विक्षिप्त माणसं

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 November, 2014 - 13:11

असतात ना!
या जगात विक्षिप्त माणसं असतात!

एखाद्याची एखादी सवय विक्षिप्त असते, तर एखाद्याचा स्वभाव विक्षिप्त असतो. कोणी कधीतरीच विक्षिप्तपणा दाखवतो, तर कोणी प्रसंगानुरूप व्यक्त होतो.

........... पण ती सारी एकाच दिवशी भेटावीत!

शनिवारचा दिवस होता. अकरा-साडेअकराची वेळ. ट्रेनला गर्दी जेमतेम. मी आणि माझा मित्र कामानिमित्त मुंबईच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास करत होतो. तासाभराचा प्रवास म्हणून दहा-पंधरा मिनिटे मोबाईलशी खेळून झाले, दहापंधरा मिनिटे आपापसात गप्पा मारून झाल्या. ट्रेन भरत होती, रिकामी होत होती, आसपासचे चेहरे बदलत होते. समोरचे एक ज्येष्ठ नागरीक मात्र आपली जागा पकडून होते. ना ते हलत होते ना त्यांच्या चेहर्‍यावरची माशी. या आसपासच्या जगाशी आपला काहीही संबंध नसल्यासारखे त्यांचे वृत्तपत्रवाचन चालू होते. वृत्तपत्रात मात्र जगभरच्याच घडामोडी वाचत होते तो भाग अलहिदा. आता हा त्यांचा स्वभावच होता वा वयोमानानुसार आलेली अलिप्तता, हे समजायला वाव नव्हता. मात्र या अर्ध्या तासात वृत्तपत्राला शक्य तितके पुढूनमागून चाळून काढल्यावर त्यांनी ते बाजूला खोचले आणि समोर बघू लागले. समोर म्हणजे अगदी आमच्याकडे नाही तर पुन्हा शून्यात लागलेली अलिप्त नजर. आमची नजर मात्र त्यांनी बाजूला ठेवलेल्या पेपरवर गेली आणि विरंगुळेच्या शोधात असलेल्या माझ्या मित्राने त्यांना "पेपर घेतो हा काका" असे मुंबई लोकल स्टाईलमध्ये तोंडदेखलं विचारत, त्यांचा होकार अपेक्षितच धरत त्या पेपरला हात घातला...

यावर जे खेकसले ते सद्गृहस्थ.. बस्स रे बस्स !! आम्ही दोघे चेहर्‍यावरून भुरटे चोर किंवा खिसेकापू तर वाटत नाही ना, असे आमचे आम्हालाच वाटले. त्यांनाही तसेच वाटले असावे म्हणून, "नाही, नाही आजोबा, आम्ही फक्त तो पेपर वाचायला घेत होतो" असे म्हणत माझा मित्र आपली बाजू मांडू लागला. त्यांच्या एका दमाने ते ‘काका’ चे ‘आजोबा’ झाले होते. त्यावर पुर्ण ऐकू न घेताच ‘हलं हल, थलं थल’ असे काहीसे कुत्र्याला हाडतुड केल्याच्या आवेशात ते पुन्हा एकदा गरजले. आता मात्र आपण खिसेकापूपेक्षाही गयेगुजरे आहोत असे आम्हाला वाटू लागले. या अपमानजनक स्थितीत आजूबाजुला बघायची माझी तरी हिंमत होत नव्हती. मात्र ट्रेनमधील सारे प्रवासी आमच्याकडेच बघत असावेत याची खात्री होती. हल्ली असल्या भांडणांचे मोबाईलवर विडिओही बनत असल्याने ते एकतर्फी भांडण आणखी ताणायची इच्छा होत नव्हती. कारण क्षुल्लकश्या कारणावरून त्या आजोबांनी जो रुद्रावतार धारण केला होता, तो पाहता आणखी एखादा शब्द उच्चारून त्यांच्या क्रोधाची नेक्स्ट लेव्हल बघायची हिंमत आमच्यात नव्हती.

तर,
आम्ही दोन बरेपैकी हट्टेकट्टे तरणेताठे गबरू जवान मूग गिळून शांत बसलो ते त्यांच्या विक्षिप्तपणाला घाबरूनच !

ट्रेनमधून उतरलो. उतरल्यावर माझा मित्र म्हणाला, " कसला अ‍ॅंटीक माणूस होता.. नक्कीच ## कर असणार.. "
"ह्म्मम, असावेत" पटल्यासारखे मी हुंकार भरला खरे, कारण मुंबईत हा अनुभव विरळाच. पण मनातल्या मनात म्हणालो नशीब हा त्यांच्यासमोर असले काही बोल्ला नाही अन्यथा.....

असो,
पुढे काही रिक्षावाल्यांचे नेहमीचे अनुभव यायचेच होते, पण ते सवयीचेच असल्याने त्यांना विक्षिप्त वगैरे सदरात टाकायची घाई करणार नाही. त्याचप्रमाणे मित्राने देखील नेहमीसारखेच रिक्षाचा नंबर मोबाईलवर टिपून घेतला आणि त्याची हि सवय देखील आजचीच नसल्याने त्याकडेही कानाडोळा केला.

इच्छित स्थळी पोहोचलो. काम सरकारी कार्यालयात होते. नेमके जेवायची वेळ झाली असल्याने आम्हाला हवी ती खिडकी बंद होती. आता हा योगायोग देखील नेहमीच कसा नशीबात येतो हे मला एक न सुटलेले कोडे. सडकून भूक तर आम्हालाही लागली होती, पण रांगेत नंबर असल्याने अन्नाच्या शोधात दूरवर भटकणे शक्य नव्हते. चांभारचौकश्यांमधून समजले की त्याच आवारात एकदोन टपरी कम अल्पोपहारगृहे होती. वडाउस्सळ, मिसळपावची तरी सोय होईल म्हणत आम्ही रांगेत नंबर सांगत तिथे प्रस्थान केले.

अपेक्षेप्रमाणे फक्त मिसळपावचीच सोय झाली, आणि ते देखील पावाच्या जागी स्लाईसब्रेड म्हणून माझी थोडी चिडचीडच झाली. पावाची स्लाईस जेवढी पांढरीशुभ्र होती तेवढीच ती ठेवलेली ताटली कळकट! पण तल्लफ लागली असल्याने तेथील मळकट चहा देखील गोड मानून घेतला. ‘रस्त्यावर खा, पण पाणी शुद्ध प्या’ म्हणत तिथे ग्लासांच्या जागी प्लास्टीकच्या बाटल्यांमधून दिले जाणार्‍या फुकटच्या पाण्याला नकार देत आम्ही आमच्यासाठी म्हणून खनिज पाण्याची बाटली विकत घेतली. त्याच बाटलीतील पाण्याचे दोन-दोन घोट मारून ती बाजूला ठेवली आणि इतक्यात तेथील आणखी एका गिर्हाईकाने ती बाटली त्या टपरीवाल्याचीच समजून, आम्ही ‘अरे अरे’ करेपर्यंत तिच्यातील पाण्याचे तब्बल चार घोट मारले. एक ते सकाळचे आजोबा, जे आम्ही तोंडदेखले का होईना परवानगी घेत पेपर उचलत असताना आमच्यावर भडकलेले. आणि इथे हा माणूस, जो गैरसमजाने का होईना आमच्या परवानगीशिवाय पाणी पिऊन मोकळाही झाला होता. जाब विचारणे वा भांडणे आमचा हक्क होताच. आणि तो आम्ही बजावताच समोरून उत्तर आले, "ठिक है ना यार, क्या दो रुपये पाणी के लिये रोता है" .. आणि एवढे बोलून, तो ते दोन रुपये न चुकवताच निघून गेला.

"हा मात्र मुंबईकरच असणार" ... मनातल्या मनात मी पुटपुटलो.

तर, असो...
सरकारी कामाची मार्जिन लावत दुपारी तीन पर्यंत आपण मोकळे होऊ असा हिशोब केला होता, पण तो दोनेक तासांनी चुकत संध्याकाळ उजाडली. पुन्हा कडकडून भूक लागल्याची जाणीव झाली. आता अन्नाच्या शोधात भटकंती करू शकत होतो, पण पुर्ण चौरस आहार घ्यायची वेळ नसल्याने रस्त्याने जाताना जो पहिला ठिकठाक उडपी दिसला त्याच्यात शिरलो. मी नेहमीसारखे मेनूकार्ड हातात घेत, साध्या डोश्यापासून पासून एक्स्ट्रा सांबारपर्यंत वाचून काढले आणि जे नेहमी कुठल्याही उडप्याकडे गेल्यावर मागवतो तो मसाला डोसाच मागवला. मित्रानेही त्याच्या आवडीनुसार काहीबाही मागवले आणि दिवसभराच्या थकावटीनंतर गप्पा मारायचा मूड नसल्याने मी शेजारपाजारच्या इतर टेबलांचे निरीक्षण करायला घेतले.

समोरच्याच टेबलावर एका माणसाची वडासांबारची ऑर्डर आलेली, पण तो त्यावर असमाधानी दिसून एका वेटरशी हुज्जत घालत होता. मी कान टवकारताच मला समजले की सांबार गरम नव्हते, फक्त एवढीच त्याची तक्रार होती. पण हुज्जत ज्याच्याशी चालू होती तो तुलनेत नवीन वेटर असावा, जे त्याला काही सुचत तरी नव्हते वा अधिकारवाणीने काही करता तरी येत नव्हते. इतक्यात तिथे आणखी एक अनुभवी वेटर आला आणि त्याने ते वडासांबार बदलून वा गरम करून आणायला सांगून हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. आमची ऑर्डर यायच्या आधीच त्या माणसाच्या टेबलवर फेरफार केलेली डिश हजर होती. त्याने एक चमचा सांबाराची चव घेतली आणि पुन्हा त्या वेटरला आवाज दिला.

"अरे देवा, आता सांबारमध्ये मीठमसाला कमी पडलाय म्हणून भांडायचेय की काय.." असे मी स्वत:शीच म्हटले, पण प्रत्यक्षातही त्याची तक्रार चवीबद्दलच होती. पुन्हा त्या अनुभवी वेटरने डिस्कस करून त्या नवीन पोराला मीठमसाला टाकून (?) ते सांबार वड्यासह बदलून आणायला आत पिटाळले आणि इथे हा माणूस माझ्या डोळ्यासमोर चक्क उठून निघून गेला. सकाळपासून घेतलेल्या एकंदरीत अनुभवांनंतर, अरे काय हा विक्षिप्त माणूस आहे, हाच विचार माझ्या मनात उमटला. मागोमाग वेटर डिश घेऊन हजर झाला तर याचा कुठेच पत्ता नाही. त्यानंतर मग दोन-तीन वेटर्सनी कावरेबावरे होत, एकत्र येऊन गहन चर्चा केली, आणि गपचूप ते वडासांबार उचलून आत घेऊन गेले.

लगोलग उजवीकडच्या टेबलावरील आणखी एक गिर्हाईक उठले आणि माझ्याकडे बघून काहीतरी पुटपुटत हॉटेलच्या किचनच्या दिशेने गेले. थोड्यावेळाने तो काय म्हणाला असावा याचा अंदाज मला आला. त्यानेही तो तमाशा बघितला होता, आणि तीच वडासांबारची प्लेट आता आपल्याला तर चिकटवणार नाहीत ना, या भितीने तो त्यावर लक्ष ठेवायला आत गेला. पण हे मला समजेपर्यंत फार उशीर झाला होता, कारण माझ्या मित्राने मागवलेले काहीबाही दुसरे तिसरे काही नसून वडासांबारच होते. आता याची चौकशी करत नवीन फुटकळ वादाला निमंत्रण द्यायची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मित्राला काहीही न बोलता मी मुकाट माझा मसालाडोसा खाल्ला. एखादा चमचा सांबार कोणी प्यायल्याने फार काही उष्टे होत नाही अशी मनाची समजूत काढली. पण मित्राने ऑफर केलेली वडासांबारची चव बघायची मात्र मी टाळली. त्यानेही मग माझा मसाला डोसा नाही खाल्ला. नाही म्हटले तरी मनाला टोचणी लागलीच. बस्स, त्याचेच प्रायश्चित म्हणून कुठेतरी हे कन्फेस करायचे होते. जे आज या लेखात कबूल करतोय. जरा हलके वाटतेय.

पण लेख इथेच संपत नाही..

हे लिहित असताना आपणही आपल्या आयुष्यात कळत नकळत असले विक्षिप्तपणाचे प्रकार केले आहेत का हे स्वत:शीच आठवू लागलो. तेव्हा याच्याशीच साम्य राखणारा एक जुना किस्सा प्रकर्षाने आठवला.

माझी पहिली नोकरी आणि दुसरा पगार. दसर्‍याचा सण होता. घरी आपल्या कमाईतून मिठाई घेऊन जाऊया ठरवले. घरच्या खादाडांची संख्या लक्षात घेता आणि सण म्हटले की त्या मिठाईचे शेजारीपाजारी वाटप होणार या हिशोबाने एक किलो मिठाई न्यायची ठरवली. मस्त झगमगीत दुकान आणि चकचकीत वर्ख असलेली मिठाई निवडून पॅक करायला सांगितली. इतक्यात शेजारच्या एका गिर्हाईकाने त्याच मिठाईची किंमत विचारली, तर तब्बल ६०० रुपये किलो! त्यावेळच्या पगाराचा विचार करता माझे डोळेच फिरले. याचे कारण म्हणजे मिठाईच्या किंमतीचा जराही अंदाज नव्हता. २००-२५० रुपयाचे बजेट ठेऊन मी आत शिरलो होतो आणि मिठाईची किंमतही त्याच आसपास असेल अश्या गैरसमजात भाव विचारायचीही तसदी घेतली नव्हती. एक किलोच्या जागी त्याला अर्धा किलो सांगावी तर ते ही बजेटच्या बाहेरच होते. आणखी एखादी बदलून स्वस्तातली मागावी तर त्याने वजन वगैरे करून पॅक करायला घेतली होती. काय कारण काढून नकार द्यावे या विचारात असतानाच मला शेजारच्या गुलाबजामच्या भांड्यावर एक माशी भिरभिरताना दिसली आणि बस्स... मागाहून तो मिठाईवाला हाका मारत राहिला आणि मी असली माश्या बसणारी मिठाई नकोच म्हणत तावातावाने दुकानाबाहेर पडलो.

..... त्या दिवशी विक्षिप्तपणाचा एक शिक्का माझ्यावर देखील नक्की पडला असावा. जसे मी त्या वडासांबार टाकून निघून जाणार्‍या इसमावर मारला होता. त्यामागेही कदाचित असेच एखादे पैश्याचे कारण असावे ज्याचे सोंग घेता येत नाही. ट्रेनमध्ये पेपरला हात लावताच चिडणार्‍या आजोबांचीही आपली एक कहाणी असावी. रिक्षाचे नंबर टिपून घेणार्‍या माझ्या मित्रालाही आयुष्याने तसाच एक फटका दिला असणार ज्याचा त्याने धसका घेतला असावा... आणि किती सहजपणे आपण एखाद्याला विक्षिप्त म्हणून मोकळे होतो.

प्रत्येक लेखात मॉरल ऑफ द स्टोरी असावेच किंवा त्यातून लेसन फ्रॉम द स्टोरी मिळावेच असा माझा हट्ट नसतो. पण कधीतरी आपल्याच नकळत आपण काहीतरी शिकतो ते हे असे Happy

- कुमार ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

##करांवर टिका करण्याची इच्छा नाही कारण मी स्वतः ##कर आणि जोगळेकर आहे. फरक इतकाच मी त्या शहरात आणि त्या पेठेत जन्माला आलो असलो तरी केवळ जन्मापुरता.

रत्नागिरीचा अंन्तु बर्वा ऐकल्यानंतर याचा मुळ स्त्रोत समजला. माझ्या गावाकडे ही प्रोसेस रिसोर्सेस काळजीपुर्वक वापरले जावे यासाठी प्रयोगात आहे. मुळात कोकणाकडे निसर्गाने पाठ फिरवली नसली तरी देशासारखी समृध्दी फारशी नाही.

ही प्रोसेस रिसोर्सेस कंट्रोल करताना वापरताना ही सामाजीक प्रवृत्ती होऊन जाते.

नातु नावाचा माझा मित्र सांगायचा की त्याचा मामा नातुने जरी फोन केला तरी निरोपापुरता फोनचा वापर करायचा, त्याला पैसे पडतात, गप्पा मारायला घरी ये पण फोनवर गप्पा मारत बसु नकोस असे म्हणायचा. त्याने मोठा झाल्यावर हा सल्ला टाळुन गप्पा चालु ठेवल्या तर मामाने फोन कट करुन टाकला.

एक ना दोन , सांगाव्या तितक्या कथा कमी सापडतील. देवाला उदबत्ती ओवाळुन विझवायची आणि या पध्दतीने १५ दिवस एक उदबत्ती वापरायची इथपसुन मृताला तुळशीचाच हार घालायचा. उगच विकतचा हार घालुन काय शेवटी स्मशानात टाकुनच द्यायचा ना ? ही वृत्ती समृध्दी अभावी येते तर कुठे कुठे ती सामाजिक प्रवृत्ती होते.

जैन समाजात सुध्दा हेच दिसते. तिथे तर पाण्याचा अभावामुळे जेवल्यावर पिण्याच्या पाण्याची चुळ भरुन बसल्याजागी पाणि न थुंकता ते पिण्याची प्रथा दिसते. महाराष्ट्रात आल्यावर अनेक पिढ्यांनंतर सुध्दा हे अंधानुकरण चालु असते.

चुक शोधुन टीका करणे ही वृत्ती समाजात अनेकांच्यात असते. त्याला प्रदेश/ जाती किंवा भाषा यांच्या सीमा नाहीत पण आयुष्यात फारसे काही न करता आलेले. अपयशी झालेले खास करुन पुरुष मात्र त्या निराशेपोटी छिद्रांवेशी ( पांढर्‍या शुभ्र कपड्यावरचा एक अत्यंत छोटा काळा डाग शोधुन काढणे ) ह्या प्रवृत्तीला कधी पोहोचतात लक्षातच येत नाही.

मागाहून तो मिठाईवाला हाका मारत राहिला आणि मी असली माश्या बसणारी मिठाई नकोच म्हणत तावातावाने दुकानाबाहेर पडलो.>>>>>>>
चांगली समयसूचकता दाखवली ऋन्मेष तुम्ही

माझ्या डोक्यात पिंगा घालणार्‍या अशाच कांहीं घटना-
वांद्र्याला मीं प.रे.च्या लोकल गाडीत चढलो. दुपारची वेळ , गाडीत अगदींच माफक गर्दी. गाडी सुटतां सुटतां माझ्यामागून एक मध्यमवयाचे गृहस्थ चढले. तडक तीन जण बसलेल्या एका बांकाकडे जावून तिथल्या उतारूंना अत्यंत तुसडेपणाने सरकायला सांगून ते चौथ्या सीटवर टेकले व लगेचच उठून पुढच्या स्टेशनवर [माहिम] उतरूनही गेले ! काय मिळवलं त्यानी इतका तुसडेपणा करून ? चौथ्या सीटवरचा अधिकार कीं इतर कुणावरचा राग या उतारूंवर काढल्याचं समाधान ?

पुण्याच्या [ अर्थात, हें कुठेही होवूं शकतं] एका बँकेत मीं काऊंटरवरच्या रांगेत उभा. रांगेत पुढे फक्त दोन जण. इतक्यांत बाजूच्याच कुठल्या तरी काऊंटरवरून एक वयस्कर गृहस्थ माझ्याकडे आले व तावातावाने माझ्यावर खेंकसले, ' तुम्हीं ज्येष्ठ नागरिक आहात ना ? मग जनरल लाईनीत उभे न रहातां वेगळी लाईन लावा ; स्वतःचे हक्क जपायचंही भान नाही का ? ' . वयामुळे मिळालेली सवलत गरजेनुसार जरूर वापरावी पण ती सवलत हा हक्क आहे हें सिद्ध करण्यासाठीच जीवाचा इतका आटापिटा करावा ? माझ्या मालवणी खंवचटपणाला आंवरताना त्यावेळीं माझ्या नाकी नऊ आले होते !

कांहीं ऐकीव माहितीमुळे आमच्या कार्यालयातील एका स्टेनो मुलीबद्दल माझ्या मनात पक्की अढी होती व संधी आल्यास मीं तें तिला जाणवेल असं वागतही असे. नंतर मला माझं वीस-बावीस पानांचं लिखाण तांतडीने मराठीत टाईप करून हवं होतं [ त्यावेळीं मला मराठी टायपींग जमत नव्हतं]. सर्वानी मला त्याकरतां त्या मुलीचंच नांव सुचवलं व कुणीतरी तिला याकरतां माझ्याकडे भेटायलाही पाठवलं. दोन दिवसांत त्या मुलीने अत्यंत नेटकं टायपींग करून तें लिखाण माझ्याकडे आणून दिलं. काम माझं खाजगी असल्याने मीं मनापासून पण कांहींशा तिर्‍हाईतपणे तिला त्याचा कांहींतरी मोबदला घेण्याची विनंति केली. " तुम्हीं माझ्याबद्दल काय ऐकलंय मला माहित नाहीं; पण तुमच्याबद्दल मी जें ऐकलंय, त्यामुळे तुमचं कांहीं काम मला करायला मिळालं याचा मला आनंद झालाय व तो मला पुरेसा आहे !' , असं नम्रपणे म्हणून ती निघून गेली. मीं क्षमा वगैरे न मागतांही माझ्या तिच्याबरोबरच्या विक्षिप्त वागण्याबद्दल तिनं मला माफ केलं होतं, हें नंतरच्या तिच्या, व माझ्याही, वागण्यावरून अर्थातच स्पष्ट झालं !

आमचे अ‍ॅप मेक चे देशपांडे मास्तर वर्गात मुलांना अक्षरक्षः काहिहि बोलत.
उत्तर न देता आलेल्या मुलींना तर" घरी वेळ जात नाही म्हणुन इथे येता का?" इथवर खवचट बोलत.
पण शिकवण्यात लैच बाप माणुस. स्पुन फीडिन्गची सवय मोडुन स्वतःच डोकं वापरायला लावणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. फक्त बोलण्यात तिरकस.

पण शिकवण्यात लैच बाप माणुस.
फक्त बोलण्यात तिरकस.
>>>>>.
हे डेडली कॉम्बिनेशन बरेच ठिकाणी बघायला मिळते. बहुतेकदा ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांमध्ये. कदाचित वर्षानुवर्षे तेच तसे शिकवण्यात काय मजा म्हणून स्वताला विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न असावा असेही वाटते. अर्थात, हे करताना मूळ स्वभावाने साथ द्यायला हवीच.

आमचे इन्ग्लिशचे सर मात्र होमवर्क नाही केला किन्वा काही आले नाही तर काशीला जा असे म्हणायचे.:फिदी: जीव तोडुन शिकवायचे पण, चिडले की काही पण बोलायचे.

एकदा ट्युशनमध्ये माझ्या काही मैत्रिणी मागे भिन्तीला टेकुन बसल्या होत्या. (नेहेमीच तसे बसायच्या ) गम्मत म्हणजे इतर मुले-मुली मान्डी घालुन बसलेले असताना, यानी मात्र पाय पसरलेले.

गणिताचे सर ( ट्युशनचे ) शिकवताना म्हणाले, क्षेत्रफळे काय करतात? पाय पसरुन बसतात.:हाहा: तेव्हापासुन या मुलीन्ची ती सवय मोडली.:फिदी:

भाऊ, अशा धाग्यावर स्वतःबद्दल लिहिणारे तुम्हीच. मानलं तुम्हाला, खरंच Happy

ऋन्मेऽऽष, ब्लॉग काढलात की नाही मग?

भाऊ, अशा धाग्यावर स्वतःबद्दल लिहिणारे तुम्हीच. मानलं तुम्हाला, खरंच
>>>>>>
प्लस वन, माझ्याही डोक्यात तेच आले होते.

तृप्ती, ब्लॉग बाकी काढायचाच आहे अजून, आळस आणि हलगर्जीपणा नडतोय. पण येस्स काढणार एवढे नक्की. निदान जे लिखाण समाधानकारकरीत्या जमलेय ते तरी साठवून ठेवायचेय Happy

क्षेत्रफळे काय करतात? पाय पसरुन बसतात. Proud भारीये

मुंबईत असताना असे अनुभव म्हणजे भारीच.. पण एक मात्र खरंय, व्यक्ति तितक्या प्रकृति

बाकी पुणे तिथे काय उणे...