गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी
"

केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.

gandhisalt.jpg

आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.

गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.

गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्‍यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?

परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आता आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.

Guru_Gobind_Singh_Ji.jpg
गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.

निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्‍याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.

चिन्मय कुलकर्णी

विषय: 
प्रकार: 

खरंच उत्तम आढावा घेतला आहेस. चिंतनीय मुद्दे आहेत.
तुला यापेक्षा जास्त प्रतिसादाची अपेक्षा आहे, तेव्हा लवकरच जास्त सविस्तर लिहीन.

    ***
    The geek shall inherit the earth (BILL 24:7)

    अत्यंत उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद आणि अभीनंदन.
    १] एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्‍या जनसमुहाचा दहशतवादी असतो.>> तो क्रांतिकारक/दहशतवादी कुठल्या परिस्थितीत बनला आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.त्या मागची आर्थिक,सामाजीक कारणेच जर अहिंसेच्या मार्गाने दुर होणार असतील तर त्याचा वापर प्रथम केला गेला पाहिजे.
    २] आपण इथे केवळ शस्त्राने होणार्या हिंसा-अहिंसेचा विचार करीत आहोत,ती नेहमीच दुसरी पायरी असते.सर्वप्रथम हिंसा ही विचारांची,भावनांची होते,ज्याने माणसाची शारिरीक हिंसा करायची प्रवृत्ती बळावते.सर्व प्रकारच्या दहशतवादात हे सुत्र कायम आहे.ही वैचारीक हिंसा केवळ तशाच प्रकारच्या अहिंसेने थोपवली जाऊ शकते.तसे झाले तर परिस्थीती शारिरीक हिंसे पर्यंत जाणारच नाही.
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    खूप आभ्यासपुर्ण लेख चिन्मय .

    ***************
    impossible is just an opinion

    धन्यवाद स्लार्ती,आगाउ आणि दिपुर्झा!!!
    स्लार्ती कृपया सविस्तर विचार कळव.
    आगाउ,कुठलीही परिस्थिती दुसर्‍याचा जीव घेण्याइतकई वाईट आहे काय याबद्दलच मुळ प्रश्न आहे.पण तुमचे उत्तर प्रॅक्टिकल आहे.वैचारीक हिंसेबाबत तुम्ही मत मांडले हे बरे झाले.माहीती म्हणुन सांगतो की रविंद्रनाथ टागोर आणि गांधीजींमध्ये यावरुन मतभेद झाले होते.कारण सत्याग्रह अथवा पॅसिव्ह रेसिस्टंस हीसुध्दा वैचारीक हिंसाच आहे असे टागोरांचे मत होते.
    दिपुर्झा,आपली या विषयावरील मते वाचायला आवडतील.
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    तो क्रांतिकारक/दहशतवादी कुठल्या परिस्थितीत बनला आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.त्या मागची आर्थिक,सामाजीक कारणेच जर अहिंसेच्या मार्गाने दुर होणार असतील तर त्याचा वापर प्रथम केला गेला पाहिजे.
    अज्ञान हे सर्वात मोठे कारण आहे. ज्ञानाच्या अभावी चूक काय नि बरोबर काय ह्याचा विचार करणे कठिण. मग कुणितरी वाईट लोक लोकांच्या भावना भडकवतात नि मार्‍यामार्‍या सुरु होतात.
    शिवाय कुठल्याहि प्रकारचे यश मिळवायला कष्ट सहन करावे लागतात. जे जे लोक प्रतिकूल परिस्थितीतून वर आले (श्री. बाबासाहेब आंबेडकर) त्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागले व ते त्यांनी केले. भरपूर ज्ञान मिळवल्यावर त्यांची जात पात विचारात न घेता, त्यांना भारतीय राज्यघटना लिहीणार्‍यांच्या समितीचे अध्यक्ष केले.
    तेंव्हा कष्ट सहन करून ज्ञान मिळवणे, तसेच स्वतः कष्ट करून इतरांना ज्ञान देणे या गोष्टी जर झाल्या तर अनावश्यक हिंसाचार टळेल.

    आता घरात जर झुरळे फार झाली, तर त्यांना मारण्यासाठी झुरळनाशक औषधे वापरणे म्हणजे हिंसाच की.

    झक्की आजोबा,बरोबर आहे
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    चिन्या चांगला लेख लिहीलास.
    अहिंसा म्हणजे काय हा प्रश्न निदान मला तरी पडलेला नाही, अहिंसा काय चिज आहे ह्याचा गांधीवाद्यानिच निट खोलवर विचार करायला हवा.
    (आणि मी तिथे लिहील्यावर मला हे ही माहीत होते की त्यावर कोणी लिहीनार नाही. )

    गांधीवाद्यांसाठी मला नेहमी एक प्रश्न पडतो.
    गांधी आणि त्यांचा तत्वज्ञानावर जोर जोरात बोलायचे, बुध्दीभेद होइल असे लिहायचे आणी तिकडे चिकन तंदुरी ओरपायची. ही कुठली अहिंसा? प्राण्यांना खाणे ही चव आणि नंतर अहिंसेवर बोलने हा बुध्दीभेद. गांधीनी अहिंसा फक्त माणसांपुरती मर्यादित ठेवली न्हवती हे ही ते विसरतात.

    त्या पेक्षा माझ्या सारखे गांधीना माणनारे तरी योग्य वागतात. Happy जिथे गांधी ग्रेट आहेत तिथे ग्रेटच आहेत पण ज्या त्यांचा चुका आहेत तिथे त्यांना विरोध करतात.

    आता हे बघा.

    विनोबा भाव्यांनी भारतीय आर्मी विसर्जीत करा असा आग्रह धरला होता.

    India And Disarmament

    Some courage, imagination and faith are needed for disarmament, and I will say, India can certainly come forward in unilateral disarmament because of its great tradition. so also other countries of the world because of their own particular situations. As regards unilateral disarmament, I have as much hope from England as from India.S. V.-760

    एवढेच नाही तर त्यांनी आणखीही काही मुद्दे मांडले.

    जर आपण गांधी व त्यांचा हट्ट पुरविला असता तर फक्त पाक व्याप्त काश्मीरच आपला प्रॉब्लेम नसता तर अन्य काही प्रदेशही तसेच झाले असते.
    पुढे चिनने आपली वाट लावली कारण जवाहरलाल नेहरुंनी आर्मीला दुय्यम स्थान देन्याचा प्रयत्न केला. पण इंदिरा गांधीनी मात्रे आधी बांग्लादेश व नंतर शिख आतकंवाद्यांनी शस्त्र बळावर थांबविले आहे. एखादा विचार शस्त्राने मारता येत नाही हे मान्य पण त्यात आपली बाजु कोणती हे पण पाहीले पाहीज. तू म्हणाल्या प्रमाने दहशतवादी आणी क्रांतीकारक ह्यात फक्त बाजु कुठली हे पाहीले जाते पण मी त्या पुढे जाइल व विचार करेल ही योग्य बाजु कुठली.

    An eye for an eye makes the whole world blind हे मत निव्वळ पळवाद ( Happy ) आहे. अरे समोरचा माणूस जर १५ लोकांचे डोळे फोडत असेल आणी १६ व्या वेळेस त्याला वाटले की आपण केले ते चूक, तर त्याचा पश्चातापामुळे तो बदलला तर गेलेल्या १५ लोकांचे डोळे वापस येनार आहेत का? नाही. १४ लोकांचे डोळे जाउद्यायचे व १६ व्याचा गेला नाही म्हणून उदो उदो करायचा. मग ही कुठली अहिंसा?
    माझ्या सारख्या माणसाने एक डोळा फोडल्यावरच त्याला थांबवीले असते, निदान १४ लोकांचे डोळे तरी वाचले असते. ( थोडक्यात उरलेल्या माणसांचे डोळे वाचवायचे असतील तर मला जो डोळे फोडत चाल्ला आहे त्याचे डोळे फोडने आवश्यक आहे कारण त्यामूळे शांतता प्रस्थापित होणार आहे.)

    म्हणजे परत मी म्हणतो तोच फरक स्वसरक्षण आणि अहिंसा. आणि स्वतः किती बलवान आहोत हे सांगाय साठी केलेली हिंसा की हिंसाच पण स्वतःला लोकांनी चालवीलेल्या अन्यायापासुन वाचविने म्हणजे हिंसा नाही.

    गांधीनीच सांगीतले की अन्यायाला सहन करनारा पण अन्याय करत असतो. मग ह्याचाही विसर का पडावा?

    गांधी किंवा विनोबांने जी अहिंसा हवी ती कधीही येनार नाही ह्याचे भान दोघही विसरतात कारण त्यांची अहिंसा ही केवळ स्वप्नरंजन आहे.
    त्यामुळेच प्र के अत्र्यांनी जेंव्हा विनोबा भाव्यांनी सैन्य नको असे म्हणल्यावर," अट्टल अहिंसाबाज अहिंसेच्या नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो" असे म्हणले आहे व ते तितकेच योग्य आहे.

    आणी समर्थ असने व हिंसक असने ह्याचा फरक ज्यांना कळत नाही त्यांनी राज्यही करु नये व आपल्या मताने बुध्दीभेद तर करुच नये. बुध्दीभेद करने हि देखील हिसांच.

    अजुनही लिहीता येईल पण थांबतो.

    (अहिंसक आणि समर्थ) केदार Happy

    An eye for an eye makes the whole world blind हे मत निव्वळ पळवाद ( ) आहे.
    --- ह्यात सर्व जगच डोळस आहे हा भ्रम (!) आहे असे माबो वरच एकाने फार समर्पकपणे म्हटले आहे. एखाद्या अधमाने (काय शब्द वापरु?) स्टेन गनचा वापर दोन वर्षाच्या मुलाचा आवाज कायमचा बंद करायला वापरला, याला अहिंसेचे पुजक डोळस म्हणणार कां? डोळस म्हणुन कोणाला संबोधले आहे?

    अरे समोरचा माणूस जर १५ लोकांचे डोळे फोडत असेल आणी १६ व्या वेळेस त्याला वाटले की आपण केले ते चूक, तर त्याचा पश्चातापामुळे तो बदलला तर गेलेल्या १५ लोकांचे डोळे वापस येनार आहेत का?
    ---- तो कोणत्या परिस्थितीत डोळे फोडत होता हे प्रथम अभ्यासायला हवे असे अहिंसेचे पुजक म्हणतील.

    केदार्,उदय प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.
    बुध्दीभेद होइल असे लिहायचे आणी तिकडे चिकन तंदुरी ओरपायची. ही कुठली अहिंसा?
    हो ना!!!अगदी तुषार गांधीही नॉन्-व्हेज खातो.हे गांधीवादी नाहीतच्.कारण गांधीजी स्वतःच शाकाहाराचा पुरस्कार करतात.कधीकधी वाटत की गांधीवाद बोलायला,चिंतन करायला चांगलाय पण तो प्रॅक्टिकल नाही.

    जिथे गांधी ग्रेट आहेत तिथे ग्रेटच आहेत पण ज्या त्यांचा चुका आहेत तिथे त्यांना विरोध करतात.

    मी पण हेच म्हणतो.पण अनेक हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना कारण नसताना शिव्या देण्याचा फाल्तु उद्योग चालुच ठेवलेला आहे.गांधीजींचे महानत्व पण हे लोक मान्य करायला तयारच नसतात.

    शिख आतकंवाद्यांनी शस्त्र बळावर थांबविले आहे.
    हे चुक आहे.इंदिरा गांधींमुळे शिख दहशतवाद वाढला.त्यांच्या मृत्युनंतर १०-१२ वर्षांचा काळ पंजाबात दहशतवादाचा काळा काळ होता.तो थांबवण्याचे श्रेय इंदिरा गांधींचे नाही.

    मी त्या पुढे जाइल व विचार करेल ही योग्य बाजु कुठली.

    योग्य बाजु कुठली हे ही सापेक्ष आहे.एका जनसमुहाला कृती ही योग्य वातते त्यामुळे तो त्यास क्रांतिकारक ठरवतो दुसर्‍या समुहाला दुसरी बाजु योग्य वाटते.

    थोडक्यात उरलेल्या माणसांचे डोळे वाचवायचे असतील तर मला जो डोळे फोडत चाल्ला आहे त्याचे डोळे फोडने आवश्यक आहे कारण त्यामूळे शांतता प्रस्थापित होणार आहे
    हेच शिख धर्म सांगतो.म्हणुनच किर्पाण हे शस्त्र त्यांच्याकडे अहिंसेचे प्रतिक म्हणुन धारण केले जाते.

    गांधीनीच सांगीतले की अन्यायाला सहन करनारा पण अन्याय करत असतो. मग ह्याचाही विसर का पडावा?
    हो पण ते सांगतात की पॅसिव्ह रेसिस्टंस करा.

    स्टेन गनचा वापर दोन वर्षाच्या मुलाचा आवाज कायमचा बंद करायला वापरला, याला अहिंसेचे पुजक डोळस म्हणणार कां? डोळस म्हणुन कोणाला संबोधले आहे?

    गांधीजींनी हे वक्तव्य बदला किंवा रीव्हेंज ला विरोध करण्यासाठी केले होते.म्हणजे आज पाकीने एका भारतीयाचे डोळे फोडले तर आपण पाकीचे फोडु,मग पाकी आपला फोडेल ,मग आपण परत त्याचे फोडु व हा बदला थांबला नाही तर सगळ जग आंधळ होईल्.बदला घेण्याची भावना चुकीची आहे असे गांधीजींना म्हणायचे होते.

    तो कोणत्या परिस्थितीत डोळे फोडत होता हे प्रथम अभ्यासायला हवे असे अहिंसेचे पुजक म्हणतील.
    नाही.असे मानवाधिकार आयोगवाले म्हणतील. गांधीवादी म्हणतील की त्यानी फोडले ना,ठिक आहे.तु त्याचे फोडु नकोस
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    या विषयावर अत्रेंचा "दारु आणि अहिंसा" हा वाचनीय लेख आहे. पुस्तक "अशा गोष्टी अशा गमती"

    पॅसिव्ह रेसिस्टंस >> चिन्मय पॅसिव्ह रेसिस्टंस म्हणजे नक्की काय?
    चिन्मय, जितकी अहिंसा प्रिय आहे तितकीच अन्यायाविरुद्ध चीडही आहे. मला वाटते शस्त्र न उचलता नुसती विचारातून केलेली हिंसा म्हणजे अन्यायाविरुद्ध प्रतिकार.

    मंदार्,काय आहे त्या लेखात??
    बी,पॅसिव्ह रेसिस्टंस म्हणजे अहिंसात्मक सत्याग्रह्.पळुन जायचे नाही.तिथे राहुन अत्याचार स्वतःच्या अंगावर घ्यायचा,वेळ पडल्यास स्वतःचा जीव पण अर्पण करायचा.पण अत्याचाराचा विरोध करायचांउसती विचारातुन केलेली हिंसा हा प्रतिकार नाही होत.

    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    बी,पॅसिव्ह रेसिस्टंस म्हणजे अहिंसात्मक सत्याग्रह्.पळुन जायचे नाही.तिथे राहुन अत्याचार स्वतःच्या अंगावर घ्यायचा,वेळ पडल्यास स्वतःचा जीव पण अर्पण करायचा>> पण चिन्मय असे फक्त सहन करायचे म्हणजे समोरच्याला एकतर आपली दया येईल किंवा तो किती अमानुष आहे हे त्याला कळेल याचीच वाट पहात बसणे असे होत नाही का काहीसे?

    केदार, तू छान लिहिले आहेस? तुझा त्या लेखापेक्षा इथेच तुझे विचार जास्त छान स्पष्ट झाले आहेत.

    छान आणि अभ्यासपुर्ण लिहिलाय लेख...

    गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.
    --- गांधीजी रामभक्त (हे राम!) होते असा माझा समज आहे. चुक असल्यास दुरुस्त करणे. पण मग रामाने कुठे अहिंसा पाळली होती? त्याने तर अन्यायाच्या विरुद्ध शस्त्रच धरले होते. मग गांधीजींनी रामाचा निषेध केलेला आहे कां? गांधीजींनी रामाचा निशेध केलेला नसेल तर मग ते अहिंसेशी प्रामाणिक कसे होते? की ते रामाभक्त होते हा शेवटचा समजच चुकीचा आहे? हा समज चुकीचा असल्यास 'हे राम' कोठून आले? हा कुठला राम आहे?

    जेंव्हा महाभारतातला अर्जुन धनुष्य टाकून निराश होऊन खाली बसला होता, तेंव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला लढण्याचा उपदेश केला. ते म्हणले सत्याचा नि धर्माचा विजय व्हायचा असेल तर तुला तुझ्या गुरुजनांची व नातेवाईकांची सुद्धा हत्या करावी लागेल. नि त्याचे समर्थनहि भगवंतांनी केले आहे. ते बरोबर मानायचे की अहिंसा?

    स्वतःचे नातेवाईक नि गुरुजन यांची हत्या सुद्धा जर योग्य असते, तर परकीय, ज्यांचे आपल्या वर काहीहि उपकार पूर्वी झालेले नाहीत, नि पुढे होणार नाहीत, त्यांची हत्या का निषिद्ध? तिथे अहिंसेचा वापर कसा करायचा? नि त्या अहिंसेचा उपयोग होईस्तवर धर्म नि सत्य टिकेल का? की कुराणात, बायबलमधे हि सत्य आहे असे समजून मुकाट्याने त्यांचा स्वीकार करायचा?

    मग गांधीजींनी पूर्ण विचारांति हिंदू धर्म स्वीकारला त्या ऐवजी त्यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आत्तापर्यंत भारतातले ९० टक्के मुसलमान झाले असते, नि पाकीस्तान वेगळा झालाच नसता.

    गांधीजींना कुणि विचारले का की अशी वेळ आली असता ते काय सल्ला देतील? कसा मार्ग काढतील? काय उत्तर आहे त्यांचे? काय महत्वाचे? धर्माचा, सत्याचा विजय की अहिंसा? नि त्या प्रसंगी अहिंसा कशी उपयोगी पडते? गांधी समर्थक याला काय उत्तर देतील?

    अल्पना धन्यवाद

    समोरच्याला एकतर आपली दया येईल किंवा तो किती अमानुष आहे हे त्याला कळेल याचीच वाट पहात बसणे असे होत नाही का
    हो बरोबर आहे.त्याचे मनपरीवर्तन व्हायची वाट पहायची.

    पण मग रामाने कुठे अहिंसा पाळली होती?
    अहो इथे माबोवर मी दोन वर्ष ओरडुन ओरडुन सांगतोय पण लोकांच्या लक्षात आलेले नाही.पण गांधीजींना ते लक्षात आले होते.राम हा माणुस नव्हता तो देव होता.त्यानेच हे जग निर्माण केले आहे त्यामुळे ते जग तो नष्ट करु शकतो असेच गांधीजींचे मत होते.ज्या लेखात गांधीजी इतरांना मिसगाईडेड पॅट्रीऑट म्हणतात त्याच लेखात ते कृष्णाची प्रशंसा करतात्.अनेक शिखांनी त्यांना हा प्रश्न विचारला की गुरु गोविंद सिंगांची हिंसा चुक आणि कृष्णाची बरोबर कशी तेंव्हा गांधीजींनी सांगितले कृष्ण हा देव होता त्यामुळे त्यानेच जग निर्माण केल्याने त्यानेच ते नष्ट केल्यास त्यात चुक नाही.

    धर्माचा, सत्याचा विजय की अहिंसा?
    गांधीजी म्हणतात की सत्य हे साध्य आहे पण त्याचे साधन अहिंसा आहे.बाकी माझा हिंसेला विरोध नाही पण कृष्ण ,राम यांना मनुष्य मानुन त्यांची नक्कल करण्याला माझा सक्त विरोध आहे.मला गांधीजींनी कृष्णाची हिंसा का बरोबर याला दिलेले उत्तर बरोबरच वाटते.
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    थोडक्यात उरलेल्या माणसांचे डोळे वाचवायचे असतील तर मला जो डोळे फोडत चाल्ला आहे त्याचे डोळे फोडने आवश्यक आहे कारण त्यामूळे शांतता प्रस्थापित होणार आहे. >> केदार मला वाटते प्रश्न हा तुझा नसून त्या पंधरा जणांचा आहे. जर त्यांची choice अहिंसा असेल तर "ती चूक आहे" असे तू सांगणे किती बरोबर ठरणार ? माझ्या मते गांधीवादी अहिंसा हि individualistic आहे त्यामूळे सामूहिक चळवळींसाठी वापरल्यावर skewed वाटते.

    राम हा माणुस नव्हता तो देव होता.त्यानेच हे जग निर्माण केले आहे त्यामुळे ते जग तो नष्ट करु शकतो असेच गांधीजींचे मत होते.
    ---- ह्याच न्यायाने माता-पितांस ते अपत्याचे निर्माते आहेत ह्या एकमेव कारणाने त्याला/ तिला हानी पोहोचवण्याचा अधिकार मिळतो कां?

    मी एकाचे डोळे फोडल्यावरच (जर तो पहिला मी नसेल तर नाहीतर मी बघणर कसे?) त्या फोडणार्‍याचे हात घट्ट पकडून ठेवेल, त्याला हालचाल करायला वावच देणार नाही. म्हणजे इतर १५ लोकांचे डोळे वाचवले म्हणुन केदार :स्मित:, आणि अहिंसा पाळली म्हणुन अमर झालेले महात्मा पण संतुष्ट.

    ह्याच न्यायाने माता-पितांस ते अपत्याचे निर्माते आहेत ह्या एकमेव कारणाने त्याला/ तिला हानी पोहोचवण्याचा अधिकार मिळतो कां?
    नाही कारण देव आणि आईवडीलांचे निर्माण वेगवेगळे आहे.भगवान कृष्ण म्हणतात की ते सर्व सजीवांचे पिता आहेत.

    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    <<अनेक शिखांनी त्यांना हा प्रश्न विचारला की गुरु गोविंद सिंगांची हिंसा चुक आणि कृष्णाची बरोबर कशी तेंव्हा गांधीजींनी सांगितले कृष्ण हा देव होता त्यामुळे त्यानेच जग निर्माण केल्याने त्यानेच ते नष्ट केल्यास त्यात चुक नाही. >>

    काहीही... हे काय उत्तर झालं... आणि मुळात कृष्णाने फक्त स्वतःच मारामारी केली आणि अर्जुनाला 'तू गप्प बस रे' असं कुठंय.... अर्जुनालाही सांगितलं ना त्याने की तू युध्द कर म्हणून.... Happy

    बहुतेक कृष्ण हा त्या काळातील अतिशय ज्ञानी राजा होता. देव वगैरे तो नंतर झाला (केला गेला). कृष्ण सुद्धा हरलाय की युध्दात (देव असून).... कृष्णाचं एक नाव रणछोडदास आहे (तो रणांगणातून पळून गेला म्हणून)...

    मला कृष्णाच्या देवत्वाबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण तो देव होता म्हणून त्याने जे केलं ते बरोबरच असं म्हणणं जरा जास्तच होतं, आणि तो देव होता म्हणून त्याला असं करण्याचा अधिकार आहे, आपल्याला नाही असं म्हणणं पण जरा चुकिचंच वाटतं.... तेव्हा चिन्मयने लेखात लिहिल्याप्रमाणे सावरकरांचा स्थलकालसापेक्षता हा मुद्दा अतिशय योग्य वाटतो...

    अर्जुनालाही सांगितलं ना त्याने की तू युध्द कर म्हणून....
    ---- युद्ध कर हे कृष्णाने (म्हणजे देवाने) सांगितले होते, निर्माण कर्त्याला तो अधिकार असावा असे ते आपल्या सामान्यांना न समजणारे तत्वज्ञान (philosophy) आहे.

    थोडक्यात रामायण, महाभारत वगैरे काही वाचू नका. त्यातले लोक देव होते, किंवा त्यांना देवाने हत्या करायला सांगितले होते म्हणून ते वेगळे. त्यांचे अनुकरण आपण करू नये. मग रघुपति राघव राजाराम कशाला म्हणायचे?
    गांधी म्हणतात की
    'कृष्ण ,राम यांना मनुष्य मानुन त्यांची नक्कल करण्याला माझा सक्त विरोध आहे.'
    युद्ध कर हे कृष्णाने (म्हणजे देवाने) सांगितले होते, निर्माण कर्त्याला तो अधिकार असावा असे ते आपल्या सामान्यांना न समजणारे तत्वज्ञान (philosophy) आहे.

    दंगलीमधे, सरकारी पोलीसांच्या गोळीबारापुढे, लाठी हल्ल्यापुढे गांधी अहिंसा वापरून जिवंत राहिले कारण ते थोर होते, त्यांना वाचवण्यासाठी इतर अनेकांनी प्राण दिले. आपण सर्वसामान्य लोक इतके थोर नाही. आपल्याला वाचवायला पोलीस, लष्कर नि शेवटी आपण स्वतः शस्त्र घ्यावे लागेल. जमणार नाही आपल्याला अहिंसा.

    म्हणूनच मी म्हणतो, गांधी थोर होते म्हणून आपण गांधीजींच्या उपदेशाचे हि पालन करू नये. कारण त्यांचेहि तत्वज्ञान आपल्या सामान्यांना न समजणारे आहे.

    .

    काहीही... हे काय उत्तर झालं
    अहो ते उत्तर बरोबरच आहे.कृष्ण हा देव होता.मानवजातीसाठी असलेले नियम त्याला लागु होत नाहीत्.जो नियम बनवतो तो ते नियम transcend करतो.वेदिक साहित्यामध्ये एक श्लोक फार छान आहे.त्याचा अर्थ असा की 'जे देवांनी केलेल्या कृत्याची नक्कल करतात आणि त्याचे नियम स्वतःलाही लागु करतात ते भगवान शंकराची नक्कल करण्यासाठी विष प्राशन करणार का??'त्यामुळे त्या उत्तरात काहीच चुकले नाही.आता कृष्णानी केल म्हणजे मी ही कराव अस ज्यांना वाटत त्यांनी आम्हास गोवर्धन पर्वत उचलुन दाखवावा किंवा विषप्राशन करुन दाखवावे. हां ...कृष्णानी अर्जुनाला केलेला उपदेश आपण मानु शकतो.त्यावर चर्चा होउ शकते की अर्जुनाने पण हिंसा केलीच की.पण गांधीजींना असा प्रश्न विचारता येणार नव्हता कारण गांधीजी गीतेचा वेगळा अर्थ घेत्.गीतेचा पहिला श्लोक 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' असा आहे.म्हणजे जे धर्मक्षेत्र आहे अशा कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांची दोन सैन्य एकमेकांसमोर युध्दासाठी उभी राहीली.गांधीजी त्याचा अर्थ वेगळा घेतात्.त्यांच्यासाठी कुरुक्षेत्र हे सध्या हिमाचलमध्ये असलेल ठिकाण नाही तर कुरुक्षेत्र म्हणजे माणसाच शरीर्.आणि पांडव म्हणजे अर्जुन्,भीम वगैरे नाही तर पांडव म्हणजे शरीराची पाच इंद्रिये.आता हा असला अर्थ साफ चुकीचा आहे.

    ते आपल्या सामान्यांना न समजणारे तत्वज्ञान (philosophy) आहे.
    आता हे तत्वज्ञान तुम्हास कळत नसेल तर तुमचे दुर्दैव्.पण तत्वज्ञान अगदी बरोबर आहे.कृष्ण हा साधारण मनुष्य होता ,नंतर त्याला देव बनवले ह्या चुकिच्या बेसिक सिध्दांतावर तुमचा सगळा डोलारा उभा आहे त्यामुळे तुमचा पुढचा विचार चुकणारच.२+२=४ असताना तुम्ही ते ३ धरलेले आहे त्यामुळे पुढे कितीही बरोबर आकडेमोड केली तरी शेवटचे उत्तर चुकणारच.

    त्यांचे अनुकरण आपण करू नये.
    ते करायचेच नसते हे तुम्हाला माहीत नाही???आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचे असते.त्यांचे अनुकरण करायचे नसतेच्.जो उपदेश अर्जुनाला केला त्याचे आपण पालन करायचे.स्वतःला फारफार तर अर्जुनाच्या जागी ठेवुन विचार करा.पण कृष्णाच्या जागी ठेवुन विचार करणे साफ चुक आहे.असे केल्याने आपण आपलीच फसवणुक करुन घ्याल.

    झक्की आजोबा 'गांधी म्हणतात' नंतरची पहिली ओळ माझी आहे गांधीजींची नाही.

    बाकी माझा कृष्ण अथवा इतर धर्मग्रंथात सांगितले म्हणुन हिंसा करायला साफ विरोध आहे.जिथे हिंसा करावी वाटली तिथे करा.त्यासाठी व्हॅलिड असे बुध्दिवादाला पटणारी कारणे द्या.पण कृष्णाने सांगितले आणि दुर्गेनी सांगितले म्हणुन मी हे करतो असे म्हणु नका.मग ह्याच्यात आणि जिहादमध्ये काय फरक??
    ----------------------
    यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
    क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
    दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
    होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
    दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

    चिन्या, तुझ्या वरिल दोन पोस्टला उत्तर द्यावे का नाही हा प्रामाणिक प्रश्न मला पडला आहे मित्रा.

    जेंव्हा चर्चा सुरु झाली तेंव्हाच वाटल होत ती आता हिंसा अहिंसा, युद्ध, कृष्ण, राम, आणि ते देव आहेत कि मानव आहेत, तरी त्यांनी असच केल तसच केल वैगरे वैगरे वर येणार. Happy

    तसही मायबोलीवर देव म्हणजे काय? यावरच एवढ गुर्‍हाळ चर्चिल जाउनही त्याच उत्तर मिळाल नाही मग राम कृष्ण देव आहेत हे पटण, पटवण तर फार लांब राहील. त्यामुळे चिन्या तु ते पटवुन द्यायचा नाद सोडुनच दे. Happy

    बाकी अहिंसा = गांधीजी अस समीकरण करुन अहिंसेला इतक छोट नका करु. गांधीजींनी अहिंसेचा वापर केला आणि ते तत्व त्यांनी पुर्णपणे शेवटपर्यन्त पाळल. अहिंसा म्हणजे कोणालाही न दुखावणे त्यात शाब्दिक वार करुन दुसर्यास दुखावणे हे सुद्धा हिंसेतच मोडत. त्यामुळे टागोरांनी जे म्हटल ते बरोबर आहे.

    खरा कट्टर अहिंसा धर्म दिसतो तो बौद्ध आणि जैन धर्मातील यम नियमांमधे. कोणी जैन ओळखीच असेल तर विचारुन बघा, मोड आलेल धान्य खाण सुद्धा हत्या समजतात. Happy हे म्हणजे जगायच अवघड होईल.

    राम आणि कृष्ण क्षत्रिय होते. लढणे हा त्यांचा धर्म होता. अर्जुनाचाही तो धर्म होता. धर्माच पालन हे सर्व श्रेष्ठ कर्म आहे हे कृष्णाने अर्जुनाला पटवुन देण्यासाठी गीता सांगीतली. धर्माच पालन करताना जर कोणाची हत्या करावी लागत असेल तर ती हत्या न होता कर्तव्य कर्म होत. त्यामुळे त्यांनी युद्ध केले तरी ते हिंसा होउ शकत नाही. ते देव आहेत म्हणुन त्यांनी केलेली हिंसा चालते वैगरे काहीही म्हणु नका हो. Happy

    आता या घडीला आपल्या भारतातले असो वा पाकिस्तान मधले असो वा जगातल्या कुठल्याही देशाचे असो सैन्यात (आर्मी एअरफोर्स सगळे) काम करणार्यांचा लढणे हा धर्म आहे त्यांनी शस्त्र खाली ठेवुन चालणार नाही. कोण बरोबर कोण चुक याच्याशी या सैन्याला काहीही देण घेण नाही. लढायची ऑर्डर मिळाली कि त्यांनी तयारच असायला पाहीजे आणि लढायलाच पाहीजे. आणि त्या लढाईत जे मारले जातील ते सगळेच कर्तव्य करताना मरण आल म्हणुन कृष्णाच्या वचनाप्रमाणे चांगल्या गतीला जातील, हो पाकिस्तानी असले तरी सुद्धा. इथे हिंसा अहिंसे पेक्षा कर्म करण्याला महत्व आहे.

    आता या पार्श्वभुमीवर एक सामान्य व्यक्ती म्हणुन किंवा नागरिक म्हणुन गांधीजींनी जो अहिंसेचा मार्ग स्वीकारला होता तो अगदी योग्य होता. तो किती प्रभावी होता हे मात्र सांगण अवघड आहे कारण फक्त गांधीजींच्या अहिंसेमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे मलाही पटत नाही. ईंग्रज देश सोडुन गेले त्याला सगळ्या बाजुनी बरीच कारण आहेत, जस कि दुसर्या महायुद्धा नंतर परिस्थीती खुपच बदलली होती, जहाल मतवादींचा गटही होता, सशस्त्र संघटनांचाही जोर वाढला होता. सगळ आलबेल असत तर फक्त गांधीजींच्या चळवळींमुळे ते देश सोडुन गेले असते अस अजिबात वाटत नाही. Happy

    राहता राहीला दहशतवाद. ते मात्र हिंसा यातच मोडत. मग तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा असु देत. धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांना मारण हे हिंसेतच मोडणार. समोरासमोर येउन युद्ध करा ते योग्य असेल. पण बेसावध लोकांवर हल्ला करुन ठार मारण कुठल्याच धर्मात धर्मासाठी म्हणुन होउ शकत नाही.

    दिव्या यांच्या संपुर्ण पोस्टशी सहमत.

    समोरासमोर येउन युद्ध करा ते योग्य असेल.
    ---- पण तसे होत नाही ना... समोरा-समोरच्या युद्धात पराभव होणार आहे याची जाण आहे मग २६ नोव्हेंबर सारखे low cost - maximum damage युद्ध (ज्याला आपण दहशतवादी हल्ला म्हणतो) शेकडो वेळा लढलेले परवडते.

    मागे कोणीतरी "अनुल्लेखाच्या", खर तर "वाळीत" टाकण्याच्या धोरणाला,"प्रतिकाराचे सामुहिक" "अहिन्सात्मक" धोरण म्हणून गौरविले होते!
    पण वरले, रविन्द्रनाथ टागोरान्चे मत ग्राह्य धरले तर ह्या देखिल वैचारिक हिन्साच ना?

    मानव त्याचे पशुन्पेक्षा वेगळेपण सिद्ध करण्याच्या नादात काहीही करुन बसतो, अहिन्सेचे तत्व हे देखिल याच माळेचे मणी आहे असे माझे मत! Happy
    मागे एकदा, पालकशिबिरामधे एका जैन मुख्याध्यापिकेबरोबर फार्मवर गेलो होतो, शाकाहार की मान्साहार यावरुन बोलता बोलता विषय निघालाच हिन्सा अहिन्सेचा! मला जेव्हा चर्चा ऐकणे असह्य झाले तेव्हा त्या बाईन्ना (व इतरान्ना) एकच प्रश्ण विचारला की हे समोर पीक हे, ते वाढतय, त्याची छाटणि तुम्ही करता, तुम्ही पालेभाज्या खाता, त्याही अशाच जिवन्त असतात नि त्या कापुन आणून "ताज्या ताज्या (मारलेल्याच ना?)" आहेत असे म्हणून आनन्दाने शिजवुन भाजुन, दळून, रगडून मग खाता! जिवन्त शाकयोनीची ही हत्याच होत नाही का? मग कुठे गेले अहिन्सेचे तत्व?
    कोणितरी म्हणाले की हे सर्व देवाने मानवाकरता निर्माण केलय!
    मी म्हणल, अस कुठे लिहिलय? कोण सान्गितल? त्याचा अधिकार काय? सान्गणारा मानवच होता ना? देव आलाय का अस सान्गायला? नाही ना? म्हणजेच तुम्हीच नियम ठरवायचे व म्हणायचे ही पूर्व! असे कसे चालेल? जीवहत्या ती हत्याच!
    बाईन्नी म्हणले, खरच की, पण मग माणसाने खायचे काय? अस असेल तर जिवन्तच रहाणे अशक्य होईल!
    मी म्हणले ते बरोबर हे, पण याकरता एक आधारभूत तत्वज्ञान आहे नि ते हिन्दु धर्मात हे!
    बाई म्हणाल्या कोणते?
    जीवो जीवस्य जीवनम, हा सृष्टीचा मूलभूत नियम हे! या नियमाच्या चाकोरीतच तुमचे सर्व मानवी यमनियम फिरत रहातात!
    प्रत्येक जीव दुसर्‍या जीवावर अवलम्बुन हे! पण हे अवलम्बित्व मान्यच नसणार्‍या नरपुन्गवान्बद्दल काय बोलावे?
    पुन्हा माझे वरील पहिले (ठळक) वाक्य विचारात घेता, पशू अन्ना करता शिकार करतात ती एक हिन्सा मानुन आम्ही त्यान्च्यापेक्षा वेगळे असे जेव्हा दाखविण्याची खुमखुमी येते तेव्हा शाकाहार किन्वा अहिन्सा वगैरे भोन्गळ तत्वज्ञानाची शर्करावगुन्ठीत आवरणे चढवुन निरनिराळे नितिनियम वेगवेगळ्या कालखन्डात अनेकान्नी केलेले आढळून येतात! Happy व त्याचीच आधुनीक आवृत्ती म्हणजे जीवनातल्या सर्व अन्गामध्ये अहिन्सा बाणविण्यासाठी केलेल्या अघोचर हालचाली! सैन्यरहित राष्ट्राचा विचार हा देखिल याच वृत्तीचा एक भाग!
    वैयक्तिक सदाचरण म्हणून माणसाने जरुर अहिन्सेचे तत्व पाळावे, "विनाकारण" हिन्सा करु नये! पण सकारण, गीतेत सान्गितल्याप्रमाणे कर्तव्य पूर्तीकरता, हिन्सा-अहिन्सेचा घोळ घालू नये!
    या सगळ्यात मोहनदास इतिहासाच्या कुठल्या तरी कोपर्‍यातल्या कालखन्डात अदखलपात्र म्हणूनच येतात!
    हिन्दुत्ववादी त्यान्च्यावर टीका करतात त्याचे कारण अहिन्सातत्वाच्या जहरी धुन्दीमुळे ज्या चूका भरतवर्षातील नेते व अनुयायान्नी केल्या त्याचे परिणामस्वरुप असन्ख्यान्ची जिवितहानी बघावी लागलीये, प्रदेश व युद्धे गमवावी लागलीहेत, अन इतकी वर्षे जाऊनही आजही हिन्दुस्थानातील हिन्दु समाज स्वसंरक्षणास कितपत समर्थ हे याची शन्काच हे!
    गान्धिजिन्ची (?) (खर तर बौद्ध धर्माची ना?) अहिन्सा अव्यावहारिक असल्याने ती या देशास (याच काय कुणासही) कायमच घातक ठरली हे! Happy

    आचार्य अत्रेन्चे ते एकच वाक्य खर तर एकटे पुरेसे आहे! "अट्टल अहिंसाबाज अहिंसेच्या नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो" चपखल वर्णन, मोजक्या नि नेमक्या शब्दात!
    केदार, वरील वाक्याकरता धन्यवाद
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    जीवो जीवस्य जीवनम, हा सृष्टीचा मूलभूत नियम हे! या नियमाच्या चाकोरीतच तुमचे सर्व मानवी यमनियम फिरत रहातात!
    --- लिम्बुटिम्बु यांची पोस्ट दोनदा वाचल्यावर रुजली, वास्तवतेला धरुन विचार आहेत.

    Pages