इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......

Submitted by ए ए वाघमारे on 9 November, 2014 - 12:11

इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......

आम्हाला आमचंच काय होणार हे माहीत नसताना आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार याची एक चिंता जगभरच्या विचारी माणसांना लागलेली असते म्हणतात . कधी ना कधी माणसाला ही पृथ्वी सोडून दुसरीकडे म्हणजे एखाद्या दुसर्‍या ग्रहावर आसरा घ्यावा लागणार हे निश्चित ,असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. पण हे दुसरीकडे म्हणजे कुठे आणि कसं आणि ते इतकं सोपं आहे का ? हेच शोधण्याचा प्रयत्नातील एका शक्यतेचं दर्शन ब्रिटीश वंशाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान आपल्याला त्याच्या ‘इंटरस्टेलार’ या सिनेमातून घडवतो. त्याच्या आधीच्या इंसेप्शन, प्रेस्टीज, मेमेंटो आणि बॅटमॅन मालिकेप्रमाणेच अत्यंत विचारपूर्वक बनवलेला हा साय-फाय चित्रपट.

पण ढोबळमानाने साय-फाय या जॉनरमधला हा सिनेमा असला तरी तो ठोकळेबाज नाही. साय-फाय आहे किंवा साधा अरिष्टपट आहे म्हणून तुम्ही जर उडणार्‍या गाड्या, चकाचक शहरं, मोठ्या प्रमाणावर मानवजातीवर कोसळलेलं संकट, विध्वंस , लांबलचक अ‍ॅक्शन सीक्वेंस, वेगवेगळी मशिन्स, रोबोट्स आणि या सगळ्यांमुळे अमेरिकेच्या अध्यक्षांची ढळलेली मन:शांती वगैरे बघण्याचा हिशेबाने जात असाल तर थोडे थांबा. तिकीट काढण्यासाठी उघडलेलं ‘बुक माय शो’ बंद करा. हा सिनेमा तसा नाही.

मी माझ्या स्वत:च्या नियमाप्रमाणे इथे सिनेमाची सगळी कथा सांगत बसत नाही. ज्या बारकाईने नोलान बंधूंनी पटकथा लिहिलीय त्याला खरंच दाद द्यायला हवी. आजकाल असल्या साय-फाय सिनेमांसाठी हॉलीवूडमध्ये रितसर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सल्लागार नेमतात. परंतु क्वांटम मेकानिक्स, रिलाटीविटी, पार्टिकल फिजिक्स, अॅस्ट्रोफिजिक्स , कॉस्मोलॉजी हे विषय, त्यांच्यातले आंतरसंबंध आणि अंतर्विरोध इतके किचकट आणि मूलगामी आहेत की सिनेमासारखं अभिव्यक्तीचं सर्वात सशक्त माध्यम हाताशी असतानादेखील थिएटरच्या अंधारात पडद्याकडे डोळे आणि भिंतीकडे कान लावून बसलेल्या सामान्य प्रेक्षकाला नेमकं काय आणि कसं दाखवायचं ही फारच अवघड गोष्ट आहे. इथेच खरं दिग्दर्शकाचं कसब आहे. आणि हे कसब आपल्याकडे आहे हे नोलानने पुन्हा सिद्ध केलं आहे.

सिनेमात जरी कालप्रवास ही एक संकल्पना साधन म्हणून वापरली असली तरी पटकथाकार अत्यंत हुशारीनं पृथ्वीवर घडणारा कथाभाग नेमक्या कोणत्या काळात घडतो म्हणजे कोणत्या शतकात घडतो याची दाद लागू देत नाहीत. निदान मला तरी ते समजलं नाही. मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालेली शेती , पात्रांच्या बोलण्यात येणारे गेलेल्या विसाव्या शतकाचे संदर्भ इत्यादी यावरून ही कथा फक्त भविष्यात कधीतरी ती घडते आहे इतकंच कळतं. त्यामुळे सिनेमा एका विशिष्ट कालबंधनाच्या अपेक्षेतून मुक्त करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. नाहीतर हे काळाचं भान ठेवता ठेवता सिनेमा तयार करताना खूप ‘रिसोर्सेस’ खर्ची पडतात.

इतका मोठा साय-फाय सिनेमा बनवाताना वैज्ञानिक आणिक तांत्रिक बाबीतलं नेमकेपण नसलं तरच नवल. सिंग्युलॅरिटी, ब्लॅक होल्स, वर्म होल्स , स्पेस टाईम रॅपिंग इत्यादी संकल्पनांचा मोठ्या खुबीने वापर केला गेला आहे. थोडंफार विज्ञान जाणणार्‍यांना आणि साय-फाय प्रकारच्या साहित्य-सिनेमाच्या रसिकांना या गोष्टींबाबत बर्‍यापैकी माहिती असते. काळाला उलटं नेता येत नाही, या कालप्रवासाच्या कल्पनेतील मुख्य अडथळ्याला ग्रॅविटी ही एक अतिरिक्त मिती (डायमेन्शन) कल्पून उत्तर देता येतं हे या सिनेमातलं प्रमुख वैज्ञानिक ‘प्रेपोजिझन’. ‘विश्वाचे आर्त’ समजून घ्यायला या ग्रॅविटेशनल वेव्हजच उपयोगी पडतील असं आजच अनेक जाणकारांना वाटतंय. त्यासाठी अनेक ठिकाणी ग्रॅविटेशनल वेव्ह ऑब्जर्वेटरीज उभारण्याचं काम चालू आहे. त्यात भारतही आहे. असो, तर या प्रवासाला कालप्रवास म्हणण्यापेक्षा एकाच व्यक्तीचं एकाच ‘वेळी’ एकाच ‘ठिकाणी’ असलेलं बहुमितीय अस्तित्व म्हणणं योग्य ठरेल. पण हे दाखवताना ‘ग्रॅंडफादर पॅरॅडॉक्स’ लागूच राहतो याचं भान ठेवण्यात आलं आहे.

दुसरी नोंद करण्यासारखी बाब म्हणजे भव्य साय-फाय सिनेमा करण्याच्या नादात येणारं अनावश्यक डिटेलिंग दिग्दर्शकाने टाळलंय. 3 डी करणं टाळलंय. कारण साय-फाय सिनेमाचा प्रेक्षक आता जरा प्रगल्भ झालाय. आधीच्या साय-फाय सिनेमात दाखवत तशा अजस्त्र प्रयोगशाळा, अवकाशयानांच्या कारखान्याचे शॉप फ्लोअर्स, चकाचक ‘फॅसिलिटी’, कंट्रोल रूम्स हे सगळं इंफ्रास्ट्र्क्चर बॅकएंडला असतंच. प्रत्येक वेळेला आता काही दाखवण्याची गरज नाही ही दिग्दर्शकाची प्रेक्षकांकडून रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे सिनेमात आता हतोत्साहित झालेल्या , नावापुरत्याच उरलेल्या नासाच्या गोपनीय फॅसिलीटीचा नेमका कामापुरताच भाग दाखवून कार्यभाग उरकला आहे.

तसंच “टार्स” आणि “केस” या रोबोट पात्रांद्वारे यापुढचे रोबोट्स हे थेटपणे ‘अॅयन्ड्रोइड’ किंवा ‘ह्युमेनॉइड’ म्हणजे माणसासारखे दिसणारे ,वागणारे नसून अधिक प्रॅक्टिकल, टास्क ओरिएंटेड डिझाईनचे असतील असं दिग्दर्शकाला सुचवायचं आहे. या रोबोटस्नासुद्धा ‘ऑनेस्टी’ ,’ह्यूमर’चं सेटींग देऊन मजा आणलीय. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची ही पुढची पायरी असेल.

परंतु साय-फाय म्हणून केवळ आंतरर्दिघीकीय (इंटरस्टेलार) प्रवास, कालप्रवास किंवा अवकाशातालं आयुष्य यावरच भाष्य करून सिनेमा थांबत नाही. पण एकूणच मानवजातीचं अस्तित्व, तिची टिकून राहण्याची धडपड, आजपर्यंत जसा माणूस टिकून राहिला तसा तो यापुढेही राहील असा दुर्द्म्य आशावाद हा या सिनेमाचा मुख्य विषय आहेत, असं मला वाटतं. आपली लाडकी पृथ्वी आता राहण्यायोग्य नाही, ती कायमची सोडून जाण्याची वेळ येणारच या वस्तुस्थितीची जाणीव आणि त्या विरहाची भावोत्कटता; माणूस कुठेही असला तरी त्याला असलेली रक्ताच्या नात्याची ओढ; सुदूर अवकाशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शाबूत असलेला माणसाचा स्वार्थीपणा असे अनेक खास ‘मानवीय’ मनाचे पैलूही सिनेमात दिसतात. आणि त्यामुळेच सिनेमा मोठा होतो, एक प्रभाव सोडून जातो.

शेवटी असे सिनेमे भारतात कधी तयार होतील या विचारातच आपण असतो आणि तोवर आयुष्यभर परदेशात राहिलेल्या भारतीय वंशाच्या कोणा शास्त्रज्ञाला कसलातरी पुरस्कार मिळाल्याच्या किंवा हॅरी पॉटरच्या असंख्य पात्रांमध्ये कुठल्यातरी पात्राचं आडनाव ‘पाटील’ असल्याच्या आनंदाने सिनेमाच्या सुरूवातीला दाखवलेल्या भारतीय वायू दलाच्या अत्याधुनिक ‘ड्रोन’ च्या दर्शनावरच आपण समाधान मानून घेतो आणि थिएटरच्या बाहेर पडतो.

इथेही उपलब्ध: aawaghmare.blogspot.in

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंत. अनेक दिवसांनी चांगले चित्रपटपरीक्षण वाचले.

आजच पाहिला, आवडला. Gravity Anomaly समजून घेणे, समजावणे सोपे नाही पण दिग्दर्शकाने पुरेपूर प्रयत्न केलाय. वेगळ्या मितीच्या विश्वात भूत-वर्तमान-भविष्य रेखीय न राहता चक्रीय असेल? चक्रावून टाकणारी कल्पना.
Matthew McConaugheyचा अभिनय मस्तच, पण सगळ्यात झकास TARS रोबो. त्याचं डिझाईन, संवाद सर्वच जमून आलंय. नायकाचा थोडासा वेगळा accent संवाद कान देऊन ऐकायला लावतो. लांबी काहीशी जास्त असूनही रखडत नाही, आणि शेवटची चाळीसेक मिनिटे तर थरारकच!

वेल्श कवी डिल्लन थॉमसची (१९१४- १९५३) कविताही अगदी खास चित्रपटासाठी लिहिल्यासारखी चपखल.

Do not go gentle into that good night,
Old age should burn and rave at close of day;
Rage, rage against the dying of the light.

- Dylan Thomas

वेगळ्या मितीच्या विश्वात भूत-वर्तमान-भविष्य रेखीय न राहता चक्रीय असेल? चक्रावून टाकणारी कल्पना. >>> खरेच.. ईटरेस्टींग ..

परीक्षण मस्त लिहिलेय. डिट्टेलवार कथा न सांगताही उत्सुकता जागवून मस्ट सी मध्ये टाकायला भाग पाडणारे..
माझ्यामते चकाचक तांत्रिक सिनेमापेक्षाही त्यातील इमोशन्स सिनेमाशी जोडायला जास्त मॅटर करतात.. ते तसे आहेत हे आपल्या परीक्षणावरून वाटतेय.. म्हणून नक्की आवडेल हा सिनेमा..

बॉलीवूड पेक्षा आम्हाला हॉलीवूडच जास्त प्रगल्भ वाटते..

त्यामुळे हा पण स सिनेमा नक्की नघेतल्या जाईल.