माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस

Submitted by बेफ़िकीर on 20 October, 2014 - 05:16

माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे त्यातील हे तिसरे पत्र तुम्हाला उद्देशून लिहीत आहोत.

त्याचं काय आहे साहेब, की जगात एक राजकारण नावाचे क्षेत्र असते.

ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात कोणीही कोणाचाही नसतो. शिवाय, कोणीही केव्हाही तात्पुरता कोणाचाही असू शकतो. ह्या क्षेत्रात सतत विजयीच होऊ हा विचार त्यागून उतरावे लागते. विजयी झालेल्यांसाठी आपण अत्यंत महत्वाचे ठरू हे येथे प्रत्यक्ष विजय मिळवण्याइतकेच महत्वाचे असते. ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात अनेक थर असतात. सर्वात खालचा थर रस्त्यावरच्या सामान्य नागरिकाशी दररोज संपर्कात येतो. अधले मधले बरेच थर निष्ठावान कार्यकर्त्यांचे व अधल्यामधल्या नेत्यांचे असतात. सर्वात वरचा जो थर असतो तेथे जनतेसमोर आपली असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्षातील आपण ह्यांच्यातील प्रचंड तफावत कौशल्याने मॅनेज करून प्रतिमा तर उत्तमच राहील पण मनासारखेही होईल हे पाहणे अत्यावश्यक असते.

त्याचं काय आहे साहेब, की जगात एक राजकारण नावाचे क्षेत्र असते.

ह्या राजकारण नावाच्या क्षेत्रात कोणालाही गृहीत धरता येत नाही. आपण खंग्री भाषाशैलीत कोणाचीही खिल्ली उडवू शकतो हे ऐकायला लाखोंचा जनसमुदाय समोर तर येतो, टाळ्या आणि शिट्ट्याही वाजवतो, पण मत नाही देत तो आपल्याला! त्याला गृहीत नाही धरता येत. आत्ता व्यासपीठावर असलेला आपला सहकारी उद्या सकाळी दुसर्‍याच व्यासपीठावरून आपल्या नावाने बोंब मारताना दिसू शकतो. ह्या क्षेत्रात आपला खरा शत्रू कोणीही असो, आपला खरा शत्रू कोण असावा ह्याबद्दल जनतेला काय वाटते हे महत्वाचे असते. भाषणे देताना धिंड काढू, खंजीर खुपसला, कोथळे काढू, प्रवेश करू देणार नाही, उलटे टांगू अशी आवेशपूर्ण आश्वासने उधळणे ही जिंकण्याची गुरूकिल्ली नाही साहेब!

राजकारण! राजकारण म्हणून एक असतं साहेब!

ते सारखं बदलत असतं. चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट! बघा ना, शिवाजी पार्कवर मोठ्या साहेबांच्या सभेला झालेली गर्दी पाहून अरबी समुद्रालाही ओहोटी लागत असे. तुमच्याही सभांना तशीच गर्दी होते. पण दरम्यान खूप काही घडलेले असते साहेब! माणूस हुषार झालेला असतो. जागृत झालेला असतो. माध्यमांद्वारे त्याला केव्हाच सगळ्या गोष्टींचा सुगावा लागलेला असतो. ठाकरी भाषा ऐकणे आणि मतदान करणे ह्या त्याच्यामते दोन भिन्न प्रक्रिया असतात. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालांचा अर्थ त्याला घरी टीव्हीसमोर बसून साधेवरण भात खातानाही लागलेला असतो. हा तोच सामान्य माणूस असतो ज्याला वार्‍याची दिशा समजलेली असते. जेथे जेथे निवडणूका होतील तेथे तेथे मतदारांना मोदींच्या पक्षाला मत द्यायची उर्मी होत आहे हे त्याला बसल्या जागी समजलेले असते. पंचवीस जागांवरून मतभेद, वीस जागांवरून मतभेद, दहा जागांवरून, आता फक्त पाच जागांवरून, आता तर फक्त दोन ते तीन जागांवरून, आता फक्त मुख्यमंत्रीपदावरून मतभेद, ह्या सगळ्या बातम्यांचा अर्थ त्याला समजत असतो. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरणारे खिल्लीसंदेश वाचून तो खो खो हासत असतो. आपोआप त्याचे एक मन आणि एक मत बनत असते. जुनाट भाषणांच्या माध्यमांवर आता त्याचे मत बनणे विसंबत नसते. राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक पक्ष ह्यातील नेमका फरक त्याला समजलेला असतो. तो युती तुटण्याचा जितका दोष भाजपला देतो तितकाच, किंबहुना अधिक दोष तुम्हाला देतो कारण तुमच्या पक्षाचा वकूब भाजपसमोर कमी आहे हे त्याला माहीत असते. आंधळे प्रेम नाही करत आता मतदार! अमित शहा मुंबईत येऊन मातोश्रीला गेले नाहीत हे तुम्हाला समजायच्या आधी त्याला समजलेले असते.

राजकारण म्हणून एक असतं साहेब!

मोठ्या साहेबांना आदरांजली म्हणून तुमच्याविरुद्ध एक शब्द बोलणार नाही असे भावनिक आवाहन करणारे मोदी तुमच्या महाराष्ट्रात येऊन तुमच्यापेक्षा जास्त भाव खाऊन जातात. तुम्ही मात्र पवार साहेब आणि चव्हाण साहेबांना सोडून मोदींनाच धोपटत बसता. पंचवीस वर्षांची युती न मोडू देणे ही बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरली असती हे सामान्य माणसाला समजते, पण तुम्हाला आणि अमित शहांच्या इगोला नाही समजत साहेब! तुम्ही मग त्यांना अफजल खान म्हणू लागता. शिवाजी महाराज हे जणू आपल्या पक्षाला संजीवनी द्यायलाच निर्माण झालेले कोणी काल्पनिक पौराणिक व्यक्तीमत्व असावे अश्या थाटात त्यांच्या नावाचा वापर करता. पंकजा आणि प्रीतमला बहिण मानल्याचे सांगून टाळ्या मिळवता. संपूर्ण बहुमताचे आवाहन करता. येडा समजता का साहेब मतदाराला? अहो भावनिक भाषणांचा जमाना केव्हाच संपला! आज तर राणे हारल्याचा आनंद व्यक्त करण्याइतकासुद्धा वेळ नाही आहे मतदारांकडे! राणे हारले त्याक्षणी विस्मृतीतसुद्धा गेले ते!

तुम्हाला माहितीय का साहेब? राजकारण नावाची एक चीज असते चीज!

दोन चार जागा इकडे तिकडे झाल्या असत्या, पण आज तुम्ही किंग ठरला असतात. आता अवस्था अशी आहे की ना तुम्हाला स्वतःला पाठिंबा जाहीर करण्याची हिम्मत होत आहे ना भाजपाला तुमचा पाठिंबा मागण्याची गरज उरली आहे. पण तुमचा इगो आड आला. 'माझ्या शिवसैनिकांची ताकद दाखवून देईन' म्हणत तुम्ही केलेल्या आवाहनांचा परिणाम काय झाला? फक्त १९ जागा वाढल्या. साहेब तुम्हाला एकदा तरी असे वाटले होते का हो की तुम्हाला सुस्पष्ट बहुमत मिळेल? आम्हाला कोणालाही वाटलेले नव्हते. आणि कार्यकर्त्यांचे काय हो साहेब? ज्यांनी आजवर भाजपच्या खांद्याला खांदा लावला, त्यांनी निष्ठा कश्या बदलायच्या एका दिवसात? पंधरा दिवसात स्वबळावर प्रचर करून सहज खिशात घालता येईल इतके लहान राज्य आहे का महाराष्ट्र?

पण एवढे होऊनही एक सांगू का साहेब? की जगात राजकारण नावाची एक गेम असते.

ती गेम तुम्ही नाही खेळलात तरी मुरलेल्या भाजपेयींना खेळावीच लागेल. पुढेमागे ह्याच मतदार मायबापाकडे मत मागायचे आहे हे माहीत असल्यामुळे ते शरद पवार साहेबांचा पाठिंबा नाकारतील. तुम्ही दिलेले शिव्याशाप दुर्लक्षित करतील. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी गळ घालतील. तेव्हा मात्र साहेब, शांतपणे राजकारणच करा हो? इगो इश्यू मध्ये आणू नका. दिल्ली आणि बारामती जोडी जमली तरी मतदार पाच वर्षे तरी काही बोलू शकणार नाहीत. पण तोवर...... सेनेचे काय झालेले असेल साहेब? आणि साहेब, युवराजांना इतक्यात मोठाल्या जबाबदार्‍या नका देऊ असे आपले सुचवावेसे वाटते. काय आहे साहेब, मोठ्या साहेबांनंतर तुमची स्वतःचीच ही पहिली निवडणूक आहे राज्यातील! अजून तुमच करिष्मा पुरेसा सिद्ध झालेला नाही. आणि साहेब, येताजाता शिवरायांना नका मधे आणू!

साहेब, आणखी एक, महाराष्ट्रात शरद पवार नावाची एक चीज असते!

त्यांनी राष्ट्रभर व्याप्ती वाढेल ह्या दृष्टीने काढलेला एक पक्ष आज ४०-४२ जागांवर खंगत पडलेला आहे. तरी अजून ते राजकारणच करत बसले आहेत. तुम्हाला सांगू का? निवडणूकीआधी ह्या साहेबांची काहीही विशेष वक्तव्ये नव्हती, पण मतमोजणीनंतर एकच वक्तव्य त्यांनी केले आणि राजकीय विश्लेषक डोक्याला हात लावून त्याचा अर्थ काढत बसले. ठाकरे साहेब, तुम्ही निवडणूकीपूर्वी बेभान वक्तव्ये केलीत आणि आता एकही वक्तव्य करत नाही आहात. पण तुम्हाला सांगू का? कितीही राजकारण राजकारण म्हंटलं ना साहेब, तरी पवार साहेबांपेक्षा मतदारांनी ह्यावेळी तुमच्यावरच जीव उधळलाय बघा! तुमचा भावनिक सच्चेपणा महाराष्ट्राच्या मातीने पुन्हा एकदा जमेल तितका गौरवला आहे साहेब. तेव्हा, नेहमीच राजकारण करण्यात अर्थ नसतो, एकदा एखादा तडाखा द्यावाच लागतो. नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात! तेवढे राजकारण कराच! फाटूदेत हरामखोरांचे बुरखे! वरून थोरले साहेब आशीर्वाद देतील तुम्हाला!

तेव्हा शेवटचे सांगतो साहेब, फक्त राजकारणच सगळं काही नसतं!

=================================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा

बेफी साहेब,
दिल्ली व बारामती जर एक झाले व थोरले पवार बाद होऊन धाकले जास्त सक्रिय झाले तर एक गोश्ट याद राखा. सेना व काँग्रेस दोन्ही पक्ष मराठी मातीतून हद्दपार होनार.

हीथ मग फकस्त राष्ट्रवादी व भाजप हे दोनच पक्ष दिसणार. उधोजीराजेना दिलेला सल्ला सेनेला महागात पडेल बघा!!!

बेफी, काहि झालं तरी शिवसेनेने जे यश मिळवले आहे ते एक हाती आहे. दुसर्‍या कुणाचा त्याला आधार नाहिय. भले दुसर्‍या पक्षातले काही लोक इकडे येउन निवडुन आले असतील पण शेवटी ते पण या यशाचाच भाग आहे. शिवसेना दुसर्‍या नं लाच असणार होती. हे अगोदर मी कुठे तरी लिहले होते. फक्त मुंबैध्ये ज्या जागा कमी झाल्या तो तेवढा त्यांचा अंदाज चुकला.
सेनेने जो निर्णय घेतला त्यात भली मोठी काही चुक झालिय (युती तुटण्यासाठी) असे कोणाला वाटत असेल तर ते तेवढे बरोबर नाही आहे. एकत्र निवडणुका लढवल्या असत्या तर भाजप + मित्र पुर्ण बहुमत आरामातच मिळाले असते. पण प्रत्येक पान भाजपच्या म्हणन्यानुसार हलले अस्ते. आता सुध्दा सेना कोणत्या अटींवर पाठींबा देते हे महत्य्वाची आहे . इगो पेक्षा दुरदृश्टी खुप महत्वाची ठरणार आहे. किंबहुन भले सेना विरोधी पक्षात बसली तरी ती आपली भुमिका चांगली वठवु शकेल, सत्तेत सामिल होउन दिलेले दान पदरात पाडुन घेन्यापेक्षा. आणि भाजप पण घेउन बघु दे आ राष्ट्रवादी चा बाहेरुन पाठींबा, तेवढे गटस आहेत का ते पण दिसेल.

नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात!>>> +१

शेवटी, आता पक्षाची नावे तेवढी शिल्लक आहेत. विचार्प्रणाली नक्किच नाहित. त्यामुळे 'माझा शिवसैनिक' याचा कितीपत अर्थ घ्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. कारण काल तो राष्ट्रवादी होता, त्याअगोदर काँग्रेस होता आणि भाज पात नसल्यामुळे आज शिवसैनिक आहे. यात पिचतोय तो खरा शिवसैनिक.

भाजप + राष्ट्रवादि + काँग्रेस + शिवसेना + मनसे + अपक्ष यांनी एकत्र येऊन राज्याला स्थीर सरकार द्यावे.चौफेर विकास.

नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात!>>> +१
याला माझाही प्लस वन!
मात्र हा निर्णयही सोपा नाही, हे हि तितकेच खरे.

लेखाबद्दल एकंदरीत बोलायचे झाल्यास बरेपैकी हार्श वाटतो. सारे उगवत्या सुर्यालाच नमस्कार करतात आणि मावळत्याला कोणी विचारत नाही यापैकी वाटतो. पण खरेच शिवसेनेचा सुर्य मावळला आहे का?

माझे उत्तर .. नक्कीच नाही.

कोणी स्विकारा किंवा नाकारा, मोदींची लाट होतीच. याचा फटका सर्वांनाच बसणार होता. आणि शिवसेना वेगळी झाल्याने ज्या प्रमाणात फटका काँग्रेस वा राष्ट्रवादीला बसणे अपेक्षित होते तसाच शिवसेनेलाही बसणे अपेक्षितच होते. याउपरही शिवसेनेने ६३ जागा राखल्या. कुठेही वाताहात नाही झाली हे विशेष. सत्तेत सहभाग नाही घेतला तरी विरोधी पक्षनेता म्हणून ते असणारच, त्यामुळे पक्ष संपणे तर दूरची गोष्ट, लाँगटर्म फटकाही फारसा बसणार नाही.

असो, जर माझ्यासारख्या सामान्यालाही समजते की शिवसेना एकट्याच्या जीवावर १४५ मिळवणे हे स्वप्नातही शक्य नव्हते तर हे उद्धव ठाकरे यांना समजले असणारच. याउपर आजच्या तारखेला भाजपापेक्षा जास्त जागाही मिळवू शकणार नाही याचीही कल्पना त्यांना असणारच. तरीही युती त्यांनी त्यांच्यावतीने एका मर्यादेपर्यंत प्रयत्न करून तुटू दिली. याचा अर्थ काही गणिते यामागे आणखी असणार जी कदाचित पडद्यामागे असतील. युतीत राहून वेळोवेळी पडती भुमिका घेण्याऐवजी आता ते स्वतंत्र पक्ष म्हणून ठाम राहू शकतात. एकदा का भाजपाला सत्तेसाठी सेनेची गरज भासली तर मग ते समीकरण ९०-८० असो वा १२०-६० असो, काही फारसा फरक नाही. भाजपा अपक्षांची मदत घेऊनही १४५ ची फिगर गाठू शकत नाही इथेच शिवसेना जिंकली. विश्वास ठेवा, मनोमन ठाकरे समाधानीच असतील.
आणि म्हणूनच वरच्या वाक्याला देखील प्लस वन दिलेय. हा पत्ताही फेकण्याचा पर्याय आता शिवसेनेकडे आहे.

- माझ्या या पोस्टवर शिवसेनेचा समर्थक असण्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे, पण तो तसा मूळ लेखावरही भाजक समर्थकाचा असल्याचा जाणवतोय Happy

एकच दुरुस्ती करा

उध्द्व साहेबांना जय महाराष्ट्र घाला ( नमस्कार ही पध्दत शिवशाहीत नाही )

शिवशाहीत दोन वेळा जय महाराष्ट्र घातला जातो. साहेबांना आदरयुक्त आणि शिवसेनेला - शिवसेना सोडायच्या वेळेला जसा छगन भुजबळ, नारायण राणे यांनी घातला.

पत्र एखाद्या बुजुर्गाने चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्यासारखा वाटले भाषाही इतर पत्रांच्या तुलनेत सौम्य वाटली. अर्थात हे बरोबरच आहे म्हणा शाब्दिक झोडायला ते कोणी पवार नि गांधी नव्हेत ठाकरे आहेत... शिवसेनेचे उपद्रवमूल्य मोठे हे मात्र खरे.

<< नसली सत्ता तर नसली साहेब, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला घ्यावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यात! >> समजा, ज्या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी आम्ही निवडणूक लढलो, त्या सरकारच्या घटकपक्षांशी हातमिळवणी करणार नाही व शिवसेनेशी चांगला समन्वय असलेली युति शक्य होत नाहीय, अशी भूमिका घेवून भाजपाने सरकार बनवण्यास आपण असमर्थ असल्याचं राज्यपालाना सांगितलं तर ... शिवसेनेचीही अशीच गोची होवूं शकते ! राष्ट्रपति राजवट म्हणजे एक प्रकारें भाजपाचंच सरकार ! Wink

<< पुलोद नं २ ? >> जो सांपळा सेना भाजपासाठी लावूं पहाते आहे त्याच सांपळ्यात सेना स्वतःलाच अडकवून घेईल ? Wink

समजा, ज्या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी आम्ही निवडणूक लढलो, त्या सरकारच्या घटकपक्षांशी हातमिळवणी करणार नाही व शिवसेनेशी चांगला समन्वय असलेली युति शक्य होत नाहीय, अशी भूमिका घेवून भाजपाने सरकार बनवण्यास आपण असमर्थ असल्याचं राज्यपालाना सांगितलं तर >>> भाऊ हे ८५-९० जागाच आल्या असत्या तर भाजपला शक्य होतं पण १२३ जागा असतांना हे करणं जवळपास अशक्य आहे. कारणे:-

१) जनतेने बहुमताच्या एवढे जवळ नेऊन ठेवल्यावर 'खाईन तर तुपाशी नाही तर ऊपाशी' म्हणत सत्तास्थापनेस नकार देणे म्हणजे जबाबदारी झटकणे, जनमताचा ऊपमर्द करणे, ज्याची 'आप' ला दिल्लीत भोगावी लागली तशी फळं भोगावी लागतील.
२) सरकार स्थापन न करणे म्हणजे मोदींचा करिष्मा, लाट, त्सुनामी जे काही आहे ती आम्हाला सत्तेत आणू शकली नाही हे अप्रत्यक्षरित्या मान्य करणे.
३) काही राज्यात लवकरच चालू होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात मोदी/शहांचं अपयश असा प्रचार केला जाईल. तुम्ही अपोझिशन मध्ये आहात तर ६० घेऊन आहात की १२० त्याने फार काही फरक पडत नाही.
४) सत्तास्थापनेसाठी ऊत्सुक अनेक भाजप नेते, कार्यकर्ते आणि कट्टर समर्थकांना एवढा जनाधार असतांनाही अपोझिशनमध्ये का बसायचे हे समजावणे आणि त्यांचा ऊत्साह पुढचे पाच वर्षे टिकवून ठेवणे जिकिरीचे.
५) महाराष्ट्रावर पुन्हा भ्रष्ट आणि मुल्यविरहित सरकार लादण्याचे महापाप भाजपच्या हाताने होईल.
६) शहा आदी मंडळी सरकार आणि मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे आधीच बोलून बसले आहेत. तो शब्द फिरवणे फार अवघड नसले तरी मोदी आणि भाजपच्या सध्याच्या प्रतिमेसाठी लाजिरवाणे असेल.

<< तर भाजपला शक्य होतं पण १२३ जागा असतांना हे करणं जवळपास अशक्य आहे. >> चमनजी, मीं तुमच्याशीं १००%टक्के सहमत आहे. पण सेनेने फारच अडवणूक केली तरच त्यांच्यावर डाव उलटवण्यासाठी भाजपा असेही टोंकाचे डांवपेंच लढवण्याची एक शक्यता दाखवली इतकंच. तसं झाल्यास, सेना काँग्रेसबरोबर सत्तेत आली किंवा येण्यास नकार दिला तरीही दोष भाजपापेक्षां सेनेकडेच जाण्याची शक्यता बळावते ! Wink

<पंचवीस वर्षांची युती न मोडू देणे ही बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरली असती हे सामान्य माणसाला समजते> +१००

निवांत पाटील, प्रतिसाद एकदम पटला. विशेषतः
>>> एकत्र निवडणुका लढवल्या असत्या तर भाजप + मित्र पुर्ण बहुमत आरामातच मिळाले असते. पण प्रत्येक पान भाजपच्या म्हणन्यानुसार हलले अस्ते. <<<
हे वाक्य.

<< एकत्र निवडणुका लढवल्या असत्या तर भाजप + मित्र पुर्ण बहुमत आरामातच मिळाले असते. पण प्रत्येक पान भाजपच्या म्हणन्यानुसार हलले अस्ते.>> याला दुसरीही बाजू आहेच; सेनेबरोबरच्या युतिमुळेच मुख्यतः भाजपा महाराष्ट्रात उभा आहे या इथं रुजलेल्या संकल्पनेला युति तुटल्यामुळें सुरूंग लागला आहे, हेंही विसरतां येणार नाही. त्या खर्‍या किंवा भ्रामक संकल्पनेच्या प्रभावामुळे युति न तोडतां एकत्र निवडणूक लढवून मिळालेल्या निर्विवाद बहुमतात कदाचित शिवसेनेची वट आतांपेक्षां अधिकही राहिली असती.

भाऊ, सेनेबरोबरच्या युतिमुळेच मुख्यतः भाजपा महाराष्ट्रात उभा आहे या इथं रुजलेल्या संकल्पनेला युति तुटल्यामुळें सुरूंग लागला आहे, >>>> लोकसभेच्या अगोदर याचा अंदाज घेणेत आला होता. आता हिंदुत्वात (म्हणजे काय ते मला अजुन समजले नाही) वाटेकरी नको आहे कि काय अशी पुसटशी कल्पना चाटुन जाउ लागली आहे.

बाकि अजेंडा नविन पध्दतीने लिहायचे काम सुरु होउन बरेच दिवस झालेत. भाजप चा सर्वे मॉडेल हा सध्या खुपच सरस आहे.

भाऊ,
शिवसेना महाराष्ट्रात तशीही मुंबई, कोकण आणि क्वचित नाशिक एवढ्याच भागात होती आणि त्यापलिकडे पोचू शकली नाही कधीच.

>>> सेनेबरोबरच्या युतिमुळेच मुख्यतः भाजपा महाराष्ट्रात उभा आहे या इथं रुजलेल्या संकल्पनेला युति तुटल्यामुळें सुरूंग लागला आहे, <<<
शिवसेनेचा जोर नसलेला बाकीचा महाराष्ट्र काँग्रेसीच होता ना बराचसा. युतीपूर्वी महाराष्ट्राच्या नकाशात भाजपा किती होता? होता की नाही? (मला नक्की माहिती नाहीये म्हणून विचारतेय.)
पश्चिम महाराष्ट्रात कुठेही लोकसभेला भाजपा विजयी झाल्याचे बहुतेक यावेळेस पहिल्यांदाच घडले असेल. मी मतदान करायला लागल्यापासून पुण्याची लोकसभेची सीट भाजपाला मिळाल्याचे आठवत नाही.
तेव्हा जी संकल्पना रूजली होती त्यात तथ्य नव्हतेच असे म्हणता येणार नाही पण अर्थात या निवडणुकांच्या दरम्यान ती संकल्पना खोटी ठरली.

सडेतोड लिहायलाच पाहिजे काय. ? इथले सो कॉल्ड भाजप समर्थक लिहु देत ना त्यांच्या त्यांच्या डेफिनेशस्न...

नीधपः पश्चिम महाराष्ट्रात मतदान पक्षानुसार होत नाही. व्यक्तिनुसार होते. आज निवडुन आलेले भाजपचे आमदार (ज्यांनी माजी गृह राज्य मंत्र्यांचा पराभव केला) एका विद्यमान काँग्रेसच्या आमदाराचे पुत्र आणि या लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांचे चुलत भाउ आहेत.

त्यामुळे पक्ष रुजला असा काही प्रकार नाही आहे. आता कोल्हापुरात काँग्रेस नावाला देखिल नाहिय. पण अजुन ५ ते ७ वर्षात परत काँग्रेसच दिसेल कोल्हापुरात Happy

नीधप,
<< तेव्हा जी संकल्पना रूजली होती त्यात तथ्य नव्हतेच असे म्हणता येणार नाही >> ती संकल्पना खरी कीं भ्रामक होती हा मुद्दाच नाहीय; युति तुटली नसती तर कदाचित त्या संकल्पनेच्या प्रभावामुळे आतांपेक्षां सेनेची वट अधिक राहिली असती, एवढाच माझा मुद्दा आहे व तोही << एकत्र निवडणुका लढवल्या असत्या तर भाजप + मित्र पुर्ण बहुमत आरामातच मिळाले असते. पण प्रत्येक पान भाजपच्या म्हणन्यानुसार हलले अस्ते.>> या संदर्भात.

Pages