मुक्तांगणचा "वस्ताद"

Submitted by अतुल ठाकुर on 10 November, 2014 - 07:19

मुक्तांगणला गेल्यावर जर डेटा गोळा करताना मध्येच वेळ मिळाला तर मी वायंगणकरसरांसमोर जाऊन बसतो. काहीही न बोलता नुसतं पाहुनच बरंच काही दिसत असतं, उमगत असतं. मला वाटतं तेथेच मी वस्ताद हे नाव सर्वप्रथम ऐकलं. उत्सुकता वाटली कि सर्वजण "वस्ताद" म्हणुन उल्लेख करतात ती व्यक्ती आहे तरी कोण? नंतर राजेश रजपुत सरांची ओळख माधव सरांनी करुन दिली. तेव्हा लक्षात आलं अरे आपण तर यांना अनेकदा पाहिलं आहे. त्यांच्या या टोपण नावाची मात्र माहिती नव्हती. मध्यम उंची, सडपातळ अंगकाठी, गोरापान चेहरा, प्रसन्न हसु, चालण्याची विशिष्ट ढब, खणखणीत आवाज आणि अत्यंत नीटनेटकी राहणी ही रजपुत सरांची वैशिष्ट्ये. त्यांचे राजेश रजपुत हे नाव किती जणांना ठाऊक असेल सांगता येत नाही. सारे मुक्तांगण त्यांना "वस्ताद" या नावानेच ओळखते. तर या वस्तादबद्दल एका व्यसनमुक्त मित्राने ठाणे फॉलोअपच्या वेळी काढलेले उद्गार मनात घर करुन राहिले होते. "वस्ताद फार पुण्याचे काम करतो" असे तो म्हणाला होता. हे उद्गार काहींना भाबडेपणाचे वाटण्याची शक्यता आहे. पण मुक्तांगणमध्ये जाऊन वस्तादाचे काम प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याच्या या उद्गाराचा अर्थ माझ्या लक्षात आला. मी मुक्तांगणला जायला लागल्यापासुन वस्ताद तेथे नेहेमी दिसत असे, मात्र त्यांचे काम पाहण्याचा योग आला नव्हता. मुक्तांगणच्या पाच आठवड्याच्या निवासाच्या दरम्यान प्रत्येक आठवड्याचे उपचाराच्या दृष्टीने वेगळे महत्त्व असते हे देखिल तेव्हा माहित नव्हते. हळुहळु मुक्तांगणच्या कार्यपद्धतीची ओळख होऊ लागली. आणि लक्षात आले कि मुक्तांगणला जेव्हा रुग्णमित्र दाखल होतात तेव्हा तेथला पहिला आठवडा ते वस्तादच्या ताब्यात असतात.

हा पहिला आठवडा फार महत्त्वाचा असतो. व्यसन ही किती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे याची माहिती असलेल्यांनाच याची काहीशी कल्पना येईल. बरेचसे रुग्ण त्यांना मुक्तांगणला आणले जाते तेव्हा भानावर नसतात. व्यसनाचा पगडा पुर्णपणे बसलेला असतो. नातेवाईकांनी आशा सोडलेली असते, शेवटचा उपाय म्हणुन त्यांनी रुग्णाला येथे आणलेले असते. रुग्ण तर फारसे काही समजण्याच्या मनस्थितीतच नसतात. पण नातेवाईकही साशंक असतात. मनात, चेहर्‍यावर, डोळ्यात अनेक शंका असतात. हा येथे धड राहिल का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न. अशावेळी दरवाजात वायंगणकरसरांसारखी माणसे त्यांना धीर देत असतात. मुक्तांगणला येताना आता दारु सोडायची आहे तेव्हा शेवटची पिऊन घेऊया म्हणुन बाटली गाडीत लपवुन गेटच्या आत येण्याआधी दारु पिणारे महाभाग देखिल आहेत. त्यामुळे दाखल होतानाचा पहिला आठवडा हा भावभावनांच्या कल्लोळाचा असतो. त्यातच काहींना नातेवाईकानी न सांगता किंवा काही वेगळेच कारण सांगुन आणलेले असते. आळंदीला देवदर्शनाला जायचे असे सांगुन गाडी मुक्तांगणकडे वळवलेली असते. काहींना फक्त औषधासाठी जायचे आहे असे सांगुन आणलेले असते. काहींना येथे आता पस्तीस दिवस राहायचे आहे याची कल्पनाच नसते. मुक्तांगणला उपचारासाठी रुग्णाला तयार करणे हेच मुळी एक कर्मकठीण काम असते. बाबा पुता करुन त्यांना येथे आणावे लागते. अलिकडे तर असेही ऐकले आहे कि बुधवारी मुक्तांगणला अ‍ॅडमिशन असते हे माहित असलेले आणि घरचे आता आपल्याला मुक्तांगणमध्ये दाखल करणार आहेत याची कुणकुण लागलेले काही व्यसनी मित्र बुधवारी घरातुन गायबच होतात आणि एकदम गुरुवारीच घरी उगवतात. अशा तर्‍हेने रुग्णाला मुक्तांगणला आणण्याचे कठीण काम पार पाडल्यावर जेव्हा त्या व्यसनात पुर्णपणे बुडालेल्या रुग्णाच्या हे लक्षात येते कि आपल्याला येथे मनाविरुद्ध आणले आहे तेव्हा त्याची सुरुवातीच्या काही दिवसात काय प्रतिक्रिया होत असेल याची कल्पनाच करवत नाही. आणि मुक्तांगणचा हाच पहिला आठवडा हा "वस्तादचा आठवडा" असतो.

घरचे मुक्तांगणला दाखल करुन निघुन गेल्यानंतर रुग्णमित्रांचा राग बाहेर येऊ लागतो. आपल्याला न सांगता फसवुन आणले आहे ही एकच भावना मनात बळावलेली असते. हे आपल्या भल्यासाठी चालले आहे हा विचार नसतो. कारण मुळात आपल्याला काही झाले आहे हेच मान्य नसते. शारीरीक मानसिक पडझडीने अगतिकता वाढलेली असते. त्यातच रोजचे व्यसन पस्तिस दिवस मिळणार नसते. बंदोबस्त कडेकोट असतो. बाहेर जाता येणार नसते. काहीजण इतर सेंटर्समध्ये जाऊन आलेले असतात. तेथे तंबाखु खायला परवानगी असते. पण मुक्तांगणमध्ये ती देखिल मिळणार नसते. दारुसारखे व्यसन सोडायला आम्ही आलो तर थोडी तंबाखु खायला काय हरकत आहे अशा समजुतीते असलेल्यांना तंबाखु नाही हा कडेलोटच असतो. त्यात भरीस भर म्हणजे येथे स्वतःची कामे स्वतः करावी लागणार असतात. स्वयंपाक करण्याची, भांडी घासण्याची ड्युटी लागणार असते. घरी चहाचा कपदेखिल उचलुन ठेवण्याची सवय नसते. वेळच्या वेळी उठणे, व्यायाम हे सारे एकतर कधी केलेले नसते किंवा सोडुन बरीच वर्षे झालेली असतात. या सार्‍यामुळे चीडचीड, संताप वाढु लागतो. मग "ठीक आहे पस्तिस दिवस तुमचे, छत्तीसावा दिवस माझा." "मला फसवतात काय......एकेकाला बघुन घेतो." " हे लोक मला काय शिकवणार मला सगळे माहित आहे", " मी आणि भांडी घासायची? अहो माझ्या घरी चार नोकर आहेत यासाठी" अशा तर्‍हेची वाक्ये तोंडातुन बाहेर पडु लागतात. बर्‍याच व्यसनीमाणसांमध्ये शिवराळपणा असतो. त्याचे प्रत्यंतर येऊ लागते. असहकार पुकारला जातो. सारा राग अन्नावर निघतो. रागावलेला व्यसनी माणुस जेवणच नाकारतो. हा सारा राग, चीड संताप सर्वप्रथम निघतो तो या सार्‍यांची आईच्या मायेने काळजी घेणार्‍या वस्तादावर. मुक्तांगणच्या पहिल्या आठवड्यात डोक्यावर बर्फाची लादी असलेला आणि निधड्या छातीचा वस्तादच या रागाला सामोरा जाणार असतो. नुसता रागच नाही तर त्यामुळे आलेला असहकार, व्यसन न मिळाल्याने होणार्‍या शारिरिक, मानसिक प्रतिक्रिया यांनाही वस्तादना तोंड द्यावे लागणार असते. ज्यादिवशी माणसे दाखल होतात त्यादिवशीपासुन, म्हणजे बुधवारपासुन वस्तादचा कस लागणार असतो. त्या आठवड्याचे पहिले तीन दिवस मोठा कठीण आणि कसोटीचा काळ असतो. वस्तादना झोप मिळणार नसते. यातला पहिला दिवस मी स्वतः पाहिला आहे.

बुधवारचा दिवस मुक्तांगणचा गजबजलेला दिवस असतो. त्यादिवशी मुद्दाम मुक्तांगणमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी आलो होतो. खाली वर्दळ होती. अमोल पोटे सर व्यवस्था पाहात होते. कुणी कुठे जायचे, बसायचे सांगत होते. वायंगणकर सरांना तर मानदेखिल वर करायला फुरसत नव्हती. नातेवाईकांचे काळजीने व्यापलेले चेहरे सगळीकडे दिसत होते. व्यसनी रुग्णमित्र तर फारसे भानावरच नव्हते. बाजुला खाद्यपदार्थांचा छोटासा स्टॉल लागला होता. आज दिवसभर मंडळी आपापल्या माणसाला दाखल करण्यासाठी लांबलांबहुन येणार होती, त्यामुळे इतक्या वाजता काम संपलं असा प्रकार नव्हता. मी पहिल्या मजल्यावर वस्तादच्या वॉर्डमध्ये जाउन बसलो. वस्तादचे काम सुरु झाले होते. दोन खुर्च्यांच्या मध्ये एक टेबल होते. त्यावर एक रजिस्टर. बाजुला बेडवर कपड्यांचा ढीग होता. वस्तादचा सहाय्यक तेथे बसला होता. रुग्णाला दाखल करण्याआधी काय सामान घेऊन यायचे याची सुचना यादी घरच्या मंडळींना दिलेली असते. त्याप्रमाणे रुग्ण आणतात. त्याची नोंद घेण्याचे काम सुरु होते. एका रुग्णाने कपड्यांचे बोचके आणले आणि तो समोरच्या खुर्चीवर बसला. सहाय्यकाने बोचके उघडले. मोजदाद सुरु झाली " दोन टी शर्ट, दोन बर्म्युडा पँट, दोन अंडरवियर, टॉवेल..." वस्ताद लिहित होते. लिहुन झाल्यावर वस्तादने बेडचा क्रमांक सांगितला आणि खिशातुन एक चावी काढुन दोर्‍यात घातली. ही लॉकरची चावी. तो दोरा रुग्णाच्या गळ्यात घातला. पिण्याच्या पाण्याचा ग्लास त्याला दिला. चष्मा कुठे ठेवायचा पासुन ते जेवण्याचे ताट अंथरुणाखाली आहे इथपर्यंत सार्‍या सुचना दिल्या आणि ते पुढच्या पेशंटची वाट पाहु लागले. हा पेशंट आता वैद्यकिय तपासणीसाठी जाणार होता. बाजुच्या बेडसवर तपासणी होऊन आलेले रुग्ण पहुडले होते. ओळखी होत होत्या. येथे तंबाखुदेखिल मिळत नाही अशी कुजबुज होत होती. त्यानंतर आलेला रुग्ण हा यापुर्वी देखिल येऊन गेलेला होता. पुन्हा रिलॅप्स झाला होता, धड चालता येत नव्हते. दाढी वाढलेली. अजुनही दारुच्या अंमलाखाली होता. त्याला कोपर्‍यातलाच बेड हवा होता. त्यासाठी त्याने हुज्जत घालणे सुरु केले. आजुबाजुच्या रुग्णामध्ये त्याच्या बोलण्यावर हशा पिकत होता. वस्ताद त्याला गंमतीशीर उत्तरे देऊन टोलवत होते. वस्तादच्या संयमाचा आणि तयारीचा काहीसा अंदाज मला येथे आला. राग तर नाहीच पण चेहर्‍यावर त्रासिकपणाचाही भाव नव्हता. वस्ताद अगदी शांत होते. सुरुवातीला माझ्या लेखी जे काही चालले होते ते रुटीन होते पण तेथे वॉर्डमध्ये दरवाज्याच्या बाजुलाच चार बेडस वेगळे ठेवले होते. त्याच्या आजुबाजुला पडदे होते. त्याचे कारण कळले आणि वस्तादचे खरे काम लक्षात येऊन मी थक्क झालो.

अनेक वर्षे व्यसन करणार्‍यांचे व्यसन मुक्तांगणला आल्याबरोबर अचानक बंद होते. आणि शरीर त्याची तीव्रतेने मागणी करु लागते. व्यसन मिळत नसल्यास त्याच्या शारिरीक, मानसिक प्रतिक्रिया सुरु होतात. याला "विथड्रॉल" म्हणतात. काहींना "भास" होण्याचा त्रास होतो. याला "हॅल्युसिनेशन" म्हणतात. सार्‍यांनाच हे त्रास होतात असे नाही. मात्र भास होण्याचा त्रास हा जास्त गंभीर असतो. हॅल्युसिनेशनमध्ये गेलेला रुग्ण तर भानावरच नसतो. काय करेल सांगता येत नाही. हिंसकही होऊ शकतो. वॉर्डबाहेर निघुन जाऊ शकतो. पडुन जखमी होऊ शकतो, स्वतःला किंवा इतरांना इजा करु शकतो. अशा वेळी त्याला हातपाय बांधुन ठेवावं लागतं. हा त्रास साधारणपणे दोन ते तीन दिवस टिकतो. रुग्ण दाखल होतानाच कुठला रुग्ण हॅल्युसिनेशनमध्ये जाणार याचा अचुक अंदाज वस्तादला येतो. हे वस्तादचे कसब आहे. त्यामुळे वस्तादसमोर रुग्ण जरी वस्तुंची नोंद करायला बसलेला असला तरी ती एकप्रकारची रुग्णाच्या नकळत होत असलेली तपासणीच असते. रुग्णाच्या एकंदरीत अविर्भावावरुन कुठला रुग्ण हॅल्युसिनेशनमध्ये जाणार हे आधीच लक्षात घेऊन त्याला कोपर्‍यातील बेड देण्याची व्यवस्था वस्ताद करतात. आपल्याला इतरांपेक्षा वेगळ्या बाजुला असलेला बेड का देण्यात आला आहे याची रुग्णाला कल्पना नसते. अशावेळी वस्तादच्या जीभेवर साखर असते, अगदी गोड बोलुन ते रुग्णाला राजी करतात. विथड्रॉल आणि हॅल्युसिनेशनच्या वेळी होत असणारा त्रास यामुळे इतर रुग्ण अपसेट होऊ नयेत म्हणुन ते पडदे लावलेले आहेत हे मला नंतर समजलं. हे सारं चाललेलं असताना वस्ताद रुग्णाशी ती लहान मुलं असल्यासारखे बोलतात, आणि ते आवश्यकच असतं कारण त्याचेळी त्या रुग्णाचं लहान मुलच झालेलं असतं. अनेक तक्रारी असतात. त्या गोड बोलुन, त्यांच्यासमोर मान तुकवुन, त्यांच्या हो ला हो करत निस्तराव्या लागतात. त्यादिवसाची व्यवस्था झाली कि पुढे कसोटीचा क्षण येणार असतो. त्याआधीच वस्तादच्या कौशल्याचा कस लागलेला असतो. हॅल्युसिनेशनमध्ये गेलेल्या रुग्णाची वस्ताद कशी काळजी घेतात हे पाहायचं होतं. तो योग देखिल आला. मला असं काही पहायला मिळेल याची कल्पना नव्हती. मी नेहेमीप्रमाणे आपला डेटा गोळा करण्यासाठी मुक्तांगणमध्ये आलो होतो. वस्तादना भेटलो. त्यांची वेळ हवी होती. वस्तादने काही बोलण्यापेक्षा ते काय करताहेत ते पाहण्यास मला सांगीतले.

जीन्यावरच वॉर्डकडे जाताना त्यांनी एकाला सांगीतले कि त्यांनी ताट तयार केले आहे. भाजी घातली आहे फक्त चपात्या घालुन ताट घेऊन ये. मी वस्ताद बरोबर वॉर्ड मध्ये आलो. कोपर्‍यातल्या एका बेडवर रुग्णाचे हात पाय बांधुन ठेवले होते, अशा तर्‍हेने बांधलेल्या अवस्थेत रुग्णाला मी प्रथमच पाहात होतो. काही गैरसमज दुर झाले. मला वाटायचं की करकचुन, आवळुन हातपाय बांधत असतील. पण ते तसे नव्हते. कुशन्सचा वापर करुन विशिष्ट प्रकारे त्याला बांधलं होतं. वस्तादने हाक मारली "काय साहेब, कुणी बांधलं तुम्हाला.....उठा आता जेवायची वेळ झाली". रुग्ण जागा तर झाला पण अजुनही भानावर आला नव्हता. तो बडबडु लागला. " मला घरी जायचंय" वस्तादने हाताकडच्या दोर्‍या सोडायला सुरुवात केली " अहो तुम्हाला घरीच तर न्यायचंय आता. पण त्या आधी दोन घास खाऊन घ्यायचेत. मला नेणार की नाही तुमच्या घरी? संध्याकाळी दोघे मिळुनच जाउ." वस्तादने हाताच्या दोर्‍या सोडल्या. ताकद येण्यासाठी रुग्णाच्या पोटात अशावेळी दोन घास जाणे अत्यंत आवश्यक असते. ताट आणले होते. वस्तादने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो रुग्ण भानावरच नव्हता. शेवटी जोर लावुन वस्तादने त्याला उठवले आणि तो मागल्यामागे पडू नये म्हणुन आपल्या गुडघ्याचा आधार त्याच्या पाठिला दिला. एका हातात ताट घेतले तुसर्‍या हाताने पोळीचा तुकडा मोडला आणि त्याला भाजी लावुन वस्ताद रुग्णाला घास भरवु लागले. अक्षरशः लहान मुलाला आई भरवते त्याप्रमाणे ते दृश्य दिसत होतं. "आपल्याला घरी जायचय ना संध्याकाळी? मग जेवला नाहीत तर मी नेणार नाही. तुमच्या गाडीत बसवुन मला न्याल का? कुठे सिंहगड रोडलाच घर आहे ना तुमचं?" असं बोलत बोलत वस्ताद त्याला भरवत होते. त्यादिवशी मश्रुमची भाजी होती. " बघा तुमच्यासाठी मटण आणलंय." असं काहीबाही म्हणत त्यांनी रुग्णाला बळबळे चार घास खाऊ घातले. रुग्णही त्यांना उत्तरं देत होता, त्यांच्या बोलण्याला मान डोलवत होता. जेवण झालं. "आता पडा आरामशीर". वस्तादांनी हळुवारपणे रुग्ण लवंडल्यावर पुन्हा दोर्‍या बांधल्या. सेवेचा हा विलक्षण प्रकार मी थक्क होऊन पाहात राहिलो. वस्तादची सेवा इथेच संपत नाही. भानावर नसलेल्या, हातपाय बांधुन ठेवलेल्या रुग्णाचे प्रातर्विधी त्यांच्या कपड्यातच होतात. ते सारं साफ करण्यापासुन ते त्यांना अंघोळ घालण्यापर्यंत त्यांची सारी सेवा वस्तादच करतात. दोनतीन दिवसांनी भानावर आल्यावर रुग्णाला तर काहीच आठवत नसतं पण त्याला त्याच्या सवंगड्यांकडुन वस्तादने त्याच्यासाठी काय केलं हे कळतंच. कदाचित घरच्यांनीही आपली एवढी सेवा कधी केली नसती असाही विचार एखाद्याच्या मनात तरळुन जात असेल. रुग्णांकडुन वस्तादचा उल्लेख अतिशय प्रेमाने केला जातो असं मला वायंगणकरसरांनी आवर्जुन सांगीतलं आणि त्या मित्राचे "पुण्याचे काम" या शब्दांचा अर्थ मला कळला.

हळुहळु आठवडा निघुन जातो. पण पहिल्या तीन दिवसात वस्तादना झोप नसते. कुणाला कसला त्रास होईल ते सांगता येत नाही. विथड्रॉल सुरु होऊ शकतात. भास सुरु होऊ शकतात. जाग ठेवावी लागते. मग वस्ताद केव्हातरी दुपारी विश्रांती घेतात. मात्र त्यांना मी त्रासलेलं कधीही पाहीलं नाही. राग, चीड, त्रागा काहीही नाही. बोलताना तीच मिठ्ठास वाणी. आणि वावरताना तोच उत्साह. आठवड्याने वस्तादची "मुलं" दुसर्‍या वार्डमध्ये शिफ्ट होणार असतात. आणि या आईला आता लगेच बुधवारी येणार्‍या मुलांची काळजी घ्यावी लागणार असते. पुढे गेलेल्या मुलांना आता मुक्तांगणचे इतर शिलेदार सांभाळणार असतात. त्यामुळे त्यांची काळजी नसते. मी विचार करत होतो. बोलघेवडे, पोकळ विद्वान खुप पाहिले होते. सेमिनारमध्ये तर खुपच. सेवेच्या बाता मारणारे. इथे एका कृतीतुनच सेवेचा खरा अर्थ कळला होता. आपल्या परंपरेतली अमृत मंथनाची गोष्ट मला अशावेळी आठवते. मंथनातुन जेव्हा हलाहल विष बाहेर आलं तेव्हा शंकराशिवाय कुणीही ते प्राशन करु शकला नाही. मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीच्या मंथनातुन सर्वप्रथम जे हलाहल बाहेर येतं त्याला वस्ताद सामोरे जातात. वस्तादांनी त्या विषाला नाहीसे केल्यावर निर्मळ झालेला माणुस व्यसनमुक्तीचे अमृत प्राप्त करण्याच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार झालेला असतो.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली ओळख घडवलीत,

मी सर्वप्रथम पुण्या-मुंबईचे म्हणतो तसे वाचले पुण्याचे काम Happy

व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे पण पुणे - पुण्याचे, पुण्य - पुण्ण्याचे असं काहीतरी हवे नाही टाईप करताना

अतुलजी

खुपच ह्रद्य लेखन आहे. श्री. रजपुत यांची खुप चांगली ओळख करून दिलीत. त्याबद्द्ल तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या या लेखामुळेच इतक्या महत्वाच्या आणि अनोख्या सेवाकार्याची माहिती मिळाली. अन्यथा मुक्तांगणची एक व्यसनमुक्ती केंद्र एवढीच जुजबी ओळख. तिथे भेट देण्याची शक्यताही जवळ जवळ नाहीच. श्री. रजपुतांचे आभार मानायला तर 'धन्यवाद' हा शब्द पुरेसा नाही असे वाटते. अशी अव्यक्तिगत सेवा करणारी भली माणसं जगात आहेत त्यामुळेच चांगुलपणा आणि आशा टिकून आहे.

प्रिया

खुपच ह्रद्य लेखन आहे. श्री. रजपुत यांची खुप चांगली ओळख करून दिलीत. त्याबद्द्ल तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या या लेखामुळेच इतक्या महत्वाच्या आणि अनोख्या सेवाकार्याची माहिती मिळाली. अन्यथा मुक्तांगणची एक व्यसनमुक्ती केंद्र एवढीच जुजबी ओळख. तिथे भेट देण्याची शक्यताही जवळ जवळ नाहीच. श्री. रजपुतांचे आभार मानायला तर 'धन्यवाद' हा शब्द पुरेसा नाही असे वाटते. अशी अव्यक्तिगत सेवा करणारी भली माणसं जगात आहेत त्यामुळेच चांगुलपणा आणि आशा टिकून आहे. >>>> +१००००...

अशा सुंदर लेखाबद्दल मनापासून धन्यवाद .... Happy

हा लेख तर नेहमीप्रमाणेच तुमच्या शैलीला साजेसा आहेच पण एकुणातच तुमच्या लेखातुन हे जे मुक्तांगणचे दर्शन घडते ते ही खुपच छान आहे. Happy

खुपच सुंदर लेखन, वस्ताद खरोखरंच फार पुण्याचे काम करतायत .. त्यांना माझ्याकडुन सलाम !!! मला खरोखर तिथे जाउन वस्ताद ला पहायची इच्छा झालीये.

माहिती साठी आभार्..........खुप सुन्दर माहिती.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे खुद्द वस्तादचा फोन आला होता आणि लेख वाचुन त्यांनी आवडल्याचे कळवले Happy

अशा सेवाभावी माणसाची अतिशय सुरेख ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .... तुमची लेखन शैली आवडली.

वस्तादांना नमस्कार आणि त्यांच्या सहनशक्तीला सलाम.
खुप छान ओळख करुन दिलीत.

...दोन्ही कर जोडोनी...!
-गा.पै.

अतूल, वस्तादांना खरच साष्टांग नमस्कार. भलभलत्या अन नवनवीन मुलांची आई होत राहाणं सोप्पं नाही. देवानं किती म्हणजे किती मोठं मन बनवलय ह्या माणसासाठी.
खळांची व्यंकटी सांडो नुसतं म्हणत नाहीत... प्रत्यक्षं कृतीत उतरलय. ईश्वरनिष्ठांचिया मांदियाळीतले हे जेष्ठं.

कशा उत्तुंग व्यक्तीमत्वाची ओळख करून दिलीत अतुल.. मनापासून धन्यवाद