उत्तम ब्लॉग बनवायचा आहे - माहिती हवी आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 October, 2014 - 03:51

मायबोलीवर रुळून मला बरेपैकी कालावधी झालाय. इथेतिथे शेव-कुरमुरे सारख्या माझ्या पोस्ट आणि चणे-फुटाणे सारखे धागे तुम्ही बघत असालच. पण त्यातच एखादा काजू-बदाम निघतो. म्हणजेच अनपेक्षितपणे चांगले वा ठिकठाक लिहीले जाते. बस्स असलेच काही लिखाण एका जागी सेव्ह करून ठेवावे म्हणून मला एक ब्लॉग बनवायचा आहे.

=> ब्लॉग बनवायचा हेतू -

१) आवडीचे आणि निवडक लिखाण एका जागी सुरक्षित राहावे, अन्यथा एके दिवशी उठायचो आणि समजायचे मायबोलीला टाळे लागलेय, कि झाले कल्याण, गेले सारे लिखाण ढगात.
२) माझ्या मित्र-मैत्रीणींना ते निवडक लिखाण एकाच लिंक मध्ये वाचायला देता यावे. मायबोलीच्या लिंक द्यायला भितीच वाटते कारण देवा कधी कधी त्या खालचे प्रतिसाद फारच डेंजरस असतात. (याच कारणास्तव आजपर्यंत मी माझ्या गर्लफ्रेंडला देखील माझे काहीच वाचायला दिलेले नाही :()

=> ब्लॉगकडून माझ्या अपेक्षा आणि ब्लॉग बनवण्यासाठी अपेक्षित असलेली मदत

१) चांगली आणि विश्वासार्ह वेबसाईट -- मी गूगाळले असता ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस वगैरे दोन-तीन प्रामुख्याने सापडल्या.
२) आकर्षक तसेच उपयुक्त थीम -- दूरद्रुष्टीचा विचार करता जर त्यावर ३००-४०० लेख पडले तर विभागवार आणि तारखेनुसार रेकॉर्ड ठेवायला आणि शोधायला सोपे.
३) चांगला मराठी फॉंट -- हे सर्वात महत्वाचे. वाचकांच्या सोयीचा फॉंट असायलाच हवा. (हा थीमनुसार असतो? बदलतो? कि फॉंट डाऊनलोड करावे लागतात? कोणता आणि काय कसे वगैरे.)
४) हे सारे फुकट हवे! ब्लॉगनिर्मितीचा खर्च शून्य हवा! Happy

=> मला ब्लॉगजगताचा काहीच अनुभव नसल्याने या अपेक्षांमध्ये मी काही मिसतोय असे वाटल्यास स्वत:तर्फे भर टाकू शकता.

येथील माहितीचा फायदा सर्वच ब्लॉग बनवण्यास उत्सुक उमेदवारांना व्हावा. तसेच ज्यांनी आधीच ब्लॉग बनवले आहेत त्यांनाही सुधारणा करता येईल. ज्यांनी हल्लीच ब्लॉग बनवलेत अश्यांनीही आपल्याकडचे ज्ञान नक्कीच शेअर करावे. कदाचित त्यांच्याकडे काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन असावी जी जुन्या ब्लॉगधारकांनाही माहीत नसावी.

ईन अ‍ॅडव्हान्स आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा ब्लॉग बघा

www.kelkaramol.blogspot.com

काही माहिती पाहिजे अस्ल्यास अवश्य विचारा/ व्य. नि. करा

शुभेच्छा

अमोल केळकर

पियु, पुढची लिंकही बघतो ..

अमोल, आपलाही ब्लॉग नजरेखालून घालतो.
तयार ब्लॉग पाहून आयडीया घेणे हा सोयीचा प्रकार वाटतो. त्यातून पटकन आयडीया मिळाली तर छानपैकी दिवाळी-भाऊबीज-लक्ष्मीपूजनचा मुहुर्त बघून ब्लॉग काढता येईल.

वर्डप्रेस आणि गुगल (ब्लोगस्पॉट) या दोन प्रमुख वेबसायीट आहेत फ्री ब्लोग साठी. गुगलची सेवा थोडी वापरायला सोपी आहे व ट्रान्सलिटरेशन वापरून मराठी सहज लिहिता येते. तुमचे जीमेल चे अकौंट वापरून २ मिनिटात ब्लोग सुरु करता येतो.

येथे भरपूर मराठी ब्लोग आहेत. उदाहरणादाखल पाहण्यासाठी.
http://marathiblogs.net/

happy blogging Happy

गाढव आहात!

या एका वाक्याकरता :
>>
" एके दिवशी उठायचो आणि समजायचे मायबोलीला टाळे लागलेय, "
<<

थूथू करून काढून टाका बरं ते शब्द तोंडातले Happy

"एकादेदिवशी उठून समजायचे, आयडीला टाळे लागलेय" अशी भीती वाटत असेल, तर ऋन्मेऽऽषविचार किंवा मेऽऽषऋण वगैरे नावाचा फुटकळ ब्लॉग काढून टाका. फुकटातच असतोय, हाकानाका.

पण सांभाळून हं, ऑर्कुटला टाळे लागू शकते तर ब्लॉगस्पॉटला का नाही लागू शकणार?

अन हो, टंब्लर नको. पोर्नोब्लॉग्जने लडबडलेलं टमरेल आहे ते.

चांगला प्रश्न आहे. मला हाच प्रश्न पडला होता. यामध्ये दोन गोष्टींचा विचार करा १)चांगला ब्लॉग कसा असावा आणि २) मराठीत ब्लॉग का लिहावा.

न्युयॉर्क टाईम्सच्या अबाउट डॉट कॉमवर याविषयीचे उपयुक्त लेख आहेत यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

ब्लॉग किती मोठा /लहान असावा हाच खरा कळीचा मुद्दा ठरतो. कंटाळवाणा होण्याइतका लांबलचक नको.

दुसरा एक पर्याय म्हणजे तुमच्या आवाजात साउंड रेकॉर्डींग करून ती ऑडिओ क्लिप(MP3 ,WAV format) मित्रांना पाठवा /द्या. इतर कामे करतांना ते ऐकू शकतील.
मराठीतल्या ब्लॉगसाठी विषय हीच महत्त्वाची बाब आहे.
शुभेच्छा.

"एके दिवशी उठायचो आणि समजायचे मायबोलीला टाळे लागलेय" >>> निषेध निषेध निषेध.
हे असं बोलवतं तरी कसं ?

जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही हे माहित असलं तरी
आपण आपल्या प्रिय वस्तू/व्यक्तीबद्दल असले उद्गार काढत नाही.

सदर लेखातील वर उद्धृत केलेल्या वाक्यानंतर पुढचं काहीही वाचलं नाही. इच्छाच झाली नाही.
बाकीचे का वाचतायत आणि प्रश्नांना उत्तरे का देतायत हे कळत नाही.
असो.... त्यांची मर्जी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ऑर्कुटला टाळे लागू शकते तर ब्लॉगस्पॉटला का नाही लागू शकणार?" >>> खरं आहे इब्लिस.

ऋऽऽन्मेष, नवीन धाग्याबद्दल अभिनंदन. विषय आवडला.

> इथेतिथे शेव-कुरमुरे सारख्या माझ्या पोस्ट आणि चणे-फुटाणे सारखे धागे तुम्ही बघत असालच.
मी बरेच धागे पाहिले आहेत, पण सध्या वेळ नसल्याने वाचन कमी झाले आहे. पण मी ते पाहिले आहेत. असो. हा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने प्रतिसाद लिहीण्यासाठी लगेचच लॉगिन केले.

>१) आवडीचे आणि निवडक लिखाण एका जागी सुरक्षित राहावे, अन्यथा एके दिवशी उठायचो आणि समजायचे > मायबोलीला टाळे लागलेय, कि झाले कल्याण, गेले सारे लिखाण ढगात.
हेही खरे आहे. मीही असाच विचार केला आणि एक वेबसाईट बनवायचं ठरवलं. पण त्यासाठी पैसे लागतात म्हणे. मला तर शत प्रतिशत मुफ्त मधेच वेबसाईट बनवायची होती. काही समजत नव्हतं. अशातच एके दिवशी मला एका दोस्ताने (दोस्ताना नव्हे हां, हा हा हा!) ब्लॉगरबद्दल सांगितलं. त्यानेच मला माझा ब्लॉग बनवून दिला. तेव्हापासून मी बरेचदा माझ्या ब्लॉगवर ब्लॉग लिहीत असे. त्याची लिंक मित्रांना देत असे.

ब्लॉगरवर तुम्ही वर लिहीलेल्या सर्व अटी पूर्ण होतील, आणि तेही शत प्रतिशत मुफ्त मध्ये. तुमच्या प्रत्येक स्वतंत्र ब्लॉग पोस्टवर कितीही लोकांनी कितीही वेळा विचित्र प्रतिसाद दिले, तरी ते तुम्ही घरबसल्या डीलीट करू शकता, आणि तेही शत प्रतिशत मुफ्त मध्ये.

ह्या सर्व सोयींसाठी ब्लॉगरडॉटकॉमला माझ्याकडून ४ स्टार. अर्थात वर म्हटल्याप्रमाणेच मायबोली आणि ओरकूटप्रमाणे ब्लॉगरलादेखील कधी टाळे पडेल हे सांगता येणार नाही, म्हणून एक स्टार कमी दिला आहे. Happy
( थोडं अवांतर - केवळ चित्रपटालाच का रेटींग द्यावे ? एक इन्सान म्हणून आपण ज्या गोष्टींचं मूल्यमापन करतो, त्या सगळ्या गोष्टींना रेटींग का देऊ नये? कधीतरी या विषयावर धागा काढून चर्चा घडवायची आहे. असो..)

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जरूर तुमचा नवा ब्लॉग सुरू करा. तो उत्तम बनेल ह्यासाठी ढेरो शुभेच्छा! Happy

काही लिहायचे मिसले असेल, तर कृपया जाणकारांनी योग्य ती भर टाकावी ही विनंती. येथील माहितीचा फायदा सर्वच ब्लॉग बनवण्यास उत्सुक उमेदवारांना होईल यात शंका नाही.

धन्यवाद आतापर्यंत आलेल्या माहिती सूचनांचे.

दिवाळीचा मुहुर्त चुकेलही कारण तेवढाच बिझी सुद्धा आहे.

वर्डप्रेस किंवा ब्लॉगस्पॉट उद्या दोन्ही ठिकाणी चक्कर मारून बघतो.

मराठी लिहिण्याचा काही प्रॉब्लेम नाही. ते घरी बराहा नोट्पॅडवर लिहितो, तिथूनच कॉपीपेस्ट करायचे आहे, फक्त ब्लॉगवर दिसताना कसे दिसेल, कोणता फाँट वा थीम चांगली हा प्रश्न होता.

मराठी ब्लॉग मध्ये बरेच लेख आणि ब्लॉग दिसताहेत, चाळून निर्णय घेणे सोपे पडावे. लिंकबद्दल धन्यवाद

ब्लॉगमध्ये काही वेगळे विशेष नाही लिहिणार तर इथलेच जे चांगले वाटेल स्वता लिहिलेले ते अधूनमधून वेळ काढून तिथे डकवत जाईल.

आशा करतो, त्या ब्लॉगला कधी टाळे लागू नये, म्हणजे मी मेलो तरी माझ्या पाठी माझे काहीतरी लिखाण राहील.

मायबोलीला टाळे लागलेले असेल हे मी गंमतीनेच म्हणालो होतो, कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मनापासून क्षमस्व !

मायबोली म्हणजे मॅन्युअल गूगल झालयं.

आपल्याला शोधायला वेळ नसेल तर इथे विचारायचे, सर्व माहिती मिळते. काय हव ते विचारा. Proud

Light 1

ब्लॉग काढायचा आहे त्यासाठी आधी ब्लॉग्स वाचा.माबो वर येण्यासाठी जशी माहीती तुम्हाला माबो वर मिळाली त्या त्या साईट्स वर माहीती असते. ती वाचा .तुम्हाला इकडची लोकं मदत करतीलच पण त्या ठिकाणीसुध्दा मद्त मागा .ब्लॉग लिहीणारे मद्त करतील .ब्लॉग साठी शुभेछा.
आणि मायबोलीला टाळे -शुभ बोल रे नार्‍या.(आत्त्ता आत्ता माबोवर आलेय).

पियू छान माहिती आहे .

ऋन्मेऽऽष तुमचा हेतू चांगला आहे ,तुम्ही केलेले लिखाण स्वताच्या ब्लॉग वर असलेले बरे.

Srd, चांगले लेखनमूल्य असलेले आणि नियमितपणे नवीन पोस्ट्स येणारे ब्लॉग्स नक्की वाचले जातात! ब्लॉग हा सार्वजनिक अनुदिनी सारखा असतो. तिथे नवीन वाचायला मिळेनासं झालं की त्यावर भेट देणे कमी होत जाते. सध्या मराठीत कोणता ब्लॉग follow करत नाहीये. पूर्वी करायचे. आता मायबोली पुरते (बरेचदा पुरून उरते)! English मध्ये अलीकडे waitbutwhy (http://waitbutwhy.com/) follow करत्येय!

रच्याकाने, मायबोलीवर हिंदी/मराठी/इंग्रजी मधल्या वाचनीय किंवा तुमच्या आवडत्या ब्लॉग्सची माहिती/लिंक्स देणारा धागा आहे का? नसेल तर कुणी काढेल का?

जिज्ञासा ,शेवटचा मुद्दा पटला वाचनीय ब्लॉगबद्दल तीनचार ओळीत सांगून लिँक देणारा धागा कुणी काढेल का? नाहीतर काय होते युट्युबच्या 'मस्ट वॉच धिस'-छाप व्हिडिओसारखे कंटाळवाणे होते.
इथे मायबोलीवर काहीजण थोडेसे लिहून बाकीचे या- माझ्या -ब्लॉगवर-आणखी -पाहा हे आवडले.

विषयाप्रमाणे ब्लॉगची जंत्री उपयोगी पडेल.
माझ्याकडे डायरीत पंधरावर्षाँचे स्फुट लेखन(हार्ड कॉपी) आहे.त्याला ऋन्मेऽऽषसारखी ब्लॉगची जोड व्यापक प्रसार या दृष्टीने उपयोगी ठरेल.

रच्याकाने, मायबोलीवर हिंदी/मराठी/इंग्रजी मधल्या वाचनीय किंवा तुमच्या आवडत्या ब्लॉग्सची माहिती/लिंक्स देणारा धागा आहे का? नसेल तर कुणी काढेल का?
<<
माझ्या आठवणीप्रमाणे हे असे प्रकरण माबोच्या धोरणाविरुद्ध आहे. इथे येणारा माणूस इतरत्र निघून जावा अशी योजना करणारा धागा नसावा असे मा. अ‍ॅडमिन यांनी पूर्वी स्पष्ट केले आहे. अशाप्रकारचा धागा कानोकानी मधे मात्र निघू शकतो.

माझ्या आठवणीप्रमाणे हे असे प्रकरण माबोच्या धोरणाविरुद्ध आहे. इथे येणारा माणूस इतरत्र निघून जावा अशी योजना करणारा धागा नसावा असे मा. अ‍ॅडमिन यांनी पूर्वी स्पष्ट केले आहे.

>>>>>>>>>>

शक्य आहे,
मी सुद्धा हा धागा काढायच्या आधी सर्च / शोध घेतला तेव्हा नाही सापडला असा कोणताही धागा. तेव्हा किंचित आश्चर्य वाटले, पण कारण हेच असावे.

या निमित्ताने विचारतो ब्लॉग ओळखीचे लोक सोडून कुणी वाचतं का ? >>>>

ब्लॉग मध्ये नियमित चांगले लेखन केले तर वाचक ब्लॉग ला भेट देतात. पण त्यासाठी वाचकां पर्यंत पोहोचणे हे महत्वाचे. त्यासाठी काही ब्लॉग डिरेक्टरी आहेत. तिथे ब्लॉगची नोंद केली कि प्रत्येक नवीन पोस्ट ची झलक त्या डिरेक्टरी वर दिसते. त्या डीरेक्टरी ला भेट देणारे मग ब्लॉग कडे येतात.

ऋन्मेऽऽष यांनी जो महत्त्वाचा प्रश्न मांडला की 'अमुक अमुकला टाळे लागले तर ?' याचा दणका मला दोनदा बसलाय.MSN myspaceवरच्या फोटोंवर पाणी सोडावे लागले.ओपेराचा myopera बंद झाल्याने लेख आणि फोटो काढून घ्यावे लागले खरं म्हणजे myopera फारच सोपे होते त्यामुळे आता फार अपेक्षा ठेवत नाही. आपले लिखाण चारपाच वर्षे कुणी वाचले तरी खूप झाले एवढीच इच्छा बाळगून आहे.

फ्री ब्लॉग साठी दोनच चांगले ऑपशन्स आहेत वर्डप्रेसब्लॉगस्पॉट. मी बराच रिसर्च करुन (दोन्ही ठिकाणि एकेक ब्लॉग करुन बघितले) शेवटी वर्डप्रेस फायनल केले.

http://suhasastrology.wordpress.com/
http://suhasgokhale.wordpress.com/

वर्डप्रेस च्या दोन आवृत्त्या आहेत : फ्री व पेड.
फ्री मध्ये तुमच्या युआरएल मध्ये wordpress.com असे येते जसे myblog.wordpress.com तर पेड वर्शन मध्ये myblog.com असा वेब अॅड्रेस घेता येतो. अर्थातच पेड वर्शन मध्ये अनेक चांगल्या सुविधा आहेत पण सुरवातीला त्याची खरेच आवश्यकता भासणार नाही. सुरवात फ्री पासून करुन नंतर केव्हाही पेड वर्शन मध्ये रुपांतर करता येते.

वर्डप्रेस मध्ये तुम्हाला ब्लॉग चे रंगरुप व मांडणी ठरवण्यासाठी अनेक फ्री डिजाईंस (टेम्पेट्स) उपलब्ध आहेत, पण त्यांच्या कस्ट्मायझेशन ला काही मर्यादा आहेत , 30 ते 200 डॉलर वार्षीक फी मध्ये अनेक स्पेशल थीमस पण घेता येतात. त्या तर खूप छान आहेत,अगदी डोळ्याचे पारणे फेडणार्‍या !

फ्री थीम्स ही उत्तम आहेत, तुमच्या ब्लॉग चा विषय व संभाव्य मजकूर याला अनुरुप अशा असंख्य थिमस आहेत , त्यातही बर्‍या पैकी कस्ट्मायझेशन करता येते. (मी केले आहे , माझा ब्लॉग पहावा). फक्त थीम्सचा जरी विचार केला तरी वर्डप्रेस नंबर 1 आहे.

वर्डप्रेस फ्री मध्ये तुम्हाला भरपूर जागा मिळेल 30 जी बी , मी गेल्या आठ महिन्याच्या वापरात ‌(75 पोस्टस) अवधी 1% जागा वापरली आहे तेव्हा उपलब्ध जागा तुम्हाला अनेक वर्षे किंबहुना तहहयात पुरेल !

कॉमेट्स चे फिल्ट्रिंग अत्यंत उच्च दर्जाचे आहे, इतर टुल्स सहज सोपी आहेत. कोणतेही खास तांत्रिक ज्ञान लागणार नाही.

ब्लॉग वर मराठी लिहणे अगदी सोपे आहे, त्यासाठी मी Marathi Indiac Input 3 ही मायक्रोसॉफ़्टची युटीलीटी वापरतो, ही लहानशी युटीलीटी इंस्टॉलकेली की कोठेही (वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, फेसबुक ,मायबोली इ.) मराठी सहज पणे लिहता येते (म्हणजे आधी कोठेतरी लिहून मग कॉपी पेस्ट करा असा उपद्वयाप करावा लागत नाही), मी ऐरीयल युनिकोड एमेस हा फॉन्ट वापरतो, वळणदार , डेकोरेटीव्ह असे लिख़ाण हवे असेल तर ‘अपराजिता’ हा युनिकोड फॉन्ट चांगला आहे, मायक्रोसॉफ़्ट्चा डिफॉल्ट ‘मंगल’ फॉन्ट ही चांगलाच आहे .

मिळत असलेल्या सुविधा, निवडि साठी उपलब्ध असलेले पर्याय, जसे बजेट असेल तसे तसे सोयी सुविधात भर घालण्याची सोय, लॉंगटर्म स्टॅबीलीटी, भविष्यकालात एका स्वयंपूर्ण वेबसाईट मध्ये रुपांतर करण्याची सोय, उत्तम कस्ट्मर सपोर्ट , अत्यंत जागृत व साह्यकारी युजर कम्युनिटी सपोर्ट या सार्‍यांचा विचार करता वर्डप्रेस हा प्लॅट्फॉर्म ब्लॉगस्पॉट पेक्षा जास्त उजवा वाटतो.

काही अ‍डचण आल्यास विचारा .

शुभेच्छा !

व्वा suhasg. फारच उपयुक्त माहिती.
प्लस वन
मगाशीच आपली पोस्ट पाहिली होती, पण घाईगडबडीत पोचपावती देता आली नाही. माझ्यामते या माहितीच्या आधारे उद्यापरवा दिवाळीचाच मुहुर्त साधत आपण सुचवलेल्या वर्डप्रेसवर ब्लॉग बनवून मग हवे तर त्यात आणखी रंगरंगोटी यथावकाश करता येईल Happy

ऋन्मेऽऽष जी ,करा एक छानसा ब्लॉग सुरु करा, आपले लेखन वाचायला आवडेल, ब्लॉग वर लिहलेल्या प्रत्येक पोष्ट्ला किमान ड्जनभर तरी टॅग्ज द्या त्यात आळस करु नका , हे टॅग्जच सर्व सर्च इंजिन्स वाचतात आणि त्याप्रमाणे तुमच्या ब्लॉग चे इंडेक्सींग होते ,ते एकदा झाले की मग सर्च इंजिनांच्या माध्यमातून (गुगल, बिंग इ.) तुमचा ब्लॉग लोकांना दिसायला लागतो, ब्लॉग तयार झाला की तो सर्व सर्च इंजिनांना सबमीट करा तसे ईंडिब्लॉगर ,ब्लॉगअ‍ड्डा अशा ब्लॉग्ज ची यादी बनवणार्‍या वेबसाईट्स वर तुमचा ब्लॉग रजिस्टर करा म्हणजे ब्लॉगची प्रसिद्धी होऊन अधिकाधिक लोकांपर्यंत ब्लॉग पोहोचेल. सर्व सोशल साईट्स वर (फेबु, ट्वीटर इ.) ब्लॉग ची घोषणा करा ,अपडेट्स देत राहा ,

पण एक महत्वाचे : उत्तम ,दर्जेदार मजकूर द्या , चांगली चित्रे द्या ,सतत बदल करत रहा , त्याला पर्याय नाही आणि लिखाणात सातत्य ठेवा,बास्स ट्रॅफिक आपोआप वाढेल ,

शुभेच्छा !

suhasg , इथे एका दुसऱ्या धाग्यावर विंडोज ८ वगैरेतून मराठी लिहिता न येण्याबद्दल चर्चा चाललीय ती फक्त मायबोलीवर लिहिण्याबद्दल आहे का ?तुम्ही वर दिलेले मंगल ,indiac वगैरे फॉँट वर्डप्रेसशीच सुसंगत आहेत का ?मला लुमिआ ५२५(मोबाइल) घेऊन मायबोली आणि वर्डप्रेस/ब्लॉगर दोन्हीँवर लिहायचे आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. थोडा अवांतर प्रश्न आहे ऋन्मेऽऽष.

Srd ,

मी माझे ब्लॉग वरचे लिखाण किंबहुना इंटरनेट माध्यमातले सर्व लिखाण माझ्या संगणकां वरुन करतो, माझा फोनही ही विंडोज बेस्ड्च आहे पण ती विंडोजची जुनी व्हर्शन ७.८ असल्यामुळे त्यावरुन मराठी लिहता वाचता येत नाही. नव्या विंडोज फोन ८.१ वरुन हे करता येते असा विश्वास आहे पण त्याचा मला अनुभव नाही.

संगणका वरुन ( विंडोज ७ व विंडोज ८.१) वरुन मात्र कोठेही मराठीतून अगदी आरामात (अमूल माचो सारखे) लिहता येते यात शंकाच नाही. मी फायर फाक्स व ऑपेरा असे दोन्ही ब्राऊसर वापरतो कोणतीही अडचण येत नाही. माझे सर्वच काम अगदी ईमेल सुद्धा मराठीतून्च लिहल्या जातात.ईमेल साठी माझे जीमेल अकौट असले तरी ती वाचणे व नवीन ईमेल पाठवणे यासाठी मी मायक्रोसॉफ्ट आऊटलूक वापरतो, पण कोठेही मराठी अगदी सहज लिहता येते . आत्ता ही पोष्ट मायबोली वर , प्रतिसादाच्या चौकटीतच डायरेक्ट टाईप करत आहे. फेसबुक वर सुद्धा माझ्या सर्व कॉमेंट्स , स्ट्याटस अपडेट्स इ. मराठीत असतात तिथेही मी डायरेक्ट टाईप करतो.

bhashaindia.com वरुन marathi India input 3 (विंडोज ७ साठी input २) डाऊन्लोड करुन घ्या (१५ एमबी) , मोफत आहे, लायसेन्स लागत नाही, लिगल आहे. ईन्स्टाल करा. कोठेही मराठीत लिहा , अगदी सोपे. मराठी / ईंग्रजी स्विच (जो मी आत्ताच भाषाईंडिया.कॉम लिहताना केला) एका माऊस क्लिक वर आहे किंवा 'विंडोज की + स्पेसबार' वापरुन क्षणार्धात होतो. टास्क ट्रे मध्ये मराठी / ईंग्रजी चा आयकॉन येतो.

'मंगल' हा मायक्रोसॉफ्टचा स्वतःचा , मोफत दिलेला फॉन्ट आहे, बाकीचे फाँट लायसेन्स वाले आहेत.

ब्लॉग साठी लिहताना मी प्रथम वर्ड मध्ये मजकूर एरियल युनिकोड फाँट मध्ये टाईप करतो, ते तुलनात्मक रित्या जलद गतीने होते मग ते ब्लॉग च्या न्यु पोष्ट च्या एडिट विंडो मध्ये डकवतो. वर्ड मधला मजकूर ब्याकअप म्हणून कामास येतो.

आणखी काही माहीती लागलयास विचारा.

शुभेच्छा !

सुहासजी,
मला तुर्तास ब्लॉग माझे लिहिलेले रेकॉर्डला सेव्ह करून ठेवणे आणि जमल्यास जवळच्या इच्छुक व्यक्तींना वाचायला देता यावे याच हेतूने काढायचा आहे. त्यामुळे आपण पुढे ब्लॉगच्या प्रसिद्धीचे जे फंडे सांगितले आहेत त्यात मला शिरायचे नाही. पुढे मागे चांगले लिहायला लागलो आणि जास्त लोकांपर्यंत लिखाण पोहचावे असे वाटू लागल्यास नक्की तसे करेन, मात्र तोपर्यंत मायबोली झिंदाबाद Happy

आणि हो, मला ऋन्मेषजी नका बोलू, कसेसेच वाटते Wink

एसआरडी, आपली फाँटची चर्चा अवांतर नसून उपयुक्तच आहे.

>>>त्यामुळे आपण पुढे ब्लॉगच्या प्रसिद्धीचे जे फंडे सांगितले आहेत त्यात मला शिरायचे नाही. <<<<

हायला राँग लंबर लागला म्हनायचा , स्वारी बर्का का पावनं तरास दिल्या बद्दल , ( विचार्ल्या वाचून सल्ला दिला की हे अस्से होते, द्येशील पुन्नादा, नाय ना ? )

हा हा.. काय हो, उगाच असले काही बोलून लाजवू नका.. धाग्याचा फायदा सर्वांना .. आणि कोणास ठाऊक मी सुद्धा पुढेमागे हे फंडे वापरेलच Happy

एखादा विचारतो "तळ्यातली कमळं काढायची कशी ?"दुसरा "छोटीशी नाव घ्यायची आणि सकाळी लवकर तोडायची नाव जाणार नाही तिकडे पाण्यात जायचे नाही वेली फार अडकवतात." पहिला "ते वेलींचं नका सांगू फक्त कमळांचं बोला."

एखादा वर्डप्रेस ब्लॉग लिहिला की त्यातील एखादे महत्त्वाचे वाक्य टाकून आपणच गुगल सर्च करून पाहायचे गुगल तिकडे नेतो का. ब्लॉगरचा असेल तर बिंग सर्च करायचा.नाही आले तर टैग्झ बदलायचे.

फायनली ब्लॉग बनवला Happy

http://rishipakoor.wordpress.com/

बस्स ४ पोस्टी टाकल्या आहेत.. त्यांवरच ब्लॉग हा प्रकार काय असतो हे समजून घेताच उरलेल्या पोस्टी धडाधड टाकता येतील.. सध्या तर ब्लॉगला नाव काय द्यायचे हेही सुचेनासे झालेय Sad

इथे सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, पुढे आता शोधाशोध करताना काही अडचणी आल्या तर हक्काने मदत मागेन Happy

नव्या ब्लॉग चे स्वागत व अभिनंदन. छान आहे. ब्लॉग चा अड्रेस आवडला. Happy वेगवेगळ्या थीम्स व विजेट्स ट्राय करा व ब्लॉगला अजून आकर्षक बनवा. शुभेच्छा.

डिविनिता, सुचवल्याबद्दल धन्यवाद,
पण जेव्हा आपण पैश्याच्या आणि कमाईच्या मागे लागतो तेव्हा आयुष्य जगण्याचा आपला मूळ हेतू लोप पावतो.

स्पार्टाकस नक्कीच, इथेही आणि तिथेही, दोन्हीकडचा आपापला मित्रपरीवार राहील.

पण जेव्हा आपण पैश्याच्या आणि कमाईच्या मागे लागतो तेव्हा आयुष्य जगण्याचा आपला मूळ हेतू लोप पावतो>> अहो अॅडसेन्सच्या मागे धावावे लागत नाही, त्याचे ते धावते. अन्‌ मी फक्त सुचवलं

डीविनिता नक्कीच, आपण भल्याचाच विचार केला, म्हणून धन्यवाद आहेतच. Happy

पण तरीही आपण जे आनंद मिळवायला म्हणून करतोय त्यात आपण मागे न धावताही पैसा यायला लागला तरी मग आपल्या डोक्यात ते खेळत राहतेच. अर्थात ते तसे नसेलही, पण मी माझ्या परीने तसा विचार करतो म्हणून आधीच काळजी घेतो Happy

आणि तसेही माझे लिखाण काही उच्च दर्जाचे नाही जे त्यातून चार पैश्याची कमाई होईल, हा एक आणखी वेगळा मुद्दा झाला , म्हणूनही त्या कमाईच्या उल्लेखाने संकोचायला झाले Happy

माझ्या मित्र-मैत्रीणींना ते निवडक लिखाण एकाच लिंक मध्ये वाचायला देता यावे. मायबोलीच्या लिंक द्यायला भितीच वाटते कारण देवा कधी कधी त्या खालचे प्रतिसाद फारच डेंजरस असतात. (याच कारणास्तव आजपर्यंत मी माझ्या गर्लफ्रेंडला देखील माझे काहीच वाचायला दिलेले नाही अरेरे)

--> ब्लोग वर देखील कॉम्मेंत्स येतात हो ... आणि नक्कीच डेंजरस असणार...

ओ लेखनाच्या उच्चनीचते वरून गुगलबाबा पैसे नाय देत वो. हिटा पायजेल. सनसनाटी ल्ह्यायच. ज्यात जीएफ, माझी आई, रुमाल किंवामग कमल हसन/ आमीर इ. प्रसिद्धव्यक्ती ज्याचं फ्यान हैत त्यांना शिव्या द्यायच्या, जे लोक जनरल पब्लिकला आवडत नाहीत असे आवडून घायचे, भारतीय संस्कृतीमधील ऱ्यानडम गोष्टी बद्दल जाज्वल्य अभिमान बाळगायच, सरसकट विरोध न करता पाश्चिमात्यांना क्लासी विरोध करायचा आणि कीवर्ड वापरायचे. वर हे सगळं महितीच नाही हे दाखवतं आपल्यालाच कशी खर्री खुर्र्री तळमळे ते सांगायचं. तुम्ही खरच नाव काढाल.

>>स्पार्टाकस | 21 December, 2014 - 15:09
12
Vote up!
आता सगळं लेखन तिकडेच करा.>> Lol अतिशय कळकळीतून आलेली प्रतिक्रिया.
अमितव Proud

उत्तम ब्लॉग काढायचा असेल, तर अनिता पाटील विचार मंच या ब्लॉगला भेट द्या. माझा आवडतीचा ब्लॉग आहे. ब्लॉगची मांडणी बढिया टाईपची आहे. सगळ्या लेखाच्या लिन्का उघड्या पानाच्या दोन्ही बाजूंना दिसून येतात. पान संपल्यानंतर स्वतंत्र कप्पे दिसून येतात. हा ब्लॉग पाहायलाच पाहिजेल आहे. इतका नीट नेटका ब्लॉग मराठी भाषेत दुसरा दिसून येणार नाही. असे माझे मत आहे. मायबोलीवर या ब्लॉगाचे विरोधक खूप दिसून येतात. एका धाग्यावर चर्चा करताना मला हे जाणवून आले. तरीही ब्लॉगाच्या मांडणीकरिता त्याला भेट द्या.

http://anita-patil.blogspot.in/2014/09/blog-post_16.html

माबोवर स्वतःच्या किंवा इतर ब्लॉग्सची जाहीरातबाजी करायची नाही असे काहीतरी होते ना? ते फक्त कानोकानी मधूनच करु शकतो बहूदा.

पृथा,
धन्यवाद
आपण लिंक दिलेला ब्लॉग खरेच भारी आहे, बहुतेक अशी थीम फ्री नसावी, पैसे पडत असावेत, तसेच ते ब्लॉगस्पॉट आहे, मी वर्डप्रेसला उघडलाय. तरी बघायला हवे, आवडला तो ब्लॉग (तांत्रिकदृष्ट्या).

सेनापती,
कल्पना नाही पण धागा जुना आहे, तसे काही असते तर आतापर्यंत उडवला गेला असता. पण तसेही माझ्यामते प्रत्येकाच्या अकाऊंटला जो तो आपापल्या ब्लॉगची लिंक देत असतोच, तसेच लेखाखालीही काही जणांना आपल्या ब्लॉगची लिंक देताना पाहिलेय. अर्थात तरी अजूनही काही वेगळा अ‍ॅंगल याला असल्यास कल्पना नाही.

Pages