कैलास मानससरोवर यात्रा: भाग ६ - मुक्कामपोस्ट मानससरोवर

Submitted by Adm on 9 November, 2014 - 22:45

भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/5083
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024
भाग चौथा : http://www.maayboli.com/node/51358
भाग पाचवा : http://www.maayboli.com/node/51433
--------------------------------------------------------------------
बस निघायच्या आधी तिथे संपूर्ण बॅचचा ग्रुप फोटो काढावा अशी टुम निघाली पण सगळे त्यावेळी इतके प्रचंड उत्साहात होते की सगळ्यांना एका जागी जमा करणं शक्यच झालं नाही. तिबेटी पोर्टर आणि घोडेवाल्यांना निरोप द्यायची वेळ आली होती. आम्ही त्यांचे पैसे आधीच दिलेले होते. त्यामुळे आमच्या जवळचा थोडाफार खाऊ आणि बक्षिशी त्यांना दिली. काही पोर्टर मुली आमच्या बरोबर बसने दार्चेन गावापर्यंत आल्या. ह्या सगळ्या गडबडीत केदारचा मोबाईल हरवला. म्हणजे झालं असं की रघू की कोणाचा तरी मोबाईल सापडत नव्हता म्हणून त्याबद्दल बोलणं चाललं होतं म्हणून केदारने आपला मोबाईल आहे ना हे चाचपून बघून तो जॅकेटच्या खिशात ठेवला आणि तो खिशातून बसमध्ये पडला. एक पोर्टर सिटखाली काहीतरी गोळा करत होती हे आम्ही पाहिलं. कदाचित आमच्यापैकी कोणाचा नसेल असं समजुन तिने बहूतेक तो उचलला. पण झालं असं की आमचा सगळ्यांचाच घरच्यांशी संपर्क तुटला कारण आम्ही केदारच्या मोबाईलवरून मेट्रीक्स कार्ड वापरायचो. पुढे एकदा चौबळ साहेबांचा मोबाईल आम्ही वापरला पण भारतात परतेपर्यंत घरी फारसं बोलणं झालच नाही. परिक्रमेदरम्यान आमचं मुख्य सामान आम्ही दार्चेनला ठेवलं होतं. ते घेण्यासाठी बस दार्चेनला थांबली. तिथे बॅचमधल्या एका ज्येष्ठ नागरिकांना गुरू काहीतरी उद्धटपणे बोलला. श्यामने त्याला त्यावरून हटकल्यावर त्याच्या आत्तापर्यंत आमच्यावर असलेल्या रागाचा विस्फोट झाला आणि तो काय वाट्टेल ते बोलायला लागला. तुमच्यावर 'अँटी चायना अ‍ॅक्टीव्हिटीज'चा आरोप लाऊन तुरूंगात टाकेन वगैरेही बोलला. पुढे तर शर्टाच्या बाह्या सरसावून श्यामच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत त्याची मजल गेली. केदार आईल सिटवर असल्याने गुरूला येताना बघून तो श्याम आणि त्याच्या मधे उभा राहिला म्हणून पुढचा प्रकार टळला. नंतर आमचे एलओ उगवले आणि त्यांनी सगळ्यांना शांत केलं. वास्तविक परिस्थिती इतकी पराकोटीला जाईपर्यंत ते स्वस्थ का बसले होते काय माहित!

इथून पुढे ९५ किलोमिटरचा प्रवास छान होता. निवांत बसमध्ये बसून आसपासच्या प्रदेश पहात होतो. थोड्यावेळाने मानससरोवरा काठून प्रवास सुरू झाला. हा रस्ता झाल्यापासून मानस परिक्रमा बसने होते अन्यथा ही पण पायी करावी लागायची. इथे जवळच सिंधू नदीचा उगम आहे. तसच मानस सरोवर आणि राक्षसताल ह्यांना जोडणारा एक लहानसा प्रवाह आहे. पण गुरू आम्हांला तिथे घेऊन जायची अजिबात शक्यता नव्हती त्यामुळे आणखी अपमान करून घेण्यापेक्षा आम्ही त्याला विचारलच नाही. तसही पुढच्यावेळी पुन्हा तिथे जाण्यासाठी काही निमित्त पाहिजे ना! मधे एक लहान गाव लागलं. तिथे भाज्या वगैरे घेता आल्या असत्या. पण मधले एक दोन दिवस सकाळचं जेवणं केलेलच नसल्याने त्यावेळसाठी घेतलेल्या भरपूर भाज्या आमच्याकडे शिल्लक राहिल्या होत्या.

रस्त्याच्या एका बाजूला मेंढ्याचा एक मोठा कळप दिसला. खरतर इथलं मुख्य जनावर म्हणजे याक. पण हल्ली मेंढ्या आणि घोडेही सामान वाहतूकीसाठी वापरले जातात. ह्याबद्दल एक रोचक माहिती कळली. विरळ हवेमुळे इथे गवताचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आपल्या इथे हिमालयात जसं खूप गवत किंवा हिरवळ असते तसं इथे नसतं. मधे मधे पट्टे असतात. याक जेव्हा चरतं तेव्हा आपल्या धारदार जिभेचा 'लॉन मोवर' सारखा उपयोग करून फक्त वरवरचं गवत कापून खातं पण मेंढ्या किंवा घोडे/खेचरं गवत मुळापासून उपटून खातात. त्यामुळे त्यांचा कळप चरून गेला की तिथला गवताचा पट्टा नाहीसा होऊन जातो आणि तो परत उगवायला बरेच दिवस जातात आणि मग आसपासच्या परिसरात चार्‍याचा तुटवडा जाणवतो. नैसर्गिक गोष्टींचा विरुद्ध केलेल्या गोष्टी कश्या अपायकारक ठरू शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर कुगूचा कॅम्प आला. हा कॅम्प अतिशय सुंदर आहे. मानससरोवराच्या अगदी काठावर आणि प्रत्येक खोलीच्या मोठ्या खिडकीतून मानससरोवर आणि त्या पाठीमागे कैलास दिसत रहातो. कॅम्पच्या बाहेर एक सुंदर मॉनेस्ट्रीपण आहे. आजही स्वच्छ ऊन पडलं होतं. त्यामुळे पवित्र स्नानाचा कार्यक्रम आज होता. आमचे स्वैपाकी स्वैपाकाला लागले आणि जेवण तयार होईपर्यंत आम्ही अंघोळी करून घ्याव्या असं ठरलं. कॅम्पपासून उजव्या बाजूला थोडं पुढे जाऊन आम्ही पाण्यात उतरलो. पाणी अति म्हणजे अति थंड होतं. पहिली डुबकी मारल्यावर डोळ्यासमोर तारे, मेंदूत झिणझिण्या, सर्वांगातून शिरशिरी वगैरे सगळे प्रकार झाले. तीन डुबक्या माराव्या म्हणतात. बाहेर येऊन कोरडं झाल्यावर बरं वाटलं. पापांचा घडा रिकामा झाला!

जेवणं झाल्यानंतरचा उद्योग म्हणजे खोलीच्या खिडकीतून कैलास आणि मानससरोवराकडे बघत बसणे. बसल्याजागून इतकं सुंदर दृष्य दिसत होतं की बाहेर जायचीही आवश्यकता नव्हती. केदार आणि रघू थोडावेळ पूल खेळून आले. संध्याकाळी एलओने मिटींग बोलावली होती. दुसर्‍या दिवशी आम्ही मानससरोवराच्या काठी होमहवन आणि पुजा करणार होतो, त्याची ठरवाठरवी करायची होती. कोणीतरी टुम काढली की होमहवनाच्या आधी मानस सरोवरात अंघोळ करायची आणि पुजेआधी नाश्ता करायचा नाही. मानस सरोवरात अंघोळ करायची तर अकरा वाजेपर्यंत थांबावं लागलं असतं कारण तोपर्यंत पुरेसं ऊन पडत नाही. त्याबद्दल आमची काही हरकत नव्हती पण नाश्ता करायचा नाही हे चालणार नव्हतं. आधीच कैलास परिक्रमेदरम्यान खाण्याचे जरा हाल होऊन लोकांना अ‍ॅसिडीटीचा, उलट्यांचा त्रास झाला होता आणि तिथे पुन्हा भुकेलं राहून तब्येत बिघडवणं परवडण्यासारखं नव्हतं. काही गुज्जू मंडळींचं सुरू झालं की इतक्या दुर आलात तर जरा भुक धरवत नाही का वगैरे. मी मिटींगमध्ये विचारलं की जर आम्ही नाश्ता केला आणि पुजेला बसलो तर तुमच्या पुजेत काही बाधा येणार आहे का किंवा विटाळ वगैरे होणार आहे का ? तर सगळे म्हणाले नाही तसं काही नाही. म्हटलं मग ज्यांना खायचं त्यांना खाऊ द्या, तुम्ही कशाला मधे पडता. मग जेव्हडे लोक नाश्ता करणार आहेत त्यांच्या पुरता नाश्ता बनवायचा असं ठरलं. जवळ जवळ पंचवीस जणांनी नाश्ता करण्याला होकार दिला !! ह्यावेळी गुरूच्या वर्तनाबद्दलही चर्चा झाली. सगळ्या यात्रींनी मिळून एलओंना लेखी तक्रार नोंदवायचं ठरवलं आणि त्यानुसार एलओ चिन मधल्या भारतीय उच्चायुक्त्ताकडे तक्रार करणार असं ठरलं.

मानससरोवरामध्ये रात्री चमत्कार पाहायला मिळतात असं म्हणतात. कैलास तसच गुर्लामांधाता पर्वतावर रहाणारे यक्ष आणि किन्नर रात्री स्नानासाठी मानससरोवर येतात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी कैलास पर्वतावरून निघुन मानससरोवरात उतरणारे प्रकाश किरण दिसतात. त्यामुळे हे पहाण्यासाठी रात्री जागायचं होतं. फक्त एकच गोष्ट होती की आज पौर्णिमेची रात्र होती. त्यामुळे खूप चंद्रप्रकाश होता. जितका अंधार जास्त तितके तो प्रकाश दिसायची शक्यता अधिक असते. संध्याकाळी जेवणं झाल्यावर एलओचा दरबार भरला. त्यांनी दिल्लीतल्या निवडणूका किंवा त्याआधीच्या घडामोडींवरच्या बर्‍याच गोष्टी सांगितल्या.

रात्रे साडेदहा अकराच्या सुमारास आम्ही बाहेर सरोवराच्या काठी जाऊन बसलो. थंडी बरीच होती. त्यामुळे बरेच कपडे घालावे लागले. माझ्याकडे ट्रायपॉड होता, त्यामुळे आज रात्रीचे फोटो काढायची चांगली संधी होती. आम्ही कॅमेर्‍याच्या सेटींग्ज बद्दल बरीच बडबड करत होतो पण आमच्या बडबडीमुळे ते यक्ष आणि किन्नर येत नाहीयेत असं वाटून बाकीचे लोक वैतागत होते. खरं म्हणजे आम्ही ज्या दिशेला बघत होतो तिकडे आता रस्ता बांधलेला आहे. त्यामुळे मधूनच एखादा वाहनाचा दिवा दिसायचा. पण पार्वते वगैरे मंडळींनी त्याच दिव्यांना दिव्य प्रकाश समजून दुसर्‍या दिवशी चाळीस वेळा तसा प्रकाश दिसल्याचं सांगितलं! आम्ही अर्थातच त्याला काहीही सांगायच्या फंदात पडलो नाही. माझ्या कॅमेर्‍यामधून शटर स्पीड कमी करून बरेच फोटो काढले. केदारने बर्‍याच उपयुक्त सुचना, सुचवण्या केल्या. ट्रायपॉडवर कॅमेरा बसवण्या-काढण्यात मी आणि भिमाने जरा शक्ती प्रयोग केले त्यामुळे ट्रायपॉड खराब झाला आणि केदारचा कॅमेरा त्यावर बसेचना. खरतर केदारकडे खूप चांगल्या लेन्स होत्या, त्यामुळे तो कॅमेरा ट्रायपॉडवर बसवता आला असता तर अजून बरेच प्रयोग करून मस्त फोटो काढता आले असते. दरम्यान कोणीतरी चहाची सोयही केली. चांदण्या रात्री, मस्त थंडीत, निरव शांततेत, मानससरोवराच्या काठी, कैलास पर्वताच्या समोर गरम गरम चहाचे घोट घेत, इतर कसलीही काळजी, घाई, गडबड नसताना निव्वळ आजुबाजूचं दृष्य न्याहाळत रहाण्यासारखं दुसरं सुख नाही! ह्या केवळ ह्या दहा-पंधरा मिनीटांसाठीही प्रवासादरम्यान झालेले सगळे कष्ट अगदी सत्कारणी लागल्यासारखं वाटलं. अडीच तीन पर्यंत जागूनही दिव्य प्रकाश वगैरे न दिसल्याने मी खोलीत परतलो. खोलीतूनही बाहेरच दृष्य दिसत होतच. त्यामुळे पुन्हा थोडावेळ खिडकीपाशी रेंगाळलो आणि कधीतरी उशीरा झोपलो.

हे फोटो रात्री दिड दोन वाजता काढलेले आहेत.

चमत्कार बघण्यासाठी बसलेले यात्री :

दुसर्‍या दिवशी उठायची घाई नव्हती. अंघोळ, पुजा उशीरा उन्हं वर आल्यावर होती. पुजेमध्ये सहभागी व्हायचं की नाही ह्यावरून आमच्या कंपूमध्ये बरीच बोलाचाली झाली. मी पुजेत भाग घ्यायचा हे आधीच ठरवलेलं होतं. बाकीच्यांचं मात्र ठरत नव्हतं. दुसरे सांगतात किंवा करतात म्हणून सगळ्याच धार्मिक गोष्टी मी करत नाही. पण मला पटतील आणि ज्या करून बरं वाटतं अश्या गोष्टी मी करतो. शिल्पाचही तसच आहे. पण मानससरोवराच्या काठी करणार्‍या होमहवनात मी सहभागी व्हावं अशी तिचीही इच्छा होती आणि त्यापुढे एक पायरी म्हणजे मी सोवळं नेसून ती पुजा करावी असा तिचा ठाम आग्रह होता !! हे (खुळ) तिच्या डोक्यात कुठून आलं होतं ते माहित नाही पण तिचा युक्तीवाद असा होती की आपण ठराविक प्रसंगी/ठिकाणी ठराविक प्रकारचे कपडे घालण्याबाबत आग्रही असतो जसं की ऑफिसमध्ये फॉर्मल, पार्टीला कॅज्युअल, खेळताना किंवा ह्या प्रवासासाठी ड्राय फिट वगैरे तर मग पुजेला बसायचं तर ट्रॅक सुट का? सोवळं का नको! म्हटलं ठिक आहे, महिनाभर मला तिथे जाऊ देणार असशील तर हा एक हट्ट पुरा करायला माझी काही हरकत नाही. फक्त ते सव्वा दिड किलो वजनाचं सोवळं वागवायला जरासा त्रास झाला. काही काळ ते केदारच्या सामानातही ठेवावं लागलं त्यामुळे होमहवनातलं माझ्या वाटच थोडं पुण्य केदारलाही मिळालं असेल.

उन्हं वर आल्यावर पुन्हा एकदा मानससरोवरात डुबक्या मारल्या. कालच्या अंघोळीमधून काही पापं निसटली असतील तर ती पण धुवून निघाली. नंतर ते सोवळं नेसणं ह्या प्रकारावरून बर्‍याच गंमतीजमती झाल्या. रानडे आणि केदार म्हणायला लागले की ह्या खोलीत इतकं सामान आणि त्यात एक जण तयार होतो आहे हे म्हणजे अगदी लग्न घरासारखं वाटतं आहे. म्हटलं पण प्लीज मला परत एकदा बोहोल्यावर चढवू नका. एका स्त्रीहट्टामुळे हे सोवळं नेसायाला लागतं आहे, दुसरी काय करायला लावेल माहित नाही! बाहेर येऊन बघतो तर सगळे जण ठेवणीतले चांगले, स्वच्छ कपडे वगैरे घालून, नीट तयार होऊन आले होते. बर्‍याच जणांनी साड्या, झब्बे, धोतरं वगैरेही आणली होती. अगदी सणासुदीसारखं वाटत होतं. मानससरोवरा काठी होमकुंड बांधलेलच आहे. त्यामुळे ते सोडून इतर ठिकाणी पुजा करून परिसर घाण करू नये अशी अपेक्षा असते आणि ती रास्त आहे. आमच्या बॅचमधले रामनरेशजी बॅचचे पंडीत म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे तेच पुजा सांगणार होते. आपल्याकडे कशी प्रत्येक पुजेची सुरुवात गणपतीच्या पुजेपासून होते तशी उत्तर भारतीय लोकं करत नाहीत. त्यांनी एकदम नवग्रहांची पुजा सुरू केली. एकंदरीत होमहवन त्यांनी खूप व्यवस्थित पार पाडला. प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगत होते आणि शिवाय पुजा खूप लांबवलीही नाही. एकंदरीत प्रसन्न वातावरणात सगळं पार पडलं. आमच्या कंपूतला सौम्या वगळता सगळेजण नाही नाही करत करत पुजेला बसलेच, मग आधी इतकी चर्चा कशाला केली काय माहीत. अर्थात तिथे चर्चा करण्याव्यतिरिक्त दुसरं काही फारसं करण्यासारखं नव्हतच म्हणा! पुजा झाल्यावर, प्रसाद म्हणून जर कोणी काही आणलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला. आम्हांला दिल्लीत गुजराथी समाजातर्फे पुजेच्या सामानाचा डबा मिळाला होता. त्यात प्रसादाचं पाकीट होता. त्याचा नैवेद्य इथे दाखवणं अपेक्षित होतं म्हणे. पण आम्ही मात्र हुशारी करून ती पाकीटं आधीच्या प्रवासातच खाऊन संपवली होती! मग आम्ही इतरांचाच प्रसाद गोड मानून घेतला. आज जेवायचा शिरा पुरीचा स्पेशल बेत होता. गुरूपौर्णिमेच्या दिवशी मानससरोवराकाठी पुजा करायला मिळाली म्हणून सगळे भक्तगण एकदम खुषीत होते. पौर्णिमेमुळे इतर बॅचच्या बर्‍याच लोकांनी बॅच बदलून आमच्या बॅचमध्ये यायचा प्रयत्न केला होता म्हणे. आणखीन एक गोष्ट म्हणजे, कैलास परिक्रमेचे 'आऊटर कोरा' आणि 'इनर कोरा' असे दोन प्रकार असतात. आम्ही जी परिक्रमा केली ती आऊटर कोरा होती. इनर कोरा कैलास पर्वताच्या अजून जवळून आणि आतल्या बाजुला आहे. बारावेळा आऊटर कोरा केल्यानंतर यात्री इनर कोरा साठी पात्र ठरतात. मात्र यंदा 'हॉर्स इयर' असल्याने आम्ही एकदा आऊटर कोरा करूनही इनर कोरासाठी पात्र ठरलो आहोत. एकंदरीत बर्‍याच दृष्टीने आमची बॅच भाग्यवान होती तर.

दुपारी कॅम्प बाहेरची मॉनेस्ट्री पाहून आलो. आतमध्ये खूप सारे तेलाचे दिवे लावले होते. त्या दिव्यांच्या प्रकाशात बुद्धमुर्ती फार सुंदर दिसत होती.

आजची संध्याकाळ कैलास तसेच मानससरोवराच्या सानिध्यातली आमची शेवटची संध्याकाळ. त्यामुळे उजेड असेपर्यंतचा सगळा वेळ बाहेरच घालवायचा ठरवून आम्ही मानससरोवराच्या काठाने दुरवर फिरून आलो. आपल्याइथे जसं बोकड कापतात तसं इथे याक कापून देवाला अर्पण करतात. अर्थात हे अगदी खास प्रसंगीच केलं जातं. त्या याकचं डोकं ज्याला मिळतं तो भाग्यशाली समजला जातो. नंतर त्या याकची शिंग देवळाबाहेर वगैरे मांडून ठेवली जातात. याकच्या शिंगांच्या अश्या चळती बर्‍याच ठिकाणी बघायला मिळतात.

बर्‍याच विषयांवर भरपूर गप्पा झाल्या. उद्यापासून आमच्या परतीचा प्रवास सुरू होणार होता. घरी जायची ओढ होतीच पण आता हा प्रवास संपत आल्याची जाणीव झाल्याने सगळ्यांनाच जरा वाईट वाटायला लागलं होतं. संपूर्ण संध्याकाळ मानससरोवराकाठी घालवून डोळे आणि मन भरून तो परिसर पाहून घेतला. सामानाची बांधाबांध केली आणि आज फारसे जाग्रण न करता किंवा चमत्कार बघायची अपेक्षा न करता वेळेत झोपायला गेलो. कुगूच्या कॅम्पची उंची खरतर कैलास परिक्रमेमधल्या कॅप्सच्या तुलनेत कमी होती. पण कुगूला दोन्ही दिवशी रात्री श्वास घ्यायला जरा त्रास होता. खूप दीर्घ श्वास घ्यावे लागत होते. नंतर आम्ही खोलीचं दार उघडं ठेवलं होतं जेणेकरून खोलीतल्या ऑक्सिजनची पातळी खाली जाणार नाही.

दिवस १६ : कुगू ते तकलाकोट अंतर: ६५ किमी.

आजचा बसचा प्रवास छोटासा होता. तकलाकोटच्या जवळ सरदार झोरावरसिंगच्या स्मारकापाशी थांबलो. झोरावरसिंग हे काश्मिरच्या राजाचे सेनापती. त्यांनी स्वांतत्र्यापूर्वीच्या एका युद्धात हा सगळा परिसर जिंकून घेतला होता. मात्र तेव्हा संपर्क सुविधांच्या अभावी राजापर्यंत त्यांना ही बातमी पोहोचवताच आली नाही आणि नंतर ते काश्मिरला परतत असताना हिवाळी हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्यथा हा सगळा परिसर आज काश्मिरचा आणि पर्यायाने भारताचा भाग असता. विजयानंतर झोरावरसिंगांनी स्थानिक जनतेवर कोणतेही अन्याय किंवा अन्याय केले नव्हते. त्यामुळे ह्या स्थानिक जनतेने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे स्मारक इथे बांधले आहे.

चिनी सरकारने तकलाकोटच्या आसपास शेतीचे अनेक प्रयोग सुरू केले आहेत. थेट पंजाबची आठवण करून देणारी सरसोची शेते इथे हल्ली बघायला मिळतात. झोरावरसिंग स्मारकापाशी असच एक टवटवीत शेत पहायला मिळालं.

नंतर तकलाकोटहून पुढे १०-१५ किलोमिटरवर असलेलं एक बुद्धीस्ट देऊळ बघायला गेलो. ह्या देवळात राम, सिता आणि लक्षमणाच्या हिंदू तसेच बौध्द धर्मिय मुर्ती आहेत. हिंदू मुर्ती म्हणजे आपल्या देवळांमध्ये असतात तश्या तर बौद्ध मुर्तीमध्ये त्यांची आयुधं, आभुषणं वेगळी आहेत. ह्या देवळाचा परिसर खूप सुंदर होता. आपल्या इथे जश्या आज्या सकाळी आन्हिकं आटोपून देवळात जातात तश्या अनेक तिबेटी आज्या देवदर्शनासाठी आलेल्या दिसल्या. इथे ह्या देवळातर्फे याकच्या दुधातला चहा दिला.

बाराच्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो. जाताना आम्हांला जुन्या इमारतीत खोली मिळाली होती. त्यामुळे आज आम्हांला नवीन इमारतीतली खोली दिली. खोलीत येऊन हिटर सुरू केला आणि आधी गरम पाण्याच्या शॉवरने अंघोळ केली. तकलाकोटहून निघाल्यापासून मानससरोवरातल्या डुबक्या वगळता अंघोळ केलीच नव्हती. त्या गरम पाण्याच्या शॉवरने इतकं बरं वाटलं की त्यासाठी चिन्यांचे अगदी शंभर नाही पण निदान एक दोन अपराध तरी माफ!
तकलाकोटचा आजचा दिवस पूर्ण मोकळा होता. पुन्हा एकदा बाजारात चक्कर मारली. जरा फुटकळ खरेदी केली. घराची ओढ लागलेली असल्याने तसेच प्रवासातले सगळे मुख्य टप्पे पूर्ण झालेले असल्याने आज खूप बरं वाटत होतं. हॉटेलमधल्या कॅफेत सहज चक्कर टाकली तर तिथली बाई 'इंदो कॉफी' हवी आहे का असं विचारायला लागली. म्हणजे काय विचारलं तर तिने नेस कॅफेची बाटली दाखवली. छान गरम कॉफी घेऊन खोलीत परतलो. केदार आणि कंपनीने हिशोबाची कामं संपवली. स्वैपाक्यांची पैसे देणे, जमाखर्च मांडणे, शिलकीच्या पैशांचं काय करायचं हे ठरवलं. टोपीवाल्याने ५०० युवानांचा घोळ घालून ठेवला होता. केदार कडून पैसे घेतले आणि परत देताना फूड कमिटीला देतो असे सांगून दिलेच नाहीत! हिशोबाच्यावेळी ते लक्षात आलं. ह्यावेळी मात्र केदारने त्याची चांगलीच कान उघडणी केली. आम्ही तकलाकोटला आलो त्यावेळी नाभीढांगहून निघाल्यापासून जवळ जवळ १२ तास काहीच खायला मिळालं नव्हतं. उद्या येणार्‍या बॅचचे असे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या कॉमन फंडातल्या उरलेल्या पैशांमधून त्यांच्यासाठी ज्युसच्या बाटल्या, बिस्कीटे, फळे वगैरे आणून ती बसमध्ये ठेऊन द्यायचं असं ठरलं. त्याप्रमणे ती खरेदी केली.

आज रात्री जर्मनी विरूद्ध अर्जेंटीना अशी फुटबॉल फायनल होती. मॅच दाखवणारा चॅनेल शोधून झोपायला गेलो. उद्यापासून परतीचा प्रवास सुरू होणार होता. लिपुलेखपासमध्ये सीमा ओलांडून भारतात परतायचं होतं. संपूर्ण यात्रेतला सगळ्यांत मोठा म्हणजे तब्बल २८ किलोमिटरचा ट्रेक होता आणि त्याआधी १ वाजता उठून फायनल बघायची होती. एकंदरीत मोठा दिवस असणार होता !

---------------------------------------
भाग सातवा : http://www.maayboli.com/node/51573

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग पण मस्त! फोटो फारच अप्रतिम आहेत! मात्र ती याकची शिंगं पाहून कसंसं झालं Sad
आता किती सोयीसुविधा झाल्या आहेत तरी इथे वृत्तांत वाचताना बापरे वाटतंय तर पूर्वी कसं करत असतील?

पराग, अतिशय छान उतरला हाही भाग. कयाकच्या दुधाचा चहा कसा लागतो चवीला? वेगळा वास येतो का चहाला? आणि गावात भाज्या शिजवलेल्या मिळतात की कच्च्या भाज्या म्हणत आहेस? मानससरोवरातील पाणी पिण्यालायक असते का? माझ्या चुलत भावाने एक दोन बाटल्या भरुन आणल्या होता. आम्ही त्यातले पाणी घोट घोट प्यायलो.

रात्रीच दोन वाजताचे फोटो खरे तरे ते फोटो रात्रीचे वाटतच नाही. चांदण मात्र दिसत.

धन्यवाद Happy

कयाकच्या दुधाचा चहा कसा लागतो चवीला? वेगळा वास येतो का चहाला? >>>> वेगळी लागतेच चव. थोडा सॉल्टी लागतो.

आणि गावात भाज्या शिजवलेल्या मिळतात की कच्च्या भाज्या म्हणत आहेस? >>>> कच्चा भाज्या रे.. तिथे मार्केट आहे.

मानससरोवरातील पाणी पिण्यालायक असते का? >>>> हो असते. कुगूच्या कॅम्पवर तेच प्यायलो. शिवाय बाटल्या भरून घरी आणलं होतं.

आणि हो, आडो म्हणते आहे तसं 'याक'.. 'कयाक' नाही...

बाकी, जिप्सी तुझ्याकडून फोटोंचं कौतूक म्हणजे 'मेड माय डे'.. Happy

भारी! प्रवास संपत आल्याची मला पण रुखरुख वाटते आहे !
ते रात्री १ चे फोटो सन्ध्याकाळचे वाटताय्त फार तर. इतका उजेड कसा?
'लग्नघर' आणि सोवळे नेसणे भाग फनी होता Happy

रात्रीचे फोटो काय सुंदर आले आहेत.
आपल्याकडची लोकं-जनरली गृपमधली- ज्याला जे करायचं ते का करू देत नाहीत? कुणी काय करावं हे कशाला सांगायला हवंय?

रात्री काढलेले फोटो मस्त.

आतापर्यंतचे सगळेच भाग छान झालेत. नीट फॉरमॅटिंग करून याचं इ-बुक किंवा कमीत कमी पीडीएफ बनव.

हाही भाग सुंदरच जमलाय. रात्रीचे फोटो काय देखणे आलेत. ते चांदणं अनुभवण्यासाठी तरी किमान एकदा तिथं जावंसं वाटायला लागलंय.

हा भागही छान. फोटो तर सगळे अफाट आहेतच.

रात्रीचे फोटो खरंच रात्रीचे वाटतच नाहीत अजिबात.

मस्त आहे हा ही भाग. यात्रा संपत आल्याची रुखरुख इथे बसल्या बसल्या आम्हालाही लागली आहे.

ती सरसोंची शेतं पाहून आवाक झालेय. त्या वातावरणात इतकी हिरवाई? बाकीही काही मोठी झाडं दिसत आहेत. मागच्या उजाड डोंगराच्या पार्श्वभूमीवर हे बघायला वेगळंच वाटलं.

धन्यवाद सगळ्यांना.. Happy

इतका उजेड कसा? >>> मैत्रेयी, अंधार होता.. पण कॅमेर्‍याचं शटरस्पीड खूप कमी केला.. त्यामुळे फोटोत इतका उजेड दिसतो आहे. इतक्या कमी शटरस्पीडला ट्रायपॉड लागतोच नाहितर हलतं सगळं. तू जर यात्रींचा फोटो पाहिलास तर त्यात थोडी मुव्हमेंट दिसते आहे.

केदारने एकदम भारी सजेशन्स दिली हे फोटो काढताना... फोकस करायच्या बाबतीत वगैरे. त्यामुळे छान आलेत ते फोटो.

मागच्या उजाड डोंगराच्या पार्श्वभूमीवर हे बघायला वेगळंच वाटलं. >>>> खरय. ड्राय माऊंटन्समध्ये फुललेलं शेते बघायला ऑड वाटतं जरा !

अडम, तुम्ही नुसते याक दूध प्यायला काय?
कारण काश्मिर वगैरे ठिकाणी नूनचाय(नून-मीठ) चहा पितात. तर बहुधा तिबेट मध्ये सुद्धा मिठाचा चहा प्यायची पद्धत असेल थंडीत. कारण एक नातेवाईक गेले होते कैलासाला तर त्यांनी नुसते दूध प्याले होते. ते खारट वगैरे सांगितले न्हवते असे आठव्तेय.

सर्दी झाली तर खारट चहा आमच्याकडे सुद्धा करायची काकू(उत्तराखंडची काकू).
बाकी, भाग मस्त वाटले वाचायला. ते इतक्या थंडीत सरोवरात उतरणे कसे असेल ह्या विचाराने थंडी भरेल.
थोडेसे उन असले तर तापमानात इतका फरक पडतो का? की थंडीतले उन काय असणार?

हा भागही मस्तच.

तुमची कैलास-मानसरोवर परिक्रमा पुर्ण झाली परिक्रमेच्या दरम्यान तुम्हाला आलेले अनुभव आणि काही गंमती-जमती वाचताना जणु काही आम्ही तिथेच होतो असे पदोपदी वाटत होते. ही खरं तर तुमच्या सहजसोप्या लेखनशैलीची जादू. आता परतीच्या प्रवास वर्णनाच्या प्रतिक्षेत.....

आधीच्या भागांप्रमाणेच हा भाग पण मस्त झाला आहे.
एक एक भाग वाचुन ही यात्रा करायचा अजुन अजुन मोह होतो आहे. कधी जमेल देव जाणे. Sad

मस्त लेखन पण तुम्ही गुरुविरुद्ध तक्रार उगाच केलित. कम्युनिस्ट राजवटीत तुम्ही जेव्हडी तक्रार कराल तेव्हडा वरिष्ठ अधिकार्यांचा त्या माणसावरील विश्वास वाढतो याउलट तुम्ही गुरुबद्दल स्तुतीचे एक पत्र आणि त्याला भारताबद्दल किती प्रेम वाटते याचे वर्णन करुन पाठवायला हवे होते.

बाकी प्रवास वर्णन एक्दम झकास!