मनस्वी

Submitted by सुमुक्ता on 14 October, 2014 - 05:38

शरण मी परिस्थितीस कायम
मनास सामोरी गेलेच नाही
वाकवीत राहिले दैव मला
मी मनस्वी कधी झालेच नाही

वाट आली जी पायाखाली
तिलाच आपली म्हणत गेले
दूर मागे राहूनी गेली
घ्यायची होती जी वळणे

मनाच्या कोपऱ्यात एका
जमविली स्वप्ने वेगवेगळी
मी सांधायास गेले परंतु
चित्र कधी जमलेच नाही

नव्हते कधीच मी दुःखीकष्टी
भोग कोणते भोगत नव्हते
असंख्य होते सगेसोयरे
साथीला केवळ मन नव्हते

मन आजही खुणावीत आहे
आयुष्याच्या या वळणावर
एकवटूनी माझे धैर्य सारे
काय मी मनस्वी होणार आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users