Submitted by निशिकांत on 13 October, 2014 - 11:46
का कुणासाठी उगा उमलायचे?
अन् उद्या निर्माल्य होउन जायचे
बंद ज्येष्ठांनो करा सांगायचे
येथुनी पुढती अता ऐकायचे
कासरा हाती दिला आहे तुझ्या
दावल्या वाटेवरी चालायचे
अंध प्रेमाची मजा लुटल्यावरी
व्यर्थ का डोळे अता उघडायचे?
लावला कबरीवरी कोणी दिवा?
चाहुलीने आत झंकारायचे
तत्व तुमचे का कुणावर लादता?
वागतिल ज्यांना जसे वागायचे
जे मना पटते तसे वागावया
लोक म्हणतिल काय हे विसरायाचे
खोदली मोठी कबर माझ्या मनी
आठवांचे खोल क्षण दफनायचे
तंत्र हे कोणी दिले "निशिकांत"ला?
दु:ख, आनंदे कसे सोसायचे
निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! सुंदर
व्वा !
सुंदर
अंध प्रेमाची मजा
अंध प्रेमाची मजा लुटल्यावरी
व्यर्थ का डोळे अता उघडायचे?<<< चांगला खयाल, छान शेर!
लावला कबरीवरी कोणी दिवा?
चाहुलीने आत झंकारायचे<<< असे शेर रचताना त्यातील पार्श्वभूमीवर विचार करायला हवा असे मला तरी वाटते. कबर, शम्मा ही आपली (म्हणजे हिंदूंची किंवा मुस्लिमेतरांची) संस्कृती नाही. संस्कृती आपली नसेल तर त्या संस्कृतीतील शेर आपल्याला का रचावासा वाटला ह्याचे कोठेतरी लहानसे तरी समर्थन यावे अशी अपेक्षा! नाहीतर मग उर्दू अनुवादित शायरी वाचल्यासारखे वाटेल.
माझा एक मक्ता होता:
जाळले 'बेफिकीर' हिंदूंनी
शायरी तेवढी दफन केली
ह्यात असे म्हणायचे आहे की:
जे बेफिकीर हिंदू होते त्यांनी मी गेल्यावर माझे शव हिंदू प्रथेप्रमाणे जाळले, पण माझ्या शायरीचा बाज उर्दू असल्यामुळे माझी शायरी तेवढी पुरून टाकली. (हिंदूंना बेफिकीर हे विशेषण अश्यासाठी की शायरी माझीच आहे म्हंटल्यावर मलाही शायरीप्रमाणेच पुरायलाच हवे होते, पण तेथे धर्म आडवा आला).
ह्या मक्त्यात दोन संस्कृतींची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्याचा निदान एक दुवा तरी आहे.
ह्यावर विचार व चर्चा व्हावी अशी इच्छा!
निशिकांतजी - माझ्या ह्या प्रतिसादामुळे कृपया दुखावले जाऊ नयेत अशी विनंती!
बेफिकीरजी, कबरीवरच्या
बेफिकीरजी,
कबरीवरच्या दिव्याचा शेर रचताना माझ्या मनात फक्त एकच विचार होता आणि तो म्हणजे मेल्यावरही प्रियकराविषयीची किंवा प्रेयसीविषयीची ओढ संपत नाही. म्हणून ती किंवा तो कबरीवर दिवा लावायला आला की खोल कबरीत झंकार होतो हे मला सुचवायचे होते. अर्थात हे सांगण्यातही मी कितपत यशस्वी झालो हे मला कळत नाही. प्रयत्न मात्र या दिशेने होता.
आपण दिलेला प्रतिसाद मला एक मोलाच विचार देऊन गेला हे निश्चित. या दृष्टीकोनातून मी कधीच विचार केला नव्हता. आता नक्की प्रयत्न करेन. आपला गझल क्षेत्रातला आधिकार निर्विवाद आहे म्हणून आपल्या मतप्रदर्शनामुळे गैरसमज व्हायचा प्रश्नच नाही हे मी अगदी मनापासून नमूद करू इच्छितो. मनापासून आभार आपले.
लावला कोणी असे प्रश्नार्थक
लावला कोणी असे प्रश्नार्थक करण्याऐवजी लावता कोणी असे केले तर फरक पडेल बहुधा
पण खालची ओळ स्वतंत्रपणे वाचता आज्ञार्थी वाटते आहे हाही एक प्रॉब्लेम असावा
वैवकु. आपली सुचना रास्त आहे
वैवकु.
आपली सुचना रास्त आहे आणि आवडली. वहीत बदल करून घेतला आहे. धन्यवाद.
अंध प्रेमाची मजा
अंध प्रेमाची मजा लुटल्यावरी
व्यर्थ का डोळे अता उघडायचे?
छान…