एक अपमृत्यू ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 November, 2014 - 05:39

तो टाकीत उतरला
टाकी साफ करायला
विशीचा तरुण पोरगा
क्षणात मरून गेला

कुणी म्हणती शॉक लागला
कुणी म्हणती गुदमरला
तर्क वितर्क गूढ करत
अर्थ कुणी काय लावला

दाढी कोवळी केस कुरळी
डोळे आत खोल ओढली
थोडी उघडी पुतळ्या थिजली
मुद्रा उदास करून गेली

होता मृत्यू त्याचा जाहीर
बाप उभा सुन्न कातळ झाला
आवळून मग पोट घट्ट आपले
मटकन असा खाली बसला

श्वास त्याचा छातीत अडकला
जणू की अंतर चिरत गेला
कसा बसा अन बाहेर पडत
एक विदीर्ण हंबरडा झाला

कुठे कुठे मरण लपते
असे कुणा का घेवून जाते
या अपघाती प्रश्नाचे
कुणाकडेच उत्तर नव्हते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users