्या इव्हेंटचा डेटाबेस बनवायला सांगायला हवं. मिहीरला क्लायंट साईटवर दुपारी पाठवते तोपर्यत ते रिपोर्ट्स करायला सांगते. झालंच तर, अजितला इन्शुरन्सच्या प्रीमियमचा फोन करायचाय' मनातल्या मनात कामांची यादी घोकत बसस्टॉपवर आले आणि तिथली गर्दी बघून लक्षात आलं - आज मंगळवार. अरे बाप रे! आज संकष्टी तर नाही ना?

सिद्धीविनायक मंदिराच्या आसपास रहाणाऱ्यांना हे दोन दिवस काय असतात ते विचारा. किंवा नकाच विचारू. उगाच त्यांचं बीपी वाढवल्याचं पाप तुमच्या माथी येईल. संकष्टीच्या आदल्या रात्रीपासून रांग धरून असलेल्या लोकांचे वेळी-अवेळी 'गणपती बाप्पा मोरया' चे गजर, मंदिरासमोरच टॅक्सी पकडायची आणि सोडायची ह्या अट्टाहासापायी झालेली वाहतुकीची प्रचंड कोंडी, ती हतबलतेने पहाणारे पोलीस, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न्स, रस्त्यावरच्या ठेल्यावर खाणाऱ्या लोकांनी अडवलेले फुटपाथ.....जाऊ देत. असतात भोग एकेकाचे.

बसेस येत होत्या आणि जात होत्या पण एकही जण त्यात चढत नव्हता किंवा नव्हती. मी ओळखलं हे सगळे स्टेशनला जाणारे लोक आहेत. आता एखादी १६९ किंवा १७२ आली की 'हरहर महादेव' करत त्यात चढतील. ती बस सोडूनही काही उपयोग नसतो. चीनच्या युद्धात आपल्या सैनिकांनी त्यांचे कितीही सैनिक मारले तरी नवे येतच रहात म्हणे. तसे हे भाविक मिनिटामिनिटाला येतच रहातात. माझी नेहमीप्रमाणेच चिडचिड झाली.

आणि तेव्हढ्यात मी त्या महारोग्याला पाहिलं. तसे मंदिरातल्या गर्दीच्या दिवशी नेहमीच दिसतात. हाही वेगळा नाही. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रत्येकापुढे त्याने हात पसरला. काहींनी पैसे दिले, काहींनी नाही. पैसे द्यावे तर भीक मागायला उत्तेजन दिल्यासारखे होतं. कशावरून खराच महारोगी असेल? बरं, पैसे नाही दिले तर 'एव्हढे पैसे उधळतो आपण मग एखादं नाणं देता येत नाही ह्याला?' ही टोचणी. (ही टोचणी सद्सद्विवेकबुद्धीची म्हणावी का? बहुतेक नाही.) हा असला तिढा शहरात राहणाऱ्या सगळ्यांचाच. माझा काही वेगळा नव्हे. पण मी नाही दिले पैसे. तो पुढे गेला.

बसस्टॉपवरच्या गर्दीकडे पाहून आणखी चिडचिड व्हायला नको म्हणून मी त्याच्याकडे पहात होते. थोडा पुढे गेला आणि त्याने हात जोडून कशाला तरी नमस्कार केला. हा कुठे नमस्कार करतोय म्हणून पाहिलं तर बालकृष्णाचं चित्र असलेला फलक दिसला. जन्माष्टमी काही दिवसांवर आली होती. मी त्या महारोग्याकडे पहात राहिले. २-३ वेळा हात जोडून तो नमस्कार करत होता. मग पुढे निघून गेला आणि इथे माझ्या डोक्याला उलटसुलट विचारांचा भुंगा लावून गेला.

ह्याला असं काय दिलंय देवाने की ह्याने दोन हात जोडून त्याला नमस्कार करावा? कधी काळी त्यालाही घर असेल, आपली माणसं असतील, ताठ मानेने दोन घास मिळवून खाण्याची ऐपत असेल. ह्याच देवाने त्याला आज दारोदार लोकांपुढे हात पसरायची वेळ आणली होती.

कशावरून? पैसे मिळवायचा हा त्याचा धंदा असू शकतो.

असा धंदा कोण सुखासुखी पत्करेल? पण म्हणतात ना की टीचभर पोट माणसाला काय काय करायला लावतं. असं असून तो देवाला नमस्कार करत होता. आणि इथे मी काही खुट्ट झालं की देवाला शिव्या घालायला मोकळी. आज काय बस लेट आली, उद्या ऑफिसमध्ये तणातणी झाली, परवा दाढ ठणकायला लागली. देवाला मीच दिसते खाली पृथ्वीतलावर. मीच फुटक्या नशिबाची. बघ बघ जरा त्याच्याकडे.

काहीतरी मागायला मनात असल्याशिवाय दोन हात नाही जोडले जात माणसाचे देवापुढे.

मग इथे ही एव्हढी माणसं उभी आहेत कामधाम सोडून ती काय निष्काम भक्तीने आली आहेत का? पण कितीही असलं तरी कमीच पडतं माणसाला. दुचाकी असेल तर चारचाकी पाहिजे, एक चारचाकी असेल तर दुसरी मोठी चारचाकी पाहिजे. त्याने मागितलं तर निदान रास्त आहे.

कोणाचं खरं? कोणाचं खोटं? मला नाही माहीत. हे असले प्रश्न पडायला वेळ नाही तर उत्तर शोधायला कुठनं असणार? देव आणि भक्ती ह्या व्याख्या ज्याच्या त्याच्या स्वत:पुरत्या. देव असतोच असं म्हणता येत नाही आणि नसतोच असंही म्हणता येत नाही. असलाच तर आपल्या मानण्या-न मानण्याने त्याला काही फरक पडतो का हे कळायची सोय नाही. पु.ल. म्हणतात तसं आयुष्याचा सुताड्याचा गुंता झालाय. त्यातलं एक टोक घेऊन ह्या जगात आले. दुसरं टोक सापडेल तेव्हा जायची वेळ झालेली असेल. तेव्हा अनेक प्रश्नचिन्हं बरोबर असतीलच. त्यासोबतीने काही पूर्णविरामही असावेत असं मात्र मनापासून वाटतं.
------------------------
मोके कहा ढुंढे बंदे, मै तो तेरे पासमें
ना मै देवल, ना मै मस्जिद ना काबे कैलाश में
ना तो कौने क्रिया कर्म में
खोजी होय तो तुरंत मिलीहो, पलभरकी तालाशमें
कहे कबिरां सुनो भाई साधो सब सांसो की सांस में

म्हणूनच तर कबीरजी आमचा देवाचा शोध कधी थांबायचाच नाही. जिथे तो कधीच नव्हता नेमकं तिथेच आम्ही त्याला शोधतोय.
-----
* - नावं बदलली आहेत
वि.सू. १ - कोणाच्याही कसल्याही भावना दुखावायचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास क्षमस्व Sad
वि.सू. २ - ह्याआधीच्या पन्न्यांची लिंक माझ्या विपूत आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमीप्रमाणेच छान लिहीले आहेस..
मलाही असेच प्रश्न पडतात..

ठेच लागून आंधळं झालेल्या बोटाला पुन्हा पुन्हा तिथेच लागत रहावं तसं माझ्या मनाचं होतं. >>> ठेच लागून आंधळे झालेले ही कन्सेप्ट भारी आहे. Happy

कधी कधी वाटते जर इतका विचार करणारे नसतो तर! आस्तिक असण्यात एक सुख असतं, विश्वास असतो. केवळ त्यासाठी मी अजूनही आस्तिक आहे. नाहीतर केवळ तर्काच्या आधारे देव नाही हे सिद्ध करणे सोपे आहे पण मग त्यापुढे काय? सारे अश्रद्धेचे कोरडे रखरखीत वाळवंट!
स्वप्ना, तू लिही, खूप लिही!

क्या बात है स्वप्ना...खूप दिवसांनी पुढचा पन्ना आलाय...
नेहमीप्रमाणेच सुरेख.....
आत्ता एकदाच वाचलाय पण एखादी सुरेल संगीताची सुरावट पुन्हा पुन्हा ऐकावी आणि त्यातली सौंदर्यस्थळे नव्याने सापडावीत असे पन्नांच्या बाबतीत होतं. पुन्हा पुन्हा वाचलं की नव्याने काही तरी सापडतंच....
लिहीत रहा.

खूप सुंदर!

गलबलच ज्यास्त. खास करून गोखले सर आणि मैत्रीणिची आई विषयी पॅरा वाचून.

>>>>लांडीलबाडी करणारे, प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे, 'माणूस' म्हणवून घ्यायला नालायक असलेले पण तरी दोन हात आणि दोन पाय आहेत म्हणून ज्यांना माणूस म्हणावं लागतं असे किती जण आहेत जगात. मेघदूतातल्या ओळीच्या ओळी पाठ म्हणणारे, कितीही पेपर्स सोडवून दिले तरी न कंटाळता तपासून देणारे, हाताचं काही न राखता शिकवणारे, 'शिक्षक' म्हणून सर्व अर्थाने आदर्श असलेले असे आमचे सर.<<<
हे प्रश्ण मला पण पडतात.

पोचलं. शिक्षकांना व्हीलचेअरवर पाहण्याच्या प्रसंगाशी आपसूक रिलेट झालो. प्रत्यक्ष पाहण्याची वेळ नाही आली, पण माझ्या एका आवडत्या प्राध्यापिकेबद्दल त्यांच्या अन्य एका विद्यार्थ्याने वृत्तपत्रात लिहिलेले वाचनात आले आणि त्यांच्याबाबतच्या एवढ्या आठवणी असूनही ती अप्रत्यक्ष आठवण कधी विसरता येत नाही. Sad

खुप खुप आवडलं.

<<<<<मोके कहा ढुंढे बंदे, मै तो तेरे पासमें
ना मै देवल, ना मै मस्जिद ना काबे कैलाश में
ना तो कौने क्रिया कर्म में
खोजी होय तो तुरंत मिलीहो, पलभरकी तालाशमें
कहे कबिरां सुनो भाई साधो सब सांसो की सांस में>>>

पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात.
एक दिना छिप जाएगा,ज्यों तारा परभात.
हाड़ जलै ज्यूं लाकड़ी, केस जलै ज्यूं घास.
सब तन जलता देखि करि, भया कबीर उदास.
जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं।
जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं।

कित्येक दिवसात एवढे सुंदर वाचायला मिळाले. किती संवेदब्नशील आहे लिहिलेले.
जियो !!!
फार अलभ्य आहे ही शैली !!!

बर्‍याच दिवसांनी लिहीलास पण अगदी नेहेमीसारखाच सुंदर.
तुझ्या 'पन्न्यां'मधून तुला येणारे अनुभव तर 'हटके' आहेतच पण तू त्याचे केलेले चिंतनदेखील अप्रतीम असते.
अशीच लिहित (आणि विचार करत) रहा. यापूर्वीच्या एका पन्न्यावरच मी म्हणालो होतो ते परत म्हणतो, 'असे अनुभव तुला वारंवार येत राहोत.'

स्वप्ना, सगळे पन्ने वाचले - कुठे कुठे अगदी माझ्या मनातलं वाचून कुणी लिहिलय असं वाटलं..
पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा..

अतिशय सुंदर .. नेहेमीप्रमाणेच.. लिहीत रहा स्वप्ना. Happy

केवळ सुंदर... अंतर्मुख करायला भाग पाडणारे .....

तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || - तुकोबा ||

पण सद्यस्थितीत सज्जन (म्हणजेच संत ) कोणाला म्हणायचे आणि कुठे शोधायचे हा प्रश्न आहेच .... Happy

+१ Happy

Pages