अ‍ॅनीव्हर्सरी

Submitted by कविन on 13 November, 2014 - 01:04

ऍनिवर्सरी

१५ नोव्हेंबर २०१२

फारच वा‌ईट झालं.

हो ना! चेहरा डोळ्यासमोर येतो तिचा अगदी

नुकतच लग्नं झालेलं बिचारीचं. लग्नाचा अल्बम घे‌ऊन चढलेली म्हणे ती. अल्बम राहीला आत आणि ही बाहेर एका क्षणात

छे! कठीण झालय सगळच आजकाल

गर्दीच इतकी वाढलेय. बरं डोंबिवली ट्रेन्स सोडाव्यात ना जास्तीच्या ते नाही. मग सगळे त्या मस्टरसाठी करतायत आटापिटा पाच नंबरवरुन चढण्याचा.

नाहीतर काय? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे देव जाणे

------------------------------------------------

१३ नोव्हेंबर २०१३

गेल्या महिन्यात परत आपल्या ट्रेनमधून कोणीतरी पडलं ना? हर्षू सांगत होती काल मला.

हो गं. ९.०३ ला वर्षभरात झालेला हा तिसरा अपघात. स्टेशन मास्तरांना जादा गाड्या सोडण्यासाठी निवेदन दे‌ऊन पण आता सहा महिने उलटून गेले. आपल्याला यांच्या मागे लागायला वेळ नसतो ना याचा फायदा घेतात सगळे.

ह्म्म! खरय गं.

तू का येत नाहीस गाडीला सकाळी?

उशीर होतो आजकाल. पण ये‌ईन उद्या नक्की. चेन्न‌ई ट्रिपचा खा‌ऊ पण घे‌ऊन ये‌ईन येताना.

खा‌ऊ विसरलीस तरी चालेल एकवेळ पण साखरपुड्याचे फोटो नक्की आण

हे!हे! हो नक्की आणेन.

-----------------------------------

१३ नोव्हेंबर २०१३

उद्या ऍनिवर्सरी आहे मॅडमची. काय मग यंग अन्ड ब्युटीफ़ूल लेडी. काय हवय गिफ्ट आपल्याला?

गेल्या महीन्यात तुला काय दिलं? तेच.. तसच.., फक्त माझ्या वयाला साजेसं हवं बस इतकच!

जशी आपली आज्ञा मॅडम!

------------------------------------------------

१४ नोव्हेंबर २०१३

विश यु अ व्हेरी हॅप्पी ऍनिवर्सरी डि‌अर. ऍन्ड हि‌अर कम्स यु‌अर प्रेझेन्ट ....

----------------

१५ नोव्हेंबर २०१३

काल नव्हतीस ना ट्रेनला तू? काल तो हर्षूचा गृप आहे ना? त्यांच्या गृपमधली एकजण अपघातात गेली. ट्रेन एकतर लेट होती. त्यात ती लटकत होती. हातात तिच्या साखरपुड्याचा अल्बम होता म्हणे. एका क्षणात काय झालं कळलच नाही. गर्दीचं प्रेशर होतं की तिला चक्कर आली काय माहीत. तिचा रॉडला पकडलेला हात सुटला आणि ती एकदम बाहेर फेकली गेली. तिचा अल्बम तसाच फ़ुटबोर्डच्या अलिकडे पडला.

फ़ारच वा‌ईट झालं गं. गेल्या एक दिड वर्षातली ही चौथी केस त्याच ट्रेनमधली.

काय उपयोग निवेदनं दे‌ऊन? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार कोण जाणे?

--------------------------------

१३ नोव्हेंबर २०१४

उद्या तुम्हा दोघींची ऍनिव्हर्सरी ना ग? मग यंदा काय द्यायचं गिफ़्ट? नेहमीचच ना?

होऽऽ होऽऽ तेच आणि तसच. यावर्षी दोघींना गिफ़्ट..पण दोघींना मिळून एक गिफ़्ट नको हा..

जशी आपली आज्ञा मॅडम!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, कवे घाबरवलस...
कमी शब्दात खूप मोठा परिणाम!!
>>>
+१
आधीच्या भावनेच्या भरात लिहिलेल्य अपोस्टीत हे महत्वाचं राहिलं Proud

कथा चांगली जमलीय. दोनदा वाचल्यावर त्यातला भयंकरपणा कळला.
डोंबीवलीच्या धोक्याबद्दल सहमत.

धन्यवाद मनापासून Happy

@पियु, अमानविय धाग्याशप्पथ ही सत्यघटना नाही आहे.

बाकी गर्दी, गर्दीतली धक्काबुक्की, अपघात इ. होतात ते नाकारतही नाहीये मी, पण ही गोष्ट त्या गर्दीवर भाष्य करणारी नाहीये इतकच इथे म्हणेन. बाकी वेगळ्या धाग्यावरच्या चर्चे बद्दल मंजुडीला +१ आणि तुला आलेल्या गर्दीच्या भीषण अनुभवाकरता Sad

एखादी भयकथा लिहून बघायचं बरेच दिवस मनात होतं. जमेल न जमेल कळत नव्हतं. ये अपना जॉनर नही असं वाटत होतं. आणि हे वाटणंच मोडून काढायला लिहून बघायचं होतं.

परत एकदा मनापासून धन्यवाद. Happy

धनंजय मधली छोटी क्षणकथाच वाटतेय!!
कमी शब्दात खूप मोठा परिणाम!!>> +१
डोंबीवलीची गर्दी म्हणजे... अक्षरशः मेंढरं कोंबून जात असल्यासारखी वाटतात... भयाण!!

पियू... चढता-उतरताना काऴजी घ्या... दोन-तीन स्टेशन्स मागचा पुढचा पास काढून ठेवायचा... नंतरच्या स्टॉपवर उतरायचं... उशीर होतो खरा पण... दुर्घटना से देर भली!!

बापरे, पहिल्यांदा काही कळलेच नाही, तारखेचा काहीतरी घोळ होत राहिला. नंतर दुस-यांदा लक्षात आले प्रकरण. खरेच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे ही.

माझ्या समोर एक बाई कुर्ल्याला फास्ट ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर गाडीत चढताना खाली पडली. ट्रेन उभीच होती, लोकांनी तिला ओढुन बाहेर काढले आणि हारबरच्या प्लॅटफॉर्मवर आणले. ती बाई इतकी शॉकमधे होती की दगडी डोळ्यांनी शुन्यात पाहात जवळजवळ तासभर बसुन राहिली. नंतर कुठे तिला जराशी जाग आली.

कविता, आता तुझ्या धन्यवाद पोस्टीनंतर लिहिते. कथा अजून परीणामकारक लिहिता आली असती तुला Happy
१३ नोव्हेंबर १३ आणि १४ नोव्हेंबर १३मध्ये कोण कोणाला काय म्हणालं याचा किंचीत गोंधळ उडतो आहे. आणि कथा दोन-तीनदा वाचल्यावर उलगडते आहे. (ह्या ऑफिसमधल्या मैत्रिणींच्या प्रतिक्रिया!)
भयकथा/ गूढकथा एकाच वाचनात एकदम अंगावर यायला हवी. योग्य तिथे योग्य विरामचिन्हं, ब्रेकेजेस, काही कमी-अधिक संवाद इत्यादींचा वापर करून हे जमतंय का पहा.

मस्त जमलीये.

मंजूडी म्हणते तशी अजून पॉलिश होऊ शकेल. पण आता जे काही आहे ते टेरीफाईंग आहेच.

कविन, व्हेरी गूड. Happy

मला असं वाटतंय की काहींना ही कथा कळाली नाहीये.
स्पष्टीकरण हवंय का जरा?
(मलाही पहिल्यांदा वाचलेली तेंव्हा समजली नव्हतीच Happy )

मला कळालीये गं Happy
काहींना अजिबातच कळाली नाहीये असं वाटतंय आणि मस्त कथा असल्याने सगळ्यांना कळायला हवी Happy कळालं (हे उगीच) ? Proud

स्पष्टीकरण हवंय का जरा?>> नको!! मजा जाईल मग!! क्षणकथा अशाच असतात!! शेवटचा धक्का बसला की पुन्हा फिरून वाचाव्याशा वाटणार्‍या!!

नीट वाचली की गरज नाही लागत पुन्हा वाचण्ञाची!!

थोडी अजून परीणामकारक लिहीता आली असती.. तरी हा प्रकार आवडलाच!!

सॉलीड...
जशी आहे तशीच मस्त आहे...
चटका बसतोय.. नी आजची तारीख बघुन मनात हुरहुर...

कविन.. दचकायला होतय गं वाचल्याबरोबर.

३ वेळा वाचल्यावर समजली Sad

१३ नोव्हेंबर २०१३ >>> ही तारीख दुसर्‍यांदा जिथे आहे, त्या ओळीच्या आधीही सेपरेटर हवाय ना?

लले, १३ नोव्हेंबरच्या दोन संवादांचं कनेक्शन दाखवण्यासाठी सेपरेटर घातला नसेल. सेपरेटर घातला तर त्या पॅचमध्ये निर्माण होणारी भयशंका बोथट होईल.

योग्य तिथे योग्य विरामचिन्हं, ब्रेकेजेस, काही कमी-अधिक संवाद इत्यादींचा वापर करून हे जमतंय का पहा.>>>हो गं या विरामचिन्हांचा योग्य वापर करायला जमणं सध्याचं टार्गेट आहे माझं :(. करतेय प्रयत्न पॉलिशिंगचाही

लले, १३ नोव्हेंबरच्या दोन संवादांचं कनेक्शन दाखवण्यासाठी सेपरेटर घातला नसेल. सेपरेटर घातला तर त्या पॅचमध्ये निर्माण होणारी भयशंका बोथट होईल.>>> नाही गं अश्वे Sad खरतर लली म्हणतेय तसच लिहायचं होतं. कॉपी पेस्ट करताना लक्षात नाही आलं की सेपरेटर उडवलाय मी चुकून

सगळ्या प्रतिसादकांना परत एकदा मनापासून धन्यवाद Happy

कविन जबरदस्त कथा.

(दोन वेगवेगळे चाललेले संवाद वेगळे दाखवण्यासाठी एकासाठी इटालिक स्टाईल वापरली तरी बरे होईल.

Pages