कैलास मानससरोवर यात्रा: भाग ५ - कैलास परिक्रमा

Submitted by Adm on 4 November, 2014 - 01:03

भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024
भाग चौथा : http://www.maayboli.com/node/51358
-------------------------------------------------------------------
दिवस ११ : तकलाकोट ते दार्चेन. अंतर: १०२ किमी. उंची: १५३२०फूट / ४६७०मिटर

आजपासून परिक्रमा सुरू होणार होत्या त्यामुळे सगळे उत्साहात होते. इथून पुढे मुख्य सामान ट्रकमधून वाहून नेलं जातं. ते आदल्या दिवशीच ट्रकमध्ये बांधून टाकलं होतं. नाश्ता करून सकाळी साडेआठ वाजता बसने निघालो. आज फक्त बसचा प्रवास होता. दार्चेन ह्या गावी कैलास परिक्रमेचा बेस कॅम्प आहे. नेपाळ मार्गे येणारे यात्री तकलाकोटला न येता एकदम दार्चेनलाच येतात. तकलाकोट शहराच्या बाहेर पडल्यावर ड्राय माऊंटन्स आणि टिपीकल तिबेटी दृष्ये दिसायला लागली. रखरखीत डोंगर, गवताचं एकही पातं नसलेली वाळूमय जमीन, निळशार आकाश, त्यात मधे मधे पांढर्‍या ढगांनी तयार झालेल्या नक्ष्या आणि अधून मधून दर्शन देणारी दुरवरची बर्फाच्छादित शिखरं. खरंतर प्रत्येक दृष्यच फोटो काढण्याजोगं होतं. पण हलत्या बसमधून कसरत करण्यापेक्षा तो परिसर डोळेभरून पाहून घेतला. साधारण तासभराच्या प्रवासानंतर राक्षसताल जवळ आल्याचं कळलं. ह्या परिसरात मानससरोवर आणि राक्षसताल अशी दोन सरोवरं आहेत. राक्षसतालाच्या काठी बसून रावणाने शंकराची तपश्चर्या केली आणि शिवलिंग प्राप्त केलं अशी आख्यायिका आहे. आपलं आणि रावणाचं जमत नसल्याने राक्षसताल पवित्र मानला जात नाही. (श्रीलंकन यात्रेकरू इथे येतात का ह्याची चौकशी केली पाहिजे!) इथे कोणी आंघोळी करत नाही किंवा तीर्थ घेत नाही. एक वळण घेऊन बस राक्षसतालाच्या काठी थांबली. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असल्याने राक्षसतालाचं पाणी निळशार दिसत होतं! शिवाय पाण्याच्या पातळीपासून जरा वर होतो त्यामुळे दृष्य अगदी छान दिसत होतं. हा ताल अतिशय सुंदर आहे. उगीच नाही रावणाला ह्या परिसराची भुरळ पडली!

कितीही फोटो काढले तरी समाधानच होत नव्हतं. वेगवेगळे कोन, जागा, सेटींग्ज करत करत बरेच फोटो काढले. ग्रुप फोटोही काढले. आमच्या बॅचमध्ये नुकतच लग्न झालेला एक प्रभू नामक मनुष्य होता. तो दिसेल त्या प्रत्येक जागेसमोर उभं राहून स्वतःचे फोटो काढून घेत असे. त्याचं म्हणण की कुठल्याही जागेचे गुगलवर खूप फोटो सापडतात, त्यामुळे स्वतःचा फोटो काढणं महत्त्वाचं! अर्थातच बरोबरच्या लोकांना कामाला लावत असे. इथे त्याने स्वतःचे सुमारे ५० तरी फोटो काढले असतील!
राक्षसतालाचं पाणी मानसिक रोगांवर गुणकारी असतं कोणीतरी म्हणत होतं. खरं खोटं रावण जाणे.

इथून पुढे दार्चेनपर्यंत जो रस्ता जातो तोच हा काराकोरम हायवे. जो चिनने तिबेटमधल्या ल्हासापासून, पाकव्याप्त काश्मिरातून नेऊन पुढे काराकोरम पर्वतरांगांमधून ताश्कंदपर्यंत नेला आहे. अतिशय उत्कृष्ठ दर्जाचा हा हायवे सीमेपासून खूपच जवळ आहे. ह्यामुळे चिनला सैन्याची हालचाल करणं खूपच सोईचं झालं आहे आणि भारतासाठी ते खूपच धोकादायक आहे. तिबेट आणि पाकव्याप्स काश्मिरातल्या ह्या बांधकामाबद्दल आपण कडक निषेध करण्याशिवाय काहीच करू शकलो नाही. दार्चेन जवळ येता येता रघूने एक ठिकाण सांगितलं. तिथे एक मॉनेस्ट्री आहे आणि ह्या मॉनेस्ट्रीतून कैलास पर्वत, मानससरोवर, राक्षसताल आणि गुर्लामांधाता पर्वत ही चारही ठिकाणं दिसू शकतात. हे ठिकाण अगदी आमच्या रस्त्यावर होतं पण आमच्या गुरू गाईडने तिथे बस थांबवायला नकार दिला. थोडं अंतर गेल्यानंतर मानससरोवराच पहिलं दर्शन होणार होतं. इथे एका चिनी आर्मीच्या एका चौकीवर बस थांबली आणि तिथल्या एका अधिकार्‍याने सुचना दिल्या की मानससरोवरात साबण, शॅम्पू वगैरेचा वापर करायचा नाही, तसच सैन्याच्या कुठल्याही कॅम्पचे, वस्तूंचे किंवा जवानांचे फोटो काढायचे नाहीत. हा अधिकारी बोलून एकदम चांगला वाटला. पुढे बस वळून मानससरोवराच्या काठी थांबली. आम्ही इथे पोहोचेपर्यंत आकाशात थोडेफार ढग आले होते, त्यामुळे मानससरोवर बरच गढूळ रंगाचं दिसत होतं. अगदी खरं सांगायचं तर त्या प्रथमदर्शनी मानससरोवरापेक्षा राक्षस तालच जास्त सुंदर दिसला होता. मी केदारला तसं म्हटलही. तो म्हणाला हळू बोल रे बाबा. आधीच आपण नास्तिक, पापी वगैरे गटातले, त्यात जर आपण मानससरोवरापेक्षा राक्षसताल सुंदर असं म्हणालो तर आपल्याला वाळीतच टाकायचे!

मानससरोवरात स्नान केलं की सात जन्मांची पापं धुतली जातात आणि जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटका मिळते असं मानतात. त्यामुळे सगळ्यांना मानससरोवरात डुबकी मारायची प्रचंड घाई असते. आम्हांला सुचना दिलेल्या होत्या की पाणी प्रचंड थंड असतं त्यामुळे दुपारी आणि ऊन असतानाच सरोवरात जायचं म्हणजे थंडीचा त्रास होत नाही. खरतर पुढे आम्हांला मानससरोवराच्या काठावर मुक्कामासाठी जवळजवळ दोन दिवस मिळणार होतो पण आत्ता ह्या दोन्ही अटी पूर्ण होत होत्या. खाली उतरल्या उतरल्या आम्ही फोटो काढायला लागलो, पण दुसरा ग्रुप मात्र कपडेच काढायला लागला. काय चाललय हे कळायच्या आता मंडळी पाण्यात! नंतर अचाकन पार्वते की कोणीतरी 'कच्छा दे दो.. कच्छा दे दो' ओरडायला लागलं. आम्हांला कळेना आता हे काय आणखी! तर कपडे ओले होऊ नयेत म्हणून एकाने अंघोळ करताना वापरलेलीच अंडरवेअर पुढचा माणूस चढवून अंघोळ करत होता!! मुळात बेसिक स्वच्छताच जिथे पाळली जात नाहीये, अश्या अंघोळीला पवित्र का म्हणावं ? मी, केदार, सौम्या वगैरे हा प्रकार दुरुन बघत होतो. राग, किळस, चिडचिड, हताश वगैरे भावना येऊन गेल्यानंतर आम्हांला ह्यावर जोरदार हसू यायला लागलं आणि आम्ही आता ही पवित्र अंडरवेअर घालून अंघोळ करणारा पुढचा माणूस कोण असणार ह्यावर पैज लावायला लागलो!

नंतर आम्ही आसपासच्या परिसरात चक्कर मारून आलो. कोणाशीही काही न बोलता, कुठलाही आवाज न करता फक्त पाण्याकडे बघत रहावं. फक्त स्वतःच्या श्वासाचाच तेव्हडा आवाज येतो. अतिशय शांत वाटलं!
लोकांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्यावर बसने पुढे निघालो. तासभराचा प्रवास झाल्यावर दुरवर कैलासपर्वताचं पहिलं दर्शन झालं. बाकी सगळी शिखरं बोडकी असताना फक्त कैलास बर्फाच्छादित आहे. हिमालयात बर्फाच्छादित शिखरं खूप दिसतात. नक्की काय ते सांगता येणार नाही पण कैलासपर्वतात नैसर्गिक म्हणा, धार्मिक म्हणा पण खूप काहीतरी विशेष आहे आणि ते प्रत्येक वेळी त्याचं दर्शन झाल्यावर जाणवलं. अनुभूती वगैरे जड शब्द मी नाही वापरणार पण कैलास दर्शनाचा तो अनुभव प्रत्येकासाठी वेगळा, स्वत:चा असावा असं मला वाटलं.

हा गुर्लामांधाता पर्वत

आता परिक्रमा संपेपर्यंत कैलास आमच्या सोबत असणारच होता. दार्चेनला कैलासपर्वाताचा 'साऊथ फेस' आहे. आपण देवळात जशी प्रदक्षिणा घालतो तशी कैलासाला उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालायची होती. दार्चेन गावात शिरण्यापूर्वी पुन्हा एकदा सामानाची तपासणी झाली. इथे बरीच दुकानं आणि बाजार आहे. दार्चेनला चांगलं बांधलेलं गेस्ट हाऊस आहे. तसच स्वयंपाक करण्यासाठी वेगळी खोली आहे. इथे मोठ्या प्रमाणावर सोलार पॅनल दिसली.बाहेरचे तर सगळेच दिवे सोलार बॅटरीवर चालणारे होते. दार्चेनहून जीपने 'अष्टपाद' नावाच्या ठिकाणी जाता येतं. अष्टपाद हे जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. तसच अष्टपादच्या एकेका पायरीवर पांडवांनी प्राण सोडून स्वर्गात प्रवेश केला होता असं मानलं जातं. खरतर दिवस मोकळा होता पण गेल्यावर्षी अ‍ॅक्सीडेंट झाले असं सांगून गुरूने अष्टपादला जाण्याची परवानगी नाकारली. सौम्याची ह्याच्यावरून गुरूशी खडाजंगी झाली.

आमच्या स्वयंपाक्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली. आम्ही खोलीत येऊन, आवरून जरा पडलो होतो. वाचता वाचता डोळा लागला. बोलण्याच्या आवाजाने जाग आली तर दोन तिबेटी ललना त्यांच्या जवळच्या माळा, ब्रेसलेट वगैरे फुटकळ वस्तू विकण्यासाठी आमच्या खोलीत येऊन थेट पलंगावर बसल्या होत्या आणि केदार त्यांच्याशी कुठल्यातरी वस्तूवरून घासाघीस करत होता! त्यांना 'हाऊ मच' सोडून काही कळत नाही. कॅल्क्युलेटरवर त्यांनी आणि आपण किंमत टाईप करायची आणि ठरवायचं. कसंबसं त्यांना बाहेर घालवलं. तोपर्यंत जेवण तयार झालं होतं. जेवण झाल्यावर साडेतीन चारच्या आसपास बाजारात फेरफटका मारला तसच थोडे फोटो काढले. येताना दार्चेनला मुक्काम नसणार होता आणि इथे विकायला होत्या त्या माळा वगैरे सोव्हिनिअर वस्तू तकलाकोटला दिसल्या नव्हत्या. मग शेवटी मी पण थोडीशी म्हणजे म्हणजे माझ्या पाऊचमध्ये मावेल इतकी खरेदी करूनच टाकली. बाजारात एक जरा वेगळ्या प्रकारचं ब्रेसलेट दिसलं. तिबेटी बाई म्हणे २०० युवानला. मी विचार केला फारतर नाही म्हणेल आणि तसही कुठे ती बाई मला परत भेटणार आहे शिव्या घालायला, १० युवानला मागून पाहू. १० म्हटल्यावर तिने रागीट चेहेरे केले, काहितरी पुटपुटली. मी निघून जायला लागलयावर २५ म्हणे. मग अजून जरा प्रयत्न केल्यावर शेवटी तिने २०० युवानचं ते ब्रेसलेट २० युवानला दिलं. माझी ही बार्गेनिंग पॉवर बघून आमच्या बॅचमधल्या (आणि नंतर घरातल्याही) बायका एकदम खुष झाल्या!

संध्याकाळी / रात्री करण्यासारखं काही नसल्याने नेहमीप्रमाणे टवाळक्या करून झोपून गेलो. खरतर आजचा इथला मुक्काम उगीच होता. हा कमी करून यात्रेतला एक दिवस कमी करता आला असता.

दिवस १२ : दार्चेन ते देराफुक. अंतर: १९ किमी. उंची: ५०६०फूट / १६६०० मिटर

४८ किलोमिटरच्या परिक्रमेचा आजचा पहिला दिवस. दार्चेन ते यमद्वार हे ७ किलोमिटरचं अंतर बसने तर पुढे १२ किलोमिटरचा ट्रेक होता. यमद्वाराला यमाचं देऊळ आहे. म्हणजे हे आपलं नेहमी सारखं देऊळ नाहीये. खरोखरच एक दार आहे आणि ते ओलांडून परिक्रमेची सुरुवात करायची असते. यमद्वारातून पुढे गेलं की परिक्रमा करणार्‍याला यमाची भिती रहात नाही आणि परिक्रमा सुरळीत पार पडते असं मानतात. तसच एकदा ते ओलांडलं की माघारी फिरायचं नाही. फक्त पुढेच जायचं.

यमद्वारहून कैलास दर्शन खूप सुंदर झालं. इथे आम्हांला चिनी घोडेवाले आणि पोर्टर मिळणार मिळाले. आज पासून तीन दिवस आमचं मुख्य सामान मिळणार नव्हतं त्यामुळे अगदी आवश्यक तितक्याच गोष्टी सॅकमध्ये घेतल्या होत्या. इथे पोर्टर आणि घोडेवाला ह्या दोघीही मुली होत्या. नवरा बायको मिळून हे काम करतात. बायको सामान घेते आणि नवरा घोडा हाकतो. ह्यांना हिंदी किंवा इंग्रजी अजिबात येत नाही. त्यामुळे कमान आणि अभिलाषशी जश्या गप्पा व्हायच्या किंवा ते जसे आम्हांला धिर देत रहायचे तसं इथे अजिबात होत नव्हतं.

यमद्वारहून पुढे एका नदीच्या काठून प्रवास सुरू झाला. मानससरोवरातून सतलज, सिंधू, ब्रम्हपुत्रा आणि कर्नाली अश्या चार नद्या उगम पावतात. मला वाटलं की ह्यातलीच कुठली नदी आहे. पण ही त्यातली नव्हती. हिचं स्थानिक नाव 'लाच्यू'.

आता आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो त्यामुळे विरळ ऑक्सिजनचा चांगलाच प्रभाव जाणवत होता. थोडा जरी चढ आला तरी हृदयाचे ठोके इतके वाढायचे की भिती वाटावी. त्यात केदार, भिम, श्याम, बन्सल वगैरे मंडळी पुढे निघून गेली होती कारण त्यांनी घोडे केले नव्हते. माझी घोडेवाल्याशी भेट होईपर्यंत जवळ जवळ तासभर फुकट गेला. मी चालत असताना माझ्या आजूबाजूला सगळी घोड्यावर बसलेली लोकं होती. म्हणजे घोडे, पोर्टर आणि घोडेवाले अश्या सगळ्या तिबेटींबरोबर मी एकटाच भारतीय चालत! सहयात्री 'अरेरे बिचारा' वगैरे नजरेने बघत माझी चौकशी करत होते आणि त्यामुळे अजूनच थकायला होत होतं.

बरीच थंडी होती, पण वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांमुळे आणि अंगातल्या मणभर कपड्यांमुळे घामाघुम व्हायला होत होतं. इतकं की माझ्या अनेकदा धुतलेल्या, रंग न जाणार्‍या टीशर्टचाही रंग गेला! रानडे म्हणाले ऊसाच्या गुर्‍हाळातुन बाहेर आलेल्या पिळवटून निघालेलेल्या चिपाडासारखं झालं आहे तुझं! होणार्‍या कष्टांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी मॅराथॉन पळताना जो 'डे ड्रिमिंगचं' उपाय वापरतो तो ही इथे उपयोगी पडेना कारण आजुबाजूची सुंदर दृष्य बघताना त्या 'डे ड्रिम्स' कडे लक्षच लागत नव्हतं! पुढे रघू आणि हायमा भेटले. रघूने सांगितलं आता जवळ आलं आहे. समोरच्या वळणावर दोन डोंगरांच्या फटीतून कैलास दर्शन होईल. मग त्या आशेने पावलं रेटत राहिलो. उजवीकडे सहज नजर गेली आणि कैलासाचं इतकं जवळून आणि सुंदर दर्शन झालं की कितीवेळ बघत राहिलो कळलच नाही. एकदम ताजतवानं व्हायला झालं. हा कैलासचा 'नॉर्थ फेस'.

आता पाऊण एक किलोमिटरच अंतर राहिलं आहे असं नेपाळी यात्रेचा गाईड म्हणाला. नंतर एक लहानसा पुल लागला. खाली मध्यम आकाराचा प्रवाह होता. रघू आणि हायमा खाली गेले. हायमा म्हणाली हा एकमेव प्रवाह आहे की जो थेट कैलासपर्वतातून येतो. त्यामुळे हे तीर्थ आहे. तर तू पण खाली ये. मी म्हटलं पुलावर उभा रहातो. तू खालून पाणी उडव. तेव्ह्ड्या पाण्याने जे काय पुण्य मिळायचं तेव्हडं मिळेल. पण आता अजून कष्ट केले तर तेच तीर्थ गंगाजलासारखं माझ्या तोंडात घालावं लागेल! ते तिथे थांबले आणि मी चालत राहिलो. अखेर एकदाचा कॅम्प आला. केदार वगैरे मंडळी येऊन बरीच स्थिरस्थावर झाली होती. मी येऊन तसाच्या तसा पलंगावर आडवा झालो. इथून साधारण दोन किलोमिटरवर 'चरणस्पर्श' नावाचं ठिकाण आहे. इथे कैलासपर्वताच्या सगळ्यात जवळ जाऊन त्याच्या चरणांना स्पर्श करता येतो. मागे काही अपघात झाल्यामुळे चिनी सैन्याने आता तो मार्ग बंद केला आहे. जेमतेम पाऊण किलोमिटर जाऊ देतात. मी तरी चरणस्पर्शला जायचा बेत रद्द केलेला होता.
थोड्यावेळाने सुप आलं. गरम गरम सुप घेतल्यावर जरा बरं वाटलं. एका हातात सुपचा ग्लास आणि गळ्यात कॅमेरा अडकवून कॅम्पच्या बाहेर आलो. खोलीच्या मागे कैलासपर्वत होता.

तिथे गेल्यावर अचानक काय स्फुरण चढलं कोण जाणे. अजिबात ठरलेलं नसताना सरळ चरणस्पर्शची वाट चढायला लागलो. पायात बुटही नव्हते. फक्त सॉक्स आणि फ्लोटर्स. साधारण एमआयटीच्या मागची टेकडी आहे तेव्हडी चढण चढल्यावर दोर्‍या लाऊन वाट बंद केली होती. तिथे काही यात्री होते. मस्त ऊन होतं. कैलासावर अजिबात ढग नव्हतं. तिथे बराच वेळ बसून राहिलो. मस्त वाटलं.

केदार वगैरे मंडळी दोर्‍या ओलांडून अजून पुढे जाऊन आल्याचं नंतर कळलं. कितीही वेळ बसलं तरी समाधान होत नव्हतं पण जरा थंडी वाजायला लागल्यावर खाली आलो. आता बरीच हुषारी वाटत असल्याने मघाशी जो प्रवाहं लागला होता, तिथपर्यंत मागे जाऊन आलो. अतिथंड पाणी होतं! ह्या कॅम्पवर एक अचाट प्रकार बघितला तो म्हणजे खोल्यांची दार खिडक्या कैलासच्या उलट बाजुला, म्हणजे खोलीत बसून कैलास दर्शन होत नाही. पण टॉयलेटमात्र विरुद्ध बाजुला. तिथे कार्यक्रम उरकत असताना समोर कैलास. हे असं बांधकाम करण्यामागचं प्रयोजन अजिबात समजलं नाही!

कैलास पर्वाताचे जे सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेले फोटो असतात ते दार्चेनहूनच सुर्योदयाच्या वेळी काढलेले असतात. त्यामुळे दुसर्‍या सकाळी ढग नसतील तर सुर्योदय होईपर्यंत थांबायचं अन्यथा पहाटेच निघायचं असं ठरलं. उद्या डोलमा पासचा सगळ्यांत अवघड भाग होता. एकंदरीत आजची स्थिती बघता उद्याचं दडपण आलं होतं.

दिवस १२ : देराफुक ते झुंझुंरपू अंतर: १९ किमी. उंची: १६६०० फूट / ५०६० मिटर

पहाटे उठून पाहिलं तर कैलासपर्वताला ढगांनी वेढलं होतं. त्यामुळे सुर्योदयापर्यंत न थांबता सगळ्यांनी निघायचं ठरवलं. डोलमा पासची उंची तब्बल ५५९० मिटर आहे. पहिल्या सहा किलोमिटरमध्ये आम्ही ५३० मिटर म्हणजे जवळ जवळ १८०० फूट उंची गाठणार होतो आणि ते ही आणखीन कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या हवेत. सुरवातीचा चढ ठिक होता. आम्ही आता वळण घेतल्याने कैलास डोंगराच्या मागे गेला. एक किलोमिटरनंतर चढण वाढली. माझ्याबरोबर घोडा होता. त्यामुळे घोड्यावर बसून टाकावं अशी तीव्र इच्छा झाली. घोड्यावर बसावं की नाही ह्या घोळात जवळ जवळ १५, २० मिनीटे मी एका जागी थांबून होतो. मानसिक कणखरतेची कसोटी लागते म्हणतात ती अशीच. शेवटी म्हटलं अजून थोडावेळ चालूया मग बघू. परत चालायला लागलो. मागून एलओ आले. ते म्हणाले आपण १८०० पैकी जवळ जवळ ८०० फूट उंची गाठली सुद्धा. त्यामुळे आता काही फार नाही. तू तर तरूण आहेस. चालत रहा. जरा धीर आला. सुकामेवा, लिमलेटच्या गोळ्या खात, घोटघोट पाणी घेत चालत होतो.

एक मोठी चढण संपली आणि जरा पठारी भाग आला. पोर्टरला खाणाखुणा करून विचारलं हीच का डोलमा पास तर तिने समोरच्या एका मोठ्या डोंगराकडे बोट दाखवलं. तो डोंगर पाहून पोटात गोळा आला. पठार ओलांडून पुढे गेलो. उजवीकडे कैलासाने डोंगरामागून हळूच डोकावून मस्त दर्शन दिलं.

एक अगदी छोटा उतार गेल्यानंतर शेवटची चढण सुरु झाली. अगदी 'शेवटाकडे नेणारी' प्रकारात मोडणारीच ती चढण होती.

सारखीच धाप लागत होती. कितीही छाती भरून श्वास घेतला तरी तो कमीच पडत होता. मी चालायला सुरुवात केली की आकडे मोजायला सुरुवात करायचो. विस झाल्या शिवाय थांबायचच नाही असं ठरवलं होतं. जर पंचविस झाले तर भारी आणि तिस झाले तर दिल्लीला परतल्यावर स्वतःला एक गुलाबजाम किंवा एक मोठा चमचा आईस्क्रिम ह्यांचा बोनस! कितीही चढून गेलं तरी माझ्या पुढच्या माणूस माझ्या वरच्या पातळीवर दिसायचा ह्याचा अर्थ अजून चढ बाकी होता. आलच आता करत करत स्वतःला ओढत होतो. श्वास कोंडून जीव जाताना नक्की काय होत असेल ह्याची बारिकशी झलक ह्या चढावर अनुभवता येते असं म्हणणं वावगं ठरू नये.

इथे सगळे एकमेकांना मदत करत असतात. एक तोडकं मोडकं हिंदी बोलणारा पोर्टर माझ्याजवळ आला आणि म्हणाला मी तुझा हात धरतो, चल पुढे. मी म्हटलं तू धरशील रे पण माझे पाय उचलले पाहिजेत ना! नेपाळ मार्गे येणार्‍या ग्रुप मधल्या एका काकांना अचानक खूपच धाप लागली आणि ते जवळजवळ कोसळायच्या बेतात होते. आम्ही जवळपासच्या लोकांनी हात धरून त्यांना सावरलं. जरा वेळाने ते सावध झाले आणि पुढे गेले. मी माझ्या जरा पुढे गेलेल्या पोर्टर कडे पाणी मागत असलेलं पाहून तिथेच जवळ असलेल्या त्यांच्या नेपाळी गाईडने त्याच्या जवळची ज्युसची बाटली पुढे केली. अखेर मणामणाचं एकेक पाऊल उचलत आम्ही अखेर डोलमा पासच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो.

ह्यावर्षी तिबेटमध्ये 'हॉर्स इयर' सुरु असल्याने मे महिन्यात स्थानिकांचा खूप मोठा कुंभमेळा भरला होता. त्यामुळे मंत्र लिहिलेल्या बर्‍याच तिबेटी पताका (प्रेयर फ्लॅग्स) सगळीकडे लावलेल्या होत्या. डोलमा म्हणजे तारा देवी. ह्या परिसरात तारा देवीचं वास्तव्य होतं. इथून जाणार्‍या प्रत्येकाची साक्षात यम परिक्षा पहातो. त्यामुळे इथे स्वतःची भौतिक सुखांपासून मुक्तता करून घ्यावी, स्वतःमधील स्वत्त्वाचा / गर्वाचा त्याग करावा असं मानतात. त्याचं प्रतिक म्हणून इथे स्वतःच्या कपड्यांमधलं काही, इतर वस्तू, इतकच काय तिबेटी लोकं नखं, केस, रक्त असंही काही बाही टाकतात. तारा देवीच्या नावाची एक मोठी शिळाही तिथे आहे. तिथे बरच धुकं असल्याने आम्ही अगदी तिथपर्यंत गेलो नाही. एलओ सह काही जण वर थांबलो. एका गुज्जू भाईने पुस्तक काढून त्यांची कुठलीतरी प्रार्थना / स्तोत्र म्हटली. उदबत्ती लावली. डोलमा पासच्या इतक्या उंचीवर दहा पंधरा मिनिटांपेक्षा जास्तीवेळ थांबू नये असं म्हणतात. त्यामुळे मी आत्तापर्यंत गेलेल्या जगातल्या त्या सगळ्यांत उंच स्थानावरून देवाचे म्हणा, निसर्गाचे म्हणा, कोणत्यातरी शक्तीचे म्हणा आभार मानले आणि पुढे जायला निघालो.

आता इथून पुढे जोरदार उतार होता. पाच एक मिनीटे पुढे गेल्यावर उजवीकडे हिरव्या रंगाचं 'गौरी कुंड' लागलं. ह्या कुंडात पार्वती स्नान करायला येत असे म्हणतात. म्हणजे गणपती बाप्पाचा जन्म इथेच जवळपास कुठेतरी झाला असणार! गौरी कुंडाचं पाणीही पवित्र मानलं जातं पण ते आमच्या मार्गापासून जवळ जवळ हजार फूट खाली असल्याने तिथे जाणं शक्य नव्हतं मग आम्ही एलओंच्या पोर्टरला पाणी आणायला सांगितलं.

गौरी कुंड मागे टाकल्यावर जवळ जवळ तिन किलोमिटरची अतिशय तीव्र उतरंड पार करून खाली आलो.

उंचीतला फरक तसच डोलमा पास पार झाल्यामुळे गेलेलं दडपण ह्यामुळे खूपच बरं वाटत होतं. खाली काही तंबूंमध्ये खायचे पदार्थ विकत होते. आमच्या घोडेवाल्यांकडे आणि पोर्टरकडे त्यांचे डबे असायचे. थर्मासमध्ये चिनी चहा आणि याकचं चिज असं बरोबर असायचं आणि रस्त्यातल्या अश्या तंबूंमधले नुडल्स ते विकत घ्यायचे. एकंदरीत त्यांचं सामान-सुमान, खाणं वगैरे बघता बरीच गरिबी आहे हे जाणवतं. केदारच्या पोर्टरला ४/५ वर्षांचा लहान मुलगा होता आणि तो ही आईचा हात धरून आमच्याबरोबर संपूर्ण परिक्रमा चालला. एकंदरीत केदारला सगळ्या 'वर्किंग मदर'च भेटत होत्या! इथे भिमची तब्येत बिघडली होती. खाल्ल्यावर त्याला आणि सगळ्यांनाच बरं वाटेल असा विचार करून आम्हीही दोन तिन पाकीटं नुडल्स आणि बरोबरचे डिंकाचे लाडू असा नाश्ता केला. इतक्यात गुरू मला शोधत आला. माझ्या घोडेवाल्याने माझी तक्रार केली होती की हा घोड्यावर बसत नाही आणि मला पुढेही जाऊ देत नाही तर त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते विचार. गुरू म्हणाला डोलमा पास आता पार झाला आहे. आता कॅम्पपर्यंत साधा सपाट रस्ता आहे तर तू बस घोड्यावर. त्या घोडेवाल्यालाही बरं वाटेल. म्हटलं ठिक आहे. तसही सर्वोच्च स्थान सर करून झालेलं आहे. त्यामुळे आता एकदा घोड्यावर बसायचा अनुभवही घ्यायला हरकत नाही. मग इथून झुंझुरपूच्या कॅम्प पर्यंत घोड्यावर बसलो. घोड्यावर बसणं हा एकंदरीत फार विचित्र आणि अवघड प्रकार होता. तेव्हड्या दहा बारा किलोमिटर पुरतच ठिक होतं. हा रस्ता अत्यंत रटाळ होता. आमचा प्रवास आता झ्याच्यु नदीच्या काठून सुरु होता. घोडेवाले, पोर्टर कसलीतरी सरबतं पिऊन बाटल्या रस्त्यातच टाकून देत होते. मला त्यांना त्यावरून टोकावं असं फार वाटत होतं पण एकतर भाषेचा अडसर आणि दुसरं म्हणजे आपलं घरचं झालं थोडं, बाहेरच्यांना कुठे शहाणपणा शिकवा असा विचार करून गप्प बसलो. तास दोन तासांनंतर कॅम्पवर पोहोचलो. मी हे शेवटचं अंतर घोड्यावरून आलो त्यामुळे लवकर आलो. केदार, भीम आणि बन्सल तासाभराने आले. भिमाची तब्येत चांगलीच बिघडली होती. मग रानड्यांनी जरा दादागिरी करून त्याला आमच्या जवळचा खाऊ खायला देऊन आणि औषध देऊन झोपायला लावलं. रानडे तब्येतीच्या बाबतीत सगळ्यांची नेहेमी चौकशी करायचे आणि वेळप्रसंगी योग्य ती दादागिरीही करायचे. मग मी, केदार, श्याम आणि रानडे समोरच्या नदीवर जाऊन हात, पाय, चेहेरा धुवून आलो. पाणी प्रचंड गार होतं पण खूप ताजतवानं वाटलं. डोलमा पासचा ट्रेक पूर्ण झाल्याने एकदम हलकं वाटत होतं. इथे केदारच्या मोबाईलवर मॅट्रीक्स कार्ड चालू होतं. त्यामुळे आम्ही सगळे मिळून ते वापरायचो. मिस्ड कॉल दिला की घरून फोन यायचा. आज घरच्यांशी खूप गप्पा मारल्या. वर्णन सांगितलं. तिकडची खुशाली कळली. जर्मनीचे ब्रॅझिलचा धुव्वा उडवला आणि आता अर्जेंटीनाशी फायनल, क्विटोव्हा आणि ज्योको जिंकले असे बाकीचे अपडेट्सही कळले. जर्मनी माझी आवडती तर अर्जेंटीना नावडती टीम आणि त्यात फायनलच्या वेळी आम्ही तकलाकोटला असणार होतो. त्यामुळे तिथे फायनल पहाता येणार होती! आता इतके सगळे विषय निघालेच आहेत तर मी आदित्य-मेघनाचं कुठवर आलय हे ही विचारून घेतलं. त्यावर 'घरी ये, मग सांगते!' हे उत्तर अश्या काय टोनमध्ये मिळाळं की मी लगेच विषय बदलला.
झुंझुरपूच्या कॅम्पवर आमच्या स्वैपाक्यांनी खूप घोळ करून सकाळचं जेवण बनवलच नाही. एकदम संध्याकाळी देऊ म्हणे. त्यावर काही भक्तगणांचं म्हणणं होतं की यात्रेलाच आलो आहोत, ठिक आहे. पण इतके कष्ट करून आल्यावर खूप भुक लागली होती आणि शिवाय काही लोकांना अ‍ॅसिडीटीचा त्रासही व्हायला लागला. जेवण ह्या विषयावर बरीच गरमागरमी झाली. अखेर संध्याकाळी त्यांनी जेवण दिलं.

संध्याकाळी लवकर चंद्रोदय झाला. पौर्णिमा जवळ आली असल्याने चंद्र इतका सुंदर दिसत होता! रात्रीही बाहेर टिपुर चांदणं पडलं होतं. आम्ही चार पाच जाण बराच वेळ चांदण्यात गप्पा मारत बसलो होतो. ह्या कॅम्पहून कैलास दर्शन होत नाही. अन्यथा चांदण्यातले सुरेख फोटो काढता आले असते. सकाळी लवकर निघायचं होतं त्यामुळे अखेर गप्पा आवरल्या घेतल्या.

दिवस १३ : झुंझुंरपू ते कुगू अंतर: १०० किमी. (५ किमी ट्रेक) उंची: १५१६० / ४७८०मिटर

आज कैलास परिक्रमा संपवून मानससरोवराच्या काठी मुक्कामाला जायचं होतं. आजचा ट्रेक फक्त पाच किलोमिटर होता. तो सहज संपवून दार्चेनच्या जवळ पोहोचलो. तिथे बस मिळणार होती. दिशांचं मला जेव्हडं ज्ञान आहे त्यानुसार कैलास पर्वत आमच्या उजवीकडे असायला हवा होता, पण केदार कुठल्यातरी डावीकडे दुरवर दिसणार्‍या पर्वताला कैलास म्हणत होता. बराच वेळ त्याला समजवायचा प्रयत्न केला. शेवटी गुरुला विचारलं. त्याने असे काही कटाक्ष टाकलेत की बस! आज अंतर कमी असल्याने सगळे जण पटापट पोहोचत होते. निलम काकू आणि अंजू पोहोचल्यावर एकदम रडायलाच लागल्या! मला वाटलं त्यांची तब्येतच बिघडली. पण नंतर कळलं की परिक्रमा पूर्ण झाल्याने टडोपा आलं आहे! मग बराच वेळ सगळे एकमेकांचं अभिनंदन करत होते आणि वयाप्रमाणे पाया पडत होते. काही जणांनी कैलासाच्या दिशेला साष्टांग नमस्कार घातले. एकंदरीत भारलेलं वातावरण होतं.

जिथून निघालो होतो तिथे परत :

थोड्यावेळाने बस आल्या आणि आम्ही मानससरोवर मुक्कामाच्या ठिकाणाकडे म्हणजे कुगुकडे प्रयाण केलं.

क्रमशः
(ह्या भागातले काही फोटो केदार कडून साभार.)

--------------------------------------------------------------

भाग सहावा : http://www.maayboli.com/node/51506

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख.

आदित्य मेघनाचं कुठवर आलंय वाचून लई हसू आलं. नशीब, मायबोलीवर काय चालू आहे ते नाही विचारलं.

लेख आणि फोटो दोन्हीही मस्त.
पु.भा.प्र.

दिवस १२ : दार्चेन ते देराफुक. अंतर: १९ किमी. उंची: ५०६०फूट / १६६०० मिटर
<<
<<

५०६०फूट म्हणजे १६६०० मिटर हे बरोबर आहे का? Happy

मस्त!!!

शेवटी कैलास कुठे होता? उजवीकडे की डावीकडे? तुला आणि केदारला इतकं डिटेलवार कसं आठवतं? डायरी लिहायचात का?

आत्ता हे वाचताना मला हा ट्रेकच वाटतोय. पण त्या दोघींना टडोपा झालं म्हणजे "हीच ती जागा, हाच तो परिसर.." असं काहीसं त्यांचं सर्व स्थानं प्रत्यक्ष पाहिल्यावर झालं असेल. मी पहिल्यांदा पंढरपूरला (कुठे एवढे कष्ट घेऊन गाठलेलं कैलास मानसरोवर आणि कुठे इथल्या इथे असलेलं पंढरपूर Happy ) गेले होते तेव्हा विठ्ठल पाहिलाच (तो काय सगळीकडेच आहे), पण तो दिसण्यापेक्षा जास्त भरुन आलं ते "जिथे मी आत्ता उभी आहे ह्याच सभामंडपात तुकाराम, एकनाथ वावरले असतील... इथेच सखुबाईं विठ्ठलचरणी विलीन झाल्या असतील, ह्या जमिनीनेच संतांचा मेळा अंगावर वागवला असेल" वगैरे मनात आल्यामुळे. तेव्हा नामदेवाच्या पायरी पलिकडे उभी राहून आत विठ्ठल दिसतो का ते पण पाहिलं होतं, अजून वेगवेगळ्या दारांबाहेर उभं राहून विठ्ठल दिसतो का पाहिलं होतं....चोखामेळांच्या आठवणीने.

खरतर आजचा इथला मुक्काम उगीच होता. हा कमी करून यात्रेतला एक दिवस कमी करता आला असता.>>> होमसिक झाल्याचं लक्षण का हे? Wink

इतक्या दूरवरून पण फोनवर आदित्य-मेघनाची चौकशी म्हणजे जरा.....:हाहा:

मी चालायला सुरुवात केली की आकडे मोजायला सुरुवात करायचो. विस झाल्या शिवाय थांबायचच नाही असं ठरवलं होतं. >>> हा काऊंटिंगचा खेळ मी ही खेळून बघितला होता. पण छे, ठरवलेल्या आकड्यापर्यंत पोचणं नाहीच जमायचं.

बाकी वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच झक्कास.

केवळ लिहिले आहेस.

तुला तिथे काही अध्यात्मिक अनुभव आलेत का? बर्‍याच लोकांना तिथे जाऊन अध्यातिम अनुभुती प्राप्त होते. असे तुला काही वाटले का? तेथून परत आल्यावर काही दिवस वेगळे जाणावले का घरी? नक्की ह्या प्रवासातून तुला काय मिळाले हे स्पष्ट करता येईल का?

उजवीकडे की डावीकडे? तुला आणि केदारला इतकं डिटेलवार कसं आठवतं? डायरी लिहायचात का? >>

उजवीकडेच होता. तो लांबवरचा पर्वत देखील कैलासारखाच दिसला म्हणून माझा गोंधळ झाला होता.

पराग नोंदी करायचा, मला त्या दिवसाचे लिहायला बसले की सगळे आठवते.

मला त्या दिवसाचे लिहायला बसले की सगळे आठवते.>>> _/\_ अगदी इथे ५ मिनिटं थांबलो, बाजूला कसलीशी फुलं होती, किती वाजता झोपलो/उठलो, सॅक्स आवरताना कुणी काय केलं, रस्त्याच्या कुठल्या पॅचला कोण कोण बरोबर होतात, रस्त्याला कुठे वळण होतं व त्या वळणाच्या आधी/नंतर काय दिसलं वगैरे पण लिहू शकता आहात दोघे. आणि त्यामुळेच आम्हालाही प्रवास घडवता आहात (फक्त आम्ही दमत नाहियोत Wink ). अनयाने पण असंच सुंदर लिहिलं होतं. हॅट्स ऑफ!!

मी लिहायला बसले तर इतके वाजता निघाले, वाटेतला निसर्ग सुंदर होता, अधुन मधुन घोड्यावर बसले, इतके वाजता अमुक ठिकाणी पोहोचले, एखाद दुसरा लक्षात राहिलेला प्रसंग, खूप दमले, जेवले आणि मग झोपले. मधे जसा काही सरळसोट रस्ता होता असं वाटेल वाचणार्‍याला Biggrin

केश्वी+१. खूप छान लिहीलयं दोघांनी. बाकी २०० युवानचं ब्रेसलेट २० ला!! सहीच! Happy
फोटो खूप सुंदर. घरबसल्या दर्शन घडवून आणल्याबद्दल तुम्हाला आणि मायबोलीला कितीतरी पुण्य लाभेल!

मस्त Happy सगळेच भाग खास तुझ्या स्टाइल मधे जमलेत ! काही काही ठिकाणी जाम हसू आलं. ( कच्छा, पलंगावर बसलेल्या तिबेटी ललना, टडोपा वगैरे Lol

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद. Happy

मायबोलीवर काय चालू आहे ते नाही विचारलं. >>>> Happy

५०६०फूट म्हणजे १६६०० मिटर हे बरोबर आहे का? >>>> विजय आंग्रे धन्यवाद. बदल केला आहे. चुकून इकडचा आकडा तिकडे झाला होता.

डायरी लिहायचात का? >>>> तांत्रिक नोंदी मी केलेल्या होत्या. पण बाकीचं त्या वेळी लिहिताना आठवतं. त्या नोंदीही खूपच लहान होत्या. उदा. थेट कैलासपर्वतातून येणारा प्रवाह लागला ते लिहिलं होतं पण तेव्हा रघू आणि हायमा होते, त्याच्यांशी बोलणं काय झालं हे लिहिलं नव्हतं.
पंढरपूर बद्दल मस्त लिहिलस केश्विनी. Happy

नक्की ह्या प्रवासातून तुला काय मिळाले हे स्पष्ट करता येईल का? >>> शेवटच्या भागात लिहायचा प्रयत्न करेन बी.

पुन्हा एकदा धन्यवाद Happy

मस्तच.. पुढचा भाग एवढ्या लवकर टाकलास हे बघुनच खुष झालो आणि वाचल्यावर हा भाग सुद्धा आवडला हे सांगणे नलगे.
रच्याकने.. टडोपा म्हणजे काय?

काही थिकाणी खरच जामच हसू आले.

हा भाग आत्तापर्यंतचा सर्वात मस्त भाग झालाय, सगळ्याच द्रुष्टींनी.

खूप मस्त जमलाय हाही भाग. एकदा तरी हा परिसर पहायला हवा असं वर्णनावरून आणि फोटोवरून वाटतय.

त्या ४-५ वर्षाच्या मुलाबद्दल एकदम सहानुभूती वाटली. कदाचित त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग असल्याने त्याना सवय झाली असेलही पण एवढ्या लहान मुलाला किती चालावं लागलय.

नक्की ह्या प्रवासातून तुला काय मिळाले हे स्पष्ट करता येईल का? >>> हे वाचायला आवडेल.

फार फार सुरेख! आम्हाला घरबसल्या ही परिक्रमेची अनुभूति देऊन अधिक पुण्य जोडताय दोघे!
टडोपा = टचकन् डोळ्यांत पाणी!

पराग, हा भाग भन्नाट जमला आहे.
आणि ईथे तू दिलेल्या फोटोंवरुन तरी राक्षसताल मानससरोवरापेक्षा खरच सुंदर दिसत आहे Wink
ईतक्या सुंदर ठिकाणी जाऊन तुला आदित्य मेघना आठवले हे ऐकून त्यांना पण टडोपा होईल Proud

पराग,

>> हा भाग आत्तापर्यंतचा सर्वात मस्त भाग झालाय, सगळ्याच द्रुष्टींनी.

+१

मला तर असामीचं हे पोस्ट बघून असं वाटलं क्षणभर की वाचणार्‍यांनांही काही अध्यात्मिक अनुभूती होते की काय म्हणूनच हा भाग सगळ्यात जास्त अपील होतोय असं वाटतंय?? Happy

मधलं डोल्मा पासच्या ट्रेकचं आणि शेवटच्या चढाचं वर्णन वाचताना भितीही वाटली थोडी ..

ह्या सिरीज् मधला प्रत्येक नविन भाग वाचला की तिकडे जायची इच्छा प्रबळ होतेय .. पण कोणीतरी बरोबर असल्याशिवाय जाऊ नये असंही वाटतंय .. आमच्या मातोश्रींनां जाहीर प्रणाम .. नव्हे साष्टांग नमस्कार! ती घोड्यावर बसून गेली बर्‍याच ट्रेक्स् करता पण तीने ज्या वयात यात्रा केली आणि ते सुद्धा एकटीने ते आता आठवून फारच नतमस्तक भावना येते आहे मनात .. Happy (माझी एव्हढी सेन्टी पोस्ट बघून आई म्हणेल कैलास पावला एकदाचा .. :))

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. Happy

ईतक्या सुंदर ठिकाणी जाऊन तुला आदित्य मेघना आठवले हे ऐकून त्यांना पण टडोपा होईल >>>> Lol मीपु, फार हसलो हे वाचून..

माझी एव्हढी सेन्टी पोस्ट बघून आई म्हणेल कैलास पावला एकदाचा >>>> Proud

मस्त लिहिले आहेस पराग! एकेक भाग सावकाश वाचत इथवर आले आहे. फोटोग्राफ्स तर जबरी आहेतच आणि तू केलेलं वर्णनही खुसखुशीत.

कालपासुन पाचही भाग वाचुन काढले. अप्रतिम लिहिले आहेस पराग..... एकेका प्रसंगाचे वर्णन असे जमले आहे की वावा!!!
घोड्यावर बसायचे ना डोलमापाशी, इतका त्रास होत होता तर... उगाच धोका कशाला पत्करायचा?
कैलासाचे दर्शन विलोभनीय! प्रत्यक्षात तर किती सुंदर दिसले असेल!
चिन्यांचे आक्रमण वाचुन काळजी वाढली.
केदारचे अजुन वाचले नाही. हा प्रवास संपल्यावरच दुसरा वाचायला घेणार आहे.
तुमच्या दोघांच्याही मिसेसचे कौतुक, त्यांनी तुम्हाला इतक्या अवघड प्रवासाला जायची परवानगी दिली. नक्की सांगा दोघींनाही.
मला जमणार नाही हे करायला, म्हणजे हा प्रवास करायला. अवघड आहे.

सुन्दर... मस्त..

नविन भाग लवकर द्या...

केदार आनि तुमचि लिखान चागले आहे..

Thank you very much for giving such good reading experience to us..

सुरेख वर्णन आणि फोटो Happy

हा भाग आत्तापर्यंतचा सर्वात मस्त भाग झालाय, सगळ्याच द्रुष्टींनी.>>>>>अगदी अगदी Happy

पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

घोड्यावर बसायचे ना डोलमापाशी, इतका त्रास होत होता तर... उगाच धोका कशाला पत्करायचा? >>>> सुनिधी, तोच तर प्वाईंट आहे.. Happy

तुमच्या दोघांच्याही मिसेसचे कौतुक, त्यांनी तुम्हाला इतक्या अवघड प्रवासाला जायची परवानगी दिली. नक्की सांगा दोघींनाही. >>>>> नक्की! घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय इतक मोठा प्रवास शक्यच नव्हता...

भारी झाला आहे हा भाग.

आदित्य-मेघनाची चौकशी केलेली ऐकून तुमच्या मिसेस वैतागल्याच असतील Proud

जबरदस्त लिहिलंयस...
आतापर्यंतचा सर्वात सुंदर भाग !!

खाली उतरल्या उतरल्या आम्ही फोटो काढायला लागलो, पण दुसरा ग्रुप मात्र कपडेच काढायला लागला. >>> Biggrin

आम्ही आता ही पवित्र अंडरवेअर घालून अंघोळ करणारा पुढचा माणूस कोण असणार ह्यावर पैज लावायला लागलो! >>> देवा! Rofl

मस्त!

Pages