दोन गिलास पाणी !

Submitted by तुमचा अभिषेक on 27 October, 2014 - 13:45

हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते..

दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते. पण संध्याकाळी मात्र आईने नाक्याच्या बावडीवर पाणी आणायला धाडले. आठ हंडे आठ फेर्‍या. हात अजूनही ठणकत होता. आज आंघोळ नाही आणि शाळा पण नाही. गगनबावड्याला पाईपलाईनचे काम चालू होते. संध्याकाळपर्यंत पाणी येईल असे शेजारच्या मौसी बोलत होत्या. दोन दिवस थोडे गढूळ येईल पण येईल. पण तोपर्यंत काय!

सकाळी माठाने पाऊण गिलास पाणी दिले तेवढेच. आता त्याच्या नळातून एक टिप्पूस सुद्धा बाहेर निघत नव्हता. पिंपाच्या तळाला पाणी होते, पण आई ते भांडी घासायला वापरायची. तळाशी राख जमलेली दिसत होती. सोबंत गंज चढलेला पत्रा चमकत होता. ते पाणी प्यायलो असतो आणि काही झाले असते तर आईने नक्कीच खूप मारले असते.

आई तत्वांची खूप पक्की होती. कोणाकडे हात पसरलेले तिला आवडायचे नाही. कोणाकडे साधे प्रसादीचे जेवायला जाऊ द्यायची नाही. मौसीकडे पाणी मागितले असते, पण तिने हे आईला सांगितले असते तर... त्यापेक्षा नकोच ते!

पाण्याच्या शोधात घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. उन्हं अजूनही कडक होते. तहान वाढवत होते. गल्लीबोळ दुकानलाईन, नक्की कुठे जायचे काही कल्पना नव्हती. अख्या मोहल्ल्यामध्ये पाणी आले नव्हते. बस्स एका बाजूचा फूटपाथ पकडून सावलीच्या हिशोबाने चालत होतो. ईतक्यात एका कडेला सुलभ शौचालय नजरेस पडले. बाहेरच्या बाजूने तेथील बेसिन आणि पाण्याचा ओलसरपणा दिसत होता. बेसिनच्या नळाचे पाणी प्यायला काय हरकत आहे अशी मनाची समजूत काढली. ते हात धुवायचे पाणी असते, भांडी घासायचे नसते म्हणत आत शिरलो. चिंध्या बांधलेल्या नळातून पाण्याची पिचकारी उडत होती. ते बघूनच मन तयार होत नव्हते. इतक्यात तिथून एक पाखरू फडफडत उडाले. झुरळच ते! थू थू थू! आईला जर का समजले मी इथे पाणी प्यायला आलेलो तर.. बस्स हा विचार मनात येताच मी आवंढा गिळत तिथून पळत सुटलो.

पळत पळत रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो. एका स्टॉलवर प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या सजवून ठेवल्या होत्या. पण त्याला पैसे पडतात हे माहीत होते. हिंमत करून विचारले तर दहाच्या खाली कुठलीच बाटली मिळत नव्हती. पॉकेटमनीचा दिड रुपया होता माझ्या खिश्यात. दिड दोन घोट पाणीही चालले असते. पण ते सुट्टे पाणी विकायला तयार नव्हते. इतक्यात काहीसे आठवले. मोठ्या हॉटेलात गेलो की पहिल्यांदा पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवतात. मागे एकदा आईबरोबर गेलेलो तेव्हाचे आठवले. काचेच्या ग्लासात कितीतरी वेळ स्वत:चेच प्रतिबिंब न्याहाळत बसलेलो. आज मात्र ग्लास समोर आले की पहिल्यांदा त्यातील पाणी पिऊन टाकायचे म्हणत एका हॉटेलात शिरलो. पाणी पिऊन मग काहीही ऑर्डर न करता निघून जायचे असा प्लॅन होता. दोन ग्लास पाण्यासाठी कोणी माझा जीव घेणार नव्हता!

पण घेतला तर ...

नाही आत शिरलो तर तहानेनेच जायचा होता..!

"अकेला है क्या?" वेटरने दरडावतच विचारले.
अर्धी चड्डी बघून कोणी सलाम ठोकेल अशी अपेक्षाही नव्हती. तिथूनच आल्यापावली परत फिरावेसे वाटले. पण एव्हाना टेबलांवरून नजर भिरभिरू लागली होती. वडासांबार, पुरीभाजी, मसालाडोसा.. पावभाजी, मोसंबी ज्यूस, मॅंगोला.. पण माझी तहान पाण्याची होती. जाड काचेच्या त्या ग्लासांवर नजर पडताच पावलेही थबकली. "हा अकेला है" सुकलेल्या ओठातून कसेबसे शब्दही उमटले. त्याच दरडावणार्‍या नजरांनी मग एका कोपर्‍यातील शिडीखालची जागा दाखवली. माझ्यासाठीही तिच योग्य होती. ना कोणाच्या अध्यात, ना कोणाच्या मध्यात. त्या अडचणीच्या कोपर्‍यातही मी आणखी अंग चोरून विसावलो. लगोलग एक जाडजूड मेनूकार्ड येऊन माझ्या समोर आदळले. मी उजवा अंगठा तोंडाजवळ नेत पाण्याची खूण केली. जवळून जाणारा एक पाण्याचा ग्लास उचलून माझ्या टेबलावर टेकवत तो निघून गेला. मी घटाघट घटाघट एकाच श्वासात पुर्ण ग्लास रिता केला. तहान अजून बाकी होती, पण मगासचा पाणीवाला एव्हाना दूर निघून गेला होता. इतक्यात त्या वेटरकडे माझी नजर गेली. तो फिरून मागे येऊ नये म्हणून मी उगाचच डोके मेनूकार्डमध्ये खुपसले.

त्यात वाचायचे असे काहीच नव्हते. हलकेच टेबलाचे निरीक्षण करू लागलो. स्वच्छ आणि सुंदर. एवढा छान आमचा देव्हारा सुद्धा नव्हता. मी अजून काही मागवले नव्हते तरी त्यावर आधीच बडीशेप आणि चटण्यांच्या छोट्या छोट्या बाटल्या रचून ठेवल्या होत्या. टिपकागदांचा एक स्टॅंड सुद्धा होता. त्याला पाहून आठवले, घाईघाईत पाणी पिताना बरेचसे पाणी ओघळून माझी मान आणि शर्ट ओले करून गेले होते. सावचितपणे प्यायलो असतो तर ते फुकट गेले नसते असे उगाचच वाटून गेले. माझ्या वरच्या खिशात एक रुमाल सवयीनेच असायचा. त्याने तोंड पुसून घेतले आणि तो तसाच टेबलावर ठेवून दुसर्‍या पाण्याच्या ग्लासासाठी पोर्‍याला आवाज दिला. एक गिल्लास पाणी आपली जादू करून गेला होता. मला बरेपैकी कंठ फुटला होता!

पाण्याचा दुसरा ग्लास मात्र आरामात चवीने रिचवला. शेवटचा घोट गरज नसूनही आत ढकलला. पुन्हा कधी पाणी मिळेल न मिळेल याची शाश्वती नव्हती. आता तिथून सुमडीत सटकायचे होते. ईतक्यात जवळच उभ्या त्या पाणीवाल्या पोर्‍याने वेटरला आवाज दिला. माझी ऑर्डर घ्यायची आठवण करून द्यायला..

अचानकच घडल्याने मला काही सुचेनासे झाले. अख्खे मेनूकार्ड नजरेसमोर भिरभिरून गेले. खिश्यातल्या दिड रुपयात तिथला वडाही मिळणार नव्हता. समोरचा गेट रिकामा दिसत होता. वेटर जवळ यायच्या आधीच संधी साधायला हवी म्हणत मी पटकन टेबलावरचा रुमाल उचलला आणि शर्टाच्या खिशात कोंबून गेटच्या दिशेने धाव घेतली. त्या नादात हात टेबलावरच्या बरण्यांवर आदळून आवाज झाला आणि तिथेच घात झाला.

चोर चोर चोर .. गेटबाहेर पडून डावीकडच्या फूटपाथवर वळलो तरी पाठीमागून ओरडा ऐकू येत होता.. दोन ग्लास पाण्याची चोरी.. घरी समजले असते मी चोरी केली तर आईने खरेच खूप मारले असते.

मी अक्षरशा वाट मिळेल तिथे पळत होतो. लिंबूवाल्या म्हातारीच्या गोणपाटावर पाय पडला तश्या तिने शिव्या घालायला सुरुवात केली. मी त्या कानाआड करत पुढे उडी मारली. पुढे रचलेल्या कपड्यांवर पाय पडला असता तर खूप मार पडणार होता. तो चुकवायला म्हणून मी तिरकी उडी मारली. पण पाय न पडताही तिथून सट्टाक् करत एक काठी पायावर पडली. आईग्गं, पोटरीपासून खालचा पाय सुन्न झाला. पुढची चार पावले मी एकाच पायावर धावलो की काय असे क्षणभर वाटले, आणि मग अचानक दुखर्‍या पायातून कळा येऊ लागल्या. तरी मागाहून कोणीतरी आहे म्हणून नेटाने धावायचेच होते. पण वेग मंदावला होता. घश्यापर्यंत प्यालेले पाणी डुचमळून उलटी काढावीशी वाटत होती, पण त्याच पाण्यासाठी सारे केले असल्याने आतच थांबावी असे वाटत होते. पुढे कुठे जायचे या विचारात सिग्नलजवळ पोहोचलो. इतक्यात कोणाचातरी पाठीवर जोरकस फटका पडला. मी लंगडणार्‍या पायासह कोलमडलो. डोके रस्त्याकडेच्या एका लाल खांबावर आदळले आणि त्या खांबाला आणखी लाल करत, शुद्ध हरपत मी जमिनीवर पालथा झालो. छातीतून एक जीवघेणी कळ गेली. काहीतरी छातीला चिरडत जात होते..

बहुधा मगाशी घाईघाईत रुमालासोबत बडीशेपचा डब्बाही खिशात कोंबला गेला होता!

...

"....... चांगल्या घरचा मुलगा दिसतोय रे", कोणीतरी शेवटचे म्हटल्याचे कानावर पडले. शुद्धीवर आलो तेव्हा आई उशाशी बसलेली. डोक्यावरून हात फिरवत होती. म्हणत होती, माठ आडवा केला असतास, तर दोन गिलास पाणी आरामात आले असते. मला बहुतेक ते सुचले होते. पण का माहीत नाही भिती वाटलेली. माठ फुटला असता पटकन तर आईने खूप मारले असते.

- तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मीच पहिली छान लिहील आहे.
पाण्यासाठीची तगमग मस्त उतरलीये.
विदर्भ किवा इउत्तर महाराष्ट्राचा भूभाग डोळ्यासमोर आला.
छान!!!

खुपच छान
हल्ली तुम्ही आजिबातच लिहित नाही का Sad

छान लिहीलंय! नेहेमीसारखाच 'अभीटच' Happy
हल्ली तुम्ही आजिबातच लिहित नाही का >>> Lol (सॉरी बरका पण हसूच आवरलं नाही मला.)

बादवे,
मी याआधी दोन कथांवर (रन राहुल रन आणि 'च्याई.s.s.यला परत तिचा फोन आला..') प्रतिसाद दिलेला पण त्या वर का आल्या नाहित? Sad
कुछ तो टेक्निकल गडबड हैं!

च्रप्स +१
हल्ली तुम्ही गायब असता. मागे परी सिरीज दिलीत त्यानंतर खास असे काहीच नाही. स्पेशल स्वतःचा टच असलेले तुम्ही, ऋन्मेष आणि रा हुलही आजकाल कमी दिसतात माबोवर. नवीन मेजवान्या मी मिस करतोय. वनवास लवकर संपवा अन प्रकट व्हा. Lol

राहुल Lol
काहीतरी कन्फ्यूजन होतेय बहुतेक तुझे. पुन्हा वाच एकदा प्लीज. तुम्हा सगळ्यांना मीस करतोय म्हंटले आहे मी. तुम्ही सगळे एकच आहात असे नाही Rofl

च्रप्स, आदू,
हो. हल्ली नाही फार काही लिहीत. अपवाद परी फेसबूक स्टेट्स. कारण काही विशेष नाही, पण आधी काही सुचले की सारी हातातली कामे बाजूला ठेवून चांगले वाईट जमेल तसे कागदावर उतरवून काढायचो. हल्ली तसा लागलीच वेळ मिळत नाही. नंतर लिहायला घेतले तर उत्स्फुर्ततेच्या अभावापोटी हवे तसे उतरत नाही. असे काही वेळा झाल्यावर मग लिखाणच थंडावले. पण काही खंत नाही. कधीतरी अचानक सुरूही होईल Happy

राहुल,
परीकथेचे भाग बरेच काळापासून ईथे टाकले नाही. एकत्र चार भाग टाकता येतील ईतके स्टेट्स या काळात झाले असावेत. न टाकण्याचे कारणही काही विशेष नाही. बस्स आळस Happy

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
हि कथा नंतर श्री आणि सौ मासिकात प्रसिद्धही झालेली. तेच इथे कथेखाली टाकून मिरवणार होतो. पण मायबोलीने जुन्या कथांच्या संपादनाची सोय बंद केली वाटते Happy

Pages