दुसर्‍यांच्या घरात कसे वागायचे ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 November, 2014 - 16:22

संपूर्ण शीर्षक (विषय) - दुसर्‍यांच्या घरात कसे वागायचे याची शिस्त लहान मुलांना कशी आणि कितपत लावायची?

माझे मत विचाराल तर, अपना दिल हि कुछ ऐसा है के मुलांनी मस्ती केलेली मला आवडते. उद्या माझ्या मुलांनी इतरांच्या घरात मस्ती केल्यावर मी कसा व्यक्त होईल हे आताच सांगता येणार नाही, पण सध्यातरी इतर मुलांची आमच्या घरातली मस्ती मी एंजॉय करतो. आणि आमच्या घरचे वातावरण सुद्धा ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ असे असल्याने शेजारपाजारच्या पोराटोरांचा धांगडधिंगा चालूच असतो.

असो, आज अचानक हा प्रश्न पडायचे कारण, दिवाळीच्या फराळानिमित्त आईच्या विविध वयोगटातील मैत्रीणी घरी आल्या होत्या. त्यापैकी एकीचे साधारण ३ वर्षांचे कार्टे जरा जास्तच धडाकेबाज होते. आमच्या सोफ्यावर दे दणादण उड्या मारत होते. आता आमचा सोफा आहेच कमाल! म्हणजे दिसायला चारचौघांसारखाच असला तरी त्यात माझ्या आज्जीचा आत्मा वास करतो की काय अशी मला घनदाट शंका आहे, कारण आमच्या घरी येणार्‍या प्रत्येक लहान मुलाला त्याचा लळा लागतोच. हा देखील अपवाद न ठरतो तर नवलच! पण त्याची मस्ती आवरताना त्याच्या आईची फार त्रेधा तिरकीट धा उडत होती. "नको बंटी, बीहेव बंटी, आता मार खाशील हं बंटी" वगैरे वाक्ये याच क्रमाने फिरून फिरून येत होती. मी मात्र नेहमीप्रमाणेच मजा घेत होतो. किंबहुना त्याची मस्ती बघून माझ्या आईला तिच्या या रिशी बाळाचे बालपण आठवल्याने, त्या बंटी बाळाबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर सुद्धा जन्माला आला होता.

असो, तर माझी आई आतल्या खोलीत फराळाच्या तयारीत मग्न झाली आणि इथे आईची एक ज्येष्ठ मैत्रीण, ज्यांचे विचार माझ्यासारखेच होते, त्या बंटीच्या आईला म्हणाल्या, "ईटस फाईन सुनैना!"
पण सुनैनावहिनींचे बंटीला व्यर्थ दम देणे चालूच होते. त्यावर त्या काकू पुन्हा म्हणाल्या, "ईटस अ‍ॅबसोल्यूटली फाईन सुनैना!"
‘अ‍ॅबसोल्यूटली’ हा शब्द असा टेचात उच्चारला की त्याचा इफेक्ट झालाच. पण तरीही त्यावर सुनैनावैनी म्हणाल्या, "आपल्या घरात मस्ती ठिक आहे हो, पण लोकांच्या घरात ..." आणि याच वाक्याला आतल्या खोलीतून माझ्या आईने एंट्री घेतली तसे त्यांनी जीभ चावली. ‘एकीकडे मैत्रीण म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे लोकाचे घर म्हणायचे’ वगैरे लॉजिकनुसार त्यांचे त्यांनाच वैषम्य वाटले.

असो, पुढे मग त्या सुनैना वैनी सारवासारव करत म्हणाल्या, "ओरडले नाही, शिस्त नाही लावली, की प्रत्येकाच्या घरात तो असेच वागणार ...." आणि त्यांची चर्चा सुरू झाली, जी ऐकायला मी तिथे थांबलो नाही.

आता यावरून मला प्रश्न पडले आहेत ते असे,
१) एवढ्या लहान मुलांना लोकांच्या घरात कसे वागावे याची काटेकोरपणे शिस्त लावणे खरेच गरजेचे आहे का? कि अक्कल आल्यावर त्यांचे त्यांना समजेल म्हणून शांत राहायचे?
२) शिस्त लावताना दुसर्‍याच्या घरात कसे वागावे याचीच लावायची की मग आपल्या घरात चालणार्‍या मस्तीवरही निर्बंध लावायचे?
३) हे घर दुसर्‍याचे असून आपले नाही, हे चिमुरड्यांच्या मनावर कसे बिंबवायचे? कारण दुसर्‍याच्या घरांमध्येही आपल्या जवळच्या नातेवाईकांचे घर (यात आजोळही आले), जवळच्या मैत्रीणीचे घर, लांबचे नातेवाईक किंवा लांबच्या मैत्रीणीचे घर, किंवा फारसे ओळख नसलेल्यांचे घर वगैरे बरेच प्रकार आलेत ज्यानुसार शिस्तीचे निर्बंध साहजिकच कमी-अधिक प्रमाणात शिथिल वा काटेकोर होतात. हा फरक लहान मुलांना नेमका कसा समजवायचा?
४) अतिशिस्त लावायच्या नादात पोरांचे बालपण कोमेजून गेले तर हि भिती राहणारच, तर या शिस्तीचे प्रमाण किती असावे? अर्थात व्यक्तीनुसार ते बदलणार, पण कसे ठरवावे? आपल्या आसपासच्या शिस्तखोर मुलांना बेंचमार्क पकडावे का?
५) नंबर ५, हा प्रश्न नसून एक पडलेले कोडे आहे. मुले मोठी झाल्यावर एखादी आई कौतुकाने म्हणते, "आमचा बंटी किनई, लहानपणापासूनच अगदी शांत आणि समजूतदार होता.." तर दुसरी आई कौतुकाने(च) म्हणते, "आमचा बंड्या म्हणजे तुम्हाला सांगते, लहानपणी एवढा खोडकर आणि मस्तीखोर होता की विच्चारायची सोय नाही.." आता याला आई नावाचे अजब रसायन म्हणायचे का!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा पॅरा विनोदी लेखात मोड्तो .हे तर ललित लेखन आहे ना. Proud
मी नाही लिहिणार माझा कोटा संपलाय . धाग्याच्या १०० साठी शुभेछा. Happy

आधी एखादा काढलेला धागा उचलून ( त्यावर भरपूर चर्चा झालेली असताना ) परत परत त्याच विषयावर स्वता नवीन धागा काढण्याच काय प्रयोजन ?

ऋ, तुम्ही स्वतः "बंटी" असताना कसे वागत होता?? किंवा तुम्हाला कसे वागायला भाग पाडले गेले (किंवा तसे प्रयत्न केले गेले) हे वाचायला आवडेल.

सुजा,
ओह, मला ठाऊक नव्हते, सर्चकाम करायचे राहून गेले.
असो, तसेही सिनी यांना यात थोडेफार ललित दिसले आहेच, मी फुरसतीने भर टाकून पुर्ण ललितच करून टाकतो

...

असामी,
हा बर्‍यापैकी common sense चा भाग असे नाही का वाटत तुला ? It's different ballgame that 'common sense is not so common anymore.'
>>
हा हा, अ‍ॅकचुअली हेच बोलणार होतो, कॉमनसेन्स इज व्हेरी अनकॉमन, मग कॉमन लोकांनी काय करायचे..
पण तरीही कॉमनसेन्स वापरा एवढेच उत्तर द्यायचे म्हटले तर जगातले ९९ टक्के प्रॉब्लेम्सना हेच उत्तर लागू होईल. पण नेमका कसा वापरावा हा प्रश्न मात्र जगाच्या अंतापर्यंत अनुत्तरीतच राहणार.

भ्रमर,
ऋ, तुम्ही स्वतः "बंटी" असताना कसे वागत होता?? किंवा तुम्हाला कसे वागायला भाग पाडले गेले (किंवा तसे प्रयत्न केले गेले) हे वाचायला आवडेल.
>>>
लेखात उल्लेखलेय ना मी मस्तीखोरच होतो आणि घरात कौतुक होते याचे. इतरा़ंकडेही मस्तीच करत असणार कारण माझ्या मस्तीखोरपणाचे किस्से आमच्या ओळखीच्यांमध्ये आजही चघळले जातात. अगदी आजही एखादा मुलगा मस्ती करतो तेव्हा त्याची तुलना माझ्या बालपणाशी केली जाते असा एक बेंचमार्क स्थापित केला आहे. पण अर्थातच तो काळ वेगळा होता, तेव्हाची लोक वेगळी होती, तेव्हा जिथे चाळसंस्कृती नांदायची तिथे आजच्या तारखेला फ्लॅटसंस्कृती वसते. सोफेस्टीकेटेडपणा आणि एटीकेट्स मॅनर्स यांच्याही व्याख्या बदलल्या आहेत. काही ठिकाणी संस्कार म्हणजे एटीकेट्स, मॅनर्स असेही समजले जाते. त्यामुळे आपल्या कोणाच्याही बालपणाची तुलना आज करण्यात काही अर्थ नाही म्हणून सविस्तर लिहित नाही.

Uhoh

या धाग्याच नाव खरे तर दुसर्‍याच्या घरात कसे वागु नये असे असायला हवे होते.:फिदी::दिवा:

दुसर्‍यांच्या घरात गेल्यावर आपल्या वस्तूंचा कचरा तिथे करू नये.
त्या घरातील लोकांच्या संभाषणात आपले तोंड घालून 'मला फार कळते' असे सारखे भासवू नये.
आपलेच घर आहे समजून प्रत्येक खोलीत फिरून, जिथे तिथे प्रत्येक गोष्टीवर आपले मत प्रदर्शन करू नये.
आपल्या वागण्यामुळे दुसर्‍याचा घरातील लोकांच्या कपाळावर आठ्या बघितल्यास 'योग्य तो सिग्नल समजून' काढता पाय घ्यावा.

असे वागणे 'मायबोलीवर' आचरणात आणून दुसर्‍यांच्या घरात सभ्यपणे वागण्याचा सराव तुम्हाला करता येईल.

लहान मुलांना लहान मुलांसारखेच वागु द्यावे मोठि होतिल तशि आपोआप अक्कल यायला लागते ज्यांना मुलांनी मस्ती केलेली आवडत नाहि अशांच्या घरि जाऊपन नये.

ज्यांना मुलांनी मस्ती केलेली आवडत नाहि अशांच्या घरि जाऊपन नये. >>> प्लस वन वन वन ..

हुप्पाहुय्या, लव्ह यू अगैन ... आपली विपु चेक करा Happy