येताच शिशिर गेले पांगून लोक सारे

Submitted by इस्रो on 19 October, 2014 - 09:42

घेतील आज माझे ऐकून लोक सारे
जातील मग उद्या ते विसरुन लोक सारे

रस्त्यामधे भुकेल्या पाहून याचकाला
जाती कसे सुसंस्कृत लांबून लोक सारे

सोबत हवीहवीशी वाटे सदा जयांची
जातात तेच लवकर सोडून लोक सारे

मतदान फारसे ना करती इथे कुणी पण
अभिप्राय मात्र देती भांडून लोक सारे

संपून डिंक जाता ते लावतात थुंकी
नेतात वेळ ऐशी मारुन लोक सारे

बोलावयास आतुर होते म्ह्णे किती ते !
जखमेस मीठ गेले चोळून लोक सारे

होता वसंत जेव्हा होते समीप माझ्या
येताच शिशिर गेले पांगून लोक सारे

-नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होता वसंत जेव्हा होते समीप माझ्या
येताच शिशिर गेले पांगून लोक सारे>>>>>>.जबरदस्त आहे आणी अतीशय समर्पक आहे.